श्रीमद्‌देवीभागवत महापुराण
चतुर्थः स्कन्धः
विंशोऽध्यायः


कृष्णावतारकथोपक्रमवर्णनम्

व्यास उवाच
शृण भारत वक्ष्यामि भारावतरणं तथा ।
कुरुक्षेत्रे प्रभासे च क्षपितं योगमायया ॥ १ ॥
यदुवंशे समुत्पत्तिर्विष्णोरमिततेजसः ।
भृगुशापप्रतापेन महामायाबलेन च ॥ २ ॥
क्षितिभारसमुत्तारनिमित्तमिति मे मतिः ।
मायया विहितो योगो विष्णोर्जन्म धरातले ॥ ३ ॥
किं चित्रं नृप देवी सा ब्रह्मविष्णुसुरानपि ।
नर्तयत्यनिशं माया त्रिगुणानपरान्किमु ॥ ४ ॥
गर्भवासोद्‌भवं दुःखं विण्मूत्रस्नायुसंयुतम् ।
विष्णोरापादितं सम्यग्यया विगतलीलया ॥ ५ ॥
पुरा रामावतारेऽपि निर्जरा वानराः कृताः ।
विदितं ते यथा विष्णुर्दुःखपाशेन मोहितः ॥ ६ ॥
अहं ममेति पाशेन सुदृढेन नराधिप ।
योगिनो मुक्तसङ्गाश्च भुक्तिकामा मुमुक्षवः ॥ ७ ॥
तामेव समुपासन्ते देवीं विश्वेश्वरीं शिवाम् ।
यद्‌भक्तिलेशलेशांशलेशलेशलवांशकम् ॥ ८ ॥
लब्ध्वा मुक्तो भवेज्जन्तुस्तां न सेवेत को जनः ।
भुवनेशीत्येव वक्त्रे ददाति भुवनत्रयम् ॥ ९ ॥
मां पाहीत्यस्य वचसो देयाभावादृणान्विता ।
विद्याविद्येति तस्या द्वे रूपे जानीहि पार्थिव ॥ १० ॥
विद्यया मुच्यते जन्तुर्बध्यतेऽविद्यया पुनः ।
ब्रह्मा विष्णुश्च रुद्रश्च सर्वे तस्या वशानुगाः ॥ ११ ॥
अवताराः सर्व एव यन्त्रिता इव दामभिः ।
कदाचिच्च सुखं भुंक्ते वैकुण्ठे क्षीरसागरे ॥ १२ ॥
कदाचित्कुरुते युद्धं दानवैर्बलवत्तरैः ।
हरिः कदाचिद्यज्ञान्वै विततान्प्रकरोति च ॥ १३ ॥
कदाचिच्च तपस्तीव्रं तीर्थे चरति सुव्रत ।
कदाचिच्छयने शेते योगनिद्रामुपाश्रितः ॥ १४ ॥
न स्वतन्त्रः कदाचिच्च भगवान्मधुसूदनः ।
तथा ब्रह्मा तथा रुद्रस्तथेन्द्रो वरुणो यमः ॥ १५ ॥
कुबेरोऽग्नी रवीन्दू च तथान्ये सुरसत्तमाः ।
मुनयः सनकाद्याश्च वसिष्ठाद्यास्तथापरे ॥ १६ ॥
सर्वेऽम्बावशगा नित्यं पाञ्चालीव नरस्य च ।
नसि प्रोता यथा गावो विचरन्ति वशानुगाः ॥ १७ ॥
तथैव देवताः सर्वाः कालपाशनियन्त्रिताः ।
हर्षशोकादयो भावा निद्रातन्द्रालसादयः ॥ १८ ॥
सर्वेषां सर्वदा राजन्देहिनां देहसंश्रिताः ।
अमरा निर्जराः प्रोक्ता देवाश्च ग्रन्थकारकैः ॥ १९ ॥
अभिधानतश्चार्थतो न ते नूनं तादृशाः क्वचित् ।
उत्पत्तिस्थितिनाशाख्या भावा येषां निरन्तरम् ॥ २० ॥
अमरास्ते कथं वाच्या निर्जराश्च कथं पुनः ।
कथं दुःखाभिभूता वा जायन्ते विबुधोत्तमाः ॥ २१ ॥
कथं देवाश्च वक्तव्या व्यसने क्रीडनं कथम् ।
क्षणादुत्पत्तिनाशश्च दृश्यतेऽस्मिन्न संशयः ॥ २२ ॥
जलजानां च कीटानां मशकानां तथा पुनः ।
उपमा न कथं चैषामायुषोऽन्ते मराः स्मृताः ॥ २३ ॥
ततो वर्षायुषश्चापि शतवर्षायुषस्तथा ।
मनुष्या ह्यमरा देवास्तस्माद्‌ ब्रह्मापरः स्मृतः ॥ २४ ॥
रुद्रस्तथा तथा विष्णुः क्रमशश्च भवन्ति हि ।
नश्यन्ति क्रमशश्चैव वर्धन्ति चोत्तरोत्तरम् ॥ २५ ॥
नूनं देहवतो नाशो मृतस्योत्पत्तिरेव च ।
चक्रवद्‌ भ्रमणं राजन् सर्वेषां नात्र संशयः ॥ २६ ॥
मोहजालावृतो जन्तुर्मुच्यते न कदाचन ।
मायायां विद्यमानायां मोहजालं न नश्यति ॥ २७ ॥
उत्पित्सुकाल उत्पत्तिः सर्वेषां नृप जायते ।
तथैव नाशः कल्पान्ते ब्रह्मादीनां यथाक्रमम् ॥ २८ ॥
निमित्तं यस्तु यन्नाशे स घातयति तं नृप ।
नान्यथा तद्‌भवेन्नूनं विधिना निर्मितं तु यत् ॥ २९ ॥
जन्ममृत्युजराव्याधिदुःखं वा सुखमेव वा ।
तत्तथैव भवेत्कामं नान्यथेह विनिर्णयः ॥ ३० ॥
सर्वेषां सुखदौ देवौ प्रत्यक्षौ शशिभास्करौ ।
न नश्यति तयोः पीडा क्यचित्तद्वैरिसम्भवा ॥ ३१ ॥
भास्करस्य सुतो मन्दः क्षयी चन्द्रः कलङ्कवान् ।
पश्य राजन् विधेः सूत्रं दुर्वारं महतामपि ॥ ३२ ॥
वेदकर्ता जगत्स्रष्टा बुद्धिदस्तु चतुर्मुखः ।
सोऽपि विक्लवतां प्राप्तो दृष्ट्वा पुत्रीं सरस्वतीम् ॥ ३३ ॥
शिवस्यापि मृता भार्या सती दग्ध्वा कलेवरम् ।
सोऽभवद्दुःखसन्तप्तः कामार्तश्च जनार्तिहा ॥ ३४ ॥
कामाग्निदग्धदेहस्तु कालिन्द्यां पतितः शिवः ।
सापि श्यामजला जाता तन्निदाघवशान्नृप ॥ ३५ ॥
कामार्तो रममाणस्तु नग्नः सोऽपि भृगोर्वनम् ।
गतः प्राप्तोऽथ भृगुणा शप्तः कामातुरो भृशम् ॥ ३६ ॥
पतत्वद्यैव ते लिङ्गं निर्लज्जेति भृशं किल ।
पपौ चामृतवापीञ्च दानवैर्निर्मितां मुदे ॥ ३७ ॥
इन्द्रोऽपि च वृषो भूत्वा वाहनत्वं गतः क्षितौ ।
आद्यस्य सर्वलोकस्य विष्णोरेव विवेकिनः ॥ ३८ ॥
सर्वज्ञत्वं गतं कुत्र प्रभुशक्तिः कुतो गता ।
यद्धेममृगविज्ञानं न ज्ञातं हरिणा किल ॥ ३९ ॥
राजन् मायाबलं पश्य रामो हि काममोहितः ।
रामो विरहसन्तप्तो रुरोद भृशमातुरः ॥ ४० ॥
योऽपृच्छत्पादपान्मूढः क्व गता जनकात्मजा ।
भक्षिता वा हृता केन रुदन्नुच्चतरं ततः ॥ ४१ ॥
लक्ष्मणाहं मरिष्यामि कान्ताविरहदुःखितः ।
त्वं चापि मम दुःखेन मरिष्यसि वनेऽनुज ॥ ४२ ॥
आवयोर्मरणं ज्ञात्वा माता मम मरिष्यति ।
शत्रुघ्नोऽप्यतिदुःखार्तः कथं जीवितुमर्हति ॥ ४३ ॥
सुमित्रा जीवितं जह्यात्पुत्रव्यसनकर्शिता ।
पूर्णकामाथ कैकेयी भवेत्पुत्रसमन्विता ॥ ४४ ॥
हा सीते क्व गतासि त्वं मां विहाय स्मरातुरा ।
एह्येहि मृगशावाक्षि मां जीवय कृशोदरि ॥ ४५ ॥
किं करोमि क्व गच्छामि त्वदधीनञ्च जीवितम् ।
समाश्वासय दीनं मां प्रियं जनकनन्दिनि ॥ ४६ ॥
एवं विलपता तेन रामेणामिततेजसा ।
वने वने च भ्रमता नेक्षिता जनकात्मजा ॥ ४७ ॥
शरण्यः सर्वलोकानां रामः कमललोचनः ।
शरणं वानराणां स गतो मायाविमोहितः ॥ ४८ ॥
सहायान्वानरान्कृत्वा बबन्ध वरुणालयम् ।
जघान रावणं वीरं कुम्भकर्णं महोदरम् ॥ ४९ ॥
आनीय च ततः सीतां रामो दिव्यमकारयत् ।
सर्वज्ञोऽपि हृतां मत्वा रावणेन दुरात्मना ॥ ५० ॥
किं ब्रवीमि महाराज योगमायाबलं महत् ।
यया विश्वमिदं सर्वं भ्रामितं भ्रमते किल ॥ ५१ ॥
एवं नानावतारेऽत्र विष्णुः शापवशं गतः ।
करोति विविधाश्चेष्टा दैवाधीनः सदैव हि ॥ ५२ ॥
तवाहं कथयिष्यामि कृष्णस्यापि विचेष्टितम् ।
प्रभवं मानुषे लोके देवकार्यार्थसिद्धये ॥ ५३ ॥
कालिन्दीपुलिने रम्ये ह्यासीन्मधुवनं पुरा ।
लवणो मधुपुत्रस्तु तत्रासीद्दानवो बली ॥ ५४ ॥
द्विजानां दुःखदः पापो वरदानेन गर्वितः ।
निहतोऽसौ महाभाग लक्ष्मणस्यानुजेन वै ॥ ५५ ॥
शत्रुघ्नेनाथ संग्रामे तं निहत्य मदोत्कटम् ।
वासिता मथुरा नाम पुरी परमशोभना ॥ ५६ ॥
स तत्र पुष्कराक्षौ द्वौ पुत्रौ शत्रुनिषूदनः ।
निवेश्य राज्ये मतिमान्काले प्राप्ते दिवं गतः ॥ ५७ ॥
सूर्यवंशक्षये तां तु यादवाः प्रतिपेदिरे ।
मथुरां मुक्तिदा राजन् ययातितनयः पुरा ॥ ५८ ॥
श्ण्सेनाभिधः श्द्वस्तत्राभून्मेदिनीपतिः ।
माथुराच्छूरसेनांश्च बुभुजे विषयान्नृप ॥ ५९ ॥
तत्रोत्पन्नः कश्यपांशः शापाच्च वरुणस्य वै ।
वसुदेवोऽतिविख्यातः शूरसेनसुतस्तदा ॥ ६० ॥
वैश्यवृत्तिरतः सोऽभून्मृते पितरि माधवः ।
उग्रसेनो बभूवाथ कंसस्तस्यात्मजो महान् ॥ ६१ ॥
अदितिर्देवकी जाता देवकस्य सुता तदा ।
शापाद्वै वरुणस्याथ कश्यपानुगता किल ॥ ६२ ॥
दत्ता सा वसुदेवाय देवकेन महात्मना ।
विवाहे रचिते तत्र वागभूद्‌ गगने तदा ॥ ६३ ॥
कंस कंस महाभाग देवकीगर्भसम्भवः ।
अष्टमस्तु सुतः श्रीमांस्तव हन्ता भविष्यति ॥ ६४ ॥
तच्छ्रुत्वा वचनं कंसो विस्मितोऽभून्महाबलः ।
देववाचं तु तां मत्वा सत्यां चिन्तामवाप सः ॥ ६५ ॥
किं करोमीति सञ्चिन्त्य विमर्शमकरोत्तदा ।
निहत्यैनां न मे मृत्युर्भवेदद्यैव सत्वरम् ॥ ६६ ॥
उपायो नान्यथा चास्मिन्कार्ये मृत्युभयावहे ।
इयं पितृष्वसा पूज्या कथं हन्मीत्यचिन्तयत् ॥ ६७ ॥
पुनर्विचारयामास मरणं मेऽस्त्यहो स्वसा ।
पापेनापि प्रकर्तव्या देहरक्षा विपश्चिता ॥ ६८ ॥
प्रायश्चित्तेन पापस्य शुद्धिर्भवति सर्वदा ।
प्राणरक्षा प्रकर्तव्या बुधैरप्येनसा तथा ॥ ६९ ॥
विचिन्त्य मनसा कंसः खड्गमादाय सत्वरः ।
जग्राह तां वरारोहां केशेष्वाकृष्य पापकृत् ॥ ७० ॥
कोशात्खड्गमुपाकृष्य हन्तुकामो दुराशयः ।
पश्यतां सर्वलोकानां नवोढां तां चकर्ष ह ॥ ७१ ॥
हन्यमानाञ्च तां दृष्ट्वा हाहाकारो महानभूत् ।
वसुदेवानुगा वीरा युद्धायोद्यतकार्मुकाः ॥ ७२ ॥
मुञ्च मुञ्चेति प्रोचुस्तं ते तदाद्‌भुतसाहसाः ।
कृपया मोचयामासुर्देवकीं देवमातरम् ॥ ७३ ॥
तद्युद्धमभवद्‌ घोरं वीराणाञ्च परस्परम् ।
वसुदेवसहायानां कंसेन च महात्मना ॥ ७४ ॥
वर्तमाने तथा युद्धे दारुणे लोमहर्षणे ।
कंसं निवारयामासुर्वृद्धा ये यदुसत्तमाः ॥ ७५ ॥
पितृष्वसेयं ते वीर पूजनीया च बालिशा ।
न हन्तव्या त्वया वीर विवाहोत्सवसङ्गमे ॥ ७६ ॥
स्त्रीहत्या दुःसहा वीर कीर्तिघ्नी पापकृत्तमा ।
भूतभाषितमात्रेण न कर्तव्या विजानता ॥ ७७ ॥
अन्तर्हितेन केनापि शत्रुणा तव चास्य वा ।
उदितेति कुतो न स्याद्वागनर्थकरी विभो ॥ ७८ ॥
यशसस्ते विघाताय वसुदेवगृहस्य च ।
अरिणा रचिता वाणी गुणमायाविदा नृप ॥ ७९ ॥
बिभेषि वीरस्त्वं भूत्वा भूतभाषितभाषया ।
यशोमूलविघातार्थमुपायस्त्वरिणा कृतः ॥ ८० ॥
पितृष्वसा न हन्तव्या विवाहसमये पुनः ।
भवितव्यं महाराज भवेच्च कथमन्यथा ॥ ८१ ॥
एवं तैर्बोध्यमानोऽसौ निवृत्तो नाभवद्यदा ।
तदा तं वसुदेवोऽपि नीतिज्ञः प्रत्यभाषत ॥ ८२ ॥
कंस सत्यं ब्रवीम्यद्य सत्याधारं जगत्त्रयम् ।
दास्यामि देवकीपुत्रानुत्पन्नांस्तव सर्वशः ॥ ८३ ॥
जातं जातं सुतं तुभ्यं न दास्यामि यदि प्रभो ।
कुम्भीपाके तदा घोरे पतन्तु मम पूर्वजाः ॥ ८४ ॥
श्रुत्वाथ वचनं सत्यं पौरवा ये पुरःस्थिताः ।
ऊचुस्ते त्वरिताः कंसं साधु साधु पुनः पुनः ॥ ८५ ॥
न मिथ्या भाषते क्वापि वसुदेवो महामनाः ।
केशं मुञ्च महाभाग स्त्रीहत्या पातकं तथा ॥ ८६ ॥
व्यास उवाच
एवं प्रबोधितः कंसो यदुवृद्धैर्महात्मभिः ।
क्रोधं त्यक्त्वा स्थितस्तत्र सत्यवाक्यानुमोदितः ॥ ८७ ॥
ततो दुन्दुभयो नेदुर्वादित्राणि च सस्वनुः ।
जयशब्दस्तु सर्वेषामुत्पन्नस्तत्र संसदि ॥ ८८ ॥
प्रसाद्य कंसं प्रतिमोच्य देवकीं
     महायशाः शूरसुतस्तदानीम् ।
जगाम गेहं स्वजनानुवृत्तो
     नवोढया वीतभयस्तरस्वी ॥ ८९ ॥
इति श्रमिद्देवीभागवते महापुराणेऽष्टादशसाहस्र्यां संहितायां
चतुर्थस्कन्धे कृष्णावतारकथोपक्रमवर्णनं नाम विंशोऽध्यायः ॥ २० ॥


कृष्णावताराची कथा -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

व्यास म्हणाले, "हे भरतकुलोत्पन्न जनमेजया, आता मी तुला पृथ्वीचे भारहरण कसे झाले ते कथन करतो. कुरुक्षेत्रामध्ये व प्रभासतीर्थाच्या ठिकाणी योगमायेने सैन्याचा नाश कसा केला हेही श्रवण कर. भृगुशापाच्या प्रभावाने व महामायेच्या सामर्थ्यांने केवळ भूभारहरणार्थ यदुवंशामध्ये महातेजस्वी विष्णूची उत्पत्ती झाली. भूतलावर विष्णूचा जन्म होण्याचा योग केवळ योगमायेच्या प्रभावानेच घडून आलेला आहे. हे राजा, ती मायादेवी ब्रह्मा - विष्णु वगैरे देवांना नेहमी एकसारखी नाचवीत असते. तिने आपल्या प्रसिद्ध लीलेने विष्ठा, मूत्र व स्नायू यांचा संयोग असल्यामुळे अत्यंत दु:खमय गर्भवासजन्य कष्ट विष्णूलासुद्धा भोगावयास लावले ! मग इतरांची गोष्ट पाहिजे कशाला ?

रामावतारीही हिने निर्जरांना वानर बनवले, आणि - हा मी व माझे - ह्या अतिदृढ अभिमानजन्य दु:खपाशाने, हे प्रजाधिपते जनमेजया, तिने विष्णूलादेखील मोहित केले. म्हणूनच त्या दृढपाशापासून मुक्त होण्याकरता त्या कल्याणी व विश्वेश्वरी देवीची उपासना नि:संग योगी, मुमुक्षु आणि अभ्युदयेच्छु पुरुष करीत असतात.

तिच्या भक्तिलेशाचा अतिसूक्ष्म अंशही प्राप्त झाला असता प्राणी मुक्त होतो. 'भुवनेशी' असा उच्चार करणार्‍याला ती तत्क्षणी त्रैलोक्य देते आणि 'माझे रक्षण कर' असे वाक्य उच्चारताक्षणी त्रैलोक्यापेक्षा जास्त देण्यास काही नसल्यामुळे ती देवी त्याची ऋणी होत असते.

हे राजा, विद्या आणि अविद्या ही तिचीच दोन रूपे आहेत. विद्येने प्राणी मुक्त होत असून अविद्येने बद्ध होत असतो. ब्रह्मा, विष्णु व रुद्र हे सर्व तिच्या अधीन आहेत. त्याचे सर्वही अवतार दाव्याने जखडून गेलेल्या पशूप्रमाणे दृढबद्ध झालेले आहेत. हरी कधी वैकुंठामध्ये तर कधी क्षीरसागरामध्ये सुखाचा उपभोग घेत असतो. कधी तो महाबलाढय दानवांशी युद्ध करीत असतो. तो कधी विस्तृत यज्ञ करीत असतो.

हे सुव्रता, तो कधी कधी तीर्थाचे ठिकाणी तीव्र तपश्चर्या करीत असतो. योगनिद्रेचे अवलंबन करून कधी तो शेषशय्येवर शयनही करीत असतो. हा भगवान मधुसूदन कधीही स्वतंत्र असत नाही. त्याचप्रमाणे ब्रह्मा, रुद्र, वरुण, यम, कुबेर, अग्नी, रवी, चंद्र व इतरही सुरश्रेष्ठ आणि सनक व सनातन मुनी व वसिष्ठप्रभृती ऋषी हे सर्वही पुरुषाच्या अधीन असलेल्या बाहुबलीप्रमाणे सर्वदा अंबेच्या अधीन असतात. वेसण टोचलेले बैल ज्याप्रमाणे मालकाच्या अधीन होऊन संचार करीत असतात त्याचप्रमाणे सर्वही देवता काल पाशाने बद्ध होतात.

हे राजा, हर्ष, शोक, निद्रा, तंद्रा, आळस इत्यादी भाव प्राणीमात्रांच्या देहांचा आश्रय करून राहिलेले आहेत. ग्रंथकारांनी देवाला अमर व निर्जर म्हटले आहे. परंतु ते केवळ नावानेच अमर व निर्जर आहेत, खर्‍या अर्थाने ते तसे खरोखर मुळीच नाहीत, हे सुरश्रेष्ठा, ते दु:खग्रस्त होत असतात. त्यांना 'सुखाने क्रीडा देणारे देव' अशी तरी संज्ञा खर्‍या अर्थाने कशी देता येईल ? जर देता येत असेल तर दु:खमय क्रीडेचा संभव कसा ?

आयुष्याचे अंती हे जर खास मरणार तर त्यांना कीटकादिकांची उपमा कशी लागू पडत नाही ? ज्याप्रमाणे काही मनुष्ये वर्षभर जगतात तर काही शंभर वर्षे जगतात त्याचप्रमाणे देव मनुष्यापेक्षा पुष्कळ वर्षे जगत असल्यामुळे अमर या संज्ञेस पात्र होतात. ब्रह्मदेव यांच्यापेक्षा अधिक जगतो. त्याचप्रमाणे रुद्राचे व विष्णूचे आयुष्य त्यापेक्षाही अधिक असते. या सर्वांनाही उत्पत्ती, स्थिती व नाश ही आहेतच. कोणत्याही देहधारी प्राण्याला मरण, मरणानंतर जन्म, जन्मानंतर मरण ही आहेतच. याप्रमाणे चक्रासारखे भ्रमण निःसंशय सर्वांच्या मागे लागले आहे.

मोहजालाने बद्ध झालेला प्राणी कधीही मुक्त होत नाही व माया विद्यमान असताना मोहजाल कधीही नाहीसे होत नाही. हे राजा, सृष्टिकाली सर्वांची उत्पत्ती होते. त्याचप्रमाणे कल्पांतसमयी क्रमाने ब्रह्मादिकांचा नाश होत असतो.

ज्याच्या नाशाला जो निमित्त असतो तो त्याचा घात करतोच. दैवाने जे ठरवून ठेवलेले असते ते खरोखर अन्यथा होत नाही. जन्म, मृत्यू, जरा, व्याधी, दु:ख अथवा सुख हे ह्या जगतामध्ये प्राण्याला ठरल्याप्रमाणेच प्राप्त होत असते असा सिद्धांत आहे. चंद्र, सूर्य, देव हे सर्वांना प्रत्यक्ष सुख देणारे आहेत. पण त्यांच्या वैर्‍याकडून त्यांना होत असलेल्या पीडेचा अंत होत नाही. सूर्याचा पुत्र शनैश्चर आणि चंद्र हे क्षयी असून कलंकयुक्त आहेत.

येवढे वेदकर्ता, जगद्धर्ता व बुद्धिदाता ब्रह्मदेव, परंतु तोही सरस्वतीकन्येला पाहून मोहित झाला. शिवाची भार्या सती ही अग्निकुंडात देह दग्ध करून मृत झाल्यामुळे तो शिव जनदुःखनाशक असतानाही दुःखाने संतप्त व विषयवासनेने आर्त झाला. कामग्नीने देव दग्ध झाल्यामुळे शिव यमुनेत पडला असता त्याच्या आगीमुळे त्या यमुनेचेही उदक कृष्णवर्ण झाले. नंतर तो कामातुर शिव नग्न होऊन क्रिडा करीत करीत भृगवनामध्ये गेला. भृगुची गाठ पडल्यावर "हे निर्लज्जा, आजच्या आज तुझे लिंग गळून पडेल." असा भृगुने त्या अतिशय कामातुर झालेल्या शिवाला शाप दिला. नंतर दानवांनी निर्माण केलेली अमृतवापी प्राशन केल्यावर त्याला स्वस्थता वाटली.

इंद्रही वृष होऊन पृथ्वीवर एका राजाचा वाहन झाला. सर्व जगतामध्ये श्रेष्ठ व विवेकी जो विष्णु त्याचे सर्वज्ञत्व रामावतारी कोणीकडे गेले ? त्या श्रीहरीला खरोखर सुवर्णमृगाचे ज्ञान झाले नाही. राम विषयवासनेने मोहित झाला आणि विरहाने संतप्त झाल्यामुळे अत्यंत आतुर होऊन रोदन करू लागला. तो मूढ होऊन उच्च स्वराने रडत रडत वृक्षांना विचारू लागला, "जानकी कोणीकडे गेली ? तिला कोणी भक्षण अथवा हरण केले काय ? हे लक्ष्मणा, कांतेच्या विरहाने दु:खित झाल्यामुळे मी मृत होईन ! हे अनुजा, माझ्या दुःखामुळे तुलाही मरण येईल आणि आपल्या मृत्यूची वार्ता ऐकून माझ्या मातेचाही अंत होईल नंतर ह्यामुळे दुखाकुल झालेला शत्रुघ्नही जिवंत रहाणे शक्य होणार नाही. पुत्रदु:खामुळे जर्जर झालेली सुमित्राही प्राण सोडील. कैकयीचे मात्र मनोरथ पुत्रासह परिपूर्ण होईल.

हे सीते, तू मला टाकून कोणीकडे गेली आहेस ? हे मृगनयने, ये, ये !

हे कृशोदरी, मला जगव. आता मी काय करू ! कोठे जाऊ ? माझे जीवित्व तुझ्या अधीन आहे. हे जनककन्ये, दीन झालेल्या या प्रियाला तू धीर दे."

ह्याप्रमाणे विलाप करीत करीत महातेजस्वी राम प्रत्येक वनामध्ये भ्रमण करू लागला. जनककन्या त्याच्या दृष्टीस पडली नाही. सर्व लोकांनी शरण जाण्यास योग्य असलेला तो कमलनयन राम, तो मायेने मोहित झाल्यामुळे वानरांना शरण गेला. वानरांचे साहाय्य घेऊन त्याने समुद्राला सेतू बांधला. महोदर कुंभकर्णाचा आणि वीर रावणाचा त्याने वध केला. राम सर्वज्ञ असतानाही दुरात्म्या रावणाने सीता हरण केली हे लक्षात घेऊन व सीतेला आणून त्याने दिव्य केले.

योगमायेचे बल मोठे आहे व तिनेच भ्रमणात टाकले असल्यामुळे हे सर्व विश्व खरोखर भ्रमण करीत आहे. या जगतामध्ये विष्णूही शापाधीन होऊन नानाप्रकारचे अवतार धारण करीत असतो.

आता देवकार्य सिद्धीस नेण्याकरता कृष्णाचाही मृत्युलोकी अवतार कसा झाला व त्याचे चरित्र कसे झाले हे मी तुला कथन करतो. पूर्वी यमुनेच्या रम्य तीरी मधुवनात एक लवण म्हणून मधुपुत्र बलाढय दानव वास्तव्य करीत असे. हे जनमेजय राजा, वरदानाने गर्विष्ठ झाल्यामुळे ती पापी द्विजांना दु:ख देऊ लागला, लक्ष्मणाचा पाठचा भाऊ जो शत्रुघ्न त्याने त्याचा वध केला. मदमत्त झालेल्या त्या लवणाचा संग्रामामध्ये वध केल्यानंतर मथुरानामक परम सुंदर नगरी त्याने तेथे वसवली. त्या ठिकाणी त्या विचारी शत्रुघ्नाने आपले दोन कमलनयन पुत्र राज्यावर बसवले. नंतर काल प्राप्त झाल्यावर तो स्वर्गात गेला.

सूर्यवंशाचा त्या ठिकाणी क्षय झाल्यानंतर ययातीचे वंशज जे यादव त्यांना मग ती मुक्तिप्रद मथुरा प्राप्त झाली. त्या ठिकाणी शूरसेन राजा होता व तो मथुराप्रांत आणि शूरसेन देश ह्या दोन्ही देशावर राज्य करीत असे. तेथे वरुणाच्या शापामुळे कश्यपाचा अवतार झाला. हाच अतिविख्यात असलेला शूरसेनपुत्र वसुदेव होय. पिता मृत झाल्यानंतर तो वसुदेव वैश्यवृत्तीने वागू लागला. त्यावेळी उग्रसेन हा राज्यलक्ष्मीचा अधिपती झाला. त्याला कंस म्हणून एक पुत्र होता.

वरुणाच्या शापामुळे अदितीलाही कश्यपाबरोबर अवतीर्ण व्हावे लागले. तीच अदिती देवकराजाची कन्या देवकी झाली. तिला महात्म्या देवकाने वसदेवाला अर्पण केली.

विवाहसमारंभ सुरू झाल्यावर "हे महाभाग्यवान कंसा, देवकीच्या गर्भाशयापासून जो वैभवशाली आठवा पुत्र होईल तो तुझा वध करील." अशी आकाशवाणी झाली, ती ऐकून महाबलाढय कंस विस्मित झाला. 'काय बरे करावे ?' असा विचार करून तो मनात म्हणाला, 'हिचा आजच सत्वर वध करून टाकला तर मला मृत्यु येणार नाही. मृत्युभय उत्पन्न करणार्‍या ह्या गोष्टीला दुसरा काहीच उपाय नाही. परंतु पितृतुल्य असलेल्या देवकापासून उत्पन्न झालेली ही देवकी माझी भगिनी व म्हणूनच पूज्य आहे. हिचा वध करावा कसा ?

त्याने विचार केला, ही भगिनी म्हणजे माझा मृत्यू आहे. शोचनीय अवस्थेमध्येही असलेल्या विचारी पुरुषाने देहाचे रक्षण केले पाहीजे. पाप घडले असता प्रायश्चित्ताच्या योगाने पापाची शुद्धी सर्वदा करता येते. म्हणून विचारी पुरुषांनी पातक करूनही प्राणरक्षण करावे." असा मनामध्ये विचार करून कंसाने सत्वर तरवार उपसली आणि त्या सुंदरी देवकीची वेणी धरून त्या पाप्याने तिला हिसडा दिला. तो दुरात्मा कंस म्यानातून तलवार उपसून तिला मारण्याकरता सर्व लोकांसमक्ष त्या नवोढा देवकीला ओढू लागला. कंस तिचा वध करीत असल्याचे दृष्टीस पडताक्षणी मोठा हाहाकार उडाला व धनुष्ये सज्ज करून वसुदेवाकडील वीर युद्धाला उद्युक्त झाले. अद्‍भुत साहस करणार्‍या या वीरांनी कृपेने त्या देवमाता देवकीची सुटका केली. तेव्हा धैर्यवान् वासुदेवाचे कंसाशी परस्पर घोर युद्ध झाले. रोमांच उठवणारे दारुण युद्ध सुरु झाले असता यदुवंशातील मुख्य वृद्ध वीर कंसाचे निवारण करू लागले. ते म्हणाले, "हे वीरा, ही बाला तुझी चुलत बहीण, तुला पूज्य आहे. विवाहोत्सव चालला असताना तू हिचा वध करू नकोस. स्त्रीहत्या हे अत्यंत पाप असून दुःसह आहे. ह्यापासून अपकीर्ती होणार आहे.

आकाशवाणी झाली एवढया कारणावरच विचारी पुरुषाने स्त्रीहत्या करू नये. तुझ्या अथवा ह्याच्या कोणी तरी शत्रूने गुप्त राहून ही अनर्थावह वाणी कशावरून बरे उच्चारली नसेल ?

हे राजा, तुझी आणि वासुदेवाच्या पत्‍नीची अपकीर्ती करण्याकरता तुझ्याच मायावी शत्रूने ही वाणी उच्चारली आहे. तू वीर असून भूताने उच्चारलेल्या वाणीमुळे भीत आहेस. खरोखर तुझी कीर्ती समूळ नाहीशी करण्याकरता तुझ्या शत्रूने हा उपाय योजला आहे. अरे, चुलतबहिणीच्या विवाहसमयी वध करणे योग्य नाही. भवितव्याप्रमाणेच घडत असते."

असे सांगितले तरीही तो कंस निवृत्त होईना तेव्हा नितिवेत्ता वसुदेवही त्याला म्हणाला, "हे कंसा, त्रैलोक्य सत्याच्याच आधारावर असल्यामुळे मी आज तुझ्याशी हे सत्य भाषण करीत आहे. उत्पन्न झालेल्या सर्व देवकीपुत्रांना मी तुझ्या स्वाधीन करीन. हे प्रभो, जो जो हिला पुत्र होईल तो ते मी जर तुला न देईन तर माझे पूर्वज कुंभीपाकसंज्ञक घोर नरकामध्ये पडतील."

हे त्याचे भाषण श्रवण करून पुढे असलेले नागरिक जन 'शाबास, शाबास !' असे शब्द वारंवार उच्चारून सत्वर कंसाला म्हणाले, "महाशय, वासुदेव कधीही मिथ्या भाषण करीत नाही. हे महात्म्या कंसा, तू तिचे केस सोड आणि स्त्री हत्येचे पातक करू नकोस."

याप्रमाणे यदुकुलातील महात्म्या व वृद्ध पुरुषांनी कंसाला उपदेश केला. वसुदेवाच्या भाषणाचेही त्याला अनुमोदन मिळाल्यामुळे त्याने क्रोधाचा त्याग केला. तेव्हा त्या सभेमध्ये नौबती झडू लागल्या. वाद्ये वाजू लागली. सर्वांचे मुखांतून जय जय शब्द होऊ लागला. नंतर तो महायशस्वी शूरसेनपुत्र वसुदेव स्वकीय जनांबरोबर व नवोढा स्त्रीबरोबर निर्भय होऊन त्वरेने चालता झाला, कंसाच्याही क्रोधाचे निवारण झाले.



अध्याय विसावा समाप्त

GO TOP