[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]
त्या दानवश्रेष्ठाला पूर्वी शिवाने वर दिला होता. तो असा की, तुझ्या प्रत्येक रक्तबिंदूतून राक्षस निर्माण होतील, तसेच त्यांच्या रक्तबिंदुपासून पुनः अनेक दानव उत्पन्न होतील. या वरामुळे रक्तबीज मदोन्मत्त होऊन वेगाने रणात उतरला.
गरुडावर आरूढ झालेल्या कमलनयन वैष्णवी शक्तीवर रक्तबीजाने प्रहार केला. पण वैष्णवीने आपल्या गदेने त्या शक्तीचे चूर्ण केले. तिने रक्तबीजावर चक्राचा प्रहार केला. त्यामुळे रक्तबीजाच्या रक्ताचा प्रवाह वाहू लागला. पण त्यामुळे त्याच्या प्रत्येक बिंदूतून राक्षस उत्पन्न होऊ लागले तेव्हा इंद्रायणीने क्रुद्ध होऊन त्या दानवश्रेष्ठावर वज्रप्रहार केला. पण त्यामुळे त्याच्या देहातून पुनः जास्त रक्त वाहू लागले. त्यातून आणखी राक्षस निर्माण होऊ लागले. ते सर्व राक्षस रक्तबीजाप्रमाणेच बलाढ्य होते. तेव्हा ब्राह्मणी क्रुद्ध झाली. तिने ब्रह्मदंडाने त्याच्यावर प्रहार केला. माहेश्वरीने त्रिशूलाचे वार करून त्या राक्षसाला विदीर्ण केले. नारसिंहाने नखांनी त्याला ओरबडले. वाराहीने मुखाने लयाच्यावर प्रहार केले. कौमारीने त्याच्या वक्षस्थलावर असंख्य प्रहार केले.
त्यामुळे रक्तबीज अधिक क्रुद्ध झाला. त्याने त्या देवतांवर वेगवेगळ्या आयुधांनी प्रहार केले. पण चंडिकेने तीक्ष्ण बाणांनी त्याची आयुधे तोडली. पण त्याच्या देहातून जो जो अधिक रक्त वाहू लागे तो तो त्यातून अधिक राक्षस निर्माण होत. रक्तबीजाच्या रक्तबिंदूतून उत्पन्न होणार्या राक्षसांनी सर्व जग व्यापले.
ते अनेक रक्तबीज अवलोकन करताच देव भयचकित झाले. ते अत्यंत निराश व शोकमग्न होऊन गेले. ते आपापसात म्हणाले, "अहो, हे हजारो रक्तबीज उत्पन्न होत आहेत. पण येथे ही काली, ही चंडी, इतर देवता या एकट्याच आहेत. आता ह्या सर्व रक्तबीजांच्या सहाय्यासाठी शुभनिशुंभ जर रणात आले तर निभाव लागणे कठीण. खरोखर महाभयंकर संकट उत्पन्न झाले आहे."
अशाप्रकारे देव चिंता करू लागले. तेव्हा कमलनेत्रा अंबिका म्हणाली, "हे चामुंडे, तू सत्वर आपले मुख विस्तृत कर. माझ्या शस्त्रप्रहाराने बाहेर पडणारे रक्त पिऊन टाक." आता यांच्या रक्ताचा एकही बिंदू भूमीवर न पडेल असे कर. म्हणजे हे दैत्य निर्माण होणार नाहीत. आता मी या दैत्यांचा वध करते. आपण दैत्यांचा नाश करू व या त्रैलोक्याचे राज्य आपण इंद्राला अर्पण करू.
नंतर रणांगणात अंबिका रक्तबीजांवर प्रहार करू लागली. त्यांच्या जखमातून निघणारे रक्त काली घटाघट पिऊ लागली. अंबिका खड्ग व मुसल यांचे प्रहार करून कृत्रिम राक्षसांचा वध करू लागली. वधलेल्या राक्षसांना चामुंडाने भक्षण केले. यामुळे राक्षस उत्पन्न होण्याचे थांबले. आता शेवटी फक्त तो श्रेष्ठ रक्तबीजच रणात शिल्लक राहिला. देवीने रक्तबीजाच्या शरीराचे सत्वर तुकडे केले.
कालीने त्याचे रक्त सत्वर प्राशन केले. अशाप्रकारे रक्तबीजाचा वध झाला. त्यामुळे उरलेले दानव पळून गेले. ते थेट शुंभाकडे जाऊन म्हणाले, "हे राजा, रक्तबीजाचा वध झाला. त्याच्या रक्तातून उत्पन्न झालेल्या दानवांना चामुंडाने भक्षण केले. सिंहानेही अनेक दानव ठार केले. आता आम्ही थोडेच शिल्लक आहोत.
हे राजाधिराज, दैत्य, दानव, गंधर्व, असुर, पक्ष, पक्षग, उगा, राक्षस ह्या सर्वांना ती अंबिका अवध्य आहे. रणामध्ये सर्व देवांच्या शक्ती तिला सहाय्य करीत आहेत. तेव्हा अजूनही तू योग्य विचार कर. आता त्या देवीबरोबर वैर न करता सत्वर संधी कर. कारण ती आदिशक्ती असून देवकार्य सिद्धीस नेणारी आहे.
राक्षसांच्या या भाषणामुळे शुंभाचे ओठ क्रोधाने स्फुरण पावले. कालाने मोहित होऊन तो म्हणाला, "हे भेकडांनो, तुम्ही पाताळात जा. स्वपराक्रमाने मी ह्या राज्याचा उपभोग घेतला. एखाद्या क्षुद्र स्त्रीला भिऊन मी पलायन करणार नाही. या रणात केवळ माझ्याचसाठी रक्तबीज वगैरे माझे अनुयायी मृत्युमुखी पडले. आता युद्धात कीर्ती मिळवण्याकरता मरणालाही भिणार नाही. कारण यश दुर्लभ असते.
हे निशुंभ, आता मी रणात जातो. त्या स्त्रीचा वध केल्यावाचून मी परत येणार नाही.
निशुंभ म्हणाला, "आता मीच त्या दुष्ट कालीचा वध करतो. त्या अंबिकेला घेऊन येतो. हे राजेंद्र, तू निश्चिंत अस. अरे, कोणीकडे ती पोरगी आणि कुठे वीर्यवान बाहू ? म्हणून हे बंधो, त्या स्त्रीला आणल्यावर तू तिचा उपभोग घे. तुझ्यासाठी मी त्या जगदात्रीला घेऊन येतो. असे म्हणून तो मदोन्मत्त निशुंभ एका विस्तीर्ण रथावर आरूढ होऊन आपली आयुधे सरसावून वायुवेगाने रणात येऊन उभा राहिला.