श्रीमद्‌देवीभागवत महापुराण
चतुर्थः स्कन्धः
एकोनविंशोऽध्यायः


देवान् प्रति देवीवाक्यवर्णनम्

व्यास उवाच
इत्युक्त्वा भगवान्विष्णुः पुनराह प्रजापतिम् ।
यन्मायामोहितः सर्वस्तत्त्वं जानाति नो जनः ॥ १ ॥
वयं मायावृताः कामं न स्मरामो जगद्‌गुरुम् ।
परमं पुरुषं शान्तं सच्चिदानन्दमव्ययम् ॥ २ ॥
अहं विष्णुरहं ब्रह्मा शिवोऽहमिति मोहिताः ।
न जानीमो वयं धातः परं वस्तु सनातनम् ॥ ३ ॥
यन्मायामोहितश्चाहं सदा वर्ते परात्मनः ।
परवान्दारुपाञ्चाली मायिकस्य यथा वशे ॥ ४ ॥
भवतापि तथा दृष्टा विभूतिस्तस्य चाद्‌भुता ।
कल्पादौ भवयुक्तेन मयापि च सुधार्णवे ॥ ५ ॥
मणिद्वीपेऽथ मन्दारविटपे रासमण्डले ।
समाजे तत्र सा दृष्टा श्रुता न वचसापि च ॥ ६ ॥
तस्मात्तां परमां शक्तिं स्मरन्त्वद्य सुराः शिवाम् ।
सर्वकामप्रदां मायामाद्यां शक्तिं परात्मनः ॥ ७ ॥
व्यास उवाच
इत्युक्ता हरिणा देवा ब्रह्माद्या भुवनेश्वरीम् ।
सस्मरुर्मनसा देवीं योगमायां सनातनीम् ॥ ८ ॥
स्मृतमात्रा तदा देवी प्रत्यक्षं दर्शनं ददौ ।
पाशाङ्कुशवराभीतिधरा देवी जपारुणा ।
दृष्ट्वा प्रमुदिता देवास्तुष्टुवुस्तां सुदर्शनाम् ॥ ९ ॥
देवा ऊचुः
ऊर्णनाभाद्यथा तन्तुर्विस्फुलिङ्गा विभावसोः ।
तथा जगद्यदेतस्या निर्गतं तां नता वयम् ॥ १० ॥
यन्मायाशक्तिसंकॢप्तं जगत्सर्वं चराचरम् ।
तां चितं भुवनाधीशां स्मरामः करुणार्णवाम् ॥ ११ ॥
यदज्ञानाद्‌भवोत्पत्तिर्यज्ज्ञानाद्‌भवनाशनम् ।
संविद्‌रूपां च तां देवीं स्मरामः सा प्रचोदयात् ॥ १२ ॥
महालक्ष्यै च विद्महे सर्वशक्त्यै च धीमहि ।
तन्नो देवी प्रचोदयात् ॥ १३ ॥
मातर्नताः स्म भुवनार्तिहरे प्रसीद
     शन्तो विधेहि कुरु कार्यमिदं दयार्द्रे ।
भारं हरस्व विनिहत्य सुरारिवर्गं
     मह्या महेश्वरि सतां कुरु शं भवानि ॥ १४ ॥
यद्यम्बुजाक्षि दयसे न सुरान्कदाचित्
     किं ते क्षमा रणमुखेऽसिशरैः प्रहर्तुम् ।
एतत्त्वयैव गदितं ननु यक्षरूपं
     धृत्वा तृणं दह हुताश पदाभिलाषैः ॥ १५ ॥
कंसः कुजोऽथ यवनेन्द्रसुतश्च केशी
     बार्हद्रथो बकबकीखरशाल्वमुख्याः ।
येऽन्ये तथा नृपतयो भुवि सन्ति तांस्त्वं
     हत्वा हरस्व जगतो भरमाशु मातः ॥ १६ ॥
ये विष्णुना न निहताः किल शङ्करेण
     ये वा विगृह्य जलजाक्षि पुरन्दरेण ।
ते ते मुखं सुखकरं सुसमीक्षमाणाः ्
     संख्ये शरैर्विनिहता निजलीलया ते ॥ १७ ॥
शक्तिं विना हरिहरप्रमुखाः सुराश्च ॥
     नैवेश्वरा विचलितुं तव देवदेवि ।
किं धारणाविरहितः प्रभुरप्यनन्तो
     धर्तुं धराञ्च रजनीशकलावतंसे ॥ १८ ॥
इन्द्र उवाच
वाचा विना विधिरलं भवतीह विश्वं
     कर्तुं हरिः किमु रमारहितोऽथ पातुम् ।
संहर्तुमीश उमयोज्झित ईश्वरः किं
     ते ताभिरेव सहिताः प्रभवः प्रजेशाः ॥ १९ ॥
विष्णुरुवाच
कर्तुं प्रभुर्न द्रुहिणो न कदाचनाहं
     नापीश्वरस्तव कलारहितस्त्रिलोक्याः ।
कर्तुं प्रभुत्वमनघेऽत्र तथा विहर्तुं
     त्वं वै समस्तविभवेश्वरि भासि नूनम् ॥ २० ॥
व्यास उवाच
एवं स्तुता तदा देवी तानाह विबुधेश्वरान् ।
किं तत्कार्यं वदन्त्वद्य करोमि विगतज्वराः ॥ २१ ॥
असाध्यमपि लोकेऽस्मिंस्तत्करोमि सुरेप्सितम् ।
शंसन्तु भवतां दुःखं धरायाश्च सुरोत्तमाः ॥ २२ ॥
देवा ऊचुः
वसुधेयं भराक्रान्ता सम्प्राप्ता विबुधान्प्रति ।
रुदती वेपमाना च पीडिता दुष्टभूभुजैः ॥ २३ ॥
भारापहरणं चास्याः कर्तव्यं भुवनेश्वरि ।
देवानामीष्मित कार्यमेतदेवाधुना शिवे ॥ २४ ॥
घातितस्तु पुरा मातस्त्वया महिषरूपभृत् ।
दानवोऽतिबलाक्रान्तस्तत्सहायाश्च कोटिशः ॥ २५ ॥
तथा शुम्भो निशुम्भश्च रक्तबीजस्तथापरः ।
चण्डमुण्डौ महावीर्यौ तथैव धूम्रलोचनः ॥ २६ ॥
दुर्मुखो दुःसहश्चैव करालश्चाति वीर्यवान् ।
अन्ये च बहवः क्रूरास्त्वयैव च निपातिताः ॥ २७ ॥
तथैव च सुरारींश्च जहि सर्वान्महीश्वरान् ।
(भारं हर धरायाश्च दुर्धरं दुष्टभूभुजाम् ।) ॥
व्यास उवाच
इत्युक्ता सा तदा देवी देवानाहाम्बिका शिवा ॥ २८ ॥
सम्प्रहस्यासितापाङ्गी मेघगम्भीरया गिरा ।

श्रीदेव्युवाच
मयेदं चिन्तितं पूर्वमंशावतरणं सुराः ॥ २९ ॥
भारावतरणं चैव यथा स्याद्‌दुष्टभूभुजाम् ।
मया सर्वे निहन्तव्या दैत्येशा ये महीभुजः ॥ ३० ॥
मागधाद्या महाभागाः स्वशक्त्या मन्दतेजसः ।
भवद्‌भिरपि स्वैरंशैरवतीर्य धरातले ॥ ३१ ॥
मच्छक्तियुक्तैः कर्तव्यं भारावतरणं सुराः ।
कश्यपो भार्यया सार्धं दिविजानां प्रजापतिः ॥ ३२ ॥
यादवानां कुले पूर्वं भविताऽऽनकदुन्दुभिः ।
तथैव भृगुशापाद्वै भगवान्विष्णुरव्ययः ॥ ३३ ॥
अंशेन भविता तत्र वसुदेवसुतो हरिः ।
तदाहं प्रभविष्यामि यशोदायां च गोकुले ॥ ३४ ॥
कार्यं सर्वं करिष्यामि सुराणां सुरसत्तमाः ।
कारागारे गतं विष्णुं प्रापयिष्यामि गोकुले ॥ ३५ ॥
शेषं च देवकीगर्भात्प्रापयिष्यामि रोहिणीम् ।
मच्छक्त्योपचितौ तौ च कर्तारौ दुष्टसंक्षयम् ॥ ३६ ॥
दुष्टानां भूभुजां कामं द्वापरान्ते सुनिश्चितम् ।
इन्द्रांशोऽप्यर्जुनः साक्षात्करिष्यति बलक्षयम् ॥ ३७ ॥
धर्मांशोऽपि महाराजो भविष्यति युधिष्ठिरः ।
वाय्वंशो भीमसेनश्चाश्विन्यंशौ च यमावपि ॥ ३८ ॥
वसोरंशोऽथ गाङ्गेयः करिष्यति बलक्षयम् ।
व्रजन्तु च भवन्तोऽद्य धरा भवतु सुस्थिरा ॥ ३९ ॥
भारावतरणं नूनं करिष्यामि सुरोत्तमाः ।
कृत्वा निमित्तमात्रांस्तान्स्वशक्त्याहं न संशयः ॥ ४० ॥
कुरुक्षेत्रे करिष्यामि क्षत्त्रियाणां च संक्षयम् ।
असूयेर्ष्या मतिस्तृष्णा ममताभिमता स्पृहा ॥ ४१ ॥
जिगीषा मदनो मोहो दोषैर्नक्ष्यन्ति यादवाः ।
ब्राह्मणस्य च शापेन वंशनाशो भविष्यति ॥ ४२ ॥
भगवानपि शापेन त्यक्ष्यत्येतत्कलेवरम् ।
भवन्तोऽपि निजाङ्गैश्च सहायाः शार्ङ्गधन्वनः ॥ ४३ ॥
प्रभवन्तु सनारीका मथुरायां च गोकुले ।
व्यास उवाच
इत्युक्त्वान्तर्दधे देवी योगमाया परात्मनः ॥ ४४ ॥
सधरा वै सुराः सर्वे जग्मुः स्वान्यालयानि च ।
धरापि सुस्थिरा जाता तस्या वाक्येन तोषिता ॥ ४५ ॥
ओषधीवीरुधोपेता बभूव जनमेजय ।
प्रजाश्च सुखिनो जाता द्विजाश्चापुर्महोदयम् ।
सन्तुष्टा मुनयः सर्वे बभूबुर्धर्मतत्पराः ॥ ४६ ॥
इति श्रीमद्देवीभागवते महापुराणेऽष्टादशसाहस्र्यां संहितायां
चतुर्थस्कन्धे देवान् प्रति देवीवाक्यवर्णनं नामकोनविंशोऽध्यायः ॥ १९ ॥


अवतार धारणासाठी देवीची आज्ञा -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

असे सांगून भगवान् विष्णु ब्रह्मदेवाला म्हणाले, "ज्या अर्थी सर्व जन मायेने मोहित झालेले आहेत, त्याअर्थी महामायेच्या कृपेवाचून कोणालाही तत्त्वज्ञान होणे शक्य नाही. आम्ही मायेने व्याप्त झालो असल्यामुळे शांत, सच्चिदानंद व अव्यक्त असा जो परम पुरुष जगद्‌गुरु त्याचे आम्हाला खरोखर स्मरण होत नाही. मी विष्णु, मी ब्रह्मदेव, मी शिव असा आपणाला अहंपणाचा मोह झाला आहे व त्यामुळे हे विधात्या, परमात्मरूप सनातन वस्तूचे ज्ञान आपणाला होत नाही. परमात्म्याच्या मायेने मी सर्वदा मोहित असल्यामुळे काष्ठाची बाहुली ज्याप्रमाणे मायावी मांत्रिकाच्या अधीन असते त्याप्रमाणे मी पराधीन आहे.

कल्पाचे आरंभी त्या परमात्म्याची अद्‍भुत विभूती तू व शिवांसह मीही त्या सुधासागरामध्ये अवलोकन केली आहे. मंदार वृक्षांनी युक्त असलेल्या मणीद्वीपामध्ये रसक्रीडा चालली असताना देवींच्या समाजात ती अद्‌भुत विभूती दृष्टीस पडेपर्यंत तिच्याविषयी कोणी काही सांगितलेले आमच्या ऐकण्यातही नव्हते. स्वकार्यसिद्धिकरता सर्व मनोरथ परिपूर्ण करणारी व कल्याणरूप अशी जी त्या परमात्म्याची मायारूप आद्य व परम शक्ती तिचे देवांनी आता स्मरण करावे."

विष्णूने असे सांगितले असता सर्व देव त्या सनातन व भुवनेश्वरी देवी योगमायेचे मनामध्ये स्मरण करू लागले. स्मरण करताक्षणीच त्या देवीने प्रत्यक्ष दर्शन दिले. जास्वंदीच्या फुलाप्रमाणे देवीची कांती अरुणवर्ण दिसत होती. त्या देवीने पाश व अंकुश ही आयुधे आणि वरद व अभयद ह्या मुद्रा धारण केल्या होत्या, उत्कृष्ट मुद्रेने युक्त असलेल्या त्या देवीचे दर्शन होताक्षणीच देव आनंदित होऊन तिची स्तुती करू लागले.

देव म्हणाले, "हे देवी, कोळ्यापासून निघणार्‍या तंतूप्रमाणे आणि अग्नीपासून निघणार्‍या ठिणग्याप्रमाणे ज्याच्यापासून हे जगत् निर्माण झाले तिला आम्ही वंदन करतो. तिच्या मायाशक्तीने हे सर्व चराचर जगत् निर्माण केले आहे. त्या करुणासागर व त्रैलोक्याधीश चिद्रूप देवीचे आम्ही ध्यान करतो. जिच्या अज्ञानामुळे संसारप्राप्ती होत असते व जिच्या ज्ञानामुळे संसाराचा नाश होत असतो त्या ज्ञानस्वरूप देवीचे आम्ही ध्यान करतो. ती आम्हाला तिच्या स्मरणाविषयी निरंतर प्रेरणा करो. एक महालक्ष्मीच आम्ही जाणीत असून त्या आदि शक्तीचेच ध्यान आम्ही सर्व करत असतो.

ती आमच्या बुद्धीला प्रेरणा करो. हे दयार्द्र माते, हे विश्वदुःखहारिणी, आम्ही तुला नत आहो. तू प्रसन्न हो आणि हे सांप्रत प्राप्त झालेले कार्य करून तू आमचे कल्याण कर. हे महेश्वरी, हे भवानी, तू दैत्यवर्गाचा नाश करून भूभार हरण कर. सज्जनाचे कल्याण कर. हे कमलनयने, तू जर देवांवर दया न करशील तर रणात खड्‌ग व बाण ह्यांच्या प्रहारांनी त्याचा नाश व्हावा असे तुला वाटत आहे काय ? पृथ्वीतील कोणतेही कार्य तुझ्या अनुग्रहाशिवाय होत नाही.

यक्षरूप धारण करून 'हे अग्ने, हे तृण दग्ध कर' इत्यादि पदांनी उपनिषदांमध्ये तूच कथन केले आहेस. कंस, नरकासुर, कालीय यवन, केशी, बृहद्रथ, बकासुर, पुतना, गर्दभासुर आणि शाल्व वगैरे भूतलावर असलेले मुख्य राजे त्यांचा तू वध करून हे माते, तू जगताचा भार सत्वर हरण कर.

हे कमलनयने, विष्णु व शंकर आणि इंद्र ह्यांच्याशी युद्ध करूनसुद्धा ज्यांचा वध झाला नाही ते दैत्य तुझे सुखकारक मुखकमल अवलोकन करीत असताना संग्रामामध्ये सहज लीलेने सोडलेल्या बाणांनी तू त्यांचा पूर्वी वध केला आहेस. हे चंद्रखंडमौले देवी, तुझ्या शक्तीशिवाय शिव, विष्णु प्रभृती देव चलनवलन करण्यास सुद्धा समर्थ नाहीत, मग धारणाशक्तीशिवाय असलेला शेष तरी पृथ्वी धारण करण्यास कोठून समर्थ होणार ?"

इंद्र म्हणाला, "हे देवी, हे वाग्देवी, तुझ्याशिवाय ब्रह्मदेव, लक्ष्मीशिवाय विष्णु आणि उमेशिवाय शंकर हे अनुक्रमे जगताची उत्पत्ती, स्थिती व लय करण्यास समर्थ नाहीत. ते त्या शक्तीसह स्वकार्य करण्यास समर्थ होत असतात."

विष्णू म्हणतात, "हे समस्तविश्वेश्वरी, त्रैलोक्याचे प्रभुत्व करण्यास तुझा अंश नसल्यास मी, ब्रह्मदेव आणि महेश्वर ह्यापैकी कोणी समर्थ नाही त्याचप्रमाणे तुझ्या कृपेवाचून आम्हाला येथे हालचालसुद्धा करता येत नाही.

हे देवी, तूच प्रभुत्वाने भासमान आहेस."

ह्याप्रमाणे देवीची स्तुती केली असता ती प्रसन्न होऊन सुरश्रेष्ठांना म्हणाली, "हे देवहो, तुमचे काय कार्य आहे ते तुम्ही निर्भयपणे कथन करा. मी ते आज शेवटास नेईन. हे सुरश्रेष्ठहो, या जगतामध्ये असाध्य असलेलाही तुमचा मनोरथ मी परिपूर्ण करीन. पृथ्वीला व तुम्हाला काय दु:ख होत आहे हे तुम्ही मला कथन करा."

देव म्हणतात, "भाराने चिरडून गेलेली ही पृथ्वी देवांकडे आली आहे. दुष्ट राजांनी तिला पीडल्यामुळे ही थरथर कापत असून शोक करीत आहे. हे भुवनेश्वरी, हिचा भार तू दूर कर. हे कल्याणी, हेच कार्य मुख्यत्वाने देवांना इष्ट आहे. हे माते, जसा पूर्वी महिषरूप धारण करणार्‍या अतिबलाढय दानवाचा आणि त्याच्या कोटयावधी साहाय्यकर्त्या राक्षसांचा तू वध केला आहेस, शुंभ, निशुंभ, रक्तबीज, महावीर्यवान चंडमुंड, धूम्रलोचन, दुर्मुख, दुःसह, वीर्यवान कराला आणि इतरही असह्य क्रूर राक्षस ह्यांचा वध तूच केला आहेस, त्याचप्रमाणे हल्ली पृथ्वीवर जन्मास आलेले दुष्ट, सर्व देवशत्रू यांचा तू वध कर. या दुष्ट राजांचा पृथ्वीला होत असलेला दुःसह भार तू हरण कर."

अशा प्रकारे देवांनी प्रार्थना केली असता ती कल्याणी अंबिका देवी हास्यपूर्वक मेघगंभीर वाणीने म्हणाली, "हे देवहो, दुष्ट राजांचा भार दूर व्हावा, एतदर्थ अंशाने अवतीर्ण होण्याचे मी पूर्वीच मनामध्ये आणले आहे. सांप्रत पृथ्वीवर मागधप्रभृती महाबलाढय दैत्याधिपती राजे जन्मास आलेले आहेत. त्यांना मी आपल्या शक्तीने निस्तेज करीन, त्या सर्वांचा वध करीन.

हे देवहो, तुम्हीही माझ्या शक्तीचे साहाय्य घेऊन आपापल्या अंशांनी भूतलावर अवतीर्ण व्हा. भूमीचा भार हरण करण्याच्या उद्योगास लागा. माझी शक्ती तुम्हांस साहाय्य करील.

देवांचा पूर्वज जो कश्यप मुनी तो भार्येसहवर्तमान यादवकुलामध्ये आनकदुंदुभी म्हणून तुमच्या पूर्वी जन्मास येईल आणि नंतर भृगुऋषीच्या शापामुळे भगवान सर्वव्यापी अक्षय्य श्रीहरी हा त्या यादवकुलामध्ये वसुदेवाचा पुत्र म्हणून अंशरूपाने अवतीर्ण होईल.

हे सुरश्रेष्ठहो, त्यावेळी मीही गोकुलामध्ये यशोदेच्या ठिकाणी अवतार धारण करीन आणि देवांचे सर्व कार्य करीन. कारागारामध्ये असलेल्या विष्णूला मी गोकुलामध्ये आणीन. शेषाला देवकीच्या गर्भाशयातून काढून रोहिणीच्या गर्भाशयात नेऊन ठेवीन. नंतर माझ्या शक्तीने युक्त असलेले ते राम - कृष्ण द्वापर युगाच्या शेवटी दुष्ट लोकांचा व दुष्ट राजांचा नि:संशय क्षय करतील.

त्याच वेळी साक्षात् इंद्राचा अंश अर्जुन या नावाने जन्मास येऊन तो विपुल सैन्याचा नाश करील. धर्माचा अंश युधिष्ठिर हा महाराजा होईल. वायूचा अंश भीमसेन, अश्विनीकुमारांचे अंश नकुल - सहदेव आणि वसूचा अंश गंगानंदन भीष्म हेही प्रसंगाप्रसंगाने सैन्याचा नाश करतील.

हे सुरश्रेष्ठहो, तुम्ही चिंता करू नका. मी खरोखर पृथ्वीचा भार हरण करीन. आता तुम्ही स्वस्थानी परत जा. पृथ्वीनेही निर्भय असावे. त्या कृष्णादिकांना निमित्तमात्र करून मी स्वशक्तीनेच कुरुक्षेत्रामध्ये क्षत्रियांचा निःसंशय क्षय करीन. देवहो, असूया, ईर्ष्या, कुमती, तृष्णा, ममता, अभिमान, स्पृहा, जिगीषा, विषयवासना आणि मोह ह्या दोघांनी यादवांच्या मनोवृत्ती क्षुब्ध होऊन जेव्हा ते उच्छृंखल होतील तेव्हा ब्राह्मणाच्या शापाने यदुवंशाचा नाश होईल. भगवानही शापामुळे धारण केलेल्या त्या कलेवराचा त्याग करील. आता विष्णूला साहाय्य करण्याकरता तुम्ही स्त्रियांसहवर्तमान मथुरेमध्ये व गोकुलामध्ये आपआपल्या अंशाने अवतीर्ण व्हा."

असे म्हणून परमात्म्याची ती योगमायारूप देवी गुप्त झाली. नंतर पृथ्वीसह सर्व देव आपापल्या स्थानी गेले. तिच्या भाषणाने संतुष्ट झालेली पृथ्वीही निर्भय होऊन विपुल लता व औषधी ह्यांनी युक्त झाली. प्रजा सुखी झाली. द्विजांचे भाग्य उदयास आले. सर्वही मुनी संतुष्ट होऊन धर्माविषयी दक्ष राहू लागले. सर्वत्र धर्माचे पुनरुत्थान झाले.



अध्याय एकोणिसावा समाप्त

GO TOP