[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]
बाष्कल व दुर्मुखाचा वध झाल्याचे ऐकून महिष संतप्त झाला. "असे कसे झाले ?" तो विचारू लागला. "त्या दोन रणशूर दानवांचा एका सामान्य स्त्रीने वध केला ! तेव्हा हे दैत्यांनो, हे देवीचे आश्चर्य आहे. खरोखरच काळ हाच सगळ्यांचा निर्णय करणारा आहे. पापपुण्याच्या यशापयशाचे अनुरोधन करणारा हा काळच आहे यात संशय नाही. दुर्मुख-बाष्कलासारख्या दानवश्रेष्ठांचा वध झाला यावरून आपणापुढे मोठेच कार्य संकट उभे राहिले आहे. तरी हे दानववीरांनो, आता तुम्ही सर्व जण एकत्र होऊन कोणताही निर्णय घेऊन मला सांगा."
असे महिषाने म्हणताच चिक्षुर नावाचा सेनापती म्हणाला, "हे राजा, आता कसलीही काळजी करू नकोस. मी एकटाच जाऊन त्या स्त्रीचा वध करून येतो." असे बोलून तो रथारूढ होऊन आपल्या सैन्यासह निघून गेला.
इकडे ताम्रही प्रचंड सैन्य घेऊन व प्रचंड गर्जना करीत रणसंग्रामात प्राप्त झाला. त्याला पाहून भगवती कल्याणीने शंख, घंटा, धनुष्य यांचा अद्भुत निनाद केला. त्या आवाजाने दानव त्रासले. ते भीतीने थराथरा कापू लागले व इतस्तत: सैरावैरा पळू लागले. ते पाहून चिक्षुर संतापून त्यांना म्हणाला, "अरे कशाकरता भिता ? आताच त्या मदमत्त अबलेचा मी बाणांनी वध करतो. तुम्ही निर्भयतेने माझा पराक्रम अवलोकन करा."
महाबलाढ्य चिक्षुर निर्भयपणे रणांगणात उतरला. तो म्हणाला, "हे सुनयने, लोकांना भीती दाखविण्याकरता तू या पोकळ गर्जना करीत आहेस. हे तनुलते, तुझ्या या थट्टेला मी भीत नाही. केवळ स्त्रीहत्या नको म्हणूनच मी तुझा वध करू इच्छित नाही. तेव्हा हे सुंदरी, तुझ्यासारख्या स्त्रीने शस्त्रास्त्रांनी युद्ध करायचे नसते, तर केवळ कटाक्ष व हावभाव यांनीच विरोधी पक्ष जिंकायचा असतो. वास्तविक तुझ्याशी पुष्पांनीसुद्धा युद्ध करू नये. मग बाणांचे नावच कशाला ? मालतीच्या कळीनेही तुझ्या देहावर जखम होणे शक्य आहे. अरेरे, तुझ्या देहावर बाणांची वृष्टी करावी लागावी यातच क्षात्रधर्माचा धिक्कार आहे.
अरेरे, हा तैलाभ्यंग, पुष्पांचे वारे आणि मिष्टान्न भोजन ह्मांनी पूर्ण केलेल्या या प्रिय देहाचा शत्रूच्या बाणांनी घात व्हावा ना ? तरवारीच्या घावांनी देहाचे तुकडे केल्यावर पुरुष धनसंपन्न होत असतो. पण या धनाचा धिक्कार असो. कारण हे असले धन प्रथमच जर दुःखद होत असेल तर पुढे सुखप्रद कसे होणार ? तेव्हा हे सुंदरी, तू युद्धाची इच्छा केलीस त्याअर्थी तू अज्ञानी आहेस असे मला वाटते. ते खरेच तर ! अग, संभोगसुख सोडून तू रणात कोणते सुख मिळवणार आहेस ? खङ्गांचे प्रहार, बाणांचे आघात, गदांनी छिन्नविछिन्न होणे आणि मृत्यूनंतर कोल्ह्यांनी तोंडात धरून नेणे ह्याचीच ह्या धूर्त कवींनी अतिप्रशंसा केली आहे. रणात मृत्यु आल्याने स्वर्गप्राप्ती होते. हा केवळ भ्रम आहे. तेव्हा हे सुंदरी, तुला सुख वाटेल तिकडे जा अथवा देवांना जिंकलेल्या महिषाला पती कर."
अशा प्रकारचे तत्त्वज्ञान सांगणार्या त्या दैत्याला जगदंबिका म्हणाली, "हे मूर्खा, एखाद्या पंडिताप्रमाणे तू भाषण करीत आहेस, पण अरे, नीतिशास्त्र व आत्मविद्या ही तुला अंशत:ही समजत नाही. तू वृद्धाचीही सेवा केली नाहीस. ज्याअर्थी तू सध्या मूर्खाची सेवा करीत आहेस त्याअर्थी तूही मूर्खच आहेस. राजधर्माची तुला समज
नाही. कुणा समोर काय बोलावे हे तुला अवगत नाही. आता शक्य त्या त्वरेने मी महिषाचा येथे वध करीन. चिखलामांसात येथेच जयस्तंभ उभारीन व नंतर निघून जाईन. देवांना छळणार्या त्या दुरात्म्याचा निश्चितच वध करीन. आता तू मुकाट्याने युद्धाला तयार हो. हे मूर्ख दैत्या, तुला स्वत:च्या व महिषाच्या जीविताची इच्छा असेल तर त्वरित पाताळात निघून जा, नाहीतर मरणास तयार होऊन युद्ध कर. मी सर्वांचा वध करण्याचा निश्चय केला आहे."
त्या उन्मत्त दानवाने देवीचे भाषण ऐकून देवीवर मेघाप्रमाणे प्रचंड बाणवृष्टी केली. परंतु आपल्या बाणांनी देवीने ते सर्व बाण तोडून टाकले. त्या दोघांचे आश्चर्यकारक युद्ध झाले. देवीने आपल्या वाहनावर आरूढ होऊन त्वरेने त्या दैत्यावर गदेचा प्रहार केला. त्यामुळे दैत्याला मूर्च्छा आली. तो दोन मुहूर्तापर्यंत रथातच निश्चेष्ट पडला.
तो मूर्च्छित झाल्याचे पाहून शत्रूसैन्यनाशक ताम्र उद्धटपणाने जगदंबिकेशी युद्ध करण्याच्या इच्छेने रणात आला. तेव्हा ती चंडिका हसतच म्हणाली, "हे दानवा, ये, तुला मी यमसदनी पाठवते. अरे, तुमच्यासारख्या दुर्बल दैत्यांचा काय उपयोग ? त्या मूर्ख महिषाच्या घरी राहून तू जगण्यासाठी का बरे धडपड करीत आहेस ? वास्तविक तुमचा वध करण्यात काय अर्थ आहे ? तुम्ही महिषाला येथे पाठवा म्हणजे माझी त्याने जशी वर्णने ऐकली आहेत तशी मी आहे की नाही हे त्या मूर्खाला समजेल."
इतके भाषण ऐकताच ताम्राने कानापर्यंत धनुष्य खेचले आणि त्वेषाने चंडिकेवर बाण-वृष्टी केली. तेव्हा लाल झालेल्या भगवतीनेही ताम्राच्या वधासाठी प्रचंड बाणाची प्रतिवृष्टी केली. इतक्यात महारथी चिक्षुरही सावध झाला व देवीसमोर उभा राहिला.
असे दोघेही आवेशाने देवीशी युद्ध करू लागले. अशा वेळी त्या महामायाने अतिशय संतप्त होऊन दोघांवर अखंड बाणवृष्टी केली. रणातील अनेक दैत्यांची कवचे तिने फोडली. अनेक राक्षसवीर घायाळ झाले. बाणांच्या आघाताने अनेक राक्षस रागाने कुद्ध होऊन ते देवीवर बाणांचा वर्षाव करू लागले. परंतु देवीने सोडलेल्या शिलीमुख बाणांनी सर्व राक्षस जखमी झाले. ताम्राबरोबर देवीने अतुल युद्ध केले. ते पाहून आकाशातून युद्ध अवलोकन करणारे देवही विस्मयचकीत झाले. इतक्यात ताम्राने एक भयंकर लोखंडी मुसळ घेतले व सिंहाच्या मस्तकावर प्रहार केला. त्या बरोबर सिंहाने हसत मुखाने प्रचंड गर्जना केली. त्यामुळे देवी अधिकच कुद्ध झाली. तिने अत्यंत वेगाने धारदार शस्त्राने ताम्राचे शीर छेदून टाकले. परंतु ताम्राचे मस्तकहीन शरीर तरीही रणांगणात मुसळ फिरवीत संचार करीत होते. थोड्या वेळाने तेही धाडकन जमिनीवर कोसळले.
ताम्र पडल्याचे पाहून चिक्षुर संतापाने खङ्ग घेऊन धावला. पण देवीने ते अवलोकन करून त्याच्यावर बाण सोडले व चिक्षुराच्या हातातील खङ्गाचे आपल्या बाणांनी तुकडे केले. दुसर्या बाणाने त्याचा हात तोडला व तिसर्या बाणाने त्याचे मस्तक धडावेगळे केले. असा त्या दोन राक्षसवीरांचा शेवट झाल्याबरोबर बाकीचे दानवसैन्य वाट फुटेल तिकडे पळत सुटले.
त्या राक्षसवीरांचा वध झाल्याचे पाहून देवांना हर्ष झाला. त्यांनी देवीचा जयजयकार केला. तिच्यावर पुष्पवृष्टी केली. ऋषी, देव, गंधर्व, वेताल, सिद्ध, चारण वगैरे, जयदेवी, जय अंबिके असे वारंवार म्हणू लागले.