निशुम्भ उवाच
न वा पलायनं युक्तं न दुर्गग्रहणं तथा ।
युद्धमेव परं श्रेयः सर्वथैवानयानघ ॥ ५२ ॥
ससैन्योऽहं गमिष्यामि रणे तु प्रवराश्रितः ।
हत्वा तामागमिष्यामि तरसा त्वबलामिमाम् ॥ ५३ ॥
अथवा बलवद्दैवादन्यथा चेद्भविष्यति ।
मृते मयि त्वया कार्यं विमृश्य च पुनः पुनः ॥ ५४ ॥
इति तस्य वचः श्रुत्वा शुम्भः प्रोवाच चानुजम् ।
तिष्ठ त्वं चण्डमुण्डौ द्वौ गच्छेतां बलसंयुतौ ॥ ५५ ॥
शशकग्रहणायात्र न युक्तं गजमोचनम् ।
चण्डमुण्डौ महावीरौ तां हन्तुं सर्वथा क्षमौ ॥ ५६ ॥
इत्युक्त्वा भ्रातरं शुम्भः सम्भाष्य च महाबलौ ।
उवाच वचनं राजा चण्डमुण्डौ पुरःस्थितौ ॥ ५७ ॥
गच्छतं चण्डमुण्डौ द्वौ स्वसैन्यपरिवारितौ ।
हन्तुं तामबलां शीघ्रं निर्लज्जां मदगर्विताम् ॥ ५८ ॥
गृहीत्वाथ निहत्याजौ कालिकां पिङ्गलोचनाम् ।
आगम्यतां महाभागौ कृत्वा कार्यं महत्तरम् ॥ ५९ ॥
सा नायाति गृहीतापि गर्विता चाम्बिका यदि ।
तदा बाणैर्महातीक्ष्णैर्हन्तव्याहवमण्डिता ॥ ६० ॥
इति श्रीमद्देवीभागवते महापुराणेऽष्टादशसाहस्र्यां
संहितायां पञ्चमस्कन्धे देव्यासह युद्धाय
चण्डमुण्डप्रेषणं नाम पञ्चविंशोऽध्यायः ॥ २५ ॥
धूम्रलोचनाचा वध -
[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]
धूम्रलोचनाचे भाषण ऐकून काली म्हणाली, "अरे, नीचा, असे कामुकाप्रमाणे तू भाषण का करतोस ? तू मनात व्यर्थ अभिलाषा धरली आहेस. तुला सैन्य देऊन त्या दुष्टाने इकडे पाठविले आहे, म्हणून तू आता युद्धास सज्ज हो. आता तुमचा सर्वांचा वध करूनच ही देवी स्वस्थानी जाईल. कुणीकडे तो मूर्ख शुंभ अन् कुणीकडे ही विश्वमोहिनीदेवी ? या दोघांचा विवाह अशक्य होय. सिंहीण, हत्तीण अथवा धेनु कामविव्हल झाल्यास कोल्हा, गर्दभ अथवा सूकराशी संयोग करणार नाही. म्हणून शुंभाला सांग की, तू युद्ध कर किंवा पाताळात निघून जा."
देवीचे हे भाषण ऐकताच धूम्रलोचनाचे नेत्र रागाने लाल झाले. तो म्हणाला, "हे दुर्मुखी, तुझा व सिंहाचा वध करून मी हिला सत्वर राजाकडे नेईन. पण रसभंग होऊ नये एवढीच माझी इच्छा आहे. हे काली, हे कालप्रिये, असे नसते तर मी आताच तुझा वध केला असता."
कालिका म्हणाली, "हे मंदमते, वृथा गर्व करणे हे धनुर्धरांचे लक्षण नव्हे. तू समर्थ असशील तर मजवर बाण सोड."
तिचे हे भाषण ऐकताच त्या दैत्याने धनुष्याला तीष्ण बाण जोडले. त्याने कालिकेवर बाणांची वृष्टी केली. ते युद्ध सर्व देव विमानात बसून पहात होते व देवीचा जयजयकार करीत होते.
बाण, खड्ग, गदा, शक्ती मुसल वगैरे आयुधांनी त्यांचे तुमुल युद्ध झाले. कालिकेने प्रथम दैत्यांचे गर्दभ बाणांनी मारले. त्यांचे रथ मोडले. तेव्हा रागाने अंतर्बाह्य जळणारा धूम्रलोचन दुसर्या रथात आरूढ होऊन कालिकेवर बाणांचा वर्षाव करू लागला. तिने त्याचे बाण सत्वर तोडून टाकले व तीक्ष्ण बाणांची धूम्रावर वृष्टी केली.
तिने त्याचे हजारो रक्षक ठार केले. त्याचे रथ व धनुष्य तोडून टाकले. तिने देवांना आनंद व्हावा म्हणून शंखाचा ध्वनी केला. त्यामुळे धूम्रलोचनाने लोहाचा प्रचंड परीघ हातात घेतला. तो तिच्याजवळ आला. तो क्रूरकर्मा तिची निर्भर्त्सना करू लागला.
" हे कुरूप स्त्रिये, हे पिंगलनयने, मी आता तुझा वधच करतो." असे म्हणून तो कालिकेवर प्रहार करणार इतक्यात अंबिकेने सहज हुंकार करून त्याचे भस्म केले. ते पहाताच सर्व दानवसैन्य भयभीत होऊन पळू लागले. देवांनी आकाशातून देवीवर पुष्पवृष्टी केली.
सर्वत्र प्राणी व दानव यांच्या प्रेतांचा खच पडला होता. ती रणभूमी भयानक दिसत होती. म्हणून अंबिकेने ते रणस्थान सोडले व दुसर्या स्थानी जाऊन तिने शंखाचा ध्वनी
केला. तो नाद शुंभाने श्रवण केला. जखमी झालेले व पराभूत झालेले दानवसैन्य त्याने पाहिले. त्या हीनवदन दैत्यांना पाहून शुभनिशुंभ म्हणाले, "धूम्रलोचन कोठे आहे ? तुमचा पराभव कसा झाला ? त्या सुंदरीला तुम्ही का आणले नाहीत ? हा भीतिदायक शंखनाद कोण करीत आहे ?"
दैत्य उत्तरले, "हे महाराज, धूम्रलोचनाचा वध झाला. राक्षससैन्याचा नाश झाला. कालिकेने सर्वांचा संहार केला. हा शंखनाद अंबिकेचा आहे. आनंदाने आकाशातून देव पुष्पवृष्टी करीत आहेत. आमचा विजय होणार नाही हे जाणून आम्ही पळून आलो. तेव्हा आपणच आपल्या विचारी मंत्र्यांसह काय ते ठरवावे. ती जगदंबा एकटीच आपल्या सैन्याविरुद्ध रणात उभी आहे. ती निर्भय व बलिष्ठ आहे म्हणून आता आपणच तह, युद्ध वा अन्य काय ते ठरवावे.
हे शत्रुनाशका, तिच्याजवळ सैन्य नसले तरी सर्व देव प्रसंग पडल्यास तिच्या रक्षणार्थ धावून येतील. विष्णु, शंकर हेही तिच्याजवळ आहेत हे आम्हाला समजले आहे. सर्व लोकपाल सांप्रत आकाशात स्थित असून तिचाच जयजयकार करीत आहेत. सर्व गंधर्व, यक्ष, किन्नर हेही तिला सहाय्य करतील. पण वस्तुतः त्या अंबिकेला सहाय्याची अपेक्षा दिसत नाही. ती एकटी सर्वांच्या नाशास समर्थ आहे. हे राजा, अनुयायांनी सत्य, हितावह व मित भाषण करावे हे जाणून आम्ही सर्व काही निवेदन केले. आता आपणच निर्णय घ्यावा."
हे ऐकल्यावर शुभांने एकांतात आपल्या धाकट्या भावाची भेट घेतली. तो म्हणाला, "हे भ्रात्या, धूम्रलोचनाचा वध होऊन राक्षससैन्याचा नाश झाला आहे. विजयोन्मत्त होऊन अंबिका शंखाचा ध्वनी करीत आहे. कालाची गती अनाकलनीय आहे. आपला तिने पराभव केला त्यावरून तिचा भोग घेणे आपणास अशक्य आहे. हे निशुंभा, आता काय करावे ? आता आपण येथून पळून जाणे योग्य होईल का ? हा तू जरी धाकटा भाऊ असलास तरी या आणीबाणीच्या प्रसंगी योग्य तो सल्ला दे."
निशुंभ म्हणाला, "हे निष्पापा, आता पळून जाणे योग्य नाही. आता तिच्याशी युद्धच करावे. मी आता सत्वर रणात जाऊन तिचा वध करून येतो. दुर्देवाने जर मी मृत्यू पावलो तर तू योग्य काय तो विचार कर."
शुंभ म्हणाला, "तू न जाता आता आपण चंड- मुंडांना सैन्य देऊन तिकडे पाठवू सशाची शिकार करायला हत्ती कशाला हवा ? ते दोघेही तिचा वध करतील."
"हे चंडमुंडहो, तुम्ही आता त्या निर्लज्ज स्त्रीचा वध करण्यास सैन्यासह जा. त्या कालिकेचा रणात वध करून तुम्ही अंबिकेला पकडून आणा. ती गर्वोन्मत्त अंबा येण्यास तयार नसेल तर तीक्ष्ण बाणांनी तुम्ही तिचा युद्धात वध करा."