[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]
अशाप्रकारे देवांनी देवीची स्तुती केल्यावर देवांच्या रक्षणासाठी तत्पर असलेल्या देवीच्या शरीरापासून दुसरे उत्कृष्ट रूप प्रकट झाले. पार्वतीच्या शरीरकोशापासून ती अंबा निघाल्यामुळे सर्वजण तिला कौशिकी असे म्हणतात.
कौशिकीचा अवतार झाल्याबरोबर पार्वती कृष्णरूप झाली. म्हणून ती कालिका या नावाने प्रसिद्ध झाली. दैत्यांचा नाश व देवांचे संरक्षण करणार्या त्या महाघोर कृष्णवर्ण देवीला कालरात्री असेही म्हणतात. लावण्याने व भूषणांनी ती झळकू लागली. ती देवी अंबिका हसत म्हणाली, "सुरांनो, तुम्ही निर्भय असा. मी लवकरच तुमच्या शत्रूचा वध करीन. देवकार्य करण्यासाठी मी रणामध्ये सहज क्रीडा करीन आणि शुभनिशुंभादिकांचा नाश करीन. असे म्हणून ती सिंहारूढ देवी कालिकेसह शत्रूच्या नगराकडे गेली.
ती प्रथम उपवनात राहून सर्वांना मोहक असे सुस्वर गायन करू लागली. त्या गायनाने पशुपक्षी मोहित झाले व देव आनंदित झाले. इतक्यात चंड-मुंड हे दोन दैत्य सहजगत्या तेथे आले. तेव्हा या दोन्ही देवी त्यांच्या दृष्टीस पडल्या.
ते सौंदर्यसंपन्न रूप पाहून दोघेही मंत्रमुग्ध झाले आणि ते त्वरित शुंभाकडे जाऊन राजाला म्हणाले, "हे राजा, मदनालाही मोह पडेल अशी सर्वलक्षणसंपत्र स्त्री सिंहारूढ होऊन येथे आली आहे. तिचे सुस्वर गायन गंधर्वच काय पण पृथ्वीवरही कुठे ऐकिवात नाही असे आहे.
हे राजा, सर्वांना तल्लीन करील असे ते गायन ऐकून पशुपक्षीही तिच्या सन्निध उभे राहिले आहेत. हे नृपश्रेष्ठा, ही कोणाची कन्या ? याचा शोध करून तिचा आपण स्वीकार करा. ती आपणासच योग्य आहे. अशा प्रकारची शुभनेत्रा स्त्री जगतात कोठेही नाही.
हे भूपते, आपण देवांचे सर्वस्व हरण केले आहे. तर मग सुंदरींचा स्वीकार का करीत नाही ? आपण इंद्राचा ऐरावत, पारिजात वृक्ष, सप्तमुखी अश्व ही रत्ने बलात्काराने हरण केली आहेत. हंसध्वजाने युक्त, दिव्य, अद्भुत असे ब्रह्मदेवाचे विमान, कुबेराचा पद्यसंज्ञक निधी, वरुणाचे शुभ्र छत्र, वरुणाचा पाश वगैरे सर्व आपण व आपल्या भ्रात्याने बलात्काराने हरण केले. आपल्या भीतीने सागराने कमलाच्या मालेसह नानाप्रकारची रत्ने आपणाला दिली. मृत्यूची शक्ती, यमाचा दंड आपण जिंकलात. कामधेनूही आपण घेतलीत, मेनकादि अप्सराही आपणाला वश झाल्या.
तेव्हा हे दानवश्रेष्ठा, ही रत्नरूप स्त्री स्वीकार करण्यास काय हरकत आहे ? हिच्यामुळे आपल्या रत्नांकित सुंदर महालाला शोभाच प्राप्त होईल. अशी स्त्री त्रैलोक्यातही नाही. तरी आपण सत्वर त्या स्त्रीला आणून आपली भार्या करा."
याप्रमाणे भाषण ऐकताच शुंभासूर जवळ उभा असलेल्या सुग्रीवाला म्हणाला, "हे सुग्रीवा, तू त्वरित जाऊन हे कार्य कर आणि ती सुंदरी आनंदात येथे येईल असे भाषण कर. पुरुषांनी साम व दाम या दोनच उपायांनी स्त्रियांना आकृष्ट करावे असे शृंगाररस वेत्त्यांचे मत आहे. भेदाने रसभंग होतो व निग्रहाने रसभंग होतो. म्हणून ज्ञानी जनांनी ते दोन्ही मार्ग सदोष मानले आहेत. साम व दाम असलेल्या नर्मयुक्त मधुर भाषणाने कोणती मदनविव्हल स्त्री वश होणार नाही ?"
शुंभाचे हे प्रिय व मनोहर भाषण ऐकून सुग्रीव सत्वर जगदंबिकेकडे गेला. तेव्हा येथे सिंहारूढ झालेली ती सुंदरवंदना स्त्री त्याला दिसली. तिला प्रणाम करून तो मधुर
वाणीने म्हणाला, "हे सुंदरी, सौंदर्यसंपन्न व देवांचा शत्रू जो शुंभ राजा हा सांप्रत त्रैलोक्याधिपती आहे. तो शूर असून सर्वांना अजिंक्य आहे. तुझ्या स्वरूपाचे वर्णन ऐकून तो मोहित झाला आहे. त्याने मला तुझ्याकडे पाठविले आहे.
हे सुंदरी, त्या दैत्याने नम्रतापूर्वक तुला उद्देशून केलेले भाषण तू श्रवण कर. तो म्हणाला, 'हे कांते, मी सर्व देवांनाही जिंकले आहे व त्रैलोक्याचे राज्य करीत आहे. मी सांप्रत देवांचे यज्ञभागसुद्धा ग्रहण करीत असतो. स्वर्गलोक निःसत्व व रत्नरहित केला आहे. कारण मी सर्वच हरण केले आहे.
हे भामिनी, मी त्रैलोक्यातील सर्व रत्नांचा भोक्ता असून सर्व देव, दैत्य, मानव माझ्या आधीन आहेत. तुझे गुण कानी आल्यामुळे मी तुझा दास झालो आहे. तुला हृदयात मी प्रविष्ट केले आहे. ह्यास्तव मी उत्तम काय करावे याची तू आज्ञा कर. तू सांगशील ते मी करीन. हे चारुगात्री, मी तुजपुढे दीन झालो असून कामबाणांपासून तू माझे रक्षण कर.
हे हंसनयने, मदनविव्हल झाल्यामुळे मी तुझा दास झालो आहे. म्हणून माझा स्वीकार करून त्रैलोक्याची स्वामिनी होऊन सर्व विषयोपभोगांचा उपभोग घे. मी आमरणांत तुझ्या आज्ञेत राहीन. मी सर्वांनाच अवध्य असल्याने तू चिरकाल सौभाग्ययुक्त होशील. हे चारुगात्री, तुझे मन जेथे रमेल तेथे तू क्रीडा कर.'
मदमत्त देवी, ह्याप्रमाणे त्याच्या भाषणाचा विचार करून तू प्रेमाने जे सांगायचे असेल ते सांग म्हणजे तू दिलेले उत्तर मी शुंभाला निवेदन करीन."
हे दूताचे भाषण ऐकून देवीने हास्य केले व ती देवकार्यतत्पर देवी मधुर वाणीने म्हणाली, "हे दूता, शुंभ-निशुंभ ह्या भावांचा पराक्रम मला ठाऊक आहे. देवांचा पराजय करणारा तो शत्रूचा घात करणारा आहे. तो सर्वगुणयुक्त असून संपत्तिप्रिय व दातृत्वशील आहे. अतिशय शूर व मदनाप्रमाणे सुंदर आहे. तो बत्तीस लक्षणी असून सर्व पुरुषांना अवध्य आहे. हे समजल्याने मी त्या महादैत्याला अवलोकन करण्यासाठी आले आहे.
अरे, आपली शोभा वाढवावी म्हणून रत्न हे नेहमी सुवर्णाकडेच येत असते. म्हणूनच मी आपला पती अवलोकन करण्यासाठी फार लांबून आले आहे. मी भूतलावर असलेले मानव, गंधर्व, राक्षस व इतरही प्रियदर्शनी जन अवलोकन केले, पण ते सर्व शुंभाच्या भीतीने थरथर कापत आहेत. त्यांना काही एक सुचेनासे झाले आहे. शुंभाचे गुण श्रवण करून मी आज त्याला पहाण्याकरता इथवर आले आहे.
म्हणून हे महाभाग्यशाली दूता, तू जाऊन त्या बलाढ्य शुंभाला एकांतात सांगण्यासारखे माझे भाषण कथन कर, "हे भूपते तू बलवानामध्ये श्रेष्ठ, सुंदरांमध्येही सुंदर, दाता, गुणी, शूर, सर्वविद्याविशारद, अजेय, दक्ष, उग्र, कुलीन, सर्व रत्नांचा उपभोक्ता, स्वतंत्र व स्वात्वलंबनाने योग्यतेस चढला आहेस. म्हणून तुला पती करण्याची मला खरोखरच इच्छा झाली आहे. मी तुला योग्य आहे.
हे महामते, मी स्वत: होऊन तुजकडे प्राप्त झाले आहे. पण हे राक्षसराज, विवाहसंबंधासाठी मला काही तुला सुचवायचे आहे. पूर्वी मी माझ्या सखीसह क्रीडा करीत असता स्वत:च्या शरीरबलाच्या गर्वामुळे मी पण केला होता. तो असा की, 'जो मजसारखा बलवान व मजबरोबर युद्ध करून मला जिंकेन त्यालाच मी वरीन.' हा माझा पण ऐकून माझ्या सख्या विस्मित झाल्या. कारण मी एकाएकी क्रूर व अद्भुत पण केला. म्हणून हे राजा, माझा पण स्वत:च्या बलाने शेवटास ने. तू अथवा निशुंभाने कोणीही मला रणात जिंकावे. नंतरच मी तुझ्याशी विवाह करीन."