जनमेजय म्हणाला, "हे मुनिश्रेष्ठ आपल्या सांगण्यावरून वैष्णवांश जो भगवान श्रीकृष्ण त्याच्या ठिकाणीसुद्धा दु:ख असल्याचे अवलोकन करून मला संदेह प्राप्त झाला आहे. नारायणाच्या अंशापासून उत्पन्न झालेला जो प्रतापी वसुदेवपुत्र हरी त्याचाही बालक सूतिकागृहातून कसा नेला ? रम्य नगराचा चांगला बंदोबस्त असून त्या नगरात सुरक्षित असलेल्या सूतिकागृहामध्ये त्या दैत्याने प्रवेश कसा केला ? त्या अर्भकाला कसे नेले ? वासुदेवाला तो राक्षस कसा समजला नाही ?"
व्यास म्हणाले, "हे राजा, ही भगवती माया बलाढय असून नरांच्या बुद्धीला मोह पाडणारी आहे. तिच्या तावडीत सापडलेला मोह पावतो. देवांनासुद्धा मनुष्ययोनी प्राप्त झाली असता सर्व मनुष्य देहसंबंधी गुण प्राप्त होत असतात. मनुष्ययोनी प्राप्त झाल्यावर देवांच्या ठिकाणी त्यांचा मूळ देवस्वभाव रहात नाही. असुरांचे ठिकाणीही असुरस्वभाव रहात नाही. क्षुधा, तृषा, निद्रा, भय, तंद्रा, मोह, शोक, संशय, हर्ष, अभिमान, जरा, मरण, अज्ञान, ग्लानी, दु:ख, ईर्षा, असूया, मद व श्रम हे देहसंबंधी गुण मनुष्ययोनीत जन्म झाल्यावर प्राप्त होतच असतात.
हे भूपते, पुढे आलेला सुवर्णमृग, जानकीहरण, जटायुमरण व अभिषेकाच्या दिवशी वनवास ही ज्याप्रमाणे रामाला समजली नाहीत, त्याचप्रमाणे आपल्याकरता शोकाने पित्याला मरण येईल हेही त्याला समजले नही. सीतेला पहात पहात तो ह्या वनातून त्या वनामध्ये अज्ञानी पुरुषाप्रमाणे हिंडत राहिला. परंतु रावणाने सीतेला बलात्काराने हरण करून नेल्याचे त्याला समजले नाही. महाबलाढय राम नागपाशाने बद्ध झाला व पुढे त्या रघुनंदनाची गरुडामुळे मुक्तताही झाली.
नंतर क्रुद्ध झालेल्या रघुनंदन रामाने संग्रामामध्ये महाबलाढय कुंभकर्ण, रावण, मेघनाद व निकुंभ ह्यांचा वध केला. त्या जनार्दनाला जानकीचे निर्दोषत्व न समजल्यामुळे प्रज्वलित अग्नीमध्ये प्रवेश हे दिव्य त्याने तिच्याकडून करवले. पुढे सीता निर्दोष असतांना ती दोषी आहे असे समजून लोकापवादामुळे त्या प्रियेचा त्याने त्याग केला. नंतर कुश आणि लव हे स्वत:चे पुत्र असल्याचे रामाला समजले नाही. तेव्हा, 'हे उभयता महाबलाढय पुत्र तुझे होत.' म्हणून वाल्मीकीमुनींनी त्याला सांगितले.
जानकीने पातालामध्ये गमन केल्याचेही त्याला समजले नाही. त्याचप्रमाणे क्रोधाविष्ट होऊन तो राम भ्रात्याचा वध करण्यास उद्युक्त झाला व शेवटी खरदैत्याचा नाश करणार्या त्या रामाला कालाचेही आगमन समजले नाही.
गोकुलामध्ये यदुनंदन कृष्णालाही कंसाच्या भीतीने मनुष्यदेहसंबंधी अनेक प्रकारच्या गोष्टींचा अनुभव घ्यावा लागला, ह्यात संशय घेण्याचे कारण नाही.
जरासंधाच्या भीतीने तो हरी द्वारकेमध्ये गेला. शिशुपालाने हरण केलेल्या रुक्मिणीचे हरण करणे हा अधर्मच कृष्णाने केला.
सत्यभामेच्या आज्ञेने स्वर्गामध्ये जाऊन त्याने इंद्राशी वृक्षाकरता युद्ध केले. स्त्रीचा मान राखण्याकरता इंद्राचा पराभव करून त्याने कल्पवृक्ष हरण केला. ह्यावरून विचित्र कर्म करणार्या त्या प्रभू श्रीहरीचे परावलंबित्व उघड होते. आपला पती जो श्रीहरी त्याला वृक्षाशी बांधून सत्यभामेने नारदाला अर्पण केले व सुवर्ण देऊन त्या स्त्रीने त्याला सोडवूनही आणले. रुक्मिणीचे महागुणी पुत्र दृष्टीस पडताक्षणीच जांबुवतीनेही दीन होऊन शुभ संतती प्राप्त होण्याविषयी कृष्णाची प्रार्थना केली. तपश्चर्येचा निश्चय करून तो महातपस्वी शिवभक्त उपमन्युमुनीकडे गेला.
तेथे गेल्यावर उपमन्यूला गुरू करून हरीने पाशुपती दीक्षा घेतली. तेथे त्याने उग्र तपश्चर्या केली. प्रथमतः शिवध्यानाविषयी तत्पर राहून व फलाहार करून एक मास संपेपर्यंत शिवमंत्राचा त्याने जप केला. दुसर्या महिन्यापासून जलाहार करून तपश्चर्या करून तो हरी एका पायावर उभा राहून तपश्चर्या करू लागला. तिसर्या महिन्यात पादांगुष्ठाच्या अग्रावर उभा राहून व वायुभक्षण करून त्याने तपश्चर्या केली. सहाव्या महिन्यामध्ये त्याच्या भक्तिभावामुळे भगवान रुद्र प्रसन्न झाला व चंद्रकला धारण करणार्या त्या शंकराने उमेसह त्याला तेथे दर्शन दिले. तेव्हा ब्रह्मदेव व विष्णूही त्याच्याबरोबर देवांसह होते. यक्ष व गंधर्व हे त्याची सेवा करीत होते.
ह्या वासुदेवाला उद्देशून शंकर म्हणाले, "हे कृष्णा, हे महाविचारी यादवनंदना, मी तुझ्या उग्र तपाने संतुष्ट झालो आहे. काय मनोरथ असतील ते तू कथन कर, मी ते शेवटास नेईन. मनोरथ परिपूर्ण करणारे माझे दर्शन झाल्यानंतर मनोरथ
अवशिष्ट राहण्याचा संभव नाही."
संतुष्ट झालेल्या त्या शंकराला अवलोकन करून भगवान देवकीपुत्राने त्याच्या चरणांवर प्रेमपूर्वक साष्टांग नमस्कार घातला आणि त्याच्या समोर स्थित होऊन तो सुरेश्वर सनातन वासुदेव मेघासारख्या गंभीर वाणीने त्याची स्तुती करू लागला.
कृष्ण म्हणाले, "हे देवाधिदेव, हे जगन्नाथ, हे सर्वभूतदु:खनाशक, हे विश्वयोने, हे दैत्यनाशका, हे त्रैलोक्योत्पादका, तुला नमस्कार असो. हे शूली, हे पार्वतीवल्लभ व दक्षयज्ञविघातक अशा तुला नमस्कार असो. हे सुव्रता, तुझ्या दर्शनाने मी धन्य व कृतकृत्य झालो. तुझ्या दर्शनाने प्रणाम केल्यामुळे आज माझा जन्म सफल झाला आहे. हे जगद्गुरो, ह्या संसारामध्ये स्त्रीरूप पाशाने मी बद्ध झालो आहे. हे त्रिलोचना, त्या पाशापासून रक्षण व्हावे याकरता मी तुला शरण आलो आहे.
हे दु:खनाशका, मनुष्ययोनीमध्ये जन्मास येऊन मी खिन्न झालो. गर्भवासामध्ये मला दु:ख प्राप्त झाले. जन्म झाल्यानंतरही कंसाच्या भीतीमुळे गोकुळामध्ये मी दु:खीच होतो. तेथे मी बल्लवांचा आज्ञाधारक असा नंदगोपाल झालो.
हे प्रभो, म्लेंछराजाच्या भीतीने त्रस्त होऊन मी परंपरागत चालत आलेला जो शुभ व दुर्लभ मथुरादेश त्याचाही त्याग करून मी द्वारावती नगरीमध्ये गेलो. हे प्रभो, ययातीच्या शापाने बद्ध झाल्यामुळे मी केवळ धर्मरक्षणतत्पर राहून चांगले समृद्ध राज्यही त्या उग्रसेनाला अर्पण केले. गृहस्थाश्रमामध्ये बंधापासून मुक्त होण्याची वार्ताही दुर्लभ आहे. मी सकाम होऊन सांप्रत पुत्राकरता ही तपश्चर्या केली.
हे सुरेश्वरा, हे जगद्गुरो, याचना करण्याची मला लाज वाटत आहे. कारण, सुरेश्वर, भक्तवत्सल व मुक्तिदायक असा तू आराधनेने प्रसन्न झाल्यानंतर कोण बरे मूढ पुरुष तुच्छ व नश्वर फलाची याचना करील ? हे प्रभो, हे जगदीशा, हे शंभो, मायेने माझे अंतःकरण मूढ झाल्यामुळे व स्त्रीने प्रेरणा केल्यामुळे मी मुक्ती देणार्या तुझ्याजवळ पुत्रसुखाची याचना करीत आहे. मला वैराग्य उत्पन्न होत नाही, मायापाशाने बद्ध झाल्यामुळे विपुल दु:ख भोगण्याकरता ह्या भूमंडलावर शापामुळे मी नारायण - अंशरूपाने उत्पन्न झालो आहे."
कृष्णाने स्तवन केले असता महेश्वर त्याला म्हणाले, "हे कृष्णा, माझ्या प्रसादाने तुला पुष्कळ पुत्र होतील. तुला एकंदर सोळा हजार व पन्नास स्त्रिया होतील, त्यापैकी प्रत्येकीच्या ठिकाणी तुला महाबलाढय पुत्र होतील."
इतके सांगून प्रसन्न मुद्रेने युक्त असलेले शंकर स्वस्थ बसले असता नम्र झालेल्या मधुसूदनाला देवी पार्वती म्हणाली, "हे कृष्णा, हे नराधिपते, या संसारामध्ये तू सर्व जगतात श्रेष्ठ होशील. हे जनार्दना, तद्नंतर शंभर वर्षे संपूर्ण झाल्यावर कोणी एक द्विज व गांधारी यांच्या शापामुळे तुझ्या कुलाचा क्षय होईल. शापमोहीत झालेले तुझे पुत्र संग्रामामध्ये एकमेकांना मारून नाश पावतील. इतरही सर्व यादवांचा तसाच क्षय होईल. तू अर्जुनासह देहत्याग करून स्वर्गाला जाशील. हे कृष्णा, हे मधुसूदना, तू निजधामाला गेल्यानंतर अष्टवत्सूंच्या शापामुळे चोर तुझ्या भार्यांना हरण करून नेतील. शोक करू नकोस."
असे सांगून देव अंतर्धान पावले. कृष्ण द्वारकेला परत आले.
तीच सुरेश्वरी स्वतंत्र असून स्वेच्छेने विहार करणारी आहे. त्या महेश्वरीचेच पूर्ण मनोभावाने सेवन केले पाहिजे. तिच्या सेवनापेक्षा त्रैलोक्यामध्ये अधिक काही नाही.
ज्या कुलामध्ये देवी हे दैवत नाही त्या कुलामध्ये जन्म न होणेच बरे. मी देवीच असून अन्य नाही. ब्रह्म मीच आहे, दु:खभागी मी नाही. अशा अभेदाने त्या अक्षय्य जगदंबिकेचे चिंतन करावे. वेदांचे श्रवण, मनन वगैरे करून गुरुमुखाने हिचे ज्ञान झाल्यावर त्या आत्मरूपिणी देवीचे एकाग्र मनाने नित्य ध्यान करावे.
ब्रह्मा, विष्णु वगैरे देव आणि गौरी, लक्ष्मी इत्यादी देवता ह्या निरंतर त्याच सच्चिदानंदरूपिणी देवीची उपासना करीत असतात.
सूत म्हणाले, "अशा प्रकारे व्यासांनी राजाला विस्तारपूर्वक सर्व काही सांगितले. त्यावेळी त्यांनी जणू काय पाचवा वेदच असे ते श्रीमद्भागवत पुराण सांगितले. मी त्यांच्याकडूनच ते ऐकले."