[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]
महिषाने पुढे कथा सांगण्यास सुरुवात केली. "त्या मंदोदरीची एक पाठची बहिण सुस्वरूप होती. तिने स्वयंवराच्या मंडपात आपल्या पतीची निवड करून बलवान, सुलक्षणी राजाशी विवाह केला.
त्यावेळी तेथे एका धूर्त शठाकडे मंदोदरीचे लक्ष गेले. ती कामातुर झाली. शठावरच तिचे मन जडल्याने ती पित्याला म्हणाली, "तात, या मद्रराजाला पाहून मला विवाहाची इच्छा झाली आहे. माझा विवाह करा."
हे एकांतातील कन्येचे भाषण ऐकून राजालाही आनंद झाला. त्याने त्या राजाला सत्वर बोलावून घेतले. त्याचा मंदोदरीशी विवाह करून दिला. बरोबर भरपूर नजराणाही दिला. तो मद्रदेशाचा चारूदेष्ण राजाही सुंदर पत्नीमुळे आनंदित झाला. तो राजा मंदोदरीबरोबर पुष्कळ दिवसपर्यंत रममाण झाला.
एकदा आपल्या दासाच्या पत्नीशी राजा रममाण झाल्याचे मंदोदरीच्या दासीने तिला सांगितले. मंदोदरीनेही ते प्रत्यक्ष पाहिले. तेव्हा मंदोदरीस क्रोध आला. पण स्वतःला सावरून तिने पतीची हसत मुखाने खरडपट्टी काढली. परंतु पुन: एकदा तेच दृश्य मंदोदरीच्या दृष्टीस पडल्याने तिला अत्यंत खेद झाला.
ती म्हणाली, "हा राजा शठ असल्याचे स्वयंवराचे वेळी मला समजले नाही. अरेरे, राजाने मला फसवले. पण आता या निर्लज्ज, निर्दय, शठ पतीवर मी रागावू कशाला ? आता अशा पतीवर माझे प्रेम कसे रहाणार ? माझ्या जीविताचा धिःकार असो.
आता पतिसंभोगाच्या सुखाचा मी त्याग करणार आहे. जे करू नये ते केल्यामुळे मला दु:खावस्था प्राप्त झाली आहे. मला आत्महत्येचे पातकही करता येत नाही. पितृगुहीसुद्धा सुख लाभणार नाही. तेथे मैत्रिणीचा उपहास सहन करावा लागेल. तेव्हा स्वसुखाचा त्याग करून वैराग्यावस्थेत इथेच वास्तव्य केले पाहिजे.
स्वसुखाचा त्याग करून ती पतिगृहीच राहिली. तेव्हा हे कल्याणी, तूही माझ्यासारख्या उत्तम भूपतीचा त्याग करून पुढे एखाद्या मूढ व मंद पुरुषाचा आश्रय करशील. माझे न ऐकशील तर तुला पुढे दु:ख प्राप्त होईल यात संशय नाही."
देवी म्हणाली, "हे मूर्खा, तू त्वरित पातालात जा, अगर युद्ध कर. मी तुझा दानवांसह वध करूनच निघून जाईन. साधूंच्या रक्षणाकरता मी देह धारण करीत असते. अरूप व जन्म रहित असलेली मी केवळ देवरक्षणाकरताच साकार होऊन येते. देवांनी तुझ्या वधासाठी माझी प्रार्थना केली आहे. मी तुझा वधच करीन. तेव्हा तू राक्षसांच्या वसतीस्थानात म्हणजे पातालात जा, अन्यथा मी युद्धात तुझा वध करीन."
देवीचे भाषण ऐकूनही महिष युद्धेच्छेने उभा राहिला. धनुष्य कानापर्यंत खेचून शीलेवर घासलेले बाण त्याने त्वरेने देवीवर सोडले. पण देवीने शीलीमुख बाणांच्यायोगाने ते तोडून टाकले.
त्या दोघांमधील ते अद्भूत युद्ध पाहून देवांनाही जयापजयाची शाश्वती वाटली नाही. ते भयभीत झाले. इतक्यात दुर्धर नावाच्या दैत्याने देवीवर शीलीमुख व विषदग्ध असे बाण सोडले. तेव्हा क्रुद्ध होऊन देवीने दुर्धरावर अत्यंत तीक्ष्ण बाणांनी प्रहार केला. तो धिप्पाड राक्षस पर्वताच्या शिखराप्रमाणे गतप्राण होऊन जमिनीवर कोसळला.
ते पाहून शस्त्रनिपूण असा त्रिनेत्र राक्षस तेथे आला त्याने देवीवर बारा बाण सोडले. पण ते भिडण्यापूर्वीच देवीने तोडले. त्रिशूलाचा प्रहार करून जगदंबिकेने त्रिनेत्राचाही वध केला.
ते अवलोकन करून अंधक नावाचा राक्षस त्वरित तेथे आला. त्याने लोखंडी गदेने सिंहाच्या मस्तकावर प्रहार केला. परंतु सिंहाने त्याला ठार मारून आपण त्याचे मांसही खाऊन टाकले.
अशाप्रकारे शूर दानवांचे वध झालेले पाहून महिषाने विस्मयचकित होऊन तीक्ष्ण असे बाण सिंहावर सोडले. परंतु देवीने ते शीलीमुख बाणांनी तोडून टाकले व गदेने अत्यंत जोराचा प्रहार केला तेव्हा महिष मूर्च्छित झाला. थोड्याच वेळात तो क्रुद्ध होऊन पुन: देवीवर धावून गेला. सिंहावर त्याने गदाप्रहार केला. पण उलट सिंहाने आपल्या नखाग्रांनी त्याला विदीर्ण केले.
तेव्हा मानवरूपाचा त्याग करून त्या महिषाने सिंह रूप धारण केले. नखाग्रांनी त्याने देवीच्य्या सिंहाला ताडन करण्याचा प्रयत्न केला. देवीने कुद्ध होऊन भुजंगतुल्य बाणांनी त्याचा वेध करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा सिंहरूप टाकून महिषाने मदोन्मत्त हत्तीचे रूप धारण केले आणि सोंडेने एक महाभयंकर पर्वत शिखर उपटून त्याने देवीवर फेकले. परंतु देवीने आपल्या बाणवृष्टीने त्याचे तिळाप्रमाणे तुकडे केले व ती हसू लागली.
इकडे देवीच्या सिंहानेही गजरूपी महिषाच्या मस्तकावर उडी मारून नखाने तो त्याचे गंडस्थल विदीर्ण करू लागला. महाबलाढ्य महिषाने गजरूप टाकून मनुष्यरूप धारण केले. तेव्हा देवीने त्याच्या मस्तकावर खड्गाने प्रहार केला. तोही प्रतिप्रहार करू लागला. तेव्हा त्यांचे भयंकर युद्ध झाले.
अखेर महिषरूप धारण करून तो दैत्यराज आपल्या शृंगानी देवीला ताडण करू लागला. तो भयंकर दैत्य आपल्या शेपटीने देवीला जोरजोराने प्रहार करू लागला व अत्यानंदाने मोठमोठी पर्वत शिखरे झेलीत झेलीत देवीवर फेकू लागला. तो बलोत्तम दैत्य म्हणाला, "हे देवी, तू आता रणांत मजसमोर उभी रहा. रूप व यौवन संपन्न असलेल्या तुझा आज मी नाश करतो. तू मूर्खपणाने व मदमत्त होऊन माझ्याशी युद्ध करीत आहेस. तू बलाचा मिथ्याभिमान वहात आहेस. देवांनी व्यर्थ स्तुती केल्याने तू मोहित झाली आहेस. तुझा वध केल्यावर मी जे शठ स्त्रीला पुढे करून माझ्या नाशाची इच्छा करतात त्या देवांचाही वध करीन.
देवी म्हणाली, "हे मूर्खा, गर्व न करता रणात उभा रहा. हे नीचा, मी मिष्ट माधवी सेवन करून आजच तुझा महिषदेह युद्धात तोडून टाकते व देव, मुनींना निष्काळजी करते."
असे म्हणून देवीने सुरेचे सुवर्णपात्र घेऊन वारंवार पान केले. ते मिष्ट द्राक्षासव सेवन केल्यावर देवांनाही आनंद झाला. देवीने हातात शूल घेऊन ती महिषावर चालून गेली.
तेव्हा त्या कपटपटूने वेगवेगळी रूपे धारण करून देवीला प्रहार केले. मधूपानामुळे कुद्ध झालेली ती आरक्त नेत्रांनी विभूषित झाली. त्या देवीने संतप्त होऊन पापी महिषाच्या वक्षावर प्रहार केला. त्यामुळे महिष एक मुहूर्तपर्यंत मूर्च्छित होऊन पडला. परंतु पुनः घाईंन उठून तो चामुंडेला लाथा मारू लागला व हसू लागला. देवांना भयभीत करणारी गर्जना त्याने केली.
तेव्हा सहस्र अरा व उत्तम तुंबा असलेले उत्तम चक्र धारण करून ती देवी म्हणाली, "हे मदांधा, तुझा कंठ चिरणारे हे चक्र तू पहा आणि त्वरित यमलोकी चालता हो." असे म्हणून तिने चक्र महिषावर सोडले. त्यामुळे त्या दानवाचे मस्तक धडावेगळे झाले.
गिरिकंदरातून जसे निर्मल पाण्याचे ओहळ वाहतात, त्याप्रमाणे महिषाच्या कंठनलातून उष्ण रक्त वाहू लागले आणि त्याचे धड भ्रमण करीत भूमीवर पडले. तेव्हा देवांनी अत्यानंदाने जयघोष केला. पळणार्या दानवांचे सिंहाने भक्षण करून टाकले.
हे राजा, क्रुउर महिषासूर मृत्यु पावल्यावर उरलेले दानव भयभीत होऊन पातालात निघून गेले. दैत्यांचा निःपात झाल्यामुळे देव, मुनी, मानव व इतर सज्जन यांना अपरिमित आनंद झाला. नंतर भगवती देवीने रणभूमी सोडली व ती शुभप्रदेशावर उभी राहिली. तेव्हा सुखदायक देवीचे स्तवन करण्यासाठी देवही सत्वर तेथे आले.