[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]
देव अत्यंत वेगाने वैकुंठाजवळ येऊन पोहोचले. सर्व प्रकारे सुशोभित असलेले ते वैकुंठपूर देवांनी पाहिले. तेथील विष्णूचे स्थान, सरोवर, वापी व नद्या सुखदायक व सुंदर होते. शब्द करणार्या हंस, सारस, चक्रवाक पक्ष्यांनी ते भूषित झालेले होते. चंपक, अशोक, कल्हार, मंदार व बकुल ह्यांनी व्याप्त आणि मष्ठिका, तिलक, आम्र, कुरबकादि झाडांनी ते सुशोभित दिसत होते. कोकिल पक्ष्यांचे ध्वनी, नृत्यकर्मामुळे सुशोभित दिसणारी मयूरपिच्छे आणि भ्रमरांचा गुंजारव यांच्या योगाने रम्य झालेली दिव्य उपवने, भक्तिपर स्तुतिस्तोत्रे गाणारे सुनंदन वगैरे सर्व तर्हेच्या श्रवणसौंदर्याची व दृष्टिसुखाचा आस्वाद घेत सर्व देव वैकुंठाची मुक्तपणे स्तुती करीत होते. तेथे सुवर्णाचे सुंदर प्रासाद डौलाने उभे होते. त्यावर नानातर्हेची चित्रे चितारली होती. गगनाला भिडणारी सुंदर अशी गृहे होती. देवगंधर्व गायन करीत, अप्सरा नृत्य करीत, किन्नर मधुर स्वरांचे आवाज करीत तेथे विहार करीत होते. वेदाध्ययन करणार्या ऋषीमुनींच्या सूक्तांतील स्तुतिस्तवनामुळे ते वैकुंठपूर अत्यंत आकर्षक भासत होते.
विष्णूच्या मंदिराच्या दारात स्वरूपसुंदर जयविजय द्वाररक्षण करीत होते. त्यांनी सुवर्ण वस्त्र धारण केले होते. देव म्हणाले, "हे द्वारपालांनी तुमच्यापैकी एकजण आत जाऊन आम्ही सर्व ब्रह्मशिवादि देव विष्णुदर्शनासाठी आतुर झालो आहोत असा निरोप भगवंतांना सांगा."
हे ऐकून विजय आत गेला व भगवान विष्णूंना म्हणाला, "हे रमाकांता, हे देवशत्रुनाशका सर्व देव दारापाशी येऊन उभे आहेत. ब्रह्मा, रुद्र, इंद्र, वरुण, अग्नी, यम वगैरे सर्वजण तुमची स्तुतिस्तोत्रे गात आहेत व दर्शनाची इच्छा करीत आहेत."
हे भाषण ऐकताच प्रत्यक्ष भगवान आपण स्वतःच देवांच्या भेटीसाठी बाहेर आले. अत्यंत श्रमाने कृश झालेले देव दारात उभे असलेले पाहून भगवंतांनी आपल्या प्रसन्न दर्शनाने सर्व देवांना आनंदित केले नंतर वेदांनी स्वरूप निश्चित केलेल्या भगवंतांची सर्व देव आपल्या कुवतीप्रमाणे स्तुति करू लागले.
देव म्हणाले, "हे जगन्नाथा, हे दयासिंधो, हे उत्पत्तिस्थितिलयकारका, हे महाराजा, आम्हा शरणागतांचे तू रक्षण कर.
विष्णु म्हणाले, "हे देवांनो, तुम्ही प्रथम आसनावर बसा, तुमची सर्व खुशाली मला सांगा. आपण सर्वजण एकत्रित होऊन येथे येण्याचे प्रयोजन काय असावे बरे ? ब्रह्मा व शिवासह सर्वच जण असे चिंतातुर आणि इतके दीन का झाला ? जे तुमचे काम असेल ते अगदी त्वरेने निवेदन करा."
देव म्हणतात, "वरप्राप्तीमुळे मत्त झालेला, पापी, दुराचारी महिषाने आम्हाला अत्यंत पडिले आहे. ब्राह्मणांनी अर्पण केलेले यज्ञभाग तोच भक्षण करतो. आम्ही सर्व देव सांप्रत गिरिकंदरातील गुहातून वास्तव्य करीत आहोत. हे भगवंता, ब्रह्मदेवाने वर दिल्यामुळे तो सर्वांना अजिंक्य झाला आहे. तेव्हा ह्या संकटाचे महत्त्व लक्षात घेऊन आम्ही तुला शरण आलो आहोत. आम्हाला या संकटातून सोडविण्यास तूच समर्थ आहेस. तरी हे दैत्यनाशका, महिषाच्या नाशाचा कोणता तरी उपाय कर. हे दैत्यनाशका कृष्णा, तू कोणत्याही उपायाने त्याच्या वधाची निश्चिती कर. ' पुरुषाच्या हातून तुझा वध होणार नाही, " असा या ब्रह्मदेवानेच त्याला वर दिला आहे. सांप्रत त्या दुष्टाचा वध करण्यास कोणतीही समर्थ स्त्री आम्हाला दिसत नाही. प्रत्यक्ष लक्ष्मी, उमा, शची, सावित्री यांपैकी तरी कोण समर्थ आहे ? तेव्हा हे भक्तांचे रक्षण करणार्या, तू महिषाच्या मरणाचे काहीही कारण शोधून काढ व देवाचे कार्य कर."
हे भाषण ऐकताच विष्णु हसत म्हणाले, "देवहो, आपण सर्वांनी पूर्वी त्याच्याशी युद्ध केले, पण तो अवध्यच राहिला. तस्मात आता त्याच्याशी युद्ध करण्यात यश नाही. आपल्या सर्वदेवांच्या तेजामुळे व श्रेष्ठत्वामुळे जर आपण एखादी समर्थ स्त्री उत्पन्न केली, तर तीच महिषाचा वध करील. आपल्या तेजोराशीतून स्त्रीरूप उत्पन्न व्हावे म्हणून आमच्या स्त्रियांनी आमच्या तेजाच्या राशीत आपले तेज विलीन करावे. मी, ब्रह्मा, रुद्राप्रभूती देव आमची संपूर्ण त्रिशुलादि आयुधे तिला देऊ म्हणजे सर्वगुणनायका या सर्व शास्त्रसंपन्न अशी ती देवी महिषाचा नाश करील."
येणेप्रमाणे भगवान विष्णूंनी सांगितले असता त्याचक्षणी ब्रह्मदेवाच्या मुखातून एक
दुःसह तेजोराशी बाहेर पडला. तो वर्णाने आरक्त व शुभ होता. त्याच्या ठिकाणी काही शीत व काही उष्ण गुण होते. तो किरण वलयांकित होता. शंकर व विष्णूंनी तो तेजोराशी अवलोकन केल्यावर त्यांनाही आश्चर्य वाटले.
असेच शंकराच्या शरीरातूनही एक अभूतपूर्व तेज बाहेर पडले. ते रौप्य वर्णाचे होते. ते उग्र प्रचंड होते. ते पर्वतमय व जणू दुसरा तमोगुणच असे होते. नंतर महाविष्णूच्या शरीरापासून सत्वगुणी नीलवर्ण व महातेजस्वी तेजोगोल उत्पन्न झाला. इंद्राच्या शरीरातून घन असे चित्रमय, सर्व गुणयुक्त ब असह्य असे तेज निर्माण झाले. अशा प्रकारे कुबेर, यम, अग्नी, वरुण ह्या सर्व देवेश्वरांतून अशीच अनेक तेजे बाहेर पडली. अखेर या महातेजाचा दिव्य लोळ पाहून देवांनाच आपले आश्चर्य वाटले.
थोड्याच वेळात त्या तेजातून सौंदर्यसंपन्न आणि महातेजस्वी अशी स्त्री निर्माण झाली. ती सर्व देवदेवतांच्यापासून उत्पन्न झाली असल्याने त्रयोगुणांनी व त्रिवर्णांनी युक्त होती. तिला अठरा हात होते. ती विश्वमोहिनी होती. तिचे मुख श्वेतवर्णी होते. ओष्ठ आरक्त होते. सर्व अलंकारांनी ती विभूषित होती. हजारो भूषणांनी ती युक्त होती. ती महालक्ष्मी केवळ असुरनाशाकरताच निर्माण झाली होती."
ही सर्व हकीकत ऐकून जनमेजय म्हणाला, "हे महामुनीश्रेष्ठ, आपण त्या भगवतीच्या शरीराचे वर्णन करा. तिचे कोणते अवयव कोणत्या देवापासून निर्माण झाले ? का ते सर्व तेजांच्या एकाच मिश्रणाचे होते ? त्याचप्रमाणे कोणी तिला कोणती आयुधे दिली ? हे सर्वश्रेष्ठा, आपल्या वाणीतून हे श्रवण करण्याची माझी इच्छा आहे. महालक्ष्मीच्या चरित्राचे अमृतसेवन केल्याशिवाय मला चैन पडत नाही."
व्यास म्हणाले, "हे कुरुश्रेष्ठा, मी सविस्तर हकीकत मी तुला यथामति सांगतो. कारण, प्रत्यक्ष ब्रह्मदेवही तिचे वर्णन करू शकणार नाही. मग तिचे परिपूर्ण वर्णन मी कसे करू शकणार ! ती उत्पन्न झाली हेच मी शब्दांनी सांगतो. कारण ती नित्य देवकार्य सिद्धीस नेण्याकरता अनेक रूपे धारण करते.
एखाद्या नटसम्राटाप्रमाणे ही देवि अरूप व निर्गुण असूनही लीलया अनंत सगुण रूपे धारण करते. ज्याप्रमाणे व्यवहारात दुसर्यास अर्थबोध करून देण्यासाठी आपण वाक्य तयार करतो, त्याप्रमाणे भगवतीच्या स्वरूपाविषयी आहे. तेव्हा हे राजा, मी आपल्या कुवतीप्रमाणे तेजसमूहापासून तिचे रूप कसे उत्पन्न झाले ते तुला कथन करतो.
शंकराच्या तेजामुळे तिचे मुखकमल प्रचंड व शुभ असे श्वेतवर्णाचे झाले. यमाच्या तेजाने तिचे केश मेघवर्णी असून, दीर्घ, वक्रग्रांनी युक्त व मनोहर झाले. संध्याच्या तेजामुळे तिच्या भिवया वक्र, स्निग्ध, कृष्णवर्ण व अति तेजस्वी, जणू मदनाची धनुष्येच अशा झाल्या. वायूच्या तेजापासून तिचे कर्ण प्रबल झाले. ते मदनाच्या झोपाळ्याप्रमाणे भासत होते. कुबेराच्या तेजापासून तिची नासिका अतीव सुंदर व स्निग्धवर्णी झाली. तिचा आकार तिलपुष्पाप्रमाणे होता.
त्याचप्रमाणे दक्षादिकांच्या तेजामुळे उत्पन्न झालेले तिचे दंत कुन्दकलिकेसारखे तेजस्वी व तुळतुळीत होते. अरुणाच्या तेजाने तिचा अधर अतिशय लाल तर कार्तिकाच्या तेजाने तिच्या उत्तरोष्ठात रमणीयतेची भर पडली होती. तिचे अत्यंत शुभ असे अठरा हात विष्णूच्या तेजापासून निर्माण झाले. अष्टवसूंपासून तिच्या अंगुळी आरक्तवर्णी झाल्या. सोमाच्या तेजामुळे तिचे स्तन पुष्ट असे झाले. इंद्राच्या तेजामुळे तिचा मध्यभाग तीन वळ्यांनी युक्त झाला. तिच्या मांड्या व पोटर्या वरुणाच्या तेजाने उत्पन्न झाल्या व भूमीच्या तेजाने तिचा विपुल कटिप्रदेश निर्माण झाला.
तेव्हा हे जनमेजया, अशा प्रकारे सर्व देवांच्या तेजोराशीपासून उत्पन्न झालेली ही देवी उत्कृष्ट बांधा, सुंदर स्वरुप व अतीव मनोहर स्वर यांनी मंडित होती. ती स्त्री दृष्टी पडताच देवांच्या मनातील महिषासुराची भीती पार मावळून गेली. ते अत्यंत आनंदित झाले.
नंतर विष्णू सर्व देवांना म्हणाले, "हे देवहो, आता आपली सर्व शुभ भूषणे व आयुधे हिला द्या. आणि आता त्वरा करून नाना प्रकारची तेजस्वी आयुधे निर्माण करून हिला अर्पण करा."