[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]
चंडमुंडाचा वध झाल्यावर उरलेले राक्षस राजाकडे गेले. ते सर्वजण अतिशय जखमी झाले होते. ते रडतच असुरराजाकडे गेले. ते म्हणाले, "हे राजाधिराज, आमचे रक्षण कर. कालिकेने राक्षसांना भक्षण केले. चंडमुंडाचा वध केला. आम्ही घाबरून आपणाकडे आलो आहोत. हे राजा, दानव व अश्वगजादि प्राणी यांच्या रक्ताच्या नद्या वहात आहेत. मांसाचा खच पडला आहे. केसरूपी शेवाळे जिकडे तिकडे पसरले आहे. मस्तके भोपळ्याप्रमाणे इतस्ततः विखुरली आहेत. देवांना सांप्रत आनंद होत आहे.
हे राजाधिराज, आता आमच्या ज्ञातीचे रक्षण करा. ती क्रुद्ध देवी क्षणातच सगळ्यांचा नाश करील. तिचे वाहन सिंह आहे. तोही रणात राक्षसांचे भक्षण करीत आहे. हे राजा, तू भावासह मरणाचा विचार करीत आहेस. आमच्या कुलाचा नाश करीत असलेल्या त्या स्त्रीच्या प्राप्तीसाठी तू आपल्या ज्ञातीचा नाश करू इच्छित आहेस. हे राजेश्वरा, जयापजय दैवाधीन असल्याने फलाची आशा धरून कोणतेही दु:ख देणारे कार्य अंगावर घेऊ नये. हे जग देवाधीन आहे. त्या स्त्रीने सर्व राक्षस वधले. तू आजवर सर्व लोकपालांना जिंकलेस, पण आज ती एकटी स्त्री तुझ्याबरोबर युद्ध करण्यास सिद्ध आहे.
पूर्वी पुष्करतीर्थावर तू तपश्चर्या केल्यावर ब्रह्मदेवाने वर देतांना तुला अमरत्वाविषयी सांगितले. तू तेव्हा म्हणालास, "देव, दैत्य, मानव, सर्प, किन्नर, यक्ष अथवा इतरही पुरुष प्राण्यांपासून मला मृत्यू येऊ नये."
हे राजा, या तुझ्या वरामुळे सांप्रत तुझा नाश करण्यासाठी ही स्त्री प्रकट झाली आहे. म्हणून हे राजेंद्रा, तू युद्ध करण्याचा विचार सोडून दे. हे राजा, सर्वांचा प्रलयकाली सत्वर नाश करणारी ती प्रत्यक्ष मायादेवी आहे. तीच सर्व लोक उत्पन्न करते. ती सुरेश्वरी, शुभ, तामसी व त्रिगुणात्मक आहे. ती सर्व शक्तींनी संपन्न आहे. हे राजा, हे नीट लक्षात घे.
हे राजेंद्रा, ती देवीच नित्य, सर्वज्ञ, अजिंक्य, अक्षय, नेहमी उदित असलेली, गायत्री, वेदमाता, संध्या व देवांचेही अधिष्ठान आहे. ती गौरी निर्गुण व सगुण असून देवांना अभय व सिद्धी देत असते. ती अव्यय, आनंदरूपिनी व आनंददात्री आहे.
असे असल्यामुळे, हे राजा, तू तिच्याशी वैर करू नकोस. तिला शरण जा. ती देवीच तुझे कल्याण करील. तू तिच्या आज्ञेचे पालन केल्यास, आपल्या ज्ञातीला जिवंत करील. आता जे शिल्लक राहिलेले राक्षस आहेत त्यांना तरी तू मृत्यूपासून वाचव."
दैत्यांचे हे भाषण ऐकून शुंभाने वीरांस उचित भाषण केले. तो म्हणाला, "हे मूर्खांनो, तुम्ही पराजित आहात. त्यामुळे तुमच्याजवळ धैर्य नाही. आता तुम्ही स्वस्थ बसा अथवा पातालात जा. सर्व दैवाधीन असल्याने जयपजयाचा विचार का करावा ? ब्रह्मा, विष्णू, महेश हे देवही दैवाधीनच आहेत. म्हणून भवितव्याची काळजी न करता उद्योग करावा.
हे दैत्यांनो, सुख, दु:ख, जन्म, मरण हे सर्व दैवशात घडत असते. म्हणून प्राज्ञजन विचारपूर्वक उद्योग करतात. भित्रे लोक शोक करतात. वेळ आल्यावर ब्रह्मा, विष्णु, महेश देखील नष्ट होतात. इंद्रादि देवांनाही मृत्यु आहे. असे असताना दैवाच्या आधीन असलेल्या माझा जय अथवा नाश झाल्यास आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. क्षुद्र अबलेच्या युद्धाच्या आव्हानामुळे पळून जाणे इष्ट नाही. पलायनामुळे शेकडो वर्षांचे जीवन प्राप्त झाले तरी त्यात काय अर्थ आहे ? तेव्हा संग्राम करून जय अथवा पराजय यांपैकी काहीही स्वीकारण्यास मी सिद्ध आहे. उद्योगी पुरुष तर दैवाला मिथ्या म्हणतात. भित्रे लोक दैवावर अवलंबून रहातात.
तस्मात् उद्योग करणे हेच योग्य आहे. कारण दळणारी बाई जर केवळ जात्यापाशी बराच काळ बसून राहिली, तरी उद्योगाशिवाय पीठ तयार होणार नाही. आता उद्योगात वैगुण्य असल्यास मात्र अपयश निश्चित असते, देश, काल, शत्रूचे बल या सर्वांचा विचार करून कार्य केल्यास सिद्धीस जाते."
अशाप्रकारे त्या दानवश्रेष्ठाने युद्धाचा निश्चय केला. शुंभाने रक्तबीजाबरोबर प्रचंड सैन्य देऊन त्याला युद्धास पाठविले. शुंभ म्हणाला, हे महाभगयवान, तू आपल्या सामर्थ्याप्रमाणे युद्ध कर
हे ऐकून रक्तबीज म्हणाला, "हे राजा, तू निश्चिंत रहा. मी कालीचा वध करून अंबिकेला धरून आणतो व आपले दास्य करायला लावतो."
असे सांगून तो रक्तबीज सैन्यासह रणांगणात गेला. त्याला पाहून देवीने शंखनाद केला. तेव्हा रक्तबीज सत्वर चामुंडेजवळ जाऊन म्हणाला, "हे बालिके, शंखनादाने मला भीती दाखवण्याचा प्रयत्न करतेस काय ? माझे नाव रक्तबीज असून मी युद्धास सज्ज आहे. हे मयूरकंठी आता संग्रामातच मी माझे बल दाखवतो. पण हे सुंदरी, तू थोडेसे ऐक.
शृंगाररस व शांतरस हे नवरसांत श्रेष्ठ असून शृंगार रसराज आहे. विष्णु व लक्ष्मी, ब्रह्मदेव व सावित्री, इंद्र व शची, शंकर आणि पार्वती हे नित्य शृंगारात मग्न असतात. ते सर्वदा समागम तत्पर रहातात. तसेच प्राणीही रसिकतेने संभोग करतात. पण मूढमती जन मात्र शांतरसात एकाग्र झालेले असतात.
काम, क्रोध., लोभ, असहिष्णुता, मोह यांनी युक्त झाल्यावर ज्ञान व वैराग्य कसे संभवणार ? देवावर विजय मिळवणारा शुंभ व महाबलाढ्य निशुंभ यांपैकी एकाला तू पती म्हणून स्वीकार.
असे म्हणून रक्तबीज देवीसमोर येऊन उभा राहिला. रक्तबीजाचे भाषण ऐकून अंबिका, चामुंडा व कालिका या मात्र एकमेकीकडे पाहून हेतुपूर्वक हसू लागल्या.