[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]
अखेरीस ताम्रदैत्यासारखा महापराक्रमी सेनापती मूर्च्छित झाल्याने महिषासुर अत्यंत चवताळला. तो स्वतःच मोठी गदा घेऊन देवांवर चालून गेला व गर्जना करीत म्हणाला, "आता सर्व देवांनी माझ्या समोर युद्धाला उभे रहावे. मी आता या एकच गदेने तुम्हा सर्वांचा वध करतो. तुम्ही सर्व देव केवळ यज्ञातील यथेष्ट बलिभक्षक असून सर्वदा निर्बल आहा."
असे म्हणून तो रागाने इंद्रावर चाल करून गेला, त्याने इंद्राच्या बाहूंवर गदेचा भयंकर प्रहार केला. पण इंद्राने आपल्या वज्राचा प्रतिप्रहार केला. त्या कठिण प्रहाराने महिषासुराची गदा इंद्राने सत्वर तोडून टाकली आणि पुन: प्रहार करण्याचा ईर्षेने तो महिषासुरावर धावून गेला. तेव्हा महिषासुरही एक प्रचंड तेजस्वी खङ्ग घेऊन इंद्रावर प्रहार करण्यासाठी धावून इंद्राजवळ गेला.
तेव्हा त्या दोघांमध्ये अत्यंत भयानक असे युद्ध झाले. सर्व लोकांचा नाश करणारी व मुनींनाही भूल पडेल अशी शंभरसुराची मोहक माया त्या दैत्याने प्रकट केली. त्या मायाबलाने व पराक्रमाने महिषासुरासारखे कोट्यावधी महिष आयुधासहवर्तमान चोहोकडे दृष्टीस पडू लागले आणि ते सर्व महिष त्या देवसेनेवर प्रहार करू लागले. त्यामुळे इंद्रसुद्धा विस्मयचकित होऊन भीतीमुळे उद्वीग्न झाला. वरुण, कुबेर हेही सर्वजण अगदी घाबरून गेले. यम, अग्नी, सूर्य व चंद्र हे सर्व भीतीने गांगरले. मोहित झालेले ते देव एकसारखे पळत सुटले आणि दक्ष राहून ब्रह्मा-विष्णु-महेशाचे स्मरण करू लागले. त्याचे स्मरण करताच ते हंस, गरुड, वृषभ यांवर आरूढ होऊन देवांचे रक्षण करण्याकरता धावून आले. महिषाची ती मोहिनी माया पाहून विष्णूने आपले सुदर्शनचक्र सोडले. त्याच्या तेजाने ती सर्व माया लयास गेली. जगताची उत्पत्ती, स्थिती, लय करणारे देव दृष्टीस पडताच महिषासुर प्रचंड परिघ घेऊन त्यांच्यावर चालून गेला. त्याचे सेनापती चिक्षुर, उग्राक्ष व उग्रवीर हेही युद्धासाठी धावून आले. त्यांच्याबरोबर असिलोमा, त्रिनेत्र, बाष्कल, अंधक वगैरे सर्व दैत्याधिराज रणांगणात युद्धासाठी उतरले. सर्व दैत्यांनी देवांना सर्व बाजूने वेढून टाकले. त्यानंतर उन्मत्त झालेल्या दैत्यांनी देवांवर प्रचंड बाणवृष्टी केली. दोन्ही पक्ष एकमेकांचा कायमचा नाश करण्यासाठी युद्ध करीत होते. अंधकाने विष्णूजवळ येऊन विषदायक शिळेवर घासलेले आणि कानापर्यंत ओढलेले पाच बाण त्याच्यावर सोडले. परंतु शत्रुनाशक विष्णूनेही ते बाण पोहोचण्यापूर्वीच आपल्या शक्त बाणांनी ते तोडून टाकले आणि उलट त्याच्यावर पाच बाण सोडले. विष्णु व अंधक यांच्यामध्ये अंगावर काटा येण्यासारखे युद्ध झाले. ते एकसारखे पन्नास दिवस चालू होते.
त्याचप्रमाणे इंद्र व बाष्कल, महिषासुर व' शंकर, यम व त्रिनेत्रासुर, कुबेर व महाहनू आणि वरुण व असिलोमा यांच्यामध्येही महायुद्ध झाले, अंधकाने आपल्या गदेचा जबरदस्त प्रहार गरुडावर करताच गरुड घामाघूम होऊन धापा टाकू लागला. परंतु त्याचे धैर्य खचू नये म्हणून आपल्या उजव्या हाताने विष्णूने गरुडाची पाठ थोपटली. अशा प्रकारे महाबलाढ्य गरुडाला स्थिर करून भगवान विष्णूने शार्ङ्ग धनुष्य खेचले आणि अंधकाचा वध करण्याच्या इराद्याने अनेक तीक्ष्ण बाण अंधकावर टाकले. परंतु अंधकाने ते सर्व बाण तोडले व पुन: शिळेवर घासलेले पन्नास बाण विष्णूवर सोडले. ते विष्णूने चुकवले व आपले सहस्र आरांनी युक्त असलेले सुदर्शन अंधकावर सोडले.
पण अंधकाने लांबूनच ते सुदर्शन थोपवून धरले व आपल्या चक्राने त्याचे निवारण केले आणि तो प्रचंड गर्जना करू लागला. तेव्हा सर्व देव भयभीत झाले. विष्णूचे सुदर्शनचक्रसुद्धा निष्फल झाले हे पहाताच सर्व देव शोकमग्न झाले. सर्व दानव मात्र हे पाहून हर्षित झाले व खदखदा हसू लागले.
देव दुःखित झाल्यामुळे वासुदेवालाही वाईट वाटले. कौमोदकी नावाची गदा धारण करून तो त्वरेने दानवांवर धावून गेला. आपल्या गदेचा भयंकर प्रहार त्याने मायावी राक्षसावर केला. त्याबरोबर तो दैत्य मूर्च्छा येऊन पडला. ते पाहून महिषासुर अत्यंत क्रुध्द झाला. तो मोठमोठ्याने गर्जना करून विष्णूवर चाल करून गेला. ते पाहताच विष्णूने प्रत्यंचेचा टणत्कार केला तो ऐकून सर्व देव आनंदित झाले. विष्णूने महिषासुरावर एकामागून एक बाण सोडले. पण महिषासुराने ते सर्व आपल्या बाणांनी मोडून टाकले. अखेर विष्णूने आपल्या गदेचा प्रचंड प्रहार महिषासुराच्या मस्तकावर केला. त्याबरोबर तो दैत्यराज मूर्च्छित होऊन धरणीवर कोसळला. सर्व दानवसैन्यात एकच हाहाकार उडाला.
परंतु एका मुहूर्ताने महिषासुर सावध झाला व त्याने परिघाचा एकच प्रहार विष्णूच्या मस्तकावर केला. त्याच क्षणी विष्णु मूर्च्छित झाला. मूर्च्छित विष्णूला घेऊन गरुड रणातून निघून गेला. प्रत्यक्ष विष्णुवर ही आपत्ती आली, तेव्हा सर्व देव भयाकुल होऊन गेले. देव आक्रोश करू लागले हे अवलोकन करताच शूलपाणी शंकर कुद्ध झाला. त्याने शुलाचा प्रहार महिषासुरावर केला तेव्हा महिषासुराने शंकराच्या वक्षावर शक्ती टाकली व शंकराच्या त्रिशूलाचा प्रहार चुकवून तो प्रचंड गर्जना करू लागला. वक्षस्थलावर प्रहार झाल्याने शंकराला पीडा तर झाली नाहीच, पण तो अत्यंत कुद्ध झाल्याने पुनः महिषावर शूलाचा प्रहार करू लागला. इकडे भगवान विष्णु सावध झाले. त्यांनी शंकर व महिषासुराचे युद्ध चालू असलेले पाहून पुनः रणांगणात प्रवेश केला.
महाबलवान शंकर व विष्णु यांना युद्ध प्रवृत्त झालेले पाहताच महिषासूर त्यांना सामोरा गेला. महिषरूप धारण करून आपले मागचे शेपूट हालवीत तो पुनः गर्जना करू लागला. त्यामुळे देव त्रस्त झाले. तो आपली प्रचंड शिंगे हालवू लागला व त्या योगे प्रचंड पर्वतशिखरे उपटून देवांवर फेकू लागला.
त्याच्या प्रतिकारार्थ सर्व देवांनी त्याच्यावर बाणांचा वर्षाव केला, त्याच वेळी महिषासुराने आपल्या शेपटीने एक प्रचंड पर्वतशिखर उपटून शंकर व विष्णु यांच्यावर फेकले, विष्णूने आपल्या बाणांनी त्या प्रचंड पर्वतशिखराचे शेकडो तुकडे करून टाकले व चक्राचा जबरदस्त प्रहार महिषासुरावर केला. त्याबरोबर महिषासुर मुर्च्छित पडला. परंतु दुसर्याच क्षणी सावध होऊन उठून त्याने मनुष्यशरीर धारण केले.
महाभयंकर व पर्वताप्रमाणे दिसणार्या त्या दैत्याने हातात गदा धारण केली व प्रचंड मेघाप्रमाणे गर्जना करून त्याने देवांना भयभीत करून सोडले. त्या आवाजाने निर्माण झालेले भय दूर करण्याकरता भगवान विष्णूने आपला उज्वल पांचजन्य शंख जोराने फुंकला. त्या शंखनादाने सर्व दानव घाबरून गेले व सर्व देव आणि ऋषी आनंदित झाले.