[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]
ताम्रसुराचे भाषण ऐकल्यावर ती जगन्माता गंभीरपणे हसली व म्हणाली, "हे ताम्रा, तू परत जा आणि मंदबुद्धी, कामातुर, मूर्ख, अविचारी अशा महिषासुर राजाला माझा निरोप सांग. तुझी माता जशी शिंगाळू, गवत खाणारी, लांब शेपटीची व मोठ्या पोटाची महिषा आहे तशी मी नव्हे. मी ब्रह्मा, विष्णु, महेश, इंद्र, वरुण वगैरे देवांचीही इच्छा करीत नाही, तर देवांना सोडून तुला मी वरावे असे कोणते गुण तुझ्या ठिकाणी आहेत ? तुझ्यासारख्या पशूला वरल्याने जगात माझी निंदाच होईल.
हे मूढमते, मी अविवाहित स्त्री नाही. सर्वकर्ता सर्वसाक्षी, अकर्ता, निःस्पृह, निश्चल असा प्रभू माझा पती आहे. तो निर्गुण, निर्मल, अनंत, निराधार, निराश्रय, सर्वज्ञ, सर्वव्यापी, सर्वसाक्षी, पूर्ण, पूर्णाशय, कल्याणस्वरूप, सर्वावास, समर्थ, शांत, सर्वदृष्टी, सर्वचालक असा आहे. त्याला सोडून तुझ्यासारख्या महामूर्ख महिषाची इच्छा करण्याची मला कशी बरे इच्छा होईल ? म्हणून तू आता शुद्धीवर ये व मुकाट्याने युद्धास तयार हो म्हणजे मी तुला यमाचे वाहन करीन. किंवा मनुष्याकरता पखाल वाहणारा करीन. जर तुला जीविताची इच्छा असेल तर सर्व दानवांना घेऊन तू पाताळात त्वरित जा नाही तर रणात तुझा वध ठरलेलाच आहे.
संसारात समान असलेल्यांचाच संयोग सुखावह असतो, नाही तर अज्ञानामुळे जरी संयोग केला तरी तो दुःखदायक होतो. हे ताम्रा, "माझ्या अधिपतीला तू पती कर. ' असे सांगणारा तू शतमूर्ख आहेस. अरे, मी कशी आहे हे तू पहातोसच आणि कोणीकडे तो शिंगाळू महिष ? उभयतांचा संयोग कसा बरे होऊ शकेल ? तस्मात् तुम्ही पाताळात जा, नाहीतर सर्व दानवांचा मी संहार करीन. तुम्हाला जीवित प्रिय असेल तर यज्ञभाग व देवलोक सोडून निघून पाताळात जा व सुखी रहा. असा माझा निरोप सांग."
इतके बोलून त्या देवीने अद्भुत गर्जना केली. कल्पांताप्रमाणे भासणारा तो ध्वनी देत्यांना भय उत्पन्न करणारा होता. त्यामुळे सर्व पृथ्वी कंपित झाली. पर्वत थरथरू लागले व गर्जनेच्या ध्वनीमुळे दैत्यांच्या भार्यांचे गर्भपात झाले. महिषाच्या नगरामध्ये असलेल्या सर्व दैत्यांना भीतीने ग्रासून टाकले. ' हे राजा, आम्हाला वाचव' असे म्हणत ते एकसारखे पळत सुटले. इतक्यात सिंहानेही आपली आयाळ पिंजारली व प्रचंड गर्जना केली. त्यावेळी सर्व दैत्य पुरतेच भयभीत झाले.
ताम्र परत आल्याचे पाहून तो काममोहित महिष सर्व सचिवांसह आता काय करावे याचा विचार करू लागला. तो म्हणाला, "हे दानवश्रेष्ठांनो, आता आपण किल्ल्याचा आश्रय करून रहावे अथवा युद्ध करावे ? का पलायन केल्याने आपले कल्याण होईल ? आपण सर्व बुद्धिमान, शस्त्रनिपुण आहात. आता आपण कार्यसिद्धीसाठी खरोखरच सूक्ष्म विचार केला पाहिजे. आपली मसलत गुप्त राहिली पाहिजे, तरच राज्य चालते. तेव्हा सदाचारसंपन्न व ज्ञानी मंत्र्यांनी मसलत गुप्त ठेवली पाहिजे. सारांश, हेतू व काल यांना अनुसरून व राजनीतीची जाणीव ठेवून मंत्र्यांनी आता हेतूपूर्वक व हितावह निर्भिड भाषण करावे.
कुणाचेही सहाय्य न घेता ती स्त्री एकटी आली आहे. ती बाला युद्धेच्छेने प्रवृत्त झाली आहे हेच फार मोठे आश्चर्य आहे. युद्धात आपला जय वा पराजय होईल हे जाणणारा जगात कोण आहे ? आपल्याकडे कितीही बलवान सैन्य असले तरीही त्यामुळे आपण विजयीच होऊ असे नाही, कारण यशापयश हे दैवाधीन आहे.
उद्योगवादी म्हणतात, "दैव म्हणजे काय ? ते कोणी पाहिले काय ? जे दृष्टीला जाणवत नाही त्याच्या अस्तित्वाविषयी प्रमाण काय ? भित्र्यांना समाधान वाटणे हेच दैवाचे असित्व, समर्थ पुरुष दैवावर अवलंबून रहात नाहीत. प्रयत्नवाद व दैववाद हे अनुक्रमे कूर व भित्र्या लोकांचे मत आहे. तस्मात् नीट विचार करून जे कर्तव्य असेल तेच केले पाहिजे. '
ह्याप्रकारे राजाने हेतुगर्भ भाषण केले, तेव्हा महापराक्रमी बिडाल हात जोडून म्हणाला, "हे राजा, ती सुंदर स्त्री कोणाची पत्नी आहे ? ती कोठून व का आली ? याचा प्रथम शोध करा. मी असे ऐकले आहे की तुझे मरण स्त्रीच्या हातूनच असल्याने देवांनी आपल्या तेजापासून तिला निर्माण केली आहे व तुझ्यासाठी पाठविली आहे. सर्व देव तुमचे हे युद्ध पाहण्यासाठी आकाशातच दडून राहिले आहेत आणि जरूर पडली तर तेही तिला युद्धात सहाय्य करणार आहेत. भगवान विष्णु वगैरे देव या स्त्रीचे निमित्त करून आम्हा सर्वांचा नाश करणार आहेत. एकंदरीत ती स्त्री युद्धात तुझा वध करील.
हे राजा, मला भविष्य समजत नाही, पण देवांचा हेतू मात्र कळून चुकला आहे. तरीही हे राजा, युद्ध करू नये असे मात्र मी म्हणत नाही. तरी तू सांगशील ते ऐकणे ऐवढेच माझे कर्तव्य आहे. तुझ्या कार्याचे महत्व जाणून आम्ही तुझ्यासाठी मरण्यास अथवा सुखोपभोग घेण्यास तत्पर आहोत. आमचा सेवकांचा हा धर्म आहे, परंतु हे राजा, आमच्या सर्व समर्थ सैन्याशी युद्ध करण्यास ती एकटी स्त्री तयार आहे यावरून आपण पूर्ण विचार केला पाहिजे.
दुर्मुख म्हणाला, "हे राजा, या युद्धात आपणाला जयप्राप्ती नाही हे मी समजून आहे. पण पलायनाचा विचार मात्र मला योग्य वाटत नाही. कारण त्यामुळे अपकीर्ती होईल. इंद्रादि देवांबरोबर झालेल्या युद्धातही आपण पलायन केले नाही, तेव्हा स्त्रीबरोबर युद्ध करताना पळण्यास कोण बरे तयार होईल ? तरी जय अथवा पराजय काहीही होवो, युद्ध करणे प्राप्त आहे. होणारे चुकत नाही. विचारी पुरुषाला त्याची काळजी करण्याचे कारण नाही.
या युद्धात मरण प्राप्त झाले तर यश व जिवंत राहिल्यास सुखप्राप्ती होईल. पलायनाने अपकीर्ती ठरलेली. तेव्हा जीवनाचा अथवा मृत्यूचा व्यर्थ शोक करू नये."
दुर्मुखाचे भाषण झाल्यावर वक्तृत्वात श्रेष्ठ असलेला बाष्कल म्हणाला, "हे राजा, युद्ध भित्र्या लोकांना अप्रिय असते, म्हणून आपण काळजी का करावी ? अहो, त्या चंचलेचा मी एकटा वध करीन. मात्र आपण उत्साह धरला पाहिजे.
हे नृपश्रेष्ठा, भीती हा शूराचा शत्रू होय. तेव्हा अदभुत युद्ध करून मी त्या स्त्रीला यमसदनाला पाठवीन. स्त्रीची मला काय भिती ? आजच तू माझे सामर्थ्य पहा. हे राजा, आपण स्वत: युद्ध करण्यास जाण्याची आवश्यकता नाही."
त्याचवेळी दुर्धर नम्रतापूर्वक म्हणाला, "हे महिषा, ही देवी अठरा हातांनी आणि श्रेष्ठ आयुधांनी युक्त असली तरी मी तिचा सहज पराभव करीन. केवळ तुला भीती दाखविण्यासाठी निर्माण केलेली ही देवांची माया आहे. हे बुजगावणे आहे. त्यांचे भय मनात बाळगू नकोस. राजनीती अनुसरून तू मंत्र्याचे कर्तव्य श्रवण कर."
सात्त्विक, राजस आणि तामस असे तीन प्रकारचे मंत्री असतात. सात्त्विक मंत्री स्वत:च्या सामर्थ्यावर स्वामीची सेवा करीत असतो व आपलेही कार्य साधून घेतो. ते धर्मनिष्ठ, एकाग्र, सर्व शास्त्रनिपुण असतात. राजस मंत्री एकचित नसला तरी स्वकार्य करीत असतो. तामस मंत्री लोभी असून नेहमी कार्यसाधू वृत्तीचा असतो. प्रसंगी तो शत्रूला फितूरही होतो. त्यामुळे वैगुण्ये शत्रुपक्षाला समजतात. म्यानात घातलेल्या तलवारीप्रमाणे ते नेहमी कार्यनाश करतात व युद्धप्रसंगी आपल्या राजाला भयभीत करतात. तेव्हा हे राजा, अशांवर कधीही विश्वास ठेवू नका. कारण विश्वास ठेवल्यास कार्यनाश होतो व मसलत फसते. दुष्ट, लोभी, पापकृत्य करणारा, निर्बुद्ध व शठ अशा लोकांवर विश्वास ठेवल्यास अनर्थच होतो. म्हणून हे नृपश्रेष्ठा, संग्रामात मी एकटा जाऊन तुझे कार्य पार पाडीन. या दुष्ट स्त्रीला सत्वर पकडून आणीन. तेव्हा आता माझे सामर्थ्य पहाच."