प्रातःकाली नंदाच्या घरी पुत्रजन्ममहोत्सव झाल्याची वार्ता कंसाला हेरांच्या मुखांतून समजली. वसुदेवाच्या स्त्रिया, पशु व दासवर्ग हे सर्व त्या कंसाला ठाऊक होते. पूर्वी नारद मुनींनीही ते सर्व कारण त्याला कथन केले होते. "गोकुलामध्ये असलेले नंदादिप गोप, त्यांच्या पत्न्या, देवकी, वसुदेव इत्यादि सर्व खरोखर तुझे शत्रु होत." असे नारद म्हणाले होते.
याप्रमाणे नारदवाक्याने त्याला बोध झाला असल्यामुळे हे राजा, तो महापापी व कुलाधम कंस मनामध्ये क्रुद्ध झाला. पुढे तेजस्वी कृष्णाने बक, वत्सासुर, महाबलाढय धेनुक व प्रलंब यांचा वध करून गोवर्धन पर्वत उचलून धरला. हे अद्भुत कर्म कानावर येताक्षणी आपले मरण जवळ आले असे त्या कंसाला वाटू लागले. नंतर केशीचा वध झाल्याचे समजल्यावर तो मनामध्ये अतिशय खिन्न झाला. त्या कंसाने धर्मयुगाचे निमित्त करून त्या राम-कृष्णांना सत्वर आणवण्याची तजवीज केली. त्या दुर्बुद्धी व क्रूर कंसाने त्यांना आणण्याकरता अक्रूराला पाठवले.
कंसाच्या आज्ञेत असणारा तो गांधिनीपुत्र अक्रूर त्या उभयता गोपालांना रथात बसवून गोकुलातून मथुरेमध्ये घेऊन आला. तेथे आल्यानंतर त्या उभयता रामकृष्णांनी धनुभंग करून रजक, गज, चाणूर, मुष्टिक, शल व तोशल ह्यांचा वध केला आणि सुरेश्वर कृष्णाने कंसाचाही वध केला.
त्याने मातापितरांना करागृहापासून मुक्त व दु:खरहित केले. त्या शत्रुनाशक कृष्णाने ते राज्य उग्रसेनाला दिले. नंतर वसुदेवाने त्या ठिकाणी मौंजीबंधनपूर्वक त्यांचा यथाविधी व्रतबंध केला. उपनयन झाल्यावर ते गुरु सांदीपनीच्या घरी गेले. ते वसुदेवाचे वीर व महाबलाढय पुत्र विद्याभ्यास करून तेथून मथुरेमध्ये परत आले.
त्याकाळी मगधदेशाधिपती जरासंध हा कंसनामक आपल्या जावयाच्या वधाने दु:खित झाला. तो आपले सर्व सैन्य एकत्र करून मथुरानगरीवर चाल करून आला आणि त्याने मधुपुरीमध्ये वास्तव्य करणार्या बुद्धीमान कृष्णाशी सतरा वेळा संग्राम केला. पण त्यात जरासंधाचाच पराजय झाला. त्याने कालयवन नावाचा यादवांना भय उत्पन्न करणारा शूर पुरुष मथुरेत पाठवून दिला. तो सर्व म्लेंच्छांचा अधिपती होता.
कालयवन येत असल्याचे ऐकून मधुसूदन कृष्णाने सर्व श्रेष्ठ यादवांना आणि बलरामाला बोलावून आणले. तो म्हणाला, "त्या महाबलाढय जरासंधामुळे पुन: आपणाला भय उत्पन्न झाले आहे. हे यादवहो, आता आपण काय करावे ? अहो, कालयवन तर जवळ येत आहे. आता सैन्य व धन सोडून देऊन आपण प्राणरक्षण करावे. कारण ज्या ठिकाणी सुखाने राहता येते तोच आपला खरोखर पूर्वजांपासून चालत आलेला देश होय.
आपल्या कुलाने वहिवाटलेला जरी हा देश असला तरी सर्वदा भय उत्पन्न करणारा असल्यामुळे ह्याचा आपणाला आता काय उपयोग आहे ? सुखेच्छु पुरुषाने प्रसंग पडल्याने पर्वताच्या अथवा समुद्राच्याही सन्निध वास्तव्य करावे. कारण ज्या ठिकाणी शत्रूचे भय नसेल तेथेच समंजस लोकांनी वास्तव्य केले पाहिजे. फार कशाला ? शेषशय्येचे अवलंब करून हरीसुद्धा सागरामध्ये झोप घेत असतो. त्याचप्रमाणे त्रिपुरनाशक शंकर भयभीत होऊन कैलासावर रहात असतो. शत्रूचा त्रास होत असल्यास आपण येथे राहू नये. आपण सर्व एकत्र जुळून द्वारावती नगरीमध्ये जाऊ. रैवतपर्वतासमीप समुद्रतीरी रम्य व मनोहर द्वारावती नगरी असल्याचे आज मला गरुडाने सांगितले."
हे कृष्णाचे भाषण श्रवण करून सर्व यादवश्रेष्ठांनी कुटुंब व वाहने ह्यांसह जाण्याचे मनामध्ये ठरवले. गाडे, उंट, घोडया व रेडे द्रव्याने भरून व रामकृष्णांना पुढे करून ते सर्व यादव सामानासह नगरातून बाहेर पडले. सर्व प्रजा पुढे घालून ते सर्व श्रेष्ठ यादव पुढे चालू लागले. काही दिवसांनी ते द्वारावतीनगरीमध्ये आले. त्या ठिकाणी कृष्णाने कामगारांकडून त्या नगरीचा जीर्णोद्धार केला. तेथे यादवांना ठेवून ते रामकृष्ण वेगाने निर्जन झालेल्या मथुरा नगरीमध्ये येऊन राहिले. त्याच वेळी बलाढय यवनाधिपती कालयवन तेथे आला.
तो आल्याचे समजताक्षणीच कृष्ण नगराबाहेर आला. पायांनीच तो या यवनापुढे गेला. कमलनयन कृष्ण पुढे धावत असल्याचे अवलोकन करून दुष्ट यवनही पायांनीच त्याच्या मागोमाग धावत गेला. ज्या ठिकाणी महाबलाढय
मुचकुंद राजर्षी निजला होता त्या ठिकाणी भगवान हरी व तो कालयवन हे पोहोचले. मुचकुंदाला निजलेला अवलोकन करताक्षणीच आपला शेला त्याच्या अंगावर टाकून कृष्ण तेथेच गुप्त झाले. नंतर त्या ठिकाणी तो यवन प्राप्त झाला असता निद्रिस्त असलेल्या त्या मुचकुंदाला त्याने अवलोकन केले आणि हाच कृष्ण आहे असे समजून त्या यवनाने त्या मुचकुंद राजाला लत्ताप्रहार केला. तेव्हा तो महाबलाढय मुचुकुंद जागा झाला. क्रोधाने नेत्र लाल करून त्या यवनाला त्याने दग्ध करून टाकले. त्याला दग्ध केल्यानंतर तेथे त्याला कमलनयन कृष्णाचे दर्शन झाले. त्या क्षणीच सुरश्रेष्ठ वासुदेवाला त्याने प्रणाम केला. त्याची आज्ञा घेऊन तो बदरीकाश्रमाकडे निघून गेला.
नंतर बलरामासह कृष्ण द्वारकेला परत आले. उग्रसेनाला राजा करून स्वेच्छेने रुक्मिणीचे हरण करून राक्षसविवाहविधीने हरीने तिचे पाणिग्रहण केले.
जांबुवती, सत्यभामा, मित्रविंदा, कालिंदी, लक्ष्मणभद्रा व पवित्र नाग्नजिती ह्या स्त्रिया वेगवेगळ्या प्रसंगाने प्राप्त करून कृष्णाने त्यांच्याशी विवाह केला. हे भूपाला, परममंगलकारक अशा या आठच पत्न्या त्या वेळी कृष्णाला होत्या. त्यापैकी रुक्मिणीला मनोहर मुद्रेने युक्त असा प्रद्युम्ननामक पुत्र झाला. तेव्हा मधुसूदनाने त्याचे जातकर्म केले. अकस्मात् बलाढय शबरासुराने सूतिकागृहातून तो पुत्र हरण केला व आपल्या मायावतीनामक भार्येला अर्पण केला. तेव्हा पुत्र नेल्याचे अवलोकन करून कृष्ण शोक करू लागले. जिच्या लीलेनेच वृत्रासुरादिकांचा वध झाला त्या देवीला भक्तियुक्त अंतःकरणाने ते शरण गेले. त्या योगमायेची त्यांनी अत्यंत उदार शब्द व शुभ स्तोत्रे यांनी युक्त अशा भाषणांनी उत्कृष्ट स्तुती केली.
श्रीकृष्ण म्हणाले, "हे माते, पूर्वजन्मी मी नरनारायणनामक धर्मपुत्र असताना तपश्चर्या करून तुला संतुष्ट केले. बदरिकाश्रमामध्ये पुष्पादिकांनी तुझे अर्चनही केले. परंतु हे जननी, तुझ्या ठिकाणी असलेल्या माझ्या भक्तिभावाचे तुला विस्मरण पडले. हे देवी, सूतिकागृहातून कोणी दुष्ट हेतूने अथवा माझा अभिमान नाहीसा करण्याकरता कौतुकाने माझा बालक आज हरण करून नेला आहे. हे अंबे, खरोखर तुला भक्तजनाची लाज असणे योग्य आहे. ह्या नगरीच्या सभोवती फारच मोठा बंदोबस्त ठेवला आहे. त्यातून या नगरीमध्येही माझे गृह खरोखर मध्यभागी आहे. सूतिकागृह तर फारच अंतःपुरामध्ये आहे. तरीही दुर्दैवामुळे माझ्या बालकाला कोणी तरी हरण करून नेलेच.
मी दुसर्या नगरामध्ये गेलो नव्हतो, यादवही बाहेर पडले नव्हते, उत्कृष्ट वीर नगरीचे रक्षण करीत होते, असे असूनही कोणी तरी मायेने माझा बालक हरण करून नेला. हे जननी, तुझे अत्यंत गुप्त असलेले चरित्र मलासुद्धा विदित होत नाही मग दुसरा कोण बरे मंदमती पुरुष ते जाणार आहे ?
देहधारी प्राण्याचे ज्ञान अल्पच असणार. तो बालक हरण करणारा कोठे तरी निघून गेला. माझ्या योद्ध्यांच्या तो दृष्टीस पडला नाही. हे अंबिके, तूच उत्पन्न केलेली ही माया आहे. माझ्या जन्मापूर्वीच मायेच्या योगाने तू माझ्या मातेच्या गर्भाशयातून पुत्र काढून नेलेला आहेस व तोच हलधर म्हणून प्रसिद्ध आहे. पतीपासून दूर असताना पतिव्रता रोहिणीला संभोगावाचूनच पुत्र प्राप्त झाला ? पुत्रजन्माचा आनंद व पुत्रविरहाचे दु:ख मला देऊन तू त्या अत्यंत मनोहर लीलाविहारामध्ये दंग होत आहेस !
अल्पवयी असलेली बालकाची माता रुदन करीत आहे व सर्वदा माझ्या सन्निध असल्यामुळे मला दु:ख देत आहे. हे अंबे, संसारामध्ये पीडलेल्या प्राण्यांचा आश्रय तूच आहेस. पुत्रजन्म व पुत्रनाश अनुक्रमे गृहातील सुखाच्या व दु:खाच्या सीमा होत. पहिला पुत्र नाहीसा झाल्यामुळे हे माते, माझे हृदय आज अतिशय विदीर्ण होत आहे.
यज्ञ, संतोषकारक व्रत अथवा देवपूजा यांपैकी मी आता काय बरे करावे ? सर्व दु:खाचा नाश करणारी तूच आहेस. हे माते, माझा पुत्र जिवंत असेल तर तू मला सत्वर दाखव. माझ्या संपूर्ण शोकाचा नाश करण्यास तूच समर्थ आहेस."
याप्रमाणे पवित्र कर्म करणार्या कृष्णाने देवीची स्तुती केली असता ती प्रत्यक्ष प्रकट होऊन त्या जगद्गुरूला म्हणाली, "हे सुरेश्वरा, तू शोक करू नको, तुझा हा पूर्वीचा शाप आहे. त्यामुळे शबरासुराने तुझा पुत्र बलात्काराने हरण करून नेला आहे. सोळाव्या वर्षी स्वसामर्थ्याने त्या शबरासुराचा वध करून माझ्या प्रसादाने तुझा पुत्र परत येईल."