[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]
नारदमुनींच्या वचनाप्रमाणे देवकीचे सहा पुत्र कंसाने मारल्यानंतर आणि सातव्याचा गर्भपात झाला असता कंस राजा, "हा आपला मृत्यु होय." असे मनामध्ये आणून आठव्या गर्भाच्या रक्षणार्थ दक्षतेने प्रयत्न करू लागला. अवतारकाल प्राप्त झाला असता श्रीहरीने प्रथम वसुदेवाचे ठिकाणी येऊन नंतर योगाने देवकीच्या गर्भामध्ये प्रवेश केला.
तेव्हा योगमाया देवीनेही देवकार्य सिद्धीस नेण्याकरता गोकुलामध्ये नंदपत्नी जी यशोदा तिच्या उदरामध्ये स्वेच्छेने प्रवेश केला. रोहिणीपुत्र बलराम गोकुलामध्ये उत्पन्न झाला. त्यावेळी ती रोहिणी तद्नंतर देवांनाही स्तुत्य असलेली जी देवकी तिलाही कंसाने कारागारामध्ये टाकून तिच्या बंदोबस्ताकरता सेवकांचीही योजना केली. तेव्हा स्त्रीच्या प्रेमपाशाने बद्ध झालेला वसुदेवही आपणास भाग्यशाली पुत्र होणार आहे असे मनामध्ये आणून भार्येबरोबर आपणही त्या कारागृहात राहू लागला.
नंतर देवगणांनी ज्याची स्तुती केली आहे असा विष्णु देवकार्य सिद्धीस नेण्यासाठी देवकीच्या गर्भामध्ये वाढू लागला. दहावा महिना लागला असता पवित्र जो श्रावण मास त्याच्या कृष्णपक्षातील रोहिणीयुक्त अष्टमीच्या दिवशी कंस भयभीत होऊन म्हणाला, "सर्व दानवहो, तुम्ही देवकीचा आज चांगला बंदोबस्त ठेवा. कारण देवकीचा हा आठवा गर्भ माझा शत्रु होणार आहे. त्या मृत्युरूप बालकाचा माझ्या हातून वध झाल्यावर म्हणजे ह्या दुःखरूप आठव्या पुत्राचा पूर्णपणे नाश झाल्यावर सुखाने मला निद्रा येईल. तरवारी, भाले व धनुष्ये ही आयुधे धारण करून तुम्ही सर्व सज्ज असा. निद्रा अथवा तंद्रा सोडून देऊन चोहोकडे दृष्टी ठेवा."
ह्याप्रमाणे असुरगणांना सांगून भयाने अतिशय कृश व विव्हल झालेला तो कंस सत्वर आपल्या मंदिरामध्ये गेला. तथापि त्याला तिथेही सुख झाले नाही.
तद्नंतर मध्यरात्रीच्या सुमारास देवकी वसुदेवाला म्हणाली, "हे महाराज, आता मी काय करू ? माझा प्रसूतिसमय प्राप्त झाला आहे. अनेक भयंकर पहारेकरी येथे उभे आहेत. नंदपत्नीने पूर्वी माझ्याशी एक करार केला आहे. ती मला म्हणाली, हे मानिनी, माझ्या मंदिरामध्ये तू आपला पुत्र पाठवून दे. मी अगदी मनापासून त्याचे रक्षण करीन.
कंसाला विश्वास येण्याकरता मी आपले अपत्य तुला देईल. हे प्रभो, आज संकटामध्ये मी काय बरे करावे ? अशा स्थितीत माझ्या व तिच्या संततीचा बदल करणे कसे बरे शक्य होईल ? हे कांत, आता आपण दूर उभे रहा. कारण माझ्या या प्रसूतिकाली माझी लज्जा नाहिशी होणे शक्य नाही. हे प्रभो, आपण मुख फिरवून उभे रहा. याशिवाय मला दुसरा काय बरे उपाय आहे ?"
असे वसुदेवाला सांगितल्यानंतर त्या ठिकाणी मध्यरात्रीच्या समयास अत्यंत अद्भुत असा बालक देवकीला झाला. तो सुंदर बालक अवलोकन करून देवकी विस्मयचकित झाली. त्या महाभाग्यशालिनी देवकीच्या शरीरावर हर्षाचे रोमांच उठले. ती पतीला म्हणाली, "हे कांत, हे प्रभो, दुर्लभ असे हे पुत्रमुख आपण लवकर अवलोकन करा. आज माझा चुलतभाऊ कालरूप कंस खचित ह्या बालकाचा घात करील."
ह्यावर 'ठीक आहे' असे म्हणून वसुदेवाने हातामध्ये पुत्राला घेतले आणि त्या अद्भुत पराक्रमी पुत्राचे मुख त्याने अवलोकन केले. परंतु पुत्रमुख अवलोकन केल्याबरोबर तो वसुदेव चिंताक्रांत होऊन आपल्याशी .म्हणाला, "आता मी काय करू ? ह्या बालकाचे रक्षण कसे करू ?
ह्याप्रमाणे तो वसुदेव चिंताक्रांत झाला असता त्यावेळी उद्देशून स्पष्ट शब्दांनी युक्त अशी आकाशवाणी झाली.
"हे वसुदेवा, ह्याला तू सत्वर गोकुळात घेऊन जा. मी सर्व पहारेकरी निद्रेने मोहित केले आहेत.
आठ दरवाजे उघडून तुझ्या शृंखलाही मोकळ्या केल्या आहेत. तू ह्याला नंदगृही ठेवून योग मायेला घेऊन ये." ही आकाशवाणी कानावर येताक्षणीच त्या कारागृहाचे द्वार उघडले, वसुदेव वेगाने बाहेर जाण्यास उद्युक्त झाला आणि द्वारपालांच्या लक्षात न येता तो त्या बालकाला घेऊन सत्वर बाहेर पडला.
पुढे यमुनातीरी गेल्यानंतर तिला पूर आल्याचे त्याच्या दृष्टीस पडले. वसुदेव त्या ठिकाणी येताक्षणीच त्या श्रेष्ठ नदीचे पाणी कंबरेइतके झाले. योगमायेच्या प्रभावाने वसुदेव ती नदी ओलांडून परतीरी गेला. तो मध्यरात्रीच्या सुमारास गोकुळात नंदाच्या द्वाराशी येऊन उभा राहिला. त्याचवेळी यशोदेपासून योगमायेच्या अंशाने दिव्य रूप धारण करणारी त्रिगुणात्मक देवी तेथे उत्पन्न झाली होती. दासीरूप धारण करणार्या देवीने ती उत्पन्न झालेली दिव्य कन्या हाती घेतली आणि द्वारासमीप येऊन तिने ती कन्या वसुदेवाला अर्पण केली. तेव्हा त्या दासीच्या हातामध्ये पुत्राला देऊन वसुदेवाने ती कन्या घेतली आणि मनामध्ये आनंदित होऊन तो तेधून सत्वर निघून गेला.
नंतर कारागृहामध्ये जाऊन देवकीच्या शय्येवर त्याने ती कन्या ठेवली. चिंताक्रांत व भयभीत होऊन तो बाजूला उभा राहिला. तेव्हा कन्या मंजुळ स्वराने रोदन करू लागली. रात्री ते रोदन ऐकून राजसेवक जागे झाले, भयाने अतिशय विव्हल झालेले ते सेवक सत्वर राजाकडे जाऊन त्याला म्हणाले, "हे महाविचारी भूपते देवकीला पुत्र झाला. आपण सत्वर चलावे." हे त्यांचे भाषण ऐकून भोजदेशाधिपती कंस सत्वर निघाला. दार लावलेले पाहून तो वसुदेवाला हाक मारू लागला.
कंस म्हणाला, "हे महाविचारी वसुदेवा, देवकीचा पुत्र तू इकडे आण. कारण ह्या शत्रुरूप हरीचा मी वध करतो."
कंसाचे भाषण श्रवण करताक्षणी वसुदेवाचे नेत्र भयाने त्रस्त झाले. ती कन्या हातामध्ये घेऊन शोक करीत दरवाजाजवळ येऊन त्याने कंसाला सत्वर कन्या अर्पण केली. ते पहाताच देववाणी व नारदाचे भाषण ही दोन्ही व्यर्थ झाली. कारण जरी वसुदेव संकटामध्ये सापडला आहे तरी तो आपले भाषण असत्य कसे करील ? माझे हे सर्व पहारेकरी दक्ष आहेत. तेव्हा तेथे कपट होणे शक्य नाही. म्हणून देवकीला कन्याच झाली असावी यात संशय नाही. परंतु खरोखर देववाणी कशी असत्य झाली आणि ही कन्या येथे कोठून आली ? खरोखर तो देवकीचा पुत्र तरी कोणीकडे गेला ? काही असो, कालाची गती कुटिल असल्यामुळे आता संशय घेण्यात काही अर्थ नाही.
असा विचार करून दुष्ट कंसाने त्या कन्येचे पाय धरले आणि त्या कुलांगार व निर्दय कंसाने तिला पाषाणावर आपटले. पण ती हातातून सुटून आकाशमंडलामध्ये गेली आणि दिव्य रूप व मृदु स्वर धारण करून त्याला म्हणाली, "हे पाप्या, मला मारून काय उपयोग होणार आहे ? तुला मारणारा प्रबल शत्रु आजच उत्पन्न झाला आहे, त्याचा पराभव होणे कठीण आहे. तो सर्वस्वी तुज नराधमाचा घात करील."
असे सांगून ती स्वेच्छेने आकाशामध्ये निघून गेली. तेव्हा कंस विस्मयचकित होऊन परत आपल्या घरी गेला. बक, धेनुक, वत्स इत्यादि सर्व दानवगणांना बोलावून आणून क्रोधाविष्ट व भयभीत झालेला तो कंस त्यांना म्हणाला, "दानवहो, माझा शत्रु आजच कोठेतरी उत्पन्न झाला आहे तर आता माझे कार्य सिद्धीस नेण्याकरता सर्वही दानवांनी येथून बाहेर पडावे. जेथे कोठे नुकतीच उपजलेली मुले दृष्टीस पडतील तेथे त्यांचा वध करावा. गोकुलामध्येच माझा शत्रू उत्पन्न झाला असावा असा मला संशय आहे. तेव्हा ह्या बालघातक पूतनेने आजच गोकुलामध्ये जावे आणि नुकतीच उपजलेली बालके दृष्टीस पडतील तितकी माझ्या आज्ञेने मारावीत. इतकेच नव्हे तर धेनुक, वत्सक, केशी, प्रलंब व बक ह्या सर्वांनीही माझे कार्य सिद्धीस नेण्याकरता तेथेच रहावे."
असे सर्वांना सांगून तो पुन: चिंताव्यग्र होऊन आपल्या घरी निघून गेला.