[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]
एका सामान्य समजलेल्या स्त्रीकडून ताम्र व चिक्षुर यांचा वध झाल्याचे ऐकून महिषासुर विस्मयचकित झाला. त्याने युद्धात मद चढत असलेल्या बिडाल व असिलोभा या दोन महाबलाढ्य राक्षसांना प्रचंड सैन्य देऊन देवीचा वध करण्यास पाठवले. तेव्हा देवीने सिंहारूढ होऊन ढाल-तलवार हातात घेतली असल्याचे त्यांना दिसले.
असिलोभा, नम्रतापूर्वक हसतमुखाने तिला म्हणाला, "हे देवी, तू सुंदर आहेस. माझ्याशी सत्य भाषण कर. तू येथे का आलीस व निरपराधी दैत्यांचा वध का करीत आहेस ? त्याचे कारण सांग. मी तुझ्याशी तह करीन.
हे सुंदरी, सोन, हिरे, रत्ने आणि उत्तमोत्तम पात्रे यांपैकी तुला जे पाहिजे असेल ते तू घेऊन जा. तू काय करण्यासाठी युद्ध आरंभले आहेस ते सांग. युद्धामुळे दु:ख व संताप याची वृद्धी होते. युद्ध सर्व सुखांचा नाश करते असे महाजन सांगतात.
तुझ्या कोमल शरीरास पुष्पप्रहारसुद्धा सहन होणार नाहीत! मला तर आश्चर्यच वाटत आहे. शांती व विषयसुखोपभोग घेण्याचे टाकून तू दुःखद अशा संग्रामास का बरे प्रवृत्त झालीस ? संसारात दुःखाचा त्याग करून सुखाचा स्वीकार करावा असा सिद्धांत आहे.
हे सुख नित्य व अनित्य अशा दोन प्रकारचे आहे. आत्मज्ञान हे नित्यसुख व भोगजन्य सुख हे आहे. अनित्य आहे. ते नश्वर सुख वेदशास्त्रांच्या रहस्याचे चिंतन करणार्यांनी सोडून दिले पाहिजे.
हे सुमूखी, हे कृशोदरी, सौगतांच्या मतांचा जर तू स्वीकार करशील तर यौवन प्राप्त झाल्यामुळे अनुपम सुखांचा उपभोग घे. परलोकाविषयी तुझ्या मनात संशय असेल तर या भूतलावर चिरकाल राहून स्वर्गसुखाचा उपभोग घे.
देहाचे यौवन हे अनित्य असल्याने पुण्यकर्म करीत असावे. इतरांना ज्यामुळे पीडा होईल असे कर्म प्राप्तजनांनी वर्ज्य केले पाहिजे. धर्म, अर्थ, काम यांचे सेवन करावे. म्हणून हे कल्याणी, तू नेहमी धर्मावरच लक्ष ठेव. हे अंबिके, तू निरपराधी दैत्यांचा वध का करीत आहेस ? दया हा मानवधर्म सत्यावर अवलंबून आहे. म्हणून सूज्ञाने दया व सत्य यांचेच रक्षण केले पाहिजे, हे सुंदरी, तू दानवांचा वध का करतेस ?"
देवी म्हणाली, "हे महापराक्रमी दैत्या, मी येथे का आले याचे उत्तर मी तुला सांगते. हे दैत्या, मी सर्वांचे ठिकाणी संचार करीत असते आणि साक्षीरूपाने मी प्राण्यांचे न्यायअन्याय पहात असते. माझ्या ठिकाणी भोगाची इच्छा, लोभ अथवा गैरबुद्धी कधीही नसते. मी धर्मरक्षणार्थ या जगात वावरते. मी साधूंचे व भक्तांचे रक्षण करीत असते.
मी वेगवेगळ्या अवताराने साधूचे रक्षण व खलांचा नाश करते. वेदांचे संरक्षण करते. मी पूर्वी धारण केलेले अवतारच पुन्हा पुन्हा घेत असते. तेव्हा हे दानवा, दुष्ट महिष देवांचा नाश करण्यास प्रवृत्त झाला आहे. म्हणून मी त्याच्या वधाकरता अवतार घेतला आहे हे सत्य मी तुला सांगितले, मी सर्व देवशत्रूंचा नाश करणार, तू त्या दुष्ट महिषाला निरोप सांग, "तू येथे दुसर्या दैत्यांना युद्धास का पाठवतोस ? तू स्वत: युद्धाला ये किंवा माझ्याशी तह कर. जर तुझी इच्छा असेल तर देवांशी वैर सोडून तू पाताळात जा. रणांगणात जिंकून देवांच्या हरण केलेल्या सर्व वस्तु परत दे. त्वरित पाताळात निघून जा."
देवीचे भाषण ऐकताच असिलोमा अत्यंत प्रेमाने प्रतापी बिडालाला म्हणाला,
"हे बिडाला, मला तरी भवानीचे भाषण योग्य वाटते. तेव्हा अशा वेळी तह करावा की युद्ध करावे ?"
बिडाल म्हणाला, "हे वीरा, तुझे म्हणणे बरे. पण महिष अभिमानी असल्यामुळे युद्धात मृत्यूची खात्री असूनही तहास तयार होत नाही. इतकेच काय, पण शेकडो दानव युद्धात मरण पावतात हे पाहूनही त्याने आपणास पाठविले. तेव्हा दैवाचे उल्लंघन करण्यास कोण समर्थ आहे ?
खरोखरच त्या जगात सेवकांचा धर्म दुःसाध्य आहे. त्यांना कधीच मान नसतो. स्वामीची आज्ञा पाळावीच लागते. आपण खेळातल्या बाहुल्याप्रमाणे आहोत. तेव्हा आपण दोघांनी जाऊन हे कठोर भाषण कसे निवेदन करावे ? देवांचे सर्वस्व परत देऊन पाताळात जावे हे त्याला कसे रुचेल ? त्याला प्रिय भाषण करायचे म्हणजे असत्यच बोलले पाहिजे. कारण हिताचे सत्य भाषणही त्याला रुचणार नाही. सत्य भाषण प्रिय होत नसते. म्हणून विचारी पुरुष अशा वेळी मौन धरतात. आपल्यासारख्या वीरांनी राजाला उपदेश करू नये असे नीतिशास्त्र आहे. महिषाला असले हितावह भाषण सांगितले तर उलट राजा क्रुद्धच होईल. तेव्हा आपण स्वामीकार्य हेच कर्तव्य समजून मरणाला तुच्छ मानून युद्ध करावे हे उत्तम. परंतु आपला प्राण वाचण्याची शक्यता नसली तरी आपण युद्ध केलेच पाहिजे.
असा विचार करून युद्धासाठी ते रथावर आरूढ झाले व धनुष्यबाण घेऊन बाण सोडण्यास त्यांनी सुरुवात केली. बिडालाने देवीवर सात बाण सोडले. ते देवीने त्वरित तोडून टाकले. शिळेवर घासलेल्या तीक्ष्ण बाणांनी देवीने बिडालाला मूर्छित केले आणि त्यातच त्याचा अंतही झाला.
बिडालाचा वध झाल्याचे पाहून असिलोमा युद्धासाठी देवीसमोर आला. तो म्हणाला, "हे देवी त्या दुरात्म्या महिषाचे मरण तुझ्यामुळेच होणार आहे हे मला समजते. पण सेवाकार्य तत्परतेने मला केलेच पाहिजे. महिषाला प्रिय व अप्रिय भाषणाची जाण नसल्याने त्याच्यासमोर हितावह भाषण करणेही अयोग्य आहे. तेव्हा आता वीरधर्मासाठी मला मृत्यु स्वीकारलाच पाहिजे.
ज्याअर्थी तुझ्या आघातांनी सर्व दैत्य मरून पडत आहेत त्याअर्थी पौरुष हे व्यर्थ असून दैवच श्रेष्ठ आहे.
असे म्हणून त्याने देवीवर बाणांचा वर्षाव केला. पण देवीने त्याचा लीलेने प्रतिकार केला. असिलोम्याला अत्यंत जखमा झाल्याने त्याच्या शरीरातून रक्ताच्या धारा वाहात होत्या.
अखेर मोठी गदा घेऊन असिलोम्याने रागाने सिंहाच्या मस्तकावर प्रचंड प्रहार केला. पण त्या सिंहाने तितक्याच प्रखरतेने असिलोम्याचे वक्षस्थल आपल्या तीक्ष्ण नखांनी विदीर्ण करून टाकले. तेवढ्यात असिलोम्याने सिंहाच्या मस्तकावर उडी मारली आणि अंबिकेवर प्रहार केला. पण देवीने तो प्रहार चुकवून त्याचे मस्तक तीक्ष्ण धारेच्या खङ्गाने छेदून टाकले. सर्व राक्षससैन्यात हाहाकार उडाला.
यक्ष, किन्नर, गंधर्व यांनी देवीचे गायन आनंदाने सुरू केले. सिंहानेही अनेक राक्षसांना मारले. उरलेले पळून गेले. ही रणांगणातील हकीकत ऐकून राक्षस दु:खाने शोक करू लागले. महिष चिंताक्रांत व दु:खी होऊन खिन्न झाला.