[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]
सुग्रीव म्हणाला, "हे मनोहरनयने, तू साहसयुक्त भाषण का करीत आहेस ? तू देवांना जिंकलेल्या शुंभाला जिंकण्याची इच्छा कशी करतेस ? शुंभाला जिंकेल असा तिन्ही लोकांत कोणी नाही. म्हणून तू विचार केल्याशिवाय बोलू नकोस. बलाबल जाणूनच बोलावे. शुंभ तुझ्यावर मोहित झाला आहे. तू त्याची इच्छा पूर्ण कर. मूर्खपणा सोड. मी तुझ्या हिताचे सांगत आहे.
सर्व रसात शृंगारस श्रेष्ठ होय. म्हणून सुज्ञांनी त्याचे सेवन करावे. तू आली नाहीस तर तो राजा तुझा बलात्काराने घेऊन जाईल. त्याचा दूत तुझ्या केसाला धरून ओढीत, तुला शुंभाकडे नेईल.
हे तन्वंगी तू स्त्रीसुलभ लज्जा रक्षण करून साहस कर. पण तू राजाकडे चल. तीक्ष्ण बाणांनी युद्ध करण्यापेक्षा सुरतक्रीडेचे सुख भोग. तेव्हा माझे ऐकून तू शुंभ अथवा निशुंभाला वर म्हणजे तू भाग्यवान होशील."
देवी म्हणाली, "हे दूता, तू संभाषणचतुर आहेस. शुंभ व निशुंभ बलाढ्य आहेत हे मी जाणते. पण माझी बालपणीची प्रतिज्ञा वृथा होऊ नये असे तू शुंभाला व निशुंभाला सांग. कोणीही सुंदर असला तरी माझ्यावर विजय मिळविल्याशिवाय माझा कोणीही पती होणार नाही. मला जिंकेल त्यानेच माझे पाणिग्रहण करावे."
वीरधर्माचे अवलंबन करून माझ्याबरोबर युद्धात सिद्ध हो अगर जीविताला तू भीत असशील तर सत्वर सर्वाचा त्याग करून पाताळात जा. हे दूता, तू असा माझा निरोप राजाला सांग. तू विनाविलंब आपले दूताचे कर्तव्य पार पाड.
असे तिचे हेतुगर्भ भाषण ऐकून सुग्रीव स्तिमित झाला. विचार करून तो दैत्यराजाकडे जाऊन म्हणाला, "हे राजेंद्रा, दूताने सत्य व प्रिय तेच बोलावे. पण सत्य व प्रिय असे बोलणे अवघड असते. अप्रिय बोलण्यावर राजा रुष्ट होतो. मी त्या स्त्रीला अवलोकन केले. पण ती कोठली, कुणाची, का आली यापैकी मला काहीच समजले नाही. पण ती युद्धाचीच इच्छा करीत आहे एवढे खरे. ती गर्विष्ठ असून कठोर बोलणारी आहे. तिने जे सांगितले, ते मी तुला सांगतो. ती म्हणाली, विवाहासंबंधी मी बालपणी प्रतिज्ञा केली आहे, 'जो युद्धात मला जिंकेल व जो माझा गर्व हरण करील त्याच पुरुषाशी मी विवाह करीन.' ती माझी प्रतिज्ञा वृथा होऊ नये म्हणून हे धर्मज्ञा, युद्धात मला जिंकून घे.
मी तिचे भाषण तुला सांगितले, आता इच्छेला येईल असे कर. ती युद्धनिश्चयाने सिंहारूढ होऊन, आयुधांसहित आली आहे. तिचा निश्चय अटळ आहे. म्हणून योग्य तेच कर."
सुग्रीवाचे भाषण ऐकताच शुंभ आपल्या भ्रात्याला म्हणाला, "हे बंधो, आता काय करावे ? एक क्षुद्र स्त्री युद्धेच्छेने आव्हान करीत आहे. म्हणून आपणापैकी एकाने संग्राम केलाच पाहिजे. तेव्हा योग्य असेल ते सांग." निशुंभ म्हणाला, "हे वीरा, आपणापैकी संग्रामात जाणे योग्य नव्हे. धूप्रलोचनाला आपण युद्धासाठी पाठवू तो तिला जिंकून आणील. आपण येथे विवाहाची सिद्धता करू."
तेव्हा शुंभ धूम्रलोचनाला म्हणाला, "तू सैन्य घेऊन जा. त्या मदनविव्हल स्त्रीला घेऊन ये. वेळ पडल्यास तिच्या रक्षकांचा वध कर. तसेच कृष्ण वर्णाच्या कालीचाही वध कर. पण त्या सुंदरीचे, त्या मनोहर स्त्रीचे मात्र योग्यतेप्रमाणे रक्षण कर. त्या रमणीय स्त्रीचा वध न करता तिच्या रक्षकांचा वध कर आणि तिला घेऊन ये."
राजाची आज्ञा घेऊन धूम्रलोचन साठ हजार राक्षससैन्यासह त्या रमणीय उपवनाकडे गेला. तेथे त्या मृगनयनेला अवलोकन करून त्याने हेतुगर्भ मृदू शब्दांनी रसाळ भाषेत तिला सांगितले.
"हे देवी, विवाहास उत्सुक होऊन त्या राजाने रसभंग होऊ नये म्हणून दूत पाठविला. पण त्या दूताचे विपरीत भाषण ऐकल्यावर तो चिंतातुर झाला. 'जो मला युद्धात जिंकेल,' असे तू म्हणालीस पण यातला गर्भितार्थ त्या दूताला आकलन झाला नाही. रतिजन्य संग्राम व उत्साहजन्य संग्राम यातला भेद त्याला कळला नाही. रतिजन्य संग्राम सुखावह असतो तर दुसरा दारुण दु:ख देणारा असतो. म्हणून रतिसंग्रमाची विद्या अवगत असलेला मी मुद्दाम सैन्य घेऊन तुला नेण्याकरता आलो आहे.
हे महाबुद्धिमान देवी, तू त्या शुंभाचा स्वीकार कर आणि त्याची पट्टराणी होऊन या त्रैलोक्यातील सर्व सुखाचा उपभोग घे. रतिशासाचे रहस्य जाणणारा तो शुंभ रतिसंग्रामात तुझा पराजय करील. माझा परमार्थतत्पर स्वामी सुखशय्येवर तुला जिंकून घेईल. दंतांनी तुझ्या ओष्ठांना जखमा करील. तू घामाघूम होऊन पराभूत होशील. शुंभ आताच तुझ्या अधीन झाला आहे. म्हणून हे मानिनी तू त्या दैत्याधिपतीचा स्वीकार कर.
हे सुरतप्रिये, आयुधांचे युद्ध योग्य नव्हे. तू युद्धास योग्य नाहीस. नाजुक लत्ताप्रहाराने जसा अशोक विकसित होतो. मधाच्या चुटकेने बकुल वृक्ष फुलतो, आलिंगन दिल्यास कुरबक वृक्ष प्रफुल्लित होतो, तशी तू राजाची अवस्था कर."