[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]
जनमेजय म्हणाला, "ज्या अर्थी दुरात्म्या कंसाने त्या वसुदेवबालकाचा उत्पन्न होताक्षणीच घात केला त्या अर्थी त्या बालकाच्या हातून असे पातक तरी कोणते घडले होते ? ब्रह्मवेत्त्यांमध्ये अग्रेसर, ज्ञानी धर्मनिष्ठ व मुनिश्रेष्ठ नारदांनी तरी कंसाला उत्तेजन देऊन त्याच्याकडून अशा प्रकारचे पातक कसे करवले ? पापासंबंधाने कर्ता व करविणारा हे उभयताही पंडितांनी सारखेच दोषी ठरवले आहेत. तेव्हा त्या नारदमुनींनी दुष्ट कंसाला प्रेरणा तरी कशी केली ? कोणत्या कर्माचा परिपाक झाल्यामुळे त्या बालकाला मृत्यु प्राप्त झाला हे आपण मला सविस्तर कथन करा.
व्यास म्हणाले, "सर्वदा कलह ज्याला प्रिय आहे अशा नारदमुनींनी केवळ देवकार्यार्थ व चमत्कार पहाण्याच्या इच्छेने कंसाकडे येऊन हे सर्व केले. मुद्दाम मिथ्या भाषण करण्याविषयी त्या मुनींच्या मनामध्ये कधीही विचार येत नाहीत. तो मुनी कर्तव्यकर्माविषयी दक्ष, पवित्र आणि देवांतही सत्यवचनी आहे, म्हणूनच देवकार्यासाठी भावी गोष्टीकडे लक्ष देऊन केव्हा केव्हा तो विनोद करीत असतो. हे राजा, तो ज्या गोष्टीत विनोद करतो त्या सर्व दैवाने निश्चित घडणार्याच असतात. ह्याप्रमाणे वसुदेवाचे सहा बालक त्याने जसे जसे उत्पन्न झाले तसे तसे कंसाकडून मारून टाकवले व अशा रीतीने ते सहा गर्भ शापाच्या योगाने देवकीच्या गर्भाशयामध्ये येऊन मरण पावले.
त्यांच्या शापाचे कारण मी आता तुला कथन करतो. स्वायंभुव मन्वंतरामध्ये मरीची ऋषीला ऊर्णानामक भार्येच्या पोटी धर्मतत्पर असे सहा महाबलाढय पुत्र झाले. एकदा स्वकन्येचा उपभोग घेण्यास उद्युक्त झालेल्या ब्रह्मदेवाला पाहून ते हसले. तेव्हा "अध:पात होऊन ते दैत्ययोनीमध्ये जातील." असा ब्रह्मदेवाने त्यांना शाप दिला. हे प्रजाधिपते, पुढे हेच सहा गर्भ प्रथम कालनेमीचे पुत्र झाले.
नंतर दुसर्या अवतारामध्ये ते हिरण्यकशिपुचे पुत्र झाले. त्या दुसर्या जन्मामध्ये ते पूर्वशापाच्या भीतीमुळे ज्ञानयुक्त झाले. स्वस्थ मनाने त्या जन्मामध्ये त्यांनी शांत राहून तपश्चर्या केली. त्या सहा गर्भावर संतुष्ट होऊन ब्रह्मदेवाने त्यांना वर दिला.
ब्रह्मदेव म्हणाले, "हे पुत्रहो, मी क्रुद्ध झाल्यामुळे पूर्वी तुम्हाला शाप दिला होता, हे महाभाग्यशाली पुत्रांनो, आता मी तुम्हावर संतुष्ट झालो आहे. तुम्ही इच्छेस येईल तो वर मागा."
ब्रह्मदेवाचे हे भाषण श्रवण करून ते मनामध्ये प्रसन्न झाले आणि कर्तव्याविषयी दक्ष असलेले ते सर्वही गर्भ आपल्या मनाप्रमाणे ब्रह्मदेवाशी भाषण करू लागले.
गर्भ म्हणाले, "हे पितामह, आपण आम्हावर संतुष्ट झाला आहात मग आम्हाला इष्ट असलेला वर आपण द्यावा. सर्व देव, मानव व महासुर ह्यांना आम्ही अवध्य असावे आणि हे पितामह, गंधर्वाधिपतीच्या हातूनही आमचा वध होऊ नये."
ह्यावर ब्रह्मदेव त्यांना म्हणाले, "हे तुमचे मागणे सर्व शेवटास जाईल. हे महाभाग्यशाली पुत्रहो, तुम्ही आता जा. तुमच्या म्हणण्याप्रमाणे सर्व घडून येईल." असा वर दिल्यावर ब्रह्मदेवाला आनंद झाला व ते पुत्रही आनंदित झाले. पण हिरण्यकशिपूला मात्र बरे वाटले नाही. तो क्रुद्ध होऊन त्यांना म्हणाला, 'हे पुत्रांनो, ज्या अर्थी तुम्ही माझी पर्वा न करता ब्रह्मदेवाला संतुष्ट केले आणि तुम्ही त्याची वराविषयी प्रार्थना करून बलाढय झाला आहात, त्या अर्थी तुम्ही पितृस्नेहसंबंधाचा त्याग केला आहे. म्हणून मी तुमचा त्याग करतो. आता तुम्ही सहा गर्भ पातालामध्ये जा, तिथे निद्राविष्ट होऊन काही वर्षेपर्यंत पडून रहा. तद्नंतर प्रतिवर्षी तुम्ही देवकीच्या गर्भामध्ये याल व पूर्वजन्मीचा तुमचा पिता कालनेमी हा त्या ठिकाणी कंस होईल आणि तो अतिभयंकर कंस तुम्ही उत्पन्न होताक्षणीच क्रमाक्रमाने तुमचा वध करील."
याप्रमाणे त्यांना शाप दिला. म्हणूनच उत्पन्न होताक्षणी वारंवार कंसाने त्यांचा वध केला. केवळ शापामुळेच त्याला देवकीच्या सहा पुत्रांचा उपजताक्षणी वध
करण्यास प्रेरणा झालेली होती. सातवा शेषांश देवकीच्या गर्भामध्ये आला तेव्हा योगमायेने योगसामर्थ्याने तो गर्भ तेथून काढून रोहिणीच्या गर्भाशयामध्ये नेला. त्यामुळेच त्याचे संकर्षण असे नाव झाले.
तो गर्भपात पाचव्या महिन्यामध्ये झाला. देवकीचा गर्भपात झाल्याचे वर्तमान कंसालाही समजले. ही सुखदायक वार्ता श्रवण करून त्या दुरात्मा कंसाला आनंद झाला. त्यानंतर देवकीच्या आठव्या गर्भाच्या ठिकाणी यादवपती भगवान कृष्णाने देवकार्याकरता व भूभार हरण करण्याकरता वास्तव्य केले."
जनमेजय राजा म्हणाला, "हे मुने, वसुदेव हा कश्यपाचा अंश, बलराम हा शेषाचा अंश आणि हे मुनिश्रेष्ठ, कृष्ण हा हरीचा अंश अवतीर्ण झाल्याचे आपण सविस्तर कथन केले. आता भूमीच्या प्रार्थनेवरून भूभार हरण करण्याकरता इतर देवांचेही जे जे अंश अवतीर्ण झाले असतील ते सर्व मला कथन करा."
हे ऐकून व्यास म्हणाले, "देवदैत्यांचे जे अंश भूतलावर प्रसिद्ध आहेत ते मी तुला संक्षेपत: कथन करतो. वसुदेव हा कश्यपाचा अंश असून देवकी ही अदिती आहे. बलदेव हा शेषाचा अंश होय. कश्यप, अदिती व शेष हे आपापल्या स्थळी पूर्वीप्रमाणे विद्यमान असतानाच त्यांचे हे अंशरूपाने अवतार झाले. नारायण म्हणून बदरिकाश्रमात प्रसिद्ध असलेला जो श्रीमान धर्मपुत्र तो नारायण मुनी विद्यमान असतानाच वासुदेवावतार प्रकट झाला. त्या नारायणाचा कनिष्ठ भ्राता जो नर त्याचा अंश अर्जुनच होय, हा युधिष्ठिर धर्माचा अंश होय आणि महाबलाढय भीम हा वायुचा अंश होय आणि महाबलाढय माद्रीपुत्र नकुल- सहदेव हे अश्विनीकुमारांचे अंश होत.
कर्ण हा सूर्याचा अंश, विदुर हा धर्माचा अंश असून द्रोण हा बृहस्पतीचा अंश आणि द्रोणपुत्र अश्वत्थामा शिवाचा अंश होय. शंतनू हाच समुद्र असून गंगा हीच त्याची भार्या आहे. पुराणशास्त्रामध्ये देवक हाच गंधर्वपती म्हणून कथन केला आहे. भीष्म, विराट व धृतराष्ट्र हे अनुक्रमे वसू मरुद्ग व अरिष्टपुत्र ह्यांचे अंश होत. कृपाचार्य दुसर्या मरुद्गणाचा अंश असून कृतवर्माही एका मरुद्गणाचा अंश होय. दुर्योधन व शकुनी हे अनुक्रमे काली व द्वापर ह्यांचे अंश होत. सोमपुत्र सुवर्मा हा सोमप्ररुनामक यादव असून धृष्टद्युम्न व शिखंडी हे अनुक्रमे अग्नी व राक्षस ह्यांचे अंश होत.
प्रद्युम्न, द्रुपद व द्रौपदी हे अनुक्रमे सनत्कुमार, वरूण व रमा ह्यांचे अंश असून द्रौपदीचे पाच पुत्र, कुंती, माद्री, व गांधारी हे अनुक्रमे विश्वदेव, सिद्धी, धृती व मती ह्यांचे अंश होत. सर्व राजे हे इंद्राने जिंकलेले असुर होत. शिशुपाल जरासंध व शल्य हे अनुक्रमे हिरण्यकशिपू विप्रचित्ती व प्रल्हाद यांचे अंश असून कंस, हयशिरा, गोकुलामध्ये वध पावलेला कुकुद्मी हे अनुक्रमे कालनेमी, केशी व बलिपुत्र अरिष्ट याचे अंश होत.
धृष्टकेतु, भगदत्त, प्रबल व धेनुक हे अनुक्रमे अनुर्हाद, बाष्कल, लंब व खर याचे अंश होत. वाराह आणि किशोर हे चाणूर व युष्टिक यांचे अंश कुवलयापीडनामक गज हा अरिष्टनामक दैत्य असून बकी ही बलिकन्या. हेय आणि बकासुर हा तिच्या पाठचा भाऊ होय. यम, रुद्र, काम व क्रोध ह्या चौघांच्या अंशांनी महाबलाढय द्रोणपुत्र उत्पन्न झाला. पूर्वीचे जे जे दैत्य व राक्षस होते ते सर्व भूभार हरण करण्याकरता दैत्यांश रूपाने अवतीर्ण झाले.
जेव्हा ब्रह्मादि देव प्रार्थना करण्याकरता हरीकडे गेले तेव्हा हरीने एक पांढरा व एक काळा असे दोन केस त्यांच्या स्वाधीन केले होते. त्यापैकी कृष्णवर्ण केश हा कृष्ण असून श्वेतवर्ण केश हा संकर्षण होय. हे उभयता देवांश भूभार हरण करण्याकरता उत्पन्न झाले.
हे अंशावतरण जो पुरुष भक्तिभावाने श्रवण करतो तो सर्व पापापासून मुक्त होऊन स्वजनासह आनंदित होतो.
अशाप्रकारे हे राजा, सर्व अंश मी तुला यथाक्रम कथन केले आहेत.