व्यास उवाच
इति तस्या वचः श्रुत्वा कालिका प्राह तां पुनः ।
युद्धयज्ञेऽतिविख्याते खड्गयूपे प्रतिष्ठिते ॥ ६२ ॥
आलम्भञ्च करिष्यामि यथा हिंसा न जायते ।
इत्युक्त्वा सा तदा देवी खड्गेन शिरसी तयोः ॥ ६३ ॥
चकर्त तरसा काली पपौ च रुधिरं मुदा ।
एवं दैत्यौ हतौ दृष्ट्वा मुदितोवाच चाम्बिका ॥ ६४ ॥
कृतं कार्यं सुराणां ते ददाम्यद्य वरं शुभम् ।
चण्डमुण्डौ हतौ यस्मात्तस्मात्ते नाम कालिके ।
चामुण्डेति सुविख्यातं भविष्यति धरातले ॥ ६५ ॥
इति श्रीमद्देवीभागवते महापुराणेऽष्टादशसाहस्र्यां
संहितायां पञ्चमस्कन्धे चण्डमुण्डवधेन
देव्याश्चामुण्डेतिनामवर्णनं नाम षड्विंशोऽध्यायः ॥ २६ ॥
चंडमुंडांचा नाश -
[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]
राजाची आज्ञा घेऊन ते महाबलाढ्य दानवश्रेष्ठ चंडमुंड प्रचंड सैन्य घेऊन निघाले. तेथे आल्यावर ते देवीला म्हणाले, "हे बाले, देवांचा पराभव करणार्या शुंभाचे आणि इंद्राला जिंकणार्या निशुंभाचे सामर्थ्य तुला माहीत नाही काय ? तू एकटी असून कालिका व सिंह एवढेच तुझे सहाय्यकर्ते आहेत. तेव्हा तू शुंभ- निशुंभाचा पराभव कसा करणार ?
हे दुर्बुद्धे, तुला कोणीही सल्ला देणारे दिसत नाही. तुझा नाश व्हावा म्हणून देव तुला प्रेरणा करीत आहेत. तेव्हा बलाबलाचा विचार कर. तुला अठरा हात असल्यामुळे गर्व झाला आहे.
हे सुंदरी, पण शुंभापुढे तुझ्या या हातांचे सामर्थ्य व्यर्थ आहे. म्हणून ऐरावताची शुंडा तोडणारा, गण विदीर्ण करणारा व देवांचा पराभव करणारा जो शुंभ, त्याची इच्छा तू पूर्ण कर. वृथा गर्व करून तू स्वत:चा नाश ओढावून घेऊ नकोस.
हे सुंदरी, हितावह भाषण ऐकून आपण सुख देणार्या गोष्टीचा स्वीकार करावा. बलवान शुंभाने देवांचे पूर्णपणे मर्दन केले आहे त्यावरून त्याच्या सामर्थ्याचा विचार कर. त्या दैत्यराजाने देवांना त्रस्त केल्यामुळे ते तुला युद्धाची प्रेरणा देत आहेत. खरोखर ते परिणामी तुझ्या नाशालाच कारणीभूत होतील.
देव स्वार्थी आहेत, तर हा दैत्यराज विजयी, सुंदर, चतुर, शूर व कामशास्त्रनिपुण आहे. म्हणून तू त्यालाच वर. शुंभाची आज्ञा होताच तुला त्रैलोक्याचे ऐश्वर्य मिळेल. म्हणून तू त्या शुंभाचाच पती म्हणून स्वीकार कर."
चंडमुंडाचे भाषण ऐकल्यावर मेघवाणीने जगदंबिका म्हणाली, "हे दुष्टा, येथून सत्वर निघून जा. हरी व हर यांना सोडून मी दुसरा पती का स्वीकारू ? पण हे मूर्खा, मला तर पतीच करायचा नाही. कारण मीच सर्व भूतांची स्वामिनी आहे. मी शुंभनिशुंभासारखे हजारो पाहिले आहेत.
मी प्रत्येक युगात देवगणांचाही नाश झाल्याचे पहात असते. पण सांप्रत मात्र तुम्हा सर्व दैत्यांचा नाश होणार आहे. तेव्हा स्वज्ञातीच्या रक्षणार्थ तू व्यर्थ प्रयत्न करू नकोस. युद्ध करून वीर्यधर्माचे रक्षण कर. मरण न चुकवता तू युद्ध करून स्वर्गाला जा म्हणजे तुझी कीर्ती होईल. तुझ्या मागोमाग तुझे अनुयायी व बांधव सर्वजण स्वर्गात येतील.
हे मूढा, सत्वर युद्धास प्रवृत्त हो. मी आता तुम्हा दोघा भावांचा नाश करते. तसेच रक्तबीज व शुंभनिशुंभ यांचा वध करूनच मी स्वस्थानी जाईन. तू असले भित्रे भाषण आता न करता युद्ध कर.
ते ऐकून बलगर्विष्ठ चंडमुंड युद्ध करू लागले. भगवतीच्या शंखनादाने दशदिशा दणाणून गेल्या. एकमेकांच्या खड्गांचे प्रचंड ध्वनी होऊ लागले. प्रथम चंड चंडिकेबरोबर युद्ध करू लागला. चंडाचे बाण देवीने तोडले. भुजंगतुल्य बाणांचा देवीने चंडावर वर्षाव केला. त्या वृष्टीमुळे आकाश व्यापून गेले. ते पाहून मुंड रणात उतरला. त्यानेही अतिशय प्रचंड बाणवृष्टी केली.
तो बाणवर्षाव पाहून अंबिका क्रुद्ध झाली. तिचा चेहरा पश्चिम क्षितिजाकडील मेघाप्रमाणे उज्वल व तांबूस दिसू लागला. नेत्र कर्दलीच्या फुलाप्रमाणे दिसू लागले. तिच्या ललाटस्थानापासून महाभयंकर काली त्याच वेळी बाहेर पडली.
त्यावेळी कालीने व्याघ्रचर्म ल्याले हेते. गजचर्म तिने परिधान केले होते. तिने मुंडमाळ धारण केल्या होत्या. तिच्या हातात खड्ग, पाश, खट्वांग ही आयुधे होती. कालरात्रीप्रमाणेच ती भयंकर होती. विस्तीर्ण मुखात जीभ वळवळत होती. तिचा श्रोणीप्रदेश विस्तृत होता.
उत्पन्न झाल्याबरोबर कालीने दानवांचा वध करण्यास सुरुवात केली. सापडेल त्या दैत्याला ती तोंडात टाकीत होती. कराल दाढांनी ती त्यांची चूर्ण करीत होती. तिने रक्षकासह हत्तीला भक्षण केले. अश्व, उंट, सारखी दिसेल ते मुखात घालण्याचा तिने सपाटा सुरू केला व त्यांना चावून खाल्ले.
ते सर्व अवलोकन करून चंडमुंडांनी प्रचंड बाणवर्षावाने देवीचे शरीर आच्छादून टाकले. सूर्यासारखे तेजस्वी व सुदर्शन चक्राप्रमाणे असलेले चक्र त्यांनी देवीवर सोडले. पण प्रचंड गर्जना करून देवीने बाणांनी ते चक्र सत्वर मोडून टाकले.
देवीने सोडलेल्या तीक्ष्ण बाणांच्या आघाताने चंड मूर्च्छित पडला. तेव्हा दु:खी व क्रुद्ध झालेल्या मुंडाने देवीवर असंख्य बाण सोडले. पण त्या चंडिकेने आपल्याकडे येणार्या बाणांचे प्रतिवर्षाव करून तिळाएवढे तुकडे केले. तिने मुंडावर भयंकर प्रहार करताच तोही भूमीवर कोसळला.
दानवसैन्यात हाहाकार उडाला. देव आनंदित झाले. थोड्याच वेळात शुद्धीवर आल्यावर चंडाने कालिकेच्या उजव्या हातावर प्रचंड गदेचा भयंकर प्रहार केला. पण तो चुकवून त्या कालिकेने त्याला बाण पाशाने बद्ध केले. त्याच वेळी शुद्धीवर आलेल्या मुंडाने तो प्रकार अवलोकन केला. तो त्वरेने प्रचंड शक्ती घेऊन धावला. तेव्हा त्यालाही कालिकेने बद्ध केले.
त्या दोघांनाही बद्ध केल्यावर कालिकेने प्रचंड हास्य केले. कालिका अंबेला म्हणाली, "हे प्रिये, प्रस्तुत रणयज्ञासाठी मी हे दानवरूपी पशू आणले आहेत."
लांडग्याप्रमाणे त्या दानवपशूंना आणलेले पाहून अंबा मधुर स्वरात कालिकेला म्हणाली,
"हे रणप्रिये, तू चतुर आहेस. तू यांना सोडूही नकोस, तसेच यांचा वधही करू नकोस. पण आता मात्र आपल्याला देवांचे कार्य सत्वर सिद्धीला नेले पाहिजे." अंबेचे हेतुपूर्ण भाषण ऐकून कालिका म्हणाली, "आता मी सांगितल्याप्रमाणे कार्य करते. तुझे म्हणणे मला समजले आहे. रणयज्ञात खड्गरूपी यूपाचे उपयोजन केले म्हणजे हिंसा घडणार नाही. मी तसेच करीन." असे म्हणून कालीने खड्गाच्या सहाय्याने दोघांचाही शिरच्छेद केला, त्यांचे रक्त प्राशन केले. ते पाहून अंबेला आनंद झाला. ती कालीला म्हणाली, "हे काली, तू आज देवांचे कार्य केल्यामुळे मी तुला वर देते. तू चुंडमुंडांना वधलेस म्हणून या भूतलावर तू चामुंडा या नावाने प्रसिद्ध होशील."