[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]
महिषासुराच्या मंत्र्याचे भाषण ऐकून देवीने मेघासारखे गंभीर हास्य केले. ती म्हणाली, "हे दानवा, मी सर्व दैत्यांचा नाश करणारी देवांची शक्ती आहे असे तू समज. पापात्म्या महिषाने पीडा करून यज्ञभागापासून बहिष्कृत केलेल्या सर्व देवांनी त्याच्या वधाकरता माझी प्रार्थना केली, तेव्हा सैन्य न घेता मी एकटीच त्याचा वध करण्याकरता आले आहे. हे निष्पाप मंत्र्या, सामपूर्वक आदराने भाषण केलेस म्हणून मी संतुष्ट झाले आहे. नाही तर केवळ दृष्टीनेच तुझा वध केला असता. पण मधुर भाषण कोणाला प्रिय नाही !" आता तू त्या पापी महिषाला माझा निरोप सांग.
" तुला जर जीविताची इच्छा असेल तर त्वरित पाताळात निघून जा, नाहीतर माझ्या बाणांनी तुझ्या शरीराचे तुकडे होऊन तुझा मी वध करीन. माझ्या दयाळुपणामुळे तू सत्वर निघून जा. जर हे मूर्खा, तू गेला नाहीस तर तुझा वध होऊन देवांना पुन: स्वर्गप्राप्ती होईल. माझ्या आज्ञेने समुद्रवलयांकित पृथ्वीचाही तू त्याग कर. माझे बाण तुझ्यावर पडले नाहीत तोवरच तू पाताललोकी जावेस. जर तुला युद्धाची खुमखुमी असेल तर सत्वर माझ्यासमोर ये. तुझ्या वीरांसह मी तुला यमसदनाला पाठविते.
हे मूढमते, आजपर्यंत प्रत्येक युगात तुझ्यासारख्या असंख्य दैत्यांचा मी वध केला आहे. त्याचप्रमाणे आज तुझाही वध करीन. त्यामुळे माझ्या शस्त्रांची सफलता होईल. ही वृथा धारण करण्यात काय फायदा ? म्हणून मदनाने विव्हल झालेला तू समरांगणात येऊन माझ्याशी युद्ध कर.
हे दुष्टा, स्त्रीच्या हातूनच वध होणार म्हणून देवांना फार छळलेस. पण वरप्राप्तीमुळे आता फुगून जाऊ नकोस. ब्रह्मदेवाचे वचन शेवटास न्यावे म्हणूनच मी असामान्य स्त्रीरूप धारण करून तुझा नाश करणार आहे. तरी तुला जीविताची इच्छा असेल तर ब्राह्मणांचे निवासस्थान पृथ्वी व देवांचा स्वर्ग तू त्वरित सोडून देऊन चालता हो व भुजंगांचा वास असलेल्या पाताळात जा."
देवीचे सहेतूक भाषण ऐकून तो महिषमंत्री म्हणाला, " हे देवी, तू मदमत्त झाल्यानेच स्त्रीसुलभ असे अविचाराचे भाषण केलेस. पण महिषासुराची व तुझी बरोबरी होणार नाही. युद्ध असंभवनीय आहे. शिवाय तू एकटीच तरुण स्त्री व नाजूक आहेस. महिषासुर धिप्पाड आहे. तेव्हा तुमचे दोघांचे युद्ध होणे कठीण."
गज, अश्व, रथ, पायदळ ह्यांनी व अनेक प्रकाराच्या आयुधांनी संपन्न असे आमचे सैन्य आहे. तेव्हा हे सुंदरी, मालतीचे पुष्प चुरडण्यास जसे गजेन्द्राला काहीच श्रम नाहीत, त्याचप्रमाणे तुझा वध करण्यासही त्याला श्रम होणार नाहीत.
तुझ्याशी थोडेही कठीण भाषण केले तरी ते शृंगारशास्त्राला धरून होणार नाही. त्यामुळे रसभंगाची मला भीती वाटते. शिवाय आमच्या राजाचे मन तुजवर जडले आहे. म्हणून मला सौम्य भाषणच केले पाहिजे. नाही तर मी आताच तुझ्यासारखा रूपगर्वितेचा व मदोन्मत्त स्त्रीचा वध केला असता. पण जगाला मागे टाकणारे तुझे रूप जाणून माझा धनी मोहित झाला आहे. हे त्रिभुवनसुंदरी, हे सर्व द्रव्य व राज्य तुझे असून महिषासुर हा खरोखरच तुझा दास होणार आहे. म्हणून अशाप्रकारे विनाश होणार्या क्रोधाचा त्याग करून तू त्याची प्रणयाराधना कर. माझ्या स्वामीविषयी माझी पूर्ण निष्ठा असल्याने अगदी भक्तीभावाने मी तुला प्रणिपात करीत आहे. तू महिषाची पट्टराणी हो आणि या त्रैलोक्याचा उपभोग घे."
हे त्या महिषमंत्र्याचे भाषण ऐकून देवी म्हणाली, " हे सचिवा, मी तुला शास्त्रविहित मार्गाने कथन करते. तू श्रवण कर. तू महिषासुराचा प्रधान आहेस. हे मी जाणले आहे.
तुझी बुद्धी व स्वभाव पशुतुल्य आहे असे तुझ्या भाषणावरून स्पष्ट होत आहे. तेव्हा ज्याचे मंत्री साक्षात् पशू आहेत तो तुझा धनी बुद्धीमान नसणारच. तुमचा उभयतांचा हा संयोग घडून आला आहे. अरे मुर्खा, माझा स्वभाव स्त्रीसुलभ आहे असे तू म्हणालास. मी पुरुष नाही काय ? आणि माझा स्वभावही पुरुषाप्रमाणे नाही काय ? मी जाणूनबुजून स्त्रीवेष केला आहे. कारण तुझ्या राजाने स्त्रीपासून मरण मागितले आहे. म्हणून हा दैत्यराज मूर्ख तर आहेच पण वीररसाविषयी अनभिज्ञ आहे असेच मला वाटते.
अरे दुष्टा, त्या महिषाने स्त्रीकडून मरण सुखदायक होईल म्हणून तसा वर मागितला, पण खरोखरीच तसे मरण शूराला दु:खदायक नाही का ? मी स्त्रीरूप धारण करून देवकार्य करण्यासाठी आले आहे. तर मी भय का धरावे ?
अरे, दैव फिरवल्यावर तृणही वज्राप्रमाणे भासत असते. तेव्हा सैन्ये व आयुधे यांचा आश्रय दैवापुढे टिकाव धरणार नाही. ज्याचे मरण जवळ येऊन ठेपले आहे त्याला सैन्याचा उपयोग नाही. कालयोगानेच सुख, दुःख व मरण ठरून गेलेले असते. दैवात लिहिल्याप्रमाणे मृत्युयोग संभवत असतो. प्रत्यक्ष ब्रह्मदेवादिकांचे जन्ममरणही ठरल्यावेळी घडत असते. मग इतरांचा विचारच कशाला ?
जन्ममरण निश्चित आहेत, पण देवांच्या वरदानामुळे जे मृत्यूची भीति बाळगत नाहीत ते मूर्ख होत. तू त्याला सांग की देवांना स्वर्ग प्राप्त होऊन यज्ञातील हविर्भाग मिळावा यासाठी तू त्वरित पाताल लोकी जावेस. आणि जर महिषाचा तसा विचार नसेल तर युद्धाला तयार होऊन तू सत्वर ये. अरे, विष्णु वगैरे सर्व देव पराभूत झाल्याने तू माजला आहेस. पण त्याचे कारण दैव आणि ब्रह्मदेवाचे वरदान हेच आहे."
ते ऐकून तो विचार करू लागला की आता येथून युद्ध न करता जावे की कसे ? कारण विवाहासाठी हिला बरोबर आणण्याची राजाज्ञा आहे. तरी कलह न करता येथून जाऊन राजाला सत्वर कथन करावे. पुढचा निर्णय राजाच घेईल. सर्व मंत्र्यांची मसलत घेऊन तो काय करायचे ते ठरवील.
असा मनात विचार करून तो मंत्री महिषाकडे परत आला व नम्रतापूर्वक हात जोडून म्हणाला, "हे राजा, ती देवी सिंहावर बसली असून तिचे अठरा हात आयुधांनी युक्त आहेत. मी तिला म्हटले हे सुंदरी, तू महिषाची पट्टराणी होऊन या त्रैलोक्याचा चिरकाल उपभोग घे. आज व पुढेही तो तुझ्या आधीन होऊन राहील व तू स्त्रियांमध्ये सर्वश्रेष्ठ व भाग्यवती स्त्री होशील; पण हे राजा माझे ऐकून ती मधुरादेवी हास्यकल्लोळात मग्न होऊन म्हणाली, महिषीच्या गर्भापासून उत्पन्न झालेल्या त्या अधम पशूला मी देवकार्यासाठी बळी देणार आहे. अरे मूर्खशिरोपणे, पती म्हणून महिषाचा स्वीकार करणारी एवढी मूर्ख स्त्री जगात असणार नाही. अरे मजसारखी स्त्री पशू होईल का ? कामातुर असलेली एखादी महिषीच त्याचा पती म्हणून स्वीकार करील, मी इतकी नीच नाही. मी संग्रामात युद्ध करून तुझ्यासारख्या देवशत्रूंचा वध करीन. तस्मात् जीवाची आशा असेल तर त्वरित पातालात जा.
हे राजा, ते कठोर भाषण ऐकून मी पूर्ण विचार केला आणि केवळ रसभंग होऊ नये म्हणून तिच्याशी युद्ध न करताच परत आलो. आपल्या आज्ञेशिवाय मी तरी काय ठरविणार ?
हे राजा, ती स्त्री अत्यंत उन्मत्त झाली आहे. भवितव्यात काय आहे हे मी जाणू शकत नाही. जे होणे असेल ते होईल. आपली आज्ञा आम्ही प्रमाण मानू. युद्ध किंवा पलायन यापैकी काय करायचे हे मला सांगता येणार नाही."