[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]
पुढे ऋतुकाल प्राप्त झाल्यावर देवरूप धारण करणारी ती देवकी वसुदेवाशी समागम झाल्यावर गर्भिणी झाली. रुप व अवयव ह्यांनी संपन्न व उत्कृष्ट असा पहिला पुत्र तिला झाला. तेव्हा आपल्या सत्य वचनाला स्मरून आणि भावी गोष्टी लक्षात आणून त्या देवमाता देवकीला महात्मा वसुदेव म्हणाला, "हे सुंदरी, त्या वेळी स्वकीय पुत्र अर्पण करण्याची शपथ घेऊन ती तुला सोडवले. हे सुंदरी, हा पुत्र मी कंसाला देतो. कारण ह्या विचित्र कर्माचे फल अजितेंद्रिय पुरुषांना समजणे दुर्घट आहे. कालपाशाला अनुसरून वागणार्या सर्व जीवांना खरोखर स्वकृत शुभ अथवा अशुभ कर्मांचा उपभोग घेतलाच पाहिजे. सर्वथा जीवाचे नशीब हे देवाने पूर्वीच ठरवलेले असते."
देवकी म्हणाली, "हे प्रभो, पूर्वी केलेल्या कर्माचे फल प्राण्यांना काही झाले तरी भोगावेच लागते. पण तीर्थयात्रांनी, तपश्चर्येने अथवा दानांनी त्याचा क्षय होत नाही का ? हे राजा, पूर्वसंचित पापांच्या नाशाकरता महात्म्यांनी धर्मशास्त्रामध्ये प्रायश्चित्तविधी लिहून ठेवला आहे. ब्रह्मघातकी, सुवर्ण चोरणारा, सुरापान करणारा आणि मातृगमन करणारा हेही द्वादशवार्षिक व्रत आचरल्यावर शुद्ध होतात. हे निष्पाप, मनु आदिकांनी निर्दिष्ट केलेले प्रायश्चित्त यथाविधी आचरले असता पुरुष पातकापासून मुक्त होतो.
धर्मशास्त्रप्रवर्तक जे याज्ञवल्क्य व तत्त्ववेत्ते मुनी ते मिथ्या भाषण करणारे आहेत काय ? हे प्रभो, होणार असेल ते चुकणार नाही असाच जर निश्चय असेल तर संपूर्ण मंत्रशास्त्र व आयुर्वेद ही मिथ्याच समजली पाहिजेत."
वसुदेव म्हणाला, "हे महाभाग्यशालिनी, तू माझे भाषण ऐक. कृतकर्माचे फल प्राप्त होणे दैवाधीन आहे. या संसारामध्ये असलेल्या प्राण्यांना तीन प्रकारची कर्मे असतात. हे सुंदरी, जुनी संचित कर्मे, प्रारब्ध कर्मे व विद्यमान कर्मे ही प्राण्यांची तीन प्रकारची कर्मे होत. बीजभूत अशी जी शुभाशुभ कर्मे अनेक जन्मात मिळून प्राण्याच्या हातून झालेली असतात ती सर्व संचित होऊन राहतात. नंतर स्वकर्माच्या योगाने पूर्व देहाचा त्याग केल्यानंतर कर्माधीन असलेल्या त्या जीवाला स्वकर्मांच्या योगाने नरक प्राप्त होत असतो.
मरणोत्तर दिव्य देह अथवा विषयेच्छेमुळे उत्पन्न झालेला यातना देह प्राप्त होऊन प्राण्याला स्वर्गामध्ये अथवा नरकामध्ये अनेक प्रकारच्या कर्मफलांचा उपभोग घडत असतो. कर्मफलांचा उपभोग संपूर्ण होऊन पुनः ज्यावेळी तो प्राणी जन्मास येण्याचा समय प्राप्त होतो तेव्हा तो प्राणी लिंगदेहासह जीव म्हणून प्राप्त होतो. त्याच वेळी संचित कर्माहून भिन्न असलेली प्रारब्ध कर्मे परमेश्वर जीवाच्या मागे लवीत असतो.
हे सुंदरी, संचित व क्रियात्मक ही दोन प्रकारची कर्मे प्रायश्चित्ताने सत्वर नाहीशी होतात. प्रारब्धकर्माचा क्षय भोगानेच होतो. प्राप्त कर्मावर विश्वास ठेवून हा पुत्र तू सर्वथा कंसाला अर्पण कर, लोकनिंदेला पात्र करणारे मिथ्या भाषण मी कधीही केले नाही. देहधारी प्राण्याने निरर्थक शोक कधीही करू नये.
हे कांते, ज्याचे सत्य नष्ट झाले त्याचे जीवितच व्यर्थ होय. जो इहलोकाला मुकला त्याला परलोक कोठून प्राप्त होणार ? हे सुंदरी, सत्याचे अवलंबन केल्याने आपले पुढे कल्याण होईल. हे प्रिये, सुख अथवा दु:ख प्राप्त झाले तरी पुरुषांनी पुण्यकर्माचेच अवलंबन करावे."
असे वसुदेवाने सांगितले असता शोकाकुल झालेल्या देवकीने तो झालेला पुत्र वसुदेवापाशी दिला. धर्मात्मा वसुदेवही आपला नवीनच झालेला पुत्र घेऊन कंसगृही जाऊ लागला. त्यावेळी मार्गामध्ये लोक त्याची स्तुती करू लागले.
लोक म्हणाले, "जनहो, ह्या विचारी वसुदेवाकडे पहा. हा आपल्या वचनाप्रमाणे पुत्राला कंसाकडे नेत आहे. मनात मत्सर न आणता तो सत्यवचनी वसुदेव आज आपला पुत्र मृत्यूला देण्यास उद्युक्त झाला आहे. हा अदभुत धर्म सर्वांनी अवलोकन करावा. ह्या वासुदेवाचेच जीवित सफल झाले आहे. कारण हा कालरूप कंसालाही आपला पुत्र अर्पण करण्याकरता जात आहे."
आणि लोक स्तुती करत असताना ती श्रवण करून वासुदेव कंसगृही प्राप्त झाला. त्याने आपला पुत्र त्याला अर्पण केला.
तेव्हा त्या महात्म्याचे धैर्य अवलोकन करून कंसही विस्मयचकित झाला व ते बालक घेऊन हसत तो वसुदेवाला म्हणाला, "हे शूरसेनपुत्रा, तू बोलल्याप्रमाणे पुत्र अर्पण केलास. तू धन्य आहेस. परंतु हा पुत्र माझा मृत्यु नव्हे, कारण आठवा पुत्र मृत्यू म्हणून आकाशवाणी झालेली आहे. स्वच्छंदपणे मी ह्याचा घात करणे योग्य होणार नाही. तर आता हा तुझा बालक घरी परत जाऊ दे. हे महाविचारी वासुदेवा, तू आपला आठवा पुत्र मला आणून दे." असे बोलून दुष्ट कंसाने तो पुत्र वसुदेवाचे स्वाधीन केला. "हा बालक घरी जावो व ह्याचे कल्याण होवो." असेही त्या कंसराजाने त्याला सांगितले. तेव्हा तो पुत्र घेऊन वसुदेव आनंदाने घरी आला.
कंसही सचिवांना म्हणाला, "अहो, मी बालकाचा घात व्यर्थ का बरे करावा ? "देवकीच्या आठव्या पुत्रापासून मला मृत्यू प्राप्त होईल." अशी आकाशवाणी झालेली आहे. हिचा पहिला पुत्र मारून मी का पातक करू ?" इतक्यात मुनिश्रेष्ठ नारद तेथे आले. उग्रसेनपुत्र कंसाने अभ्युत्थान देऊन अर्ध्यपाद्य इत्यादिकांनी त्यांचा सत्कार केला. कुशलप्रश्न व आगमनाचे कारणही त्याने त्यास विचारले.
तेव्हा नारद हास्यपूर्वक त्याला म्हणाले, "हे महाभाग्यवान कंसा, मी मेरुपर्वतावर गेलो होतो. तेथे ब्रह्मा वगैरे देव स्वस्थ चित्त होऊन विचार करीत होते. त्यावेळी वसुदेवाच्या देवकीभार्येच्या ठिकाणी सुरश्रेष्ठ विष्णु तुझ्या वधाकरता जन्म घेणार आहे असे ठरले. तू नीतिवेत्ता असून वसुदेवाच्या पुत्राचा घात कसा केला नाहीस."
कंस म्हणाला, "आकाशवाणीप्रमाणे माझा मृत्यु जो वसुदेवाचा आठवा पुत्र त्याचा मी वध करीन, इतरांचा करणार नाही."
नारद म्हणाले, "हे नृपश्रेष्ठा, तुला शुभाशुभ राजनीती विदित नाही. देवांचे मायाबलही तू जाणीत नाहीस. तेव्हा आता मी बोलू तरी काय ? अरे, शूर व शुभेच्छु पुरुषाने क्षुद्र शत्रूचीही उपेक्षा करु नये. अरे, देवकीचे आठ पुत्र एकत्र केले असता गणनेमध्ये सर्वही आठवेच आहेत. समजून उमजून तू शत्रूचा त्याग केलास हा तुझा मुर्खपणा आहे."
असे बोलून श्रीमान नारदमुनी तेथून सत्वर निघून गेले. ते गेल्यानंतर त्या मंदबुद्धी कंसाने पुनः त्या बालकाला आणवून पाषाणावर आपटून मारले. तेव्हा त्याचे मन शांत झाले.