[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]
रक्तबीजाचे भाषण श्रवण केल्यावर देवी म्हणाली, "हे मूर्खा, तू आता वृथा गर्वोक्ती करू नकोस. कारण रूप, बल, ऐश्वर्य याबाबतीत माझ्याशी बरोबरी करण्यास या त्रैलोक्यात कोणीही समर्थ नाही. तसा असेल त्यालाच मी वरीन. तेव्हा मला युद्धात जिंकून माझ्याशी विवाह करावा असे तू राजाला जाऊन सांग. संग्राम करा अथवा पाताळात जा.
हे भाषण ऐकताच रक्तबीजाने क्रुद्ध होऊन प्रथम सिंहावर बाणांचा वर्षाव केला.तेव्ह्मा बाण सोडून अंबिकेने वरच्यावर त्याचे बाण तोडले. दुसर्या बाणांनी त्याचा वध करताच तो पापी रक्तबीज मूर्च्छित होऊन भूमीवर कोसळला. तेव्हा राक्षससैन्य सैरावैरा धावत सुटले. हे पाहून शुंभाने आपले सैन्य सज्ज केले. कंबोज व कालेय ह्या महाबलाढ्य राक्षसासह तो समरांगणावर आला.
त्यांना पाहून अंबेने शंखनाद केला. तेव्हा कालीलाही स्फुरण चढले. तिने आपला विशाल जबडा पसरून प्रचंड ध्वनी केला ! त्या अक्राळविक्राळ सिंहानेही भयंकर गर्जना केली. सर्व दानव क्रोधायमान होऊ देवीवर शरांचा वर्षाव करू लागले.
ते अवलोकन करून ब्रह्मदेव वगैरे विविध शक्ति रूपे धारण करून आपली शस्त्रास्त्रे घेऊन देवीच्या सहाय्यास धावले. या देवतांची माहिती अशी : -
अक्षसूत्र, कमंडलू यांसह हंसारूढ झालेली ब्रह्माणी तेथे आली. ती ब्रह्मदेवाची शक्ती. विष्णूची शक्ती वैष्णवी, शंख, चक्र, गदा, पद्य यांसह गरुडावरून आली.
शंकराची शांकरी, त्रिशूल, अर्धचंद्र, भुजंगरूप कंकणे धारण करून तेथे आली.
कार्तिकेयरूप असलेली सुंदरी कौमारीशक्ती मयूरावर बसली होती. श्वेत वर्णाची गजावर आरूढ झालेली इंद्राणी वज्र घेऊन आली. शुक्राप्रमाणे दिसणारी प्रेतारूढ झालेली वाराही शक्ती व नृसिंहरूपी नारसिंह या शक्तीही प्राप्त झाल्या.
महिषावर आरूढ होऊन दंड धारण करणारी यमाची याम्या आली. तसेच वारुणी, कौबेरी या शक्तीही आल्या. अशाप्रकारे विविध आकार धारण करून आलेल्या त्या शक्तींना पाहून देवीला आनंद झाला. तेव्हा भगवान शंकर स्वत: तेथे येऊन चंडिकेला म्हणाला, "देवी, आता सत्वर असुरांचा वध कर. देवकार्य सिद्धीस ने. सर्व देवांच्या शक्तीही येथे अवतीर्ण झाल्या आहे. तेव्हा शुंभनिशुंभासहित सर्व दानवांचा वध करून देवांना निर्भय कर. त्यानंतर सर्व शक्ती आपापल्या स्थानी परत जातील. देवही यज्ञभाग ग्रहण करतील. ब्राह्मण स्वकार्यदक्ष रहातील सर्व चराचर जगत समाधानी होईल. वर्षाकाल नियमित होऊन वसुंधरा सुफला होईल."
शंकराचे हे भाषण संपताच एकाएकी चंडिकेच्या शरीरातून एक अद्भुत शक्ती बाहेर पडली. ती शिवेच्या शकटोपर गर्जना करणारी होती. ती घोरकाय शक्ती शिवाला म्हणाली, "हे देवाधिदेवा, तू दैत्यराजाकडे जाऊन आमचे दूतत्व कर. हे शंकरा, त्या मदोन्मत्त निशुंभाला व कामातुर शुंभाला सांग की "तुम्ही स्वर्ग सोडून पाताळात जा. देवांना स्वर्ग प्राप्त करून द्या. अथवा बलाने तुम्ही गर्वोन्मत्त झाला असाल तर सत्वर युद्धासाठी तयार व्हा."
तिचे भाषण ऐकल्यावर शंकर दैत्यराजाकडे गेला. त्याने सांगितलेला निरोप शंकराने तिच्याच शब्दात राजाला सांगितला.
देवीचे म्हणणे शंकराने दैत्यराजाला सांगितल्यावर सर्व दैत्यसैन्य राजासह चिलखते घालून हातात शस्त्रे धारण करून तीक्ष्ण बाण घेऊन रणांगणात आले. त्यांनी चंडिकेवर बाणांचा वर्षाव केला.
ते अवलोकन करताच कालिका शूल व गदा धारण करून दावनांचा संहार करीत रणातून विहार करू लागली. कमंडलूतील पाणी फेकून ब्राह्मणीने कित्येक दैत्यांना ठार मारले. माहेश्वरीने त्रिशूलाने, वैष्णवीने शक्ती, चक्र, गदा धारण करून इंद्रायणीने वज्रप्रहार करून, वाराहीने मुख व उग्रदंष्ट्रा यांचे प्रहार करून शेकडो दैत्यांचा वध केला.
तसेच शिवदूती अट्टाहासाने राक्षसांना भूमीवर पाडू लागली. चामुंडा व कालिका त्यांना खाऊ लागल्या. कौमारी मयूरावर आरूढ होऊन बाणांनी दैत्यांचा वध करू लागली. वारुणीने राक्षसांना एकमेकांच्या पाठीवर आपटून त्यांचा रणात वध केला.
अशाप्रकारे त्या संग्रामात अत्यंत बलाढ्य राक्षसांचा नाश झाला. तेव्हा सर्व सैन्य जीव घेऊन पळत सुटले. जो तो किंकाळ्या फोडू लागला. देवांनी देवतांवर पुष्पवृष्टी केली. त्यांचा जयजयकार केला. ते पाहून रक्तबीज क्रुद्ध झाला. आपल्या धनुष्याचा टणत्कार करून तो देवीच्या रोखाने धावून गेला.