[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]
रणामध्ये गेल्यानंतर धनुष्य हातात घेऊन जगदंबिकेला भेडसावण्याकरता निशुंभाने बाणवृष्टी केली. चंडिकेनेही बाण टाकीत असलेल्या निशुंभाला पाहून आपले धनुष्य हाती घेतले.
ती कालिकेला म्हणाली, "हे काली, ह्यांचा मूर्खपणा पहा. हे दोघेही केवळ मरणाकरताच आले आहेत. अनेक दैत्य वध आणि रक्तबीजाचा नाश अवलोकन करूनही माझ्या मायेने मोहित झाल्यामुळे हे जयाची अशा करीत आहेत. आशा ही बलवत्तर आहे. पुरुष जरी पराजित झाला, त्याचे बल नाहीसे झाले, धुळीला मिळून तो निश्चेष्ट झाला तरी आशा त्याला सोडीत नाही.
हे काली, आशापाशाने जखडून गेलामुळे युद्धाकरता आलेल्या ह्या शुभानिशुंभाचा वध केलाच पाहिजे. हे मुमर्षू मोहित झाल्यामुळे येथे आले आहेत. आज सर्व देवांसमक्ष मी ह्याचा वध करीन."
असे सांगून चंडीने कानापर्यंत धनुष्य ओढून विविध बाणांनी उभ्या असलेल्या निशुंभाला आच्छादित केले. तेव्हा त्या दानवानेही तीक्षा बाणांनी तिचे बाण तोडले. त्यावेळी त्यांच्यामध्ये अतिभयंकर युद्ध झाले.
सरोवरात प्रविष्ट होणार्या गजाप्रमाणे तो बलाढ्य सिंहही आपले मानेवरील केश हालवीत सैन्यसागरात प्रविष्ट झाला. नखे व दंतप्रवाह ह्यांच्या योगाने मदमत्त गजांप्रमाणे उभ्या असलेल्या दानवांचे लचके तोडून त्यांना खाऊ लागला. ह्याप्रमाणे तो सिंह सैन्याचा नाश करू लागला. तेव्हा आपले धनुष्य खेचून निशुंभासूर तिकडे धावला. इतरही अनेक क्रुद्ध झालेले दैत्य डोळे लाल करून दातओठ खात देवीचा वध करण्यासाठी पुढे धावले. कालिकेचा वध करून जगदंबिकेला पकडण्याकरता सैन्यासह तो शुंभ वेगाने तेथे गेला. ती रौद्र व शृंगाररसांनी युक्त व सौंदर्यसंपन्न अशी अंबिका त्याच्या दृष्टीस पडली. विस्तीर्ण व आरक्तवर्ण नयन आणि क्रुद्ध दृष्टी ह्यांनी युक्त असलेल्या त्या श्रेष्ठ त्रैलोक्यसुंदरीला अवलोकन करून त्याने विवाहाची इच्छा सोडून दिली. त्याने मरणाचा निश्चय केला व धनुष्य सज्ज करून तो तिच्यापुढे येऊन उभा राहिला.
त्या दानवाला देवी म्हणाली, "हे पामरहो, जीविताची आशा असल्यास ही तुमची सर्व आयुधे तेथेच टाकून द्या. तुम्ही पाताळात अथवा सागरामध्ये जा. हे रुचत नसल्यास माझ्या बाणप्रहारांनी संग्रामामध्ये मी तुमचा वध करीन. स्वर्ग प्राप्त झाल्यावर तुम्ही सर्वच निश्चिंत होऊन तेथे सुखाने क्रीडा करा. भित्रेपणा व शौर्य ही एकत्र रहाणे शक्य नाही. मी तुम्हाला अभयदान देते. तुम्ही सर्वही येथून निघून जा."
हे तिचे भाषण श्रवण करून मदमत्त झालेल्या निशुंभाने आठ चंद्रानी युक्त असलेली ढाल व तीक्ष्ण तरवार हातात घेतली. वेगाने धावत जाऊन मदमत्त सिंहावर व जगदंबिकेवर त्याने खड्गाचा प्रहार केला. परंतु देवीने आपल्या गदेने तो खड्नप्रहार चुकवून कुर्हाडीने त्याच्यावर प्रहार केला. त्या मदमत्त असुरावर तिने खड्गप्रहार केला. पण त्या वेदना सहन करून त्याने चंडिकेवर प्रहार केला तेव्हा घोर घंटानाद करून त्या निशुंभाचा वध करण्याचा इच्छेने तिने सुरापान केले.
परस्परांच्या पराजयाची इच्छा करणार्या देवदानवांच्या वतीने त्या उभयतांमध्ये भयंकर युद्ध झाले. तेव्हा मांसभक्षक क्रूर पक्षी, श्वान, जंबूक, गुहा, कंक व वायस अतिशय संतुष्ट होऊन नृत्य करू लागले. गज व अश्व यांच्या देहांनी व्याप्त झालेल्या रणभूमीवर रक्तस्रावयुक्त असुरशरीरे इकडे तिकडे पडली.
दानव पडल्याचे अवलोकन करून निशुंभाला क्रोध आला. भयंकर गदा घेऊन तो चंडिकेवर धावला. मदमत्त झालेल्या निशुंभाने सिंहाच्या मस्तकावर गदेचा प्रहार केला आणि देवीवर आघात केला.
तेव्हा देवी अत्यंत क्रुद्ध झाली. प्रहार करण्याच्या उद्देशाने उभा असलेल्या निशुंभाला अवलोकन करून ती म्हणाली, "हे मूढमते, उभा रहा. मी हे खड्ग तुझ्या मानेत खुपसते म्हणजे तू सत्वर यमसदनी जाशील." असे सांगून कालिकादेवीने खड्गाच्या योगाने त्या निशुंभाचे मस्तक तोडले. तेव्हा देवीने शिरच्छेद केला असताही, हातामध्ये गदा घेतलेले ते त्याचे भयंकर धडच देवगणांना त्रस्त करीत सर्वत्र भ्रमण करू लागले. परंतु देवीने तीक्ष्ण बाणांनी त्या धडाचे हातापाय तोडले. तेव्हा तो पर्वततुल्य राक्षस गतप्राण झाला.
ते पाहून शुंभासुर फार खिन्न झाला. परंतु निकराने युद्ध करून या देवीचा आता वध केला पाहिजे असा निश्चय करून तो शस्त्रास्त्रांची तयारी करण्याकरता आपल्या मंदिराकडे गेला. तो भयंकर पराक्रमी निशुंभ दैत्य पडला असता त्याल्या सैन्यामध्ये हाहाःकार उडाला. रक्ताने भरलेले त्याचे सर्वही सैनिक आयुधे टाकून राजमंदिराकडे गेले. ते आलेले पाहून तो शत्रुनाशक शुंभ म्हणाला, "निशुंभ कोठे आहे ? तुम्ही कसे परत आला ?"
हा राजाचा प्रश्न ऐकून सैनिक म्हणाले, "हे राजा, तुझा भ्राता रणभूमीवर मरून पडला आहे. त्या देवीने सर्व शूरांचा व तुझ्या भ्रात्याचा वध केला हे तुला सांगण्यासाठी आम्ही आलो आहे. हे राजा, त्या चंडिकेने निशुंभाचा वध केला. देवकार्यासाठी ही कोणीतरी अनिर्वचनीय स्त्री दैत्यकुलाचा वध करण्याकरताच प्राप्त झाली आहे. दैव तुला अनुकूल नाही.
ही साधारण स्त्री नसून अनुपम देवी शक्ती आहे. हिचे चरित्र अचिंत्य आहे. देवतांनाही हिचा थांग लागणे शक्य नाही. अनेक रूपे, विचित्र भूषणे सर्व आयुधे धारण करणारी ती देवी मायेचे रहस्य जाणण्यास निपुण आहे. तिचे चरित्र गूढ आहे. दुसरी कालरात्रीप्रमाणे ती सर्वलक्षणसंपन्न देवी ज्यांचा अंत लागत नाही त्या सर्वेश्वरांचेही उल्लंघन करणारी आहे. अंतरिक्षामध्ये असलेले सर्व देव निर्भय होऊन देवकार्य करणार्या त्या अद्भुत श्रीदेवीचे स्तवन करीत आहेत. म्हणून पलायन करणे व देहरक्षण करणे हाच योग्य धर्म होय.
हे राजा, आपल्याला सुखाचा व अनुकूल काल प्राप्त झाल्यानंतर संग्रामामध्ये पुनः तुझा विजय होईल हा काल कधी कधी दात्याला याचक करतो व काही प्रसंगी भिकार्यालाच धनदाता करून सोडतो. ब्रह्मा, विष्णु, महेश्वर आणि इंद्रादि सर्व देव कालाधीन आहेत. सारांश, कालच स्वतः प्रभू आहे. सांप्रत तुझा विपरीत काल आहे. म्हणून अनुकूल कालाचीच तू वाट पहा. हे राजा, सांप्रतचा काल देवांना अनुकूल आहे. म्हणून कालगती समजल्याशिवाय कार्य योग्य नाही. तेव्हा कालानुरूप वागावे. पूर्वी काल तुला अनुकूल होता. परंतु तोच काल सांप्रत विमुख झाल्यामुळे आज अबलेने तुझ्या बलाढ्य असुरांचा वध केला आहे. हे शुंभा, शुभ किंवा अशुभ सर्वस्वी कालच करीत असतो. ही काली अथवा सनातन देव हे शुभाशुभाचे कारण नव्हेत.
हे राजा, जो तुला रुचेल तो विचार तू कर. जग कालाधीन आहे असा विचार करून सत्वर पाताळामध्ये जा. अरे, जिवंत राहिलास तर तुझे कल्याण होईल. तू मेल्यानंतर तुझे शत्रू आनंदित होऊन देवांना आनंद होईल. ते पुनः प्रबल होतीत."