[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]
अशाप्रकारे हजार वर्षे लोटली. अखेर दु:खाकुल झालेले देव गुरूला शरण गेले, "हे मुने, तू सर्वज्ञ आहेस. तेव्हा दु:खनिवृत्तीचा काही मार्ग सांग. आपण सांगाल तो उपाय आम्ही करू."
हे मुनिश्रेष्ठा, मनोरथ परिपूर्ण करणारे हजारो वेद - मंत्र आहेत. वेदात अनेक गोष्टी मनोरथ पूर्ण करण्यासाठी सांगितल्या आहेत. आमच्या दु:ख निवृत्तीसाठी तू यथाविधी कार्य कर. शमुनाशाकरता सर्व प्रकारचे उपाय कर. दानवांच्या नाशाकरिता जे करता येणे शक्य आहे ते करण्याची व्यवस्था कर."
बृहस्पती म्हणाले, "सर्व मंत्रांचे फल दैवाधीन आहे. मंत्र निश्चित फल देण्यासारखे नाहीत. कारण मंत्रांच्या देवता तर तुम्हीच आहात. तेव्हा मी काय योजना करावी ? प्रत्यक्ष आपणच विपत्तीत असताना यज्ञयाजन तरी कसे करणार ? तेव्हा वेदोक्त इष्टी काय करणार ? देवहो, घडणारे कधीही चुकत नाही पण उपाय करीत रहावे. निराशावादी लोक दैव बलाढ्य म्हणून गप्प रहातात. प्रयत्नवादी लोक दैवाला निरर्थक म्हणतात. म्हणून दैव व उपाय दोन्हीही संमत आहेत. म्हणून बुद्धीने विचार करून काही प्रसंग आला तरी उपाय योजले पाहिजेत. मीही विचारपूर्वक सांगतो, ते ऐका.
पूर्वी भगवतीने महिषासुराचा वध केल्यावर तुम्हाला सांगितले होते की, "संकटसमयी माझे स्मरण करा, मी तुमचे संकट निवारण करीन. तेव्हा हे देवांनो, केव्हाही विपत्ती आली तर तुम्ही माझे स्मरण करताच मी तुमचा संकटनाश करीन."
तेव्हा तुम्ही सर्वांनी हिमालय पर्वतावर जाऊन चंडिकेची आराधना करा. तिच्या पुरश्चरणाविषयी तत्पर रहा. ती प्रसन्न होईल.
देवांनो, आज तुमच्या दु:खाचा शेवट होईल. हिमालयावर भगवती देवीचे सान्निध्य असते असे मी ऐकले आहे. तेव्हा तिचे पूजन केल्यासच तुमचा संकटनाश होईल. मला तर खात्री आहे की तीच तुमचे रक्षण करील.
हे भाषण श्रवण केल्यावर देव हिमालयावर गेले व हृदयामध्ये मायाबीजाचा जप करू लागले. अखेर भक्तांना अभय देणार्या महामायेला साष्टांग नमस्कार करून ते परमभक्तीने तिचे स्तवन करू लागले.
देव म्हणाले, "हे देवी, हे विश्वेश्वरी, हे प्राणनाथे, हे सदानंदरूपे, हे सुरानंददायिनी, हे दानवनाशिनी, तुझे स्वरूप भक्तिगम्य असून मानवांचे अनेक मनोरथ पूर्ण करणारी तूच आहेस. म्हणून तुला नमस्कार असो. हे ब्रह्मादिरूपे, तुझी अनेक नावे असल्याने तुझे रूप जाणणारा कोणीही नाही. उत्पत्तिकाली व संहारकाली तूच शक्तिरूपाने स्थित आहेस. स्मृती, धृती, बुद्धी, जरा, पुष्टी, तुष्टी, धैर्य, कांती, शांती, सुविधा, सुलक्ष्मी, गती, कीर्ती व मेधा तूच असून विश्वाचे पुरातन बीजही तूच आहेस. देवकार्य करणार्या तुझ्या रूपाला दुःखशांतिस्तव आम्ही नमस्कार करीत आहोत. तू त्या मदांध महिषासुराचा वध केलास त्या अर्थी देवांवर तुझी दया नित्य आहे. तूच देवांची जननी असल्याने त्यांना सहाय्य करून त्यांचे मनोरथ पूर्ण कर. कारण माता हीच आपल्या पुत्राचे आनंदाने पालन करते.
हे विश्ववंदे देवी, तुझे रूप, गुण आम्ही जाणत नाही. म्हणून आम्ही दयेस पात्र आहोत. म्हणून भयापासून आमचे रक्षण कर. आमचे रक्षण करण्यास तूच समर्थ आहेस. मुष्टिघात, शूल, खड्ग, शक्ती, दंड या शस्त्राशिवाय तू सहजतेने शत्रूचा वध करण्यास समर्थ आहेस. तुझी ही लीला लोकोपकारासाठी आहे. हे जगत् शाश्वत नाही हे सर्वजण जाणतातच. यावरून तूच या विश्वाची कर्ती असल्याचे आम्हास वाटते. पुराणात ब्रह्मा, विष्णु, महेश हे उत्पत्ती, स्थिती, लय यांचे कारण आहेत असे प्रसिद्ध आहे. परंतु हे तिघेही युगारंभीच तुजपासून जन्मास आले नाहीत काय ? म्हणून तू त्यांना आपली उग्र शक्ती दिलीस. पराविद्या, सर्व मनोरथ पूर्ण करणारी, मुक्तिप्रद व देवांनाही तू वंदनीय आहेस असे न मानणारे मूर्ख होत.
हे देवी, वैष्णव, पाशुपत हे आम्हाला दांभिक वाटतात. कारण लक्ष्मी, लज्जा, कांती, स्थिती, कीर्ती, पुष्टी तूच आहेस. प्रत्यक्ष हरिहर प्रभृती देवांनीही तुझी सेवा केली असूनही मानव तुला भजत नाहीत. त्यांना दैवाने फसविले आहे. स्वत: विष्णु लक्ष्मीचे चरण रंगवितात, त्र्यंबक पार्वतीच्या चरणकमलाचे पराग सेवन करतात. इतरांच्या गोष्टी हव्यात कशाला ? विरक्त मुनीही तुझीच सेवा करतात. जे तुझ्या सेवेत तत्पर नसतात ते संसारकूपात पडले आहेत. ते सुखरहित, पतित, दरिद्री, दीन, कुष्ठी, गुल्मरोगी, मस्तकशूली असे असतात. ते केवळ भारवाहूच होत. ज्यांना इतर दु:खे आहेत त्यांनी पूर्वजन्मी तुझी सेवा केली नाही असे आम्हाला वाटते."
व्यास म्हणतात, "याप्रमाणे सर्व देवांनी स्तुती केल्यावर अंबिका तेथे प्रगट झाली. ती दिव्य वस्त्रभूषणांनी युक्त होती. तिने पुष्पे ल्याली होती व चंदनाची उटी लावली होती. तिचे सौंदर्य मनोहारी होते. याप्रमाणे त्या पार्वतीचे स्वरूप अद्वितीय होते.
अशाप्रकारे ती विश्वमोहिनी जान्हवीवर स्नानास जाण्यासाठी गुहेतून बाहेर पडली. ती कोकिळकंठी देवी म्हणाली, "सूरश्रेष्ठांनो, तुम्ही कोणाचे स्तवन करीत आहात ? कशाकरता ? तुमचे काय काम आहे ? तुम्ही चिंतातूर का हे सांगा."
तिचे भाषण ऐकून उत्साहित झालेले देव म्हणाले, "हे देवी, आम्ही नम्रपणाने तुझीच स्तुती करीत आहोत. दैत्याच्या तापापासून तू आमचे रक्षण कर. हे महादेवी, महिषासुराचा वध केल्यावर तू संकटसमयी तुझे स्मरण करण्यास सांगितले होतेस. संकटनाश करीन असा वर दिला होतास. आम्ही आता तुझे स्मरण करीत आहोत. सांप्रत आम्हा सर्वांना अवध्य व दिसण्यातही घोर असे शुभनिशुंभ राक्षस यांनी इतर दानव सैन्यासह देवांचे राज्य हरण केले आहे, तेव्हा हे महाबले, तुझ्याशिवाय आम्हाला त्राता नाही. म्हणून आम्हा दु:खितांचे तू कार्य कर.
हे माते, तुझी सेवा करणार्या देवांना दानवांनी दैन्यस्थितीला आणले आहे. म्हणून तू त्यांच्या संकटाचा नाश कर. दु:खितांचा आश्रय हो. तूच विश्वकर्ता असल्याने तूच या जगताचे रक्षण कर. हे जननी, गवनि उन्मत्त झालेले दानव स्वसामर्थ्यामुळे जगाला फार पीडा देत आहेत."