[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]
सर्व असुर खिन्न होऊन गेले होते. ते पाहून महिषासुराने मनुष्यशरीर टाकून सिंहाचे रूप धारण केले. आपली आयाळ पिंजारून तो तीक्ष्ण नखांनी युक्त होऊन देवांवर धावून गेला. त्याने गरुडाला रक्तबंबाळ करून टाकले व विष्णूच्याही हातावर आपल्या नखांनी प्रहार केला ते पाहताच विष्णूने त्याचा वध करण्यासाठी चक्र उगारले. तो आपल्या चक्राने प्रहार करणार इतक्यात महिषासुराने आपल्या शिंगाने विष्णूवर प्रतिप्रहार केला. वक्षावरच शिंगाचा प्रहार झाल्यामळे विष्णु अत्यंत विव्हल झाले आणि ते वेगाने वैकुंठास निघून गेले. भगवान विष्णु निघून गेल्याचे पाहून शंकरही भीतीने गांगरले व महिषासुर अवध्य आहे असा विचार करून त्वरेने कैलास पर्वतावर निघून गेले. ब्रह्मदेवही स्वस्थानी गेला. आता रणांगणात फक्त इंद्र, वरुण, यम, कुबेर, अग्नी, चंद्र व सूर्य हे आपापली आयुधे घेऊन युद्धासाठी दक्ष होऊन रणांगणात उभे होते.
इतक्यात भयंकर भुजंगाप्रमाणे असलेले बाण फेकीत महिषासुर क्रुद्ध झालेल्या दैत्यसैन्यासह तेथे आला. आपले महिषाचे रूप धारण करून तो युद्धप्रवृत्त झाला. पुनः एकदा देवदानवांमध्ये तुमुल युद्ध सुरू झाले. मेघनादाप्रमाणे एकमेकांवर आघात होऊ लागले. महाबलाढ्य महिषासुर आपल्या शिंगांनी पर्वतशिखरे उपटून देवांवर फेकू लागला. आपल्या तीक्ष्ण शिंगांनी तो देवांवर प्रहार करू लागला. त्याचप्रमाणे आपल्या खुरांचा व पुच्छाचा मारा करू लागला. त्यामुळे युद्धप्रवृत्त देव गंधर्वासहित भयभीत होऊन गेले. अखेर इंद्र तर महिषाला पाहून एकसारखा पळत सुटला.
प्रत्यक्ष इंद्रच रणांगण सोडून गेल्याने इतर देवही भयभीत होऊन रण सोडून चालते झाले. तेव्हा आपला पूर्ण जय झाला असे समजून महिषासुर आनंदाने आपल्या घरी गेला. नंतर इंद्राने जाता जाता टाकून दिलेला ऐरावत, उच्चैश्रवा नावाचा घोडा, सूर्याची दूध देणारी कामधेनू ह्या दिव्य वस्तु महिषसुराला प्राप्त झाल्या. त्यापेक्षा अधिक दिव्य वस्तु प्राप्त करून घेण्यासाठी तो आपल्या सर्व सैन्यासह स्वर्गावर चाल करून गेला. देवांनी सोडलेले ते राज्य विनासायास महिषासुराला प्राप्त झाले.
शंभर वर्षे दारुण युद्ध केल्यावरच महिषासुराला आता सर्व प्राप्त झाले होते. तो स्वतः इंद्राच्या सुंदर आसनावर बसला व इतर देवांच्या आसनावर त्याने दैत्यांची स्थापना केली. अशा प्रकारे त्याला शेवटी इंद्रपदाची प्राप्ती झाली.
सर्व देव अगोदरच निघून गेले होते व त्यांनी निरनिराळ्या पर्वतांच्या गुहांचा आश्रय केला. सर्व देव त्रस्त होऊन ब्रह्मदेवाला शरण गेले. ब्रह्मलोकी जाऊन तेथे असलेल्या प्रजाधिप, जगन्नाथ, रजोगुणरूप, चतुर्मुख, पद्यासन, वेदगर्भ, स्वतःपासून उत्पन्न झालेला, शांत आणि वेदवेदांगपारंगत अशा मरीची प्रभृती मुनींनी आणि किन्नर, सिद्ध, गंधर्व, चारण, उरग व पन्नग ह्मांनी सेवित असलेल्या त्या देवाधिदेव जगद्गुरु ब्रह्मदेवाचे ते भयभीत झालेले देव स्तवन करू लागले.
देव म्हणाले, "हे विधात्या, हे कमलयोने, असुराधिपती महिषासुराने अत्यंत पीडा देऊन रणामध्ये जिंकल्यामुळे स्थान भ्रष्ट होऊन पर्वतांच्या गुहांमध्ये वास्तव्य करीत असलेल्या आम्हा देवांना अवलोकन करून तू दया करीत नाहीस. हे दुःखनाशका, तुझ्या चरणकमलांची सेवा करीत असलेल्या ह्या देवांना दैत्याने पीडल्यामुळे आम्ही दीन झालो आहोत. तरीही तू आज आमची उपेक्षा करतोस. परंतु पुत्रांचे शेकडो
अपराध पाहून पिता त्यांना अधिक दुःख देतो का ? सध्या महिष देवराज्याचा हवा तसा उपभोग घेत आहे. ऋषीमुनींनी दिलेले यज्ञाचे हवि तोच स्वीकारीत आहे. कल्पतरूंच्या पुष्पांचा तो आस्वाद घेत आहे. कामधेनूचेही तोच सेवन करीत आहे. हे सुरेश्वरा, यापेक्षा आम्ही अधिक काय सांगावे ? अंतर्ज्ञानाच्या योगाने तू सर्व गोष्टी जाणत आहेस. तेव्हा हे देवा, आम्ही तुझ्या चरणी नम्र झालो आहोत. आम्ही देव कोठेही गेलो तरी तो पापबुद्धी महिष आम्हाला सर्वत्र पीडाच देत आहे. अशा वेळी तूच आमचा त्राता आहेस. म्हणून हे प्रभो, तूच आमचे कल्याण कर. सर्व शक्तिमान ब्रह्मदेवाला सोडून आम्ही दानवपीडित सुरांनी कोणाकडे आश्रय मागावा ?"
ह्याप्रमाणे ब्रह्मदेवाची स्तुती केल्यावर सर्व देवांनी हात जोडले त्याचे दुःख अवलोकन करून ब्रह्मदेव मधुर वाणीने म्हणाला, "देवहो, माझाही नाइलाज आहे. वराने मत्त झालेल्या त्या महिषाला स्त्रीकडून मरण आहे. तेव्हा आपण कैलासावर जाऊन शंकराला बरोबर घेऊन भगवान विष्णूकडे जाऊ व तेथे गेल्यावर पुढील विचार ठरवू."
सर्व देव कैलासावर येत असलेले पाहून महेश स्वस्थानापासून बाहेर आले व सर्व देवांचा प्रणाम स्वीकारून संतुष्ट झाले. नंतर सर्व देवांना योग्य आसने दिल्यावर शंकरही स्वस्थानी बसले. सर्वांना कुशल विचारल्यावर देवांना कैलासाकडे येण्याचे कारण विचारले. शिव म्हणाले, "हे देवांनो, महाभाग्यशाली इंद्रासह आपण सर्वजण येथे का बरे आला हे मला सांगा."
ब्रह्मदेव म्हणाले, "हे शंकरा, सर्व देव भयभीत होऊन सांप्रत गृहांमध्ये वास्तव्य करीत आहेत. त्याचप्रमाणे महिषासुर व इतर दैत्य हेच हल्ली यज्ञभोक्ते झाले असून सर्व लोकपालांना फारच पीडा झाली आहे. म्हणून आम्ही तुला शरण आलो आहोत. तरी हे महादेवा, कार्याचे महत्त्व लक्षात घेऊन मी देवांना आपणाकडे आणले आहे. तेव्हा आपणाला योग्य वाटेल ते आपण करा. आता आम्हा सर्व देवांची भिस्त तुमच्यावरच आहे."
हे भाषण श्रवण करून शंकर हर्षयुक्त वाणीने म्हणाले, "हे ब्रह्मदेवा, आपणच वरदान दिल्याने हे कृत्य आज घडले. त्या अनर्थापुढे आपण काय करावे ? हा महिषासुर देवांपेक्षाही बलाढ्य व शूर आहे. तेव्हा अशा माजलेल्या दैत्याचा वध करण्यास कोणती स्त्री समर्थ होणार ? आपल्या दोघांच्याही भार्या प्रत्यक्ष समरभूमीवर जाऊ शकत नाहीत. इंद्राणीसुद्धा युद्धनिपुण नाही. तेव्हा त्या पापात्म्याचा वध करण्यास कोणती स्त्री समर्थ होणार ? तेव्हा आता आपण भगवान विष्णूकडे जाऊ व त्याचे स्तवन करून त्यालाच त्या देवकार्यास प्रवृत्त करू. कारण तो अति बुद्धिमान असल्याने तोच यातून आपला निभाव लावील. तो सरळ मार्गाने अथवा कपट मार्गाने आपली सर्व इच्छा सिद्धीस नेईल."
ह्याप्रमाणे शंकराचे भाषण ऐकून सर्व सुरश्रेष्ठ शिवासह सत्वर तेथून निघाले. जाता जाता शुभशकुन होऊ लागल्याने ते सर्वजण आनंदित झाले होते. मार्गामध्ये सर्व बाजूंनी पक्षी मंगलकारक शब्द करू लागले. आकाश प्रसन्न झाले आणि दिशा निर्मल दिसू लागल्या. सारांश, देव वैकुंठास निघाले असता सर्वत्र सुचिन्हे दिसू लागली.