[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]
हा सर्व उपदेश ऐकून इंद्र म्हणाला, "महिषासुराचा पराभव करण्यासाठी युद्धाच्या उद्योगाशिवाय राज्य, सुख, यश हे प्राप्त होत नाही. निरुद्योगी पुरुषाची कोणीही प्रशंसा करीत नाही. तत्त्वज्ञान हे यतीचे भूषण असून संतोष हे द्विजांचे भूषण आहे, उद्योग व शत्रुवध हे अभ्यदयाची इच्छा करणार्या पुरुषाचे भूषण आहे. तेव्हा उद्योगाच्या योगाने विश्वरूप, नमुची यांचा मी वध केला. त्याचप्रमाणे आताही मी या महिषासुराचा नाश करीन. तू देवगुरूच माझे सैन्य आहेस. वज्र हे माझे उत्कृष्ट आयुध आहे. विष्णु व शंकर हे माझे सहाय्यकर्ते आहेत. हे गुरुदेवा, तू राक्षसांचा नाश करणारे मंत्र पठण कर. मी आज उद्योग करतो. महिषासुराकडे माझे सैन्य पाठवतो."
इन्द्राने असे सांगितल्यावर बृहस्पती म्हणाला, हे देवराज, तुला युद्धापासून मी परावृत्तही करीत नाही व प्रवृत्तही करीत नाही. कारण युद्ध करणार्या पुरुषाच्या जयाची अथवा पराजयाची निश्चिती नसते.
भवितव्य जसे असेल तसेच घडेल. त्यात तुझा काही दोष नाही. ठरल्याप्रमाणेच सुख अथवा दुःख प्राप्त होत असते. भवितव्यात काय घडेल याचे मला ज्ञान नसल्याने मला निश्चित असे काहीच सांगता येत नाही. हे इन्द्रा, पूर्वी भार्याहरणासंबंधाने मला प्राप्त झालेले दुःख तू जाणतोच आहेस. हे शत्रुनाशका शशी हा माझा मित्र आहे, पण तरीही त्याने माझी भार्या हरण केली त्यामुळे सर्वसुखाचा नाश करणारे दुःख प्रत्यक्ष माझ्या घरातच मला प्राप्त झाले.
हे देवराजा, सर्वात बुद्धिमान म्हणून माझी प्रसिद्धी आहे. परंतु बलात्काराने जेव्हा चंद्राने माझी भार्या हरण केली तेव्हा माझी बुद्धी कोठे गेली होती ? तेव्हा विचारी पुरुषांनी दैवावर श्रद्धा ठेवून उद्योगाचे सहाय्य घेऊन उपाय योजले पाहिजेत. पण कार्यसिद्धी ही दैवावर अवलंबून असते."
अशा प्रकारचे श्रीगुरूचे बोधप्रद भाषण ऐकून इंद्र ब्रह्मदेवाला शरण गेला आणि नम्रतापूर्वक म्हणाला, "हे सुरेश्वर, महिषासुर नावाचा दैत्य स्वर्गहरण करण्यासाठी ससैन्य स्वर्गावर स्वारी करून येत आहे. सर्व दानव त्याला जाऊन मिळाले आहेत. ते सर्वजण युद्धनिपुण आहेत. त्यामुळे माझ्या मनात भीती उत्पन्न झाली आहे. मी तुला शरण आहे. तू सर्वज्ञ आहेस. तेव्हा तू मला सहाय्य कर."
त्यावर ब्रह्मदेव म्हणाला, "आपण सर्व देव त्वरित कैलासावर जाऊ आणि भगवान शंकराला पुढे करून महापराक्रमी विष्णुकडे जाऊ. तेथे गेल्यावर सर्व देवगण एकत्र जमवू. देव व काल यांचा विचार करून युद्धाचा विचार निश्चित करू. कारण बलाबलाचा विचार न करता व विवेकाची पर्वा न करता साहस करणारा पुरुष पराजित होत असतो."
ब्रह्मदेवाचे हे वचन ऐकून इंद्र व ब्रह्मदेव हे कैलासाकडे जाण्यास निघाले. तेथे गेल्यावर त्यांनी महेश्वराची स्तुती केली. प्रसन्न झालेल्या शंकराला घेऊन सर्वजण वैकुंठास गेले. तेथे पोहोचताच त्यांनी भगवान विष्णूंची स्तुती गाईली, आणि वरप्राप्तीमुळे उन्मत्त झालेल्या महिषासुरापासून निर्माण झालेल्या संकटाची भगवंताला जाणीव दिली. ती हकीगत श्रवण केल्यावर भगवान विष्णु म्हणाले, "आपण युद्ध करू आणि त्या दुष्ट महिषासुराचा वध करू. "
अशाप्रकारे युद्ध निश्चित करून ब्रह्मा, विष्णु व महेश यांना घेऊन सर्व देव आपापल्या वाहानावर आरुढ झाले. भगवान विष्णु गरुडावर, ब्रह्मा हंसावर, शंकर वृषभावर,
इंद्र गजावर, स्कंद मोरावर व यम महिषावर आरुढ झाले. सर्व देवसैन्य जमा होऊन महिषासुराच्या सैन्याला सामोरे गेले. त्यांची गाठ पडल्यावर तुमुल युद्ध झाले.
त्या महायुद्धात बाण, खङ्ग, भाले, मुसळ, कुर्हाडी, गदा, पट्टे, शूल, चक्र, शक्ती, तोमर, मुद्गल, अतिभयंकर नांगर आणि अशाप्रकारची अनेक आयुधे वापरून दोन शत्रुपक्ष एकमेकावर तुटून पडले. महाबलाढ्य यवन सेनापती चिक्षुर ह्याने गजावर आरुढ होऊन इन्द्रावर पाच बाण टाकले. पण इन्द्राने आपले युद्धनैपुण्य दाखवून त्याचे पाचही बाण आपल्या बाणांनी छेदून टाकले व एक अर्धचन्द्र बाण त्याच्या वक्षावर टाकला. त्याबरोबर सेनापती चिक्षुर बेशुद्ध होऊन पडला. इंद्राने याचवेळी त्याच्या गजाच्या सोंडेवर जोराचा प्रहार केला. त्यामुळे सोंड छिन्नविछिन्न झाली व तो गज सैरावैरा आपल्या सैन्याकडे पळत सुटला. ते दृश्य पाहून महिष क्रोधायमान झाला.
तो म्हणाला, "बिडाला, उन्मत्त झालेल्या इंद्राचा व वरुणाचा वध करून तू त्वरेने परत येऊन मला भेट."
हे ऐकून महापराक्रमी बिडाल मत्त गजावर आरुढ होऊन इंद्राकडे निघाला. त्याला पाहून इंद्राने रागाने सर्पतुल्य तीक्ष्ण बाण त्याच्यावर सोडले. परंतु त्या बाणांचा आपल्या बाणांनी नाश करून बिडालाने शिलीमुख नावाचे बाण इंद्रावर टाकले.
तेव्हा इंद्राने अतिसंतप्त होऊन बिडालाचे बाण भुजंगतुल्य तीक्ष्ण बाणांनी बिडालावर प्रहार केला. परंतु बिडालाने तेही बाण सत्वर तोडले व आपल्या गदेने त्याने इंद्राच्या गजावर प्रहार केला. त्याबरोबर इंद्रानेही आपले वज्र जोराने बिडालाच्या गजाच्या सोंडेवर फेकले. त्यामुळे बिडालाचा गज भयभीत होऊन पुनः आपल्याच सैन्याचा वध करीत किंचाळत सैरावैरा पळत सुटला. आपला गज रणांगणातून परत फिरल्याचे पाहून बिडाल एका सुंदर रथावर आरूढ होऊन इंद्रावर चालून आला.
त्याला पाहून इंद्राने महाभयंकर भुजंगतुल्य व तेजस्वी बाण बिडालावर सोडले. तेव्हा बिडालानेही इंद्रावर भयंकर बाणवृष्टी केली. दोघेही विजयासाठी दारुण युद्ध करीत होते. आपल्यापेक्षा दैत्य महाबलाढ्य आहे हे पाहून इंद्राने जयंताला पुढे केले. जयंताने निकराचा प्रयत्न करून सोडलेल्या पाच तीक्ष्ण बाणांनी बिडालाच्या वक्षस्थलाचा वेध घेतला. त्या बाणाच्या प्रहाराने बिडाल मूर्च्छित पडला, बिडालाच्या सारथ्याने रथ रणांगणातून माघारी परत नेला.
अशा तर्हेने बिडाल मूर्च्छित झाल्यावर देवांनी प्रचंड जयजयकार करून रणदुंदुभीचा नाद केला. सर्व देवांनी इंद्राची स्तुती केली. गंधर्व गायन करू लागले. अप्सरा सांघिक नृत्य करू लागल्या. हा जयघोष कानावर पडताच महिषासुर संतप्त झाला. त्याने ताम्र नावाच्या देत्याला देवांशी युद्ध करण्यास पाठवले. ताम्र देवांवर प्रचंड बाणवृष्टी करू लागला. तेव्हा वरुण व यम हे त्याच्यावर चालून गेले.
निरनिराळ्या आयुधांनी देव व दानव निकराने लढत होते. अखेरीस यमाच्या हातातील दंडाचा ताम्राला प्रहार झाला. पण त्यामुळे ताम्र रणांगणापासून किंचितही ढळला नाही. उलट त्याने अत्यंत वेगाने देवांवर शरांचा वर्षाव केला. अनेक देवांना त्याच्या बाणांचे प्रहार झाले. त्यामुळे सर्व देव अधिकच क्रुद्ध झाले. त्यांनी शिळेवर घासलेल्या अती तीक्ष्ण बाणांचा ताम्रावर पाऊस पाडला. त्यामुळे शरीरावर सर्वत्र प्रहार झाल्यामुळे ताम्राला मूर्च्छा आली व तो धाडकन पडला. त्यामुळे सर्व दैत्यसैन्यात हाहाःकार उडाला.