[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]
व्यास म्हणाले, "राजा जनमेजया, आता सर्वपापनाशक व प्राण्यांना सुख देणारे दुसरे एक देवीचे चरित्र मी तुला कथन करतो."
पूर्वी शुंभ व निशुंभ हे महाबलाढ्य राक्षसवीर सर्वांना अजिंक्य असे होऊन गेले. ते शूर, दुराचारी व उन्मत्त असे भाऊ होते. ते सर्वांना पीडा करीत. परंतु देवहित तत्पर अंबिकेने त्यांचाही वध केला. त्याचप्रमाणे महापराक्रमी चंड मुंड, रक्तबीज, धूम्रलोचन ह्यांचाही तिने रणांगणात वध केला व देवांचे संकट दूर केले. तेव्हा देवांनी हिमालय पर्वतावर तिचे पूजन केले."
राजा म्हणाला, "हे असूर कोण, कुठले ? हे राज्यावर कसे आले ? ते स्त्रीवध्य कसे झाले ? त्यांना कोणी वर दिला ? ते सर्व विस्ताराने मला सांगा."
व्यास म्हणाले, "राजा, आता तू ती दिव्य कथा श्रवण कर. शुंभ निशुंभ हे दिसायला सुंदर होते. ते पाताळात रहात. पण एकदा हे दोघे भाऊ भूतलावर प्राप्त झाले. तारुण्यात त्यांनी अन्नपाणी वर्ज्य करून पुष्करतीर्थावर घोर तपश्चर्या केली. योगविद्येत तत्पर राहून त्यांनी दहा हजार वर्षे तपश्चर्या केली.
शेवटी भगवान ब्रह्मदेव त्यांना प्रसन्न होऊन तेथे आले आणि म्हणाले, "हे भाग्यवान दैत्यांनो, उठा, ध्यान सोडा, तुमच्या तपश्चर्येने मी संतुष्ट झालो आहे. म्हणून तुम्ही इष्ट वर मागा. तुमची अद्भुत तपश्चर्या पाहून मी आलो आहे."
हे विधात्याचे भाषण ऐकताच दोघेही भाऊ भानावर आले. प्रदक्षिणापूर्वक ब्रह्मदेवाला प्रणिपात करून ते कृश झालेले भ्राते म्हणाले, "हे दयासागरा, आपण खरेच संतुष्ट झाला असाल तर आम्हाला अमरत्व द्या. मृत्यूसारखे भय नाही. म्हणून आम्ही तुला शरण आलो आहोत. तेव्हा हे सुरेश्वरा, आमचे रक्षण कर व आमचे मरणाचे भय नाहीसे कर." ब्रह्मदेव म्हणाले, "हे मागणे विपरीत आहे. जन्मास आलेल्यास मृत्यु ठरलेलाच आहे. त्याचप्रमाणे मृत्यूनंतर जन्म प्राप्त होतोच. ही पूर्वपरंपरा विधात्यानेच ठरवून दिलेली आहे. म्हणून तुमची दुसरी इच्छा सांगा, मी पूर्ण करीन."
हे देवाचे भाषण ऐकून पूर्ण विचार करून ते दानव ब्रह्मदेवाला प्रणाम करून म्हणाले, "हे कृपानिधी, मानव, मृग, पक्षी, देव वगैरे योनीतील पुरुषांपासून आम्हाला मृत्यू न येईल एवढा वर द्या. हे देवा, स्त्रियांची आम्हाला भीती नाही. हे ब्रह्मदेवा, आम्ही अवध्य व्हावे."
ते ऐकून ब्रह्मदेवाने इच्छित वर दिला. तो स्वस्थानी परत गेला. दानवही स्वगृही जाऊन
भृगू ऋषींना पुरोहित करून त्यांचे त्यांनी पूजन केले. एक शुभ नक्षत्रावर एक सुवर्णमय, दिव्य, शुभ सिंहासन तयार करून राजासनाकरता दिले. ज्येष्ठ भाऊ शुंभ सुमुहूर्तावर राज्यावर बसला. निशुंभ त्याची सेवा करू लागला. तेव्हा त्याच वेळी उन्मत्त झालेले दानवभ्राते चंड व मुंड हे सैन्य, रथ गज यांसह तेथे प्राप्त झाले. शरीराने धूम्रवर्णाचा असलेला धूम्रलोचनही तेथे आला. त्याप्रमाणे ब्रह्मदेवाच्या वराने गर्विष्ठ झालेला रक्तबीजही दोन अक्षौहिणी दानवसैन्य बरोबर घेऊन त्यांना येऊन मिळाला.
हे राजा, रक्तबीजाचे पूर्वचरित्र श्रवण कर. एकदा संग्रामामध्ये युद्ध चालू असता शस्त्रप्रहाराने त्याच्या देहातून भूमीवर रक्त वाहू लागले. त्यातून त्याच्यासारखे तूर शस्त्रनिपुण असंख्य पुरुष उत्पन्न होत असत. तेही उत्तम युद्ध करीत. त्यामुळे तो महावीर दैत्य सर्वांना अवध्य झाला.
अशाप्रकारचे अनेक दानववीर आपले सैन्य घेऊन शुंभ राजाचे सेवक झाले. त्यामुळे असंख्य सेनेसह त्यांनी सर्व पृथ्वीचे राज्य जिंकले.
नंतर निशुंभ शुंभाची आज्ञा घेऊन इंद्राचा पराभव करण्यासाठी सैन्य घेऊन गेला. तेथील सर्व ठिकाणी युद्धे करून जय संपादित करता झाला. पण इंद्राच्या वज्रप्रहाराने त्याच्या वक्षस्थलावर जखम होऊन निशुंभ भूमीवर पडला. तेव्हा त्याच्या सैन्याची दाणादाण झाली. ही वार्ता ऐकून शुंभ सैन्यासह तेथे आला. त्याने देवांना बाणांने जर्जर केले. इंद्रासह दिक्पालांचा त्याने पराभव केला व स्वसामर्थ्याने त्याने इंद्रपद जिंकले. सर्व त्रैलोक्य जिंकून त्याने यज्ञातील हविर्भागही घेतले. नंदनवनादि सर्व स्वर्ग त्यांनी जिंकून घेतला. कुबेर व यम यांची राज्ये जिंकली. सूर्य व चंद्र यांचे अधिकार तो चालवू लागला. अग्निचे कार्य स्वत: कडे घेऊन निशुंभास वायूचे कार्य दिले.
सर्व देव पराजित होऊन पर्वताच्या गुहांत रहाण्यास गेले. निराधार, निराश्रित देव रानावनातून हिंडू लागले. ते सुखासाठी प्रयत्न करू लागले. पण स्वस्थाने भ्रष्ट झाल्याने त्यांना कुठेही सुख लागेना. कारण सुख हे दैवाधीन असते.
यावरून महाभाग्यवान, बहुश्रुत, धनसंपन्न व बलाढ्य लोकांनाही कालगतीने दु:खदैन्य प्राप्त होते. राजाला भिकारी करणे ही कालाची घटना आहे. दात्याला याचक, बलवानाला निर्बल, पंडिताला मूर्ख, शूराला अत्यंत भीरू कालच बनवीत असतो.
कालाच्या योगाने पुरुष धर्मनिष्ठ व ज्ञानी होत असून कालाच्याच योगाने तो अत्यंत पापी व अज्ञानी होतो. ब्रह्मा, विष्णु, महेश यांनाही दु:स्थिती प्राप्त होते. त्या कालाचा विस्मय वाटण्याचे कारण नाही. कालाच्याच योगाने विष्णु सूकरादि योनीमध्ये जन्म घेतो. शिवही कालयोगानेच कापालीक झालेला आहे.