[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]
अशाप्रकारची भाषणे करून बाष्कल व दुर्मुख यांनी अंगाला कस्तुरीची उटी लावली व ते राजसभेतून निघून गेले. समरांगणात जाऊन त्यांनी भयंकर गर्जना केल्या व ते म्हणाले, "हे देवी, ज्या महापराक्रमी महिषाने प्रत्यक्ष देवांना पळवून लावले त्या दानवराजाला तू पती म्हणून वर. तो सर्वलक्षणसंपन्न व दिव्य अलंकारांनी भूषित असे मनुष्यरूप धारण करूनच तुझ्याशी रतिक्रीडा करील.
हे सुहास्यवदने, त्यामुळे तुला त्रैलोक्यात सुख प्राप्त होईल. म्हणून महिषासुरावरच तू प्रेम कर. हे मधुर वाग्विलासिनी, स्त्रियांना प्रिय असलेल्या सर्व संसारसुखाची प्राप्ती होईल."
देवी म्हणाली, "अरे दुष्टांनो, मी कामातूर आहे असे तुम्हाला वाटते काय ? मी त्या मूर्ख महिषाला का वरणार आहे ? कुल, शील, स्वरूपसंपन्नता, चातुर्य इत्यादी गुणांवरच स्त्रिया लुब्ध होतात. तो तुमचा राजा प्रत्यक्ष पशूपेक्षाही अधम आहे. असल्या महिषाला कोणती देवरूप स्त्री वरील ? तेव्हा हे मूर्ख मंत्र्यांनो, तुम्ही परत जा व राजाला सांगा. " तू सत्वर पाताळात जा अथवा युद्ध कर म्हणजे इंद्र निर्भय होईल. मी तुझा वधच करीन. तुझ्या वधाशिवाय मी परतणार नाही. तेव्हा सर्व विचार करूनच तू युद्धास तयार हो. हे पशू, माझा पराभव झाला तरच तुला या भूमीवर रहाता येईल."
याप्रमाणे तिचे भाषण ऐकताच दोन्ही दैत्य रागाने तप्त झाले. देवीने प्रचंड गर्जना केली व रणांगणात निश्चयाने उभी राहिली. दोघांनीही देवीवर बाणवृष्टी केली, पण देवकार्यासाठी तत्पर असलेल्या देवीने मधुर स्वर करीत बाणांचा प्रतिवर्षाव केला. इतक्यात बाष्कल देवीसमोर येऊन ठाकला. दुर्मुख प्रेक्षकासारखा त्यांचे युद्ध पहात होता. सामान्यांना भय उत्पन्न करणारी आयुधे दोघांनीही वापरली व घोर युद्ध झाले. युद्ध होऊन देवीने अति तीक्ष्ण बाण बाष्कलावर सोडले.
परंतु बाष्कलाने ते आपल्या बाणांनी तोडून उलट सात बाणांनी देवीला ताडन केले. तेव्हा तिनेही उत्कृष्ट तीक्ष्ण दहा बाणांनी त्याला वेधले व हसतमुखाने एका अर्ध-चंद्राकृती बाणाने त्याचे धनुष्य तोडून टाकले. तेव्हा बाष्कलाने हातात गदा घेतली व तो देवीकडे धावला. परंतु देवीने त्याला तत्काळ गदेचा प्रहार करून मूर्च्छित केले. पण लवकरच बाष्कल शुद्धीवर येऊन उठला. त्याने देवीजवळ जाऊन गदा तिच्या मस्तकावर फेकली. परंतु देवीने घाव चुकवून अचुकतेने बाष्कलाच्या वक्षावर शूलाने प्रहार केला. बाष्कल तत्काळ गतप्राण होऊन भूमीवर कोसळला. त्याच्या मृत्युमुळे दानवसैन्याची दाणादाण उडाली. आकाशातून देवांनी मात्र जयजयकार केला.
ते पाहून दुर्मुख रागाने बेभान होऊन संग्राम करण्याकरता धावला. त्याने अंगात कवच घातले व रथारूढ होऊन हातात धनुष्य बाण घेतला. तो म्हणाला, "हे अबले थांब."
परंतु देवीने जोराने शंखनाद केला. त्यामुळे तो दानव अधिकच कोपला.
दुर्मुखाने भुजंगतुल्य तीक्ष्ण बाण त्वरेने देवीवर सोडले. परंतु ते सर्व तोडून टाकून त्या महामायेने प्रचंड गर्जना केली.
बाण, शक्ती, गदा, मुसल, तोमर यांच्या योगाने परस्पर तुमुल युद्ध झाले. तेव्हा रणांगणावर रक्ताची नदी उत्पन्न झाली. तिच्या तीरावर पडलेली मस्तके जणू काय यमाच्या नवशिक्या सेवकांसाठी तरून जाण्याकरता आत टाकलेले भोपळेच भासले. कित्येक शरीरे लांडगे खात होते, त्यामुळे त्या युद्धभुमीला एक प्रकारचे भयानक स्वरूप प्राप्त झाले. कोल्ही, कुत्री, काक, कंक, अधोमुख, गृध्र, श्येन वगैरे पक्षी त्या दुष्टांच्या शरीराचे लचके तोडत होते. मृतांच्या देहांचा खच झाल्यामुळे दुर्गंधी सुटली होती. मांसभक्षक पशु-पक्ष्यांचा आवाज सदैव चालूच होता. इतके असूनही दुर्मुख क्रुद्ध होऊन आपला हात वर करून देवीला म्हणाला, "हे पोरकट देवी, तू येथून त्वरित निघून जा, नाहीतर मी तुझा आजच वध करीन अथवा तुला जगायची इच्छा असेल तर महिषाची पत्नी हो."
देवी म्हणाली, "अरे मुर्खा, आज खरोखरच तुझा मृत्यु जवळ असल्यामुळे तू असे हे बोलतो आहेस. अरे, बालकाप्रमाणे आज मी तुझाही या युद्धात वध करीन किंवा तू रणातून निघून जा. नाहीतर तुलाही मृत्युलोकी पाठवून त्या महिषासुराच्याही मी पुढे वध करीन."
हे भाषण ऐकल्याबरोबर उन्मत्त दुर्मुखाने त्या रणचंडीवर प्रचंड बाणवृष्टी केली. परंतु देवीनेही अत्यंत सावधपणे तीक्ष्ण बाण सोडून दुर्मुखाचे बाण मोडून टाकले. वृत्रासुराचा वेध घेणार्या वज्रधारी इंद्राप्रमाणे त्या क्रुद्ध देवीने बाणांनी दानवाचा वेध केला. तेव्हा भित्र्यांना दहशत बसविणारे व शूरांना प्रोत्साहन देणारे असे भयंकर युद्ध त्या दोघांमध्ये झाले.
देवीने युद्धात कसब दाखवून दुर्मुखाचे धनुष्य तोडून टाकले व पाच बाणांतच त्याचा रथही तोडला. अखेर दुर्मुख पादचारी होऊन महाभयंकर गदा घेऊन देवी जगदंबेवर धावला. त्याने सिंहाच्या मस्तकी गदेचा भयंकर प्रहार केला. परंतु जबरदस्त प्रहार होऊनही सिंह जागचा हलला नाही.
शेवटी गदाधारी दुर्मुखावर अंबिकेने तीक्ष्ण धारेचे खङ्ग फेकून त्याचे मस्तक धडावेगळे केले. दुर्मुख मरून पडल्यावर आनंदाने देव जयजयकार करू लागले.
याप्रमाणे दोन महाभयंकर दैत्यांचा वध झाल्याने देवांनी पुष्प-वृष्टी केली. ऋषी, सिद्ध, गंधर्व, विद्याधर व किन्नर यांनाही अतिशय आनंद होऊन देवांसह सर्वजण देवीचा जयजयकार करू लागले.