[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]
विष्णूचे भाषण ऐकून सर्व देव प्रमुदित झाले. त्यांनी आपली सर्व भूषणे व शस्त्रास्त्रे देवीला अर्पण केली. क्षीरसागराने प्रसन्न चित्ताने आरक्तवर्णी, दिव्य, सूक्ष्म, कधीही जुनी न होणारी अशी वस्त्रे व एक उत्तम प्रकारे शृंगारलेला हार दिला. कोट्यावधी सूर्याप्रमाणे असलेला दिव्य चूडामणी, शुभ्र कुंडले, हातातील गोट, बाजूबंद व नानाप्रकारच्या रत्नांनी सुशोभीत अशी दिव्य कंकणे विश्वकर्म्याने दिली. सूर्यापासून तेजस्वी उत्तम नादयुक्त मनोहर व निर्मल, रत्नजडित तोरड्या त्वष्ट्याने दिल्या. रम्य कंठभूषणे व तेजस्वी अंगठ्या महासागराने दिल्या. सुवर्णाच्या पुष्पांनी गुंफलेली सुगंधी व भ्रमरांनी युक्त अशी वैजयंतीमाला वरुणाने दिली. हिमालयाने सर्व रत्नासहित भूषवलेला एक सुंदर पण तेजस्वी सिंह तिला वाहानाकरता दिला.
अशाप्रकारे सर्व रत्नगुणांनी आलंकृत होऊन ती भगवतीदेवी सिंहावर स्वार झाली. विष्णूने आपल्या सुदर्शनचक्रापासून एक दिव्य चक्र निर्माण करून देवीला अर्पण केले. त्याला सहस्र आरा होत्या. शंकराने त्रिशूलापासून दुसरा एक उत्तम असा त्रिशूल निर्माण करून भगवतीला दिला.
वरुणानेही प्रसन्न होऊन आपल्या शंखापासून मधुर नादयुक्त व मंगलकारक शंख निर्माण करून दिला. सूर्याने दैत्यविनाशक अशी वेगवान शतघ्नी नावाची महाशक्ती तिला अर्पण केली. वायूने अद्भुत व उग्र शब्द करणारे धनुष्य बाणांनी युक्त असलेल्या भात्यासह दिले. इंद्राने आपल्या वज्रापासून अतिभयंकर वज्र उत्पन्न करून दिले व ऐरावताच्या घंटेपासून उत्तम नाद करणारी घंटा दिली.
प्रलयकारी ज्याच्या योगाने यम सर्वनाश करतो त्या कालदंडापासून दुसरा एक तेजस्वी दंड यमाने दिला. ब्रह्मदेवाने गंगाजलाने भरलेला कमंडलू दिला. वरुणाने पाश दिला. कालाने ढाल तलवार आणि विश्वकर्म्याने परशू दिला. कुबेराने सुरेने भरलेले एक सुवर्णाचे पानपात्र दिले. वरुणाने दिव्य मनोहर कमल अर्पण केले. दैत्यांचा नाश करणारी व अनेक घंटांचा नाद करणारी एक कौमुदकी नावाची गदा त्वष्ट्याने तिला दिली. त्याशिवाय अभेद्य कवचासह अनेक प्रकारची अस्त्रेही दिली. सूर्याने आपली किरणे त्याजगन्मातेला बहाल केली.
अशाप्रकारे सर्व भूषणांनी मंडित व आयुधांनी संपन्न झालेल्या अशा त्या त्रैलोक्यमोहिनी व मंगलमय देवतेला पाहून सर्व देव विस्मयचकित झाले व तिची स्तुती करू लागले, देव म्हणाले, "शिवा, कल्याणी, शांती, पुष्टी, भगवती, देवी रुद्राणी, तुला सतत नमस्कार असो. जी पृथ्वीला व्यापून आहे, पण पृथ्वीला जिचे ज्ञान नाही, तिच्या अंतर्यामी राहून जी पृथ्वीला प्रेरणा करीत आहे, त्या उत्कृष्ट परमेश्वरीला आम्ही वंदन करतो. हे कालरात्री, अंबा, इंद्राणी, सिद्धी बुद्धी, वृद्धी आणि वैष्णवी तुला नमस्कार असो. मायेचे ठिकाणी जी स्थित आहे परंतु मायेला जिचे ज्ञान नाही आणि अंतर्यामी स्थित असल्यामुळे जी ती मायेला प्रेरणा करीत आहे, त्या प्रेरक व कल्याणी देवीला आमचा नमस्कार असो.
हे माते, आम्हाला शत्रूने अत्यंत पीडित केले आहे. तरी तू आम्हा सर्वांचे रक्षण कर. त्या पापी महिषाचा तू आपल्या तेजाने नाश कर. तो वरामुळे माजला आहे. तो पुष्ट असून मायावी असल्यामुळे अनेक रूपे धारण करतो. त्याला फक्त स्त्रीच्याच हातून मृत्यु आहे. म्हणून हे भक्तवत्सले या पापात्म्यापासून आमचे रक्षण कर. तुला नमस्कार असो.
अशा तर्हेने सर्वसुखदायी देवीचे सर्व देवांनी स्तवन केले. तेव्हा ती महादेवी हसत म्हणाली, "देवांनो, आता दैत्यांचे भय बाळगू नका. त्या वरोन्मत्त महिषाचा आज मी रणात नाश करीन."
अशाप्रकारे देवांना अभय देऊन ती म्हणाली, "या संसाराचे हेच आश्चर्य आहे. हे जग भ्रमाने व मोहाने व्यापले आहे. प्रत्यक्ष विष्णु, महेश्वर, ब्रह्मदेव, इंद्र व इतर देव महिषासुरापासून भयभीत झाले आहेत. दैवाचे सामर्थ्य हेच श्रेष्ठ असून देवही त्याचा प्रतिकार करू शकत नाहीत. तेव्हा सर्व सुखदुःखाचा कर्ता हा कालच आहे. कारण जगाची उत्पत्ती, स्थिती, लय करण्यास समर्थ असलेले हे ब्रह्मा, विष्णु, महेशही महिषासुरामुळे जर्जर झाले आहेत, ते मोह पावले आहेत."
अशाप्रकारे हसत मुखाने देवीने असुरांना भयप्रद, महाघोर व उच्च स्वराने युक्त असा महानाद केला. त्या अद्भुत नादाने धरणीकंप होऊ लागले. सागर क्षुब्ध झाले. मेरुपर्वतादि सर्व पर्वत हलू लागले. सर्व दिशा दणाणून गेल्या. त्या प्रचंड स्वराने देवांनाही भीती निर्माण झाली. सर्व देवांनी देवीचा अत्यंत जयजयकार केला आणि ’आमचे रक्षण कर’ असे ते म्हणू लागले.
उन्मत्त झालेला महिषासुर तो भयंकर आवाज ऐकून क्रोधायमान झाला. पण साशंक होऊन तो दैत्यांना म्हणाला, "हे काय आहे ? हा शब्द कोठून उत्पन्न झाला ? याची चौकशी करण्याकरता दूताने सत्वर जावे. हा अतिशय कर्कश ध्वनी कुणी उत्पन्न केला ? तो देव असो वा दानव असो, त्या पापात्म्याला सत्वर मजसमोर उभा करा म्हणजे मत्त झालेल्या त्याचा मी वध करीन. देव पराजित व भयभीत झाल्यामुळे ते गर्जना करणार नाहीत. असुर माझ्या अधीन असल्याने गर्जना करणार नाहीत. तेव्हा हे मूर्खपणाचे वर्तन करणार्या व्यक्तीने मजकडे यावे म्हणजे दुरात्म्याचा मी वध करीन."
ह्याप्रमाणे महिषासुराने दूताला सांगितल्यावर दूत ध्वनीच्या रोखाने निघाला. तो सर्वांग सुंदर देवी त्याच्या दृष्टीस पडली. ती सर्वालंकारमंडित अष्टादश हात असलेली होती. सर्वश्रेष्ठ आयुधे तिने धारण केली होती. ती शुभलक्षणांनी संपन्न असलेली देवी वारंवार सुरा पान करीत होती. तिला पहाताच तो दूत शंकित झाला. घाबरून त्रस्त होऊन तो पुन: महिषाकडे आला व त्याने ध्वनीचे कारण त्याला सांगितले.
दूत म्हणाला, "हे दैत्यराज, मी आपल्या आज्ञेप्रमाणे शोध करीत असता एके ठिकाणी एक दिव्य व प्रौढ स्त्री दृष्टीस पडली. ती सर्वांगविभूषित व सर्व रत्नांलंकृत अशी होती. ती दिव्य व नयनमनोहर स्त्री मनुष्ययोनीतील नाही. ती सिंहारूढ झालेली असून तिने सर्व शस्त्रास्त्रे धारण केलेली आहेत. तिला अठरा हात आहेत. ती सुरापानाविषयी तत्पर आहे व उन्मत्त होऊन गर्जना करीत आहे, ती अविवाहीत असावी असे वाटते. सर्व देव तिच्याभोवती जमले असून, ते तिचे स्तवन करीत आहेत. सर्व देव तिचा जयजयकार करताना ' हे देवी आमचे रक्षण कर. शत्रूचा वध कर. ' असे शब्द सारखे उच्चारीत आहेत.
ती सुंदरी कोण, कुठली, कुणाची भार्या व येथे येण्याचा तिचा उद्देश काय हे मात्र आम्हाला समजू शकले नाही. आम्ही तिच्या तेजाने दिपून गेल्यामुळे तिच्याकडे पाहूच शकलो नाही. शृंगार, वीर, हास्य अद्भुत या रसांनी ती युक्त आहे, अशा प्रकारची ती स्त्री पाहिल्याबरोबर आम्हाला तिच्याशी भाषण न करताच परत यावे लागले. तेव्हा पुढे काय निर्णय घ्यायचा तो आपण घ्यावा."
दूताचे भाषण ऐकल्यावर महिषाने आपल्या प्रमुखाला पाचारण करून सांगितले, "तू सैन्य बरोबर घेऊन जा आणि कोणताही उपाय करून त्या सुंदर स्त्रीला इकडे घेऊन ये. ती तशी न येईल तर तिला पकडून आण म्हणजे तिला वश करून घेऊन मी तिला पट्टराणी करीन. ती सुंदरी आनंदाने येईल तर बरेच. तेव्हा तू माझी इच्छा पूर्ण कर. कारण तिचे वर्णन ऐकल्यावर मी अगदी मोहित झालो आहे.
महिषासुराचे हे नाजूक भाषण ऐकून तो प्रधानमंत्री बरोबर सर्व प्रकारचे सैन्य घेऊन तेथे गेला. सैन्य दूर उभे करून अत्यंत विनयाने तो त्या देवीला म्हणाला, "हे महाभाग्यवती, तू कोण आहेस ? येथे येण्याचे प्रयोजन काय ? असे माझा स्वामी तुला विचारीत आहे. त्याने सर्व देवांना जिंकले आहे व तो सर्व पुरुषांना अवध्य आहे. हे चारुलोचने, ब्रह्मदेवापासून वरप्राप्ती झाल्यामुळे त्याला फार अभिमान वाटतो.
हा दानवश्रेष्ठ महापराक्रमी असून इच्छेप्रमाणे रूप धारण करणारा आहे. तुझ्या रूपाचे वर्णन ऐकल्यापासून तो तुझ्या दर्शनाची इच्छा करीत आहे. तुझी इच्छा असल्यास तो स्वतः मनुष्यरूप धारण करूनही येथे येईल. तुझ्यासाठी आम्ही सर्व काही करण्याचे योजिले आहे. तेव्हा हे मृगाक्षी, तू त्या महान महिषासमीप चल किंवा तुझ्या प्रीतीसाठी आतुर झालेल्या राजाला आम्ही इकडे आणतो. सारांश हे देवी तुझ्या इच्छेप्रमाणे कर. कारण तुझे सौंदर्य ऐकून राजा वेडा होऊन गेला आहे. तेव्हा हे सुंदरी, तू लवकर निर्णय सांग म्हणजे मी तसे करीन.