[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]
राजा जनमेजय म्हणाला, "हे मुने, चंडिकेचे माहात्म्य आपण मला उत्तम रीतीने सांगितले. हे दयानिधे, आता ह्या तिन्ही चरित्रांनी भगवतीचे पूर्वी आराधन कोणी केले व तिने प्रसन्न होऊन कोणाला वर दिला ? मनोरथ परिपूर्ण करणार्या हा देवीचे आराधन करून कोणाला मोठे फल प्राप्त झाले ? हे आपण कथन करावे. हे ब्रह्मन, हे महाभाग्यवान मुने, देवीचा उपासनाविधी, पूजाविधी व होमविधी ह्याविषयी सविस्तर सांगा."
व्यास म्हणाले, "पूर्वी स्वारोचिष मध्यंतरामध्ये सुरथ नावाचा राजा होऊन गेला. तो उदार प्रजापालनाविषयी तत्पर, सत्यवचनी, कर्मनिष्ठ, ब्राह्मणांची पूजा करणारा, गुरुभक्त, दानशील, कोणाशीही शत्रूत्व न करणारा आणि धनुर्वेदामध्ये अत्यंत पारंगत होता. तो राजा राज्य करीत असता एकदा म्लेंच्छांनी चतुर्विध सैन्य जुळवून त्याच्याशी शत्रुत्व सुरू केले.
गज, अश्व, रथ व पदाती ह्यांसह मदमत्त झालेले ते म्लेंच्छ केवळ त्याचे राज्य हरण करण्याविषयीच तत्पर राहिले. युद्धनीतीची पर्वा न करता केवळ अन्यायानेच त्याचे राज्य घेण्यास ते तयार झाले. ते त्याच्या कोला नावाच्या राजधानीवर चाल करून आले. तेव्हा सुरथराजा सैन्य घेऊन त्यांच्या संमुख गेला. त्या वेळी त्या भयंकर म्लेंच्छांशी त्याचे घोर युद्ध झाले.
म्लेंच्छांचे सैन्य थोडे होते व राजाचे सैन्य मोठे होते. पण युद्धामध्ये त्यांचाच जय होऊन दैवयोगाने राजाचा पराजय झाला. पराजित झालेला तो राजा किल्ल्याप्रमाणे मजबूत व सुरक्षित असलेल्या आपल्या नगराप्रत परत आला.
तो नीतिनिपुण बुद्धीमान राजा प्रधानांनी शत्रुपक्षाचे अवलंबन केल्याचे पाहून खिन्न झाला. तो मनात म्हणाला, आता ह्या प्रसंगी खंदक व किल्ले ह्यांनी युक्त असलेल्या विस्तीर्ण स्थानाचा आश्रय करीत बसावे की युद्ध करावे ? राजा विचार करू लागला. कदाचित् शत्रूपक्षाला मिळालेले हे दुराचारी मंत्री मला पकडून शत्रूच्याही स्वाधीन करतील, मग माझे काय होईल ?
पापबुद्धी पुरुषावर कधीही विश्वास ठेवू नये. कारण लोभाविष्ट झालेले पुरुष काय करणार नाहीत ? सांप्रत शत्रूपक्षाचे अवलंबन केलेल्या ह्या अत्यंत पापी मंत्रीवर्गावर मुळीच विश्वास ठेवता उपयोगी नाही."
असा विचार करून अत्यंत खिन्न झालेला तो राजा एकटाच अश्वारूढ झाला व कोणालाही नकळत नगरातून बाहेर पडला. असहाय स्थितीत बाहेर पडल्यानंतर तो गहन वनामध्ये गेला. तीन योजने अंतरावर तपस्वी सुमेधा मुनीचा आश्रम आहे असे जाणून तो राजा तिकडे गेला.
तो आश्रम नदी सन्निध होता. कोणाशीही वैर न करणार्या श्वापदांनी तो व्याप्त होता. कोकिलपक्ष्यांच्या शब्दांनी तो भूषित होता. शिष्यांच्या अध्ययन ध्वनीने तो युक्त होता. मृगांच्या शेकडो कळपांनी तो गजबजलेला होता. तो नोवारधान्याच्या चांगल्या पिकांनी युक्त होता. उत्कृष्ट पुष्पफलांनी युक्त असे वृक्षही त्यात होते. होमधूमाच्या सुगंधाने तो प्राण्यांना सर्वदा आनंद देणारा होता. वेदध्वनीने तो व्याप्त झालेला होता. तो स्वर्गापेक्षाही मनोहर होता.
तो आश्रम पाहून राजा आनंदित झाला. निर्भय होऊन त्या द्विजाश्रमात विश्रांती घेण्याचे त्याने मनाशी ठरविले. नंतर तो विनयसंपतन्न राजा एका झाडाला घोडा बांधून आत गेला. तेथे सालवृक्षाच्या छायेखाली ते मुनी बसले आहेत असे च्याच्या दृष्टीस पडले.
तपश्चर्येमुळे अतिशय कृश परंतु मनाने सरळ व शांत असलेले ते मुनी कृष्णाजिनावर बसलेले होते. वेदशास्त्रांचे रहस्य ते जाणीत होते. त्यांना क्रोध, लोभ इत्यादिकांचा स्पर्श नसून शीतोष्णादिक द्वंद्वांचे त्यांनी अतिक्रमण केलेले होते. मत्सररहित असलेले ते मुनी आत्मज्ञानाविषयी तत्पर, सत्यवादी व शमसंपन्न होते. त्यांना पाहून राजाने साष्टांग नमस्कार घातला. तेव्हा त्या मुनींचे नेत्र भरून आले, समोर उभा असलेल्या त्या राजाला ते म्हणाले, "उठ, तुझे कल्याण असो." ते मुनींचे शब्द ऐकून तो उठला. नंतर शिष्याने त्या राजाला बसावयास आसन दिले. त्यांच्या आज्ञेने तो राजा आसनावर बसला. त्या सुमेधामुनींनी अर्घ्यपाद्यांनी त्याचे यथाविधी पूजन केले.
नंतर ते म्हणाले, "तू कोण आहेस ? कोठून आला आहेस ? तू चिंताक्रांत का आहेस ? तू आपल्या दु:खाचे कारण सांग. तुझा मनोरथ असाध्य असला तरी मी तो शेवटास नेईन
राजा म्हणाला, "मी सुरथ नावाचा राजा आहे व शत्रूंनी माझा पराजय केल्यामुळे राज्य, गृह व भार्या ह्यांचा त्याग करून आपणाला शरण आलो आहे. हे ब्रह्मन्, आपण जशी आज्ञा कराल तसा मी वागेन. हा भूतलावर आपल्याशिवाय माझा कोणीही त्राता नाही. शत्रूंपासून मला भय प्राप्त झाल्यामुळे मी आपल्या सन्निध आलो आहे. हे मुनिश्रेष्ठ, हे शरणागतवत्सल, आपण माझे रक्षण करा.
ऋषी म्हणाले, "हे राजेंद्र, तू येथे निर्भयपणे रहा. ह्या ठिकाणी तुझे बलाढ्य शत्रू येणार नाहीत. हे नृपश्रेष्ठा, येथे हिंसा मात्र करावयाची नाही. नीवार, फळे, मुळे अशा प्रशस्त पदार्थांवर वनवृत्तीने उपजीविका करावी लागेल. "
हे त्याचे भाषण ऐकून तो राजा निर्भय झाला. शुचिर्भूत होऊन व फलमूलांवर उपजीविका करून तो त्या आश्रमात राहिला.
एकदा तो राजा त्या आश्रमात वृक्षछायेचा आश्रय करून बसला असता घराकडे लक्ष गेल्यामुळे चिंताक्रांत होऊन विचार करू लागला.
पापनिष्ठ म्लेंच्छशत्रूंनी माझे राज्य हरण केले. त्या निर्लज्ज व दुराचारी म्लेंच्छांमुळे लोकही त्रस्त झाले असावेत यात संशय नाही.
माझे सेवक शत्रूच्या अधीन झालेले आहेत. पूर्वी मी त्यांचे परिपालन केले असूनही सांप्रत ते मला दुःख देण्यास उद्युक्त झाले आहेत. केवढे हे आश्चर्य ! त्या अत्यंत दुराचारी शत्रूंनी द्यूत, मद्य, वेश्या इत्यादि दुर्व्यसनात माझे द्रव्यही खर्चून टाकले असेल ते म्लेंच्छ व ते माझे मंत्रीही पापबुद्धी असल्यामुळे सत्याने वागणारे नाहीत. वृक्षाच्या छायेत राजा असा चिंताक्रांत होऊन बसला असता कोणी एक वैश्य दु:खित होऊन अकस्मात् तेथे आला. राजाने त्याला आपल्याजवळ बसविले व त्याला विचारले, "तू कोण आहेस ? कोठून आला आहेस ? तुझी जात काय आहे ? तू दीन असून शोकाकुल का झाला आहेस ? तुझी मुद्रा अशी निस्तेज का झाली आहे ? महाभाग्यवान् मनुष्या, मैत्री सात पावले बरोबर गेल्यानेही होत असते. सांप्रत तू माझा मित्र झालास. तेव्हा तुझ्या दु:खाचे मला कारण सांग."
राजाचा हा प्रश्न ऐकून तो वैश्य आसनावर बसला. स्थिर होऊन व आपल्याला साधुसमागम झाला आहे असे समजून त्या सुरथाला म्हणाला, "हे मित्रा, मी वैश्यजातीचा असून समाधी ह्या नावाने प्रसिद्ध आहे. मी धनाढ्य, धर्मनिपुण, सत्यवचनी व निर्मत्सर असतानाही धनतुल्य व दुर्जन असलेल्या माझ्या पुत्रकलत्रांनी व स्वजनांनी माझा त्याग केल्यामुळे मी वनामध्ये आलो आहे. आता हे प्रिया तू कोण आहेस ते कथन कर. तू मला मोठा भाग्यवान दिसतोस."
राजा म्हणाला, "मी सुरथ राजा असून हल्ली चोरांनी मला पीडले आहे. मंत्र्यांनी फसवल्यामुळे माझे राज्य नाहीसे झाले आहे. हे वैश्य, तू मात्र सुदैवाने मला मित्र मिळाला आहेस. हे महाबुद्धिमान वैश्या, आपण शुभ वृक्षांनी युक्त असलेल्या ह्या वनामध्ये सुखाने विहार करू. तू शोकाचा त्याग कर."
वैश्य म्हणाला, "हे राजा, माझ्या कुटूंबाला आता कोणाचाही आधार नाही. माझा वियोग झाल्यामुळे ते अत्यंत दु:खित, चिंताक्रांत आणि शोकाने त्रस्त होऊन जातील. भार्येला सुख नसेल अशा चिंतेने व्याप्त झाल्यामुळे माझ्या चित्ताला स्वस्थता प्राप्त होत नाही. हे राजा, पुत्र, भार्या यांना मी केव्हा पाहीन ?"
राजा म्हणाला, "हे महामते, ज्या दुर्वर्तनी व अत्यंत बालिश पुत्रादिकांनी तुझा त्याग केला त्यांना पाहून तुला काय सुख होणार आहे ? हितकारक शत्रु श्रेष्ठ होय, परंतु जे मित्र असून दु:खदायक आहेत त्यांना सुहृद कसे म्हणावे ? तू आपले मन स्थिर कर व माझ्याबरोबर विहार कर."
वैश्य म्हणाला, "हे राजा, हे माझे मन कुटुंबाच्या चिंतेने अत्यंत दु:खित झाल्यामुळे स्वस्थ रहात नाही." राजा म्हणाला, "माझ्याही मनाला खरोखर राज्यासंबंधी दु:ख त्रास देत आहे. म्हणून आपण दोघेही समदु:खी आहो. तेव्हा आज मुनीला शोकनाशक असे काहीतरी औषध विचारू." असे ठरवून दोघेही मुनीकडे गेले. शोकाचा नाश होण्याचे औषध विचारण्यासाठी त्यांनी मुनींना प्रणिपात केला. शांतचित्ताने ते दोघेही बसल्यावर मुनींनी त्यांना येण्याचे कारण विचारले.