श्रीमद्‌देवीभागवत महापुराण
चतुर्थः स्कन्धः
अष्टादशोऽध्यायः


ब्रह्माणं प्रति विष्णुवाक्यम्

व्यास उवाच
शृणु राजन्प्रवक्ष्यामि कृष्णस्य चरितं महत् ।
अवतारकारणं चैव देव्याश्चरितमद्‌भुतम् ॥ १ ॥
धरैकदा भराक्रान्ता रुदती चातिकर्शिता ।
गोरूपधारिणी दीना भीतागच्छत्त्रिविष्टपम् ॥ २ ॥
पृष्टा शक्रेण किं तेऽद्य वर्तते भयमित्यथ ।
केन वै पीडितासि त्वं किं ते दुःखं वसुन्धरे ॥ ३ ॥
तच्छ्रुत्वेला तदोवाच शृणु देवेश मेऽखिलम् ।
दुःखं पृच्छसि यत्त्वं मे भाराक्रान्तोऽस्मि मानद ॥ ४ ॥
जरासन्धो महापापी मागधेषु पतिर्मम ।
शिशुपालस्तथा चैद्यः काशिराजः प्रतापवान् ॥ ५ ॥
रुक्मी च बलवान्कंसो नरकश्च महाबलः ।
शाल्वः सौभपतिः क्रूरः केशी धेनुकवत्सकौ ॥ ६ ॥
सर्वे धर्मविहीनाश्च परस्परविरोधिनः ।
पापाचारा मदोन्मत्ताः कालरूपाश्च पार्थिवाः ॥ ७ ॥
तैरहं पीडिता शक्र भाराक्रान्ताक्षमा विभो ।
किं करोमि क्व गच्छामि चिन्ता मे महती स्थिता ॥ ८ ॥
पीडिताहं वराहेण विष्णुना प्रभविष्णुना ।
शक्र जानीहि हरिणा दुःखाद्दुःखतरं गता ॥ ९ ॥
यतोऽहं दुष्टदैत्येन कश्यपस्यात्मजेन वै ।
हृताहं हिरण्याक्षेण मग्ना तस्मिन्महार्णवे ॥ १० ॥
तदा सूकररूपेण विष्णुना निहतोऽप्यसौ ।
उद्धृताहं वराहेण स्थापिता हि स्थिरा कृता ॥ ११ ॥
नोचेद्‌रसातले स्वस्था स्थिता स्यां सुखशायिनी ।
न शक्तास्म्यद्य देवेश भारं वोढुं दुरात्मनाम् ॥ १२ ॥
अग्रे दुष्टः समायाति ह्यष्टाविंशस्तथा कलिः ।
तदाहं पीडिता शक्र गन्तास्म्याशु रसातलम् ॥ १३ ॥
तस्मात्त्वं देवदेवेश दुःखरूपार्णवस्य च ।
पारदो भव भारं मे हर पादौ नमामि ते ॥ १४ ॥
इंद्र उवाच
इले किं ते करोम्यद्य ब्रह्माणं शरणं व्रज ।
अहं तत्रागमिष्यामि स ते दुःखं हरिष्यति ॥ १५ ॥
तच्छ्रुत्वा त्वरिता पृथ्वी ब्रह्मलोकं गता तदा ।
शक्रोऽपि पृष्ठतः प्राप्तः सर्वदेवपुरःसरः ॥ १६ ॥
सुरभीमागतां तत्र दृष्ट्वोवाच प्रजापतिः ।
महीं ज्ञात्वा महाराज ध्यानेन समुपस्थिताम् ॥ १७ ॥
कस्माद्‌रुदसि कल्याणि किं ते दुःखं वदाधुना ।
पीडितासि च केन त्वं पापाचारेण भूर्वद ॥ १८ ॥
धरोवाच
कलिरायाति दुष्टोऽयं बिभेमि तद्‌भयादहम् ।
पापाचाराः प्रजास्तत्र भविष्यन्ति जगत्पते ॥ १९ ॥
राजानश्च दुराचाराः परस्परविरोधिनः ।
चौरकर्मरताः सर्वे राक्षसाः पूर्णवैरिणः ॥ २० ॥
तान्हत्वा नृपतीन्भारं हर मेऽद्य पितामह ।
पीडितास्मि महाराज सैन्यभारेण भूभृताम् ॥ २१ ॥
ब्रह्योवाच
नाहं शक्तस्तथा देवि भारावतरणे तव ।
गच्छावः सदनं विष्णोर्देवदेवस्य चक्रिणः ॥ २२ ॥
स ते भारापनोदं वै करिष्यति जनार्दनः ।
पूर्वं मयापि ते कार्यं चिन्तितं सुविचार्य च ॥ २३ ॥
तत्र गच्छ सुरश्रेष्ठ यत्र देवो जनार्दनः ।
व्यास उवाच
इत्युक्त्वा वेदकर्तासौ पुरस्कृत्य सुरांश्च गाम् ॥ २४ ॥
जगाम विष्णुसदनं हंसारूढश्चतुर्मुखः ।
तुष्टाव वेदवाक्यैश्च भक्तिप्रवणमानसः ॥ २५ ॥
ब्रह्मोवाच
सहस्रशीर्षास्त्वमसि सहस्राक्षः सहस्रपात् ।
त्वं वेदपुरुषः पूर्वं देवदेवः सनातनः ॥ २६ ॥
भूतपूर्वं भविष्यच्च वर्तमानं च यद्विभो ।
अमरत्वं त्वया दत्तमस्माकं च रमापते ॥ २७ ॥
एतावान्महिमा तेऽस्ति को न वेत्ति जगत्त्रये ।
त्वं कर्ताप्यविता हन्ता त्वं सर्वगतिरीश्वरः ॥ २८ ॥
व्यास उवाच
इतीडितः प्रभुर्विष्णुः प्रसन्नो गरुडध्वजः ।
दर्शनञ्च ददौ तेभ्यो ब्रह्मादिभ्योऽमलाशयः ॥ २९ ॥
पप्रच्छ स्वागतं देवान्प्रसन्नवदनो हरिः ।
ततस्त्वागमने तेषां कारणञ्च सविस्तरम् ॥ ३० ॥
तमुवाचाब्जजो नत्वा धरादुःखञ्च संस्मरन् ।
भारावतरणं विष्णो कर्तव्यं ते जनार्दन ॥ ३१ ॥
भुवि धृत्वावतारं त्वं द्वापरान्ते समागते ।
हत्वा दुष्टान्नृपानुर्व्या हर भारं दयानिधे ॥ ३२ ॥
विष्णुरुवाच
नाहं स्वतन्त्र एवात्र न ब्रह्मा न शिवस्तथा ।
नेन्द्रोऽग्निर्न यमस्त्वष्टा न सूर्यो वरुणस्तथा ॥ ३३ ॥
योगमायावशे सर्वमिदं स्थावरजङ्गमम् ।
ब्रह्मादिस्तम्बपर्यन्तं ग्रथितं गुणसूत्रतः ॥ ३४ ॥
यथा सा स्वेच्छया पूर्वं कर्तुमिच्छति सुव्रत ।
तथा करोति सुहिता वयं सर्वेऽपि तद्वशाः ॥ ३५ ॥
यद्यहं स्यां स्वतन्त्रो वै चिन्तयन्तु धिया किल ।
कुतोऽभवं मत्स्यवपुः कच्छपो वा महार्णवे ॥ ३६ ॥
तिर्यग्योनिषु को भोगः का कीर्तिः किं सुखं पुनः ।
किं पुण्यं किं फलं तत्र क्षुद्रयोनिगतस्य मे ॥ ३७ ॥
कोलो वाथ नृसिंहो वा वामनो वाभवं कुतः ।
जमदग्निसुतः कस्मात्सम्भवेयं पितामह ॥ ३८ ॥
नृशंसं वा कथं कर्म कृतवानस्मि भूतले ।
क्षतजैस्तु ह्रदान्सर्वान्पूरयेयं कथं पुनः ॥ ३९ ॥
तत्कथं जमदग्नेश्च पुत्रो भूत्वा द्विजोत्तमः ।
क्षत्रियान्हतवानाजौ निर्दयो गर्भगानपि ॥ ४० ॥
रामो भूत्वाथ देवेन्द्र प्राविशद्दण्डकं वनम् ।
पदातिश्चीरवासाश्च जटावल्कलवान्पुनः ॥ ४१ ॥
असहायो ह्यपाथेयो भीषणे निर्जने वने ।
कुर्वन्नाखेटकं तत्र व्यचरं विगतत्रपः ॥ ४२ ॥
न ज्ञातवान्मृगं हैमं मायया पिहितस्तदा ।
उटजे जानकीं त्यक्त्वा निर्गतस्तत्पदानुगः ॥ ४३ ॥
लक्ष्मणोऽपि च तां त्यक्त्वा निर्गतो मत्पदानुगः ।
वारितोऽपि मयात्यर्थं मोहितः प्राकृतैर्गुणैः ॥ ४४ ॥
भिक्षुरूपं ततः कृत्वा रावणः कपटाकृतिः ।
जहार तरसा रक्षो जानकीं शोककर्शिताम् ॥ ४५ ॥
दुःखार्तेन मया तत्र रुदितञ्च वने वने ।
सुग्रीवेण च मित्रत्वं कृतं कार्यवशान्मया ॥ ४६ ॥
अन्यायेन हतो वाली शापाच्चैव निवारितः ।
सहायान्वानरान् कृत्वा लङ्कायां चलितः पुनः ॥ ४७ ॥
बद्धोऽहं नागपाशैश्च लक्ष्मणश्च ममानुजः ।
विसंज्ञौ पतितौ दृष्ट्वा वानरा विस्मयं गताः ॥ ४८ ॥
गरुडेन तदाऽऽगत्य मोचितौ भ्रातरौ किल ।
चिन्ता मे महती जाता दैवं किं वा करिष्यति ॥ ४९ ॥
हृतं राज्यं वने वासो मृतस्तातः प्रिया हृता ।
युद्धं कष्टं ददात्येवमग्रे किं वा करिष्यति ॥ ५० ॥
प्रथमं तु महद्दुःखमराज्यस्य वनाश्रयम् ।
राजपुत्र्यान्वितस्यैव धनहीनस्य मे सुराः ॥ ५१ ॥
वराटिकापि पित्रा मे न दत्ता वननिर्गमे ।
पदातिरसहायोऽहं धनहीनश्च निर्गतः ॥ ५२ ॥
चतुर्दशैव वर्षाणि नीतानि च तदा मया ।
क्षात्रं धर्मं परित्यज्य व्याधवृत्त्या महावने ॥ ५३ ॥
दैवाद्युद्धे जयः प्राप्तो निहतोऽसौ महासुरः ।
आनीता च पुनः सीता प्राप्तायोध्या मया तथा ॥ ५४ ॥
वर्षाणि कतिचित्तत्र सुखं संसारसम्भवम् ।
प्राप्तं राज्यञ्च सम्पूर्णं कोसलानधितिष्ठता ॥ ५५ ॥
पुरैवं वर्तमानेन प्राप्तराज्येन वै तदा ।
लोकापवादभीतेन त्यक्ता सीता वने मया ॥ ५६ ॥
कान्ताविरहजं दुःखं पुनः प्राप्तं दुरासदम् ।
पातालं सा गता पश्चाद्धरां भित्त्वा धरात्मजा ॥ ५७ ॥
एवं रामावतारेऽपि दुःखं प्राप्तं निरन्तरम् ।
परतन्त्रेण मे नूनं स्वतन्त्रः को भवेत्तदा ॥ ५८ ॥
पश्चात्कालवशात्प्राप्तः स्वर्गो मे भ्रातृभिः सह ।
परतन्त्रस्य का वार्ता वक्तव्या विबुधेन वै ॥ ५९ ॥
परतन्त्रोऽत्म्यहं नूनं पद्मयोने निशामय ।
तथा त्वमपि रुद्रश्च सर्वे चान्ये सुरोत्तमाः ॥ ६० ॥
इति श्रीमद्देवीभागवते महापुराणेऽष्टादशसाहस्र्यां सहितायां
चतुर्थस्कन्धे ब्रह्माणं प्रति विष्णुवाक्यं नामाष्टादशोऽध्यायः ॥ १८ ॥


पृथ्वीची ब्रह्मदेवाकडे तक्रार -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

व्यास म्हणाले, "हे राजा, कृष्णाचे, अद्‍भुत प्रेरणा हे जे त्या अवताराचे खरे रहस्य व मुख्य कारण ते मी तुला आता कथन करतो तू श्रवण कर.

एकदा पृथ्वी भाराने अतिशय त्रस्त झाल्यामुळे अत्यंत कृश झाली. भयभीत झालेली ती दीन पृथ्वी गोरूप धारण करून शोक करीत स्वर्गाला गेली. तेव्हा इंद्र तिला म्हणाला, "आज तुला काय भय प्राप्त झाले ? तुला कोणी पीडले आहे ? हे वसुंधरे तुला काय दुःख झाले आहे ते सर्व मला सांग."

हे ऐकून पृथ्वी म्हणाली, "हे देवराज, माझे सर्व म्हणणे आपण श्रवण करावे. ज्या अर्थी मला आपण दु:ख विचारीत आहा त्या अर्थी मी सांगते. मी दुष्ट नृपांमुळे फार चिडून गेले आहे. मगध देशातील माझा पती नृप जरासंध महापापी असून चेदिदेशाधिपती शिशुपाल, प्रतापी काशिराजा, रुक्मी, बलाढय कंस, महाबलाढय तारकासुर, शाल्व, क्रूरकेशी, धेनुक आणि वत्सक हेही सर्व महापापी आहेत.

परस्परांशी विरोधाने वागणार्‍या ह्या राजांना मुळीच धर्म मान्य नाही. हे कालस्वरूप राजे दुराचारी व मदोन्मत झालेले आहेत, हे इंद्र, हे प्रभो, त्यांनी पीडल्यामुळे मी भाराने चिरडले आहे. आणि आता करावे काय व जावे कोठे अशी मोठी चिंता मला प्राप्त झाली आहे.

हे इंद्रा, जयशाली विष्णूने वराहरूप धारण करून मला प्रथम पीडा दिली. एका दु:खातून पार पडले नाही तोच हरीमुळे मला आता दुसरे दुःख प्राप्त झाले आहे हे तू जाणतच आहेस. अहो ! हिरण्याक्ष नामक दुष्ट दैत्य तो कश्यपपुत्र त्याने मला जेव्हा हरण केले तेव्हा मी त्या महासागरामध्ये मग्न झाले व सुखाने निद्रा करीत होते. त्या वेळी वराहरूप धारण करून विष्णूने जरी त्याचा वध केला तरी मला वर काढून स्थिर केले. एका स्थळीच कायमचे रहावयास सांगितले. त्यामुळे मला आता दुसरीकडे कोठेही जाता येत नाही. नाही तर मी रसातलामध्ये स्वस्थ राहून सुखाने झोप घेत पडले असते.

हे देवराज सांप्रत या दुरात्म्या राजांचा भार सहन करण्यास मी समर्थ नाही. शिवाय, पुढे अठठाविसाव्या युगातील दुष्ट कली येत आहे. तेव्हा तर हे इंद्रा, मी पीडित होऊन सत्वरच रसातलात जाईन. तस्मात् हे देवाधिदेवा, ह्या दुःखसागरातून तू मला पार कर आणि माझा भार हरण कर. मी तुझ्या चरणांना वंदन करते."

इंद्र म्हणाले, "हे वसुंधरे, आज माझ्या हातून तुझे काय बरे काम होणार आहे ? तू ब्रह्मदेवाला शरण जा मीही तेथे येतो. तो तुझे दु:ख हरण करील. हे श्रवण करून पृथ्वी सत्वर ब्रह्मलोकी गेली व सर्व देवांचा अग्रणी इंद्रही तिच्या मागोमाग ब्रह्मलोकाला गेला.

ही कामधेनु सुरभीच येत असल्याचे प्रथम ब्रह्मदेवाला वाटले, पण पुढे ती पृथ्वी आहे असे समाधीने जाणून ब्रह्मदेव तिला म्हणाले, "हे कल्याणी, तू का रडत आहेस ? तुला सांप्रत काय दुःख होत असेल ते कथन कर. हे भूमी, कोणत्या पाप्याने तुला पीडा दिली आहे ते मला सांग.

पृथ्वी म्हणाली, "हा दुष्ट कली येत आहे व त्याला मी भीत आहे. कारण हे जगदीशा त्या कलियुगामध्ये प्रजा दुराचारी होईल. पूर्वी एकमेकांचे वैरी असल्यामुळे परस्परांचा द्वेष करणारे सर्वही दुराचारी राक्षस राजे होतील. ते राजे त्या कलिप्रभावामुळे चोरकर्माविषयी दक्ष राहातील. तस्मात् हे पितामह, त्या राजांचा वध करून आपण आज माझा भार हरण करावा. हे महाराज, सांप्रत सुद्धा काही राजे बलाच्या गर्वाने उन्मत्त झाले आहेत आणि त्या राजांच्या सैन्यभारामुळे मी फार पीडित झाले आहे."

ब्रह्मदेव म्हणाले, "हे भूदेवी, तू म्हणतेस त्याप्रमाणे तुझा भार हरण करण्यास मी समर्थ नाही. आपण सर्व देवाधिदेव चक्रपाणी विष्णूच्या निवासस्थानाप्रत जाऊ. तो जनार्दन तुझा भार दूर करील. असे पृथ्वीला सांगून ब्रह्मदेव इंद्राला म्हणाले, "हे इंद्रा, सर्व देवांसह या पृथ्वीला घेऊन तू माझ्याबरोबर वैकुंठभुवनास ये. तेथे विष्णूसह या कार्याविषयी आपण विचार करू. याकरता हे सुरश्रेष्ठी, तू विष्णूकडे चल."

इतके बोलून तो वेदकर्ता चतुर्मुख ब्रह्मदेव हंसारूढ झाला, देवांना व पृथ्वीला पुढे करून वैकुंठलोकी गेला आणि भक्तीने चित्त लीन करून वेदवाक्यांनी त्या विष्णूची स्तुती करू लागला.

ब्रह्मदेव म्हणाले, "हजारो मस्तके, हजारो नेत्र व हजारो पाय ह्यांनी तू युक्त असून पुरातन वेदपुरुष आणि सनातन देवाधिदेवही तूच आहेस. इतकेच नव्हे तर हे प्रभो, भूत, भविष्य, वर्तमान तूच असून हे दयावते, आम्हाला अमरत्वही तूच दिले आहेस. हा जो तुझा प्रभाव तो न जाणणारा त्रैलोक्यामध्ये कोण बरे आहे ? सृष्टीचा उत्पादक, त्रैलोक्यामध्ये कोण बरे आहे ? सृष्टीचा उत्पादक, संहारक व रक्षक तूच असून सर्वांना आधारभूत तूच आहेस."

ह्याप्रमाणे ब्रह्मदेवाने स्तुती केली असता गरुडध्वज प्रभु विष्णु प्रसन्न झाला आणि निर्मल अंतःकरण असलेल्या त्या भगवान विष्णूने त्या ब्रह्मदेव वगैरेना प्रत्यक्ष दर्शन दिले. नंतर देवांचे स्वागत करून त्या प्रसन्नमुख श्रीहरीने त्यांच्या आगमनाचे कारण विचारले. तेव्हा पृथ्वीच्या दु:खाचे स्मरण करून ब्रह्मदेव प्रणामपूर्वक विष्णूला म्हणाले, "हे सर्वव्यापी जनार्दना, आता तुला भूभार हरण केला पाहिजे. द्वापर युगाचा शेवट होत आला आहे. तेव्हा सत्वर तू भूतलावर अवतार धारण कर. हे दयानिधे, दुष्ट राजांचा वध करून भूमीचा भार दूर कर."

विष्णू म्हणाले, "मी, ब्रह्मदेव, शिव, इंद्र, अग्नी, यम, द्रष्टा, सूर्य व वरुण ह्यापैकी कोणीही स्वतंत्र नाहीत. ब्रह्मदेवापासून तो स्तंभापर्यंत हे सर्व चराचर जगत् गुणरूप सूत्रामध्ये ओवले असून योगमायेच्या आधीन राहिले आहे.

हे सुव्रता, ती योगमाया ज्याप्रमाणे स्वेच्छेने प्रथमत: काही करण्याचे मनामध्ये आणते त्याप्रमाणेच आम्ही अतिशय दक्ष राहून वागत असतो. आम्ही सर्वही तिच्या आधीन आहो. मी जर स्वतंत्र असतो तर महासागरामध्ये मस्त्य व कूर्म का झालो असतो ह्याचा विचार करा. कारण त्या क्षुद्र योनीमध्ये उत्पन्न होऊन भोग, कीर्ती, सुख, पुण्य व उत्कृष्ट सुकर्मफल यातून मला काय बरे प्राप्त झाले आहे ?

हे ब्रह्मदेवा, मी जर स्वतंत्र असतो तर वराह, नरसिंह, वामन अथवा जमदग्निपुत्र परशुराम का बरे झालो असतो ? आणि भूतलावर मी त्या वेळी ते घोर कर्म कसे केले असते ? द्विजश्रेष्ठ जमदग्निपुत्र होऊन निर्दय म्हणून संग्रामामध्ये क्षत्रियांचा वध मी का बरे केला असता ? सर्व डोह त्यांच्या रक्ताने कसे बरे भरून काढले असते ? गर्भातसुद्धा मी क्षत्रिय का बरे मारले असते ?

हे देवराज, राम होऊन मी वल्कले नेसून आणि जटा धारण करून पादचारी होऊन दंडकारण्यामध्ये का बरे प्रवेश केला असता ? तेव्हा मला सोबती कोणी नव्हता व प्रवासात उपयोगी पडणारे पदार्थही मजपाशी नव्हते. अशा असहाय स्थितीत भयंकर वनामध्ये मृगया करीत मी निर्लज्ज होऊन संसार केला. मायेने व्याप्त झाल्यामुळे सुवर्णमृगाचे स्वरूप मला समजले नाही आणि म्हणूनच झोपडीमध्ये जानकीला एकटी टाकून मी त्या मृगाच्या मागोमाग बाहेर पडलो. इतकेच नव्हे तर मी जरी नको म्हणून लक्ष्मणाचा अतिशय निषेध केला होता तरी प्रकृतीच्या गुणांनी मोहित झाल्यामुळे तोही तिला सोडून माझ्या मागोमाग आश्रमाबाहेर पडला.

नंतर कपटाचे अवलंबन करून रावणाने संन्याशाचे रूप धारण केले आणि शोकाने कृश झालेल्या जानकीला तो राक्षस सत्वर हरण करून घेऊन गेला. मी दु:खाकुल होऊन वनामध्ये शोक करू लागलो आणि कार्यवशात सुग्रीवाशी मला मित्रत्व करावे लागले. अन्यायाने वालीचा मी वध केला, पण शापापासून त्याचे निवारण केले आणि वानर मित्र करून त्यांच्यासह मी लंकेमध्ये गेलो. तेथे कनिष्ठ बंधू लक्ष्मणासह मी नागपाशांनी बद्ध झालो असता आम्ही उभयता निश्चष्ट पडलेले पाहून वानरही विस्मयचकित झाले.

तेव्हा गरुडाने त्यावेळी येऊन आम्हा उभयता भ्रात्यांची खरोखर सुटका केली. त्या प्रसंगी दैव आणखी यापुढे काय काय करणार आहे न कळे, अशी मला मोठी चिंता उत्पन्न झाली.

राज्य हरण केले गेले, वनामध्ये वास्तव्य करावे लागले, वडील मृत्यु पावले, प्रियेला रावणाने हरण करून नेले आणि युद्धरुप कष्ट तर सध्या भोगावे लागतच आहेत. आता यापुढे हे दैव आणखी काय काय करणार आहे अशी नित्य चिंता मी करीत होतो. हे देवहो, राज्यभ्रष्ट व धनहीन होऊन राजकन्येसह वनामध्ये वास्तव्य करणे हे प्रथम मोठेच दु:ख मला प्राप्त झाले.

वनात जाते वेळी पित्याने माझ्याबरोबर धन दिले नाही. सोबतीशिवाय मी धनहीन राम पादचारीच निघून गेलो. क्षात्रधर्मांचा त्याग करून मी व्याधवृत्तीने पुरी तेरा वर्षे घालविली. नंतर दैवामुळे युद्धामध्ये जय प्राप्त होऊन त्या महादैत्य रावणाचा माझ्या हातून वध झाला. पुनः सीतेचा मी अंगिकार केला आणि अयोध्येला आलो. काही वर्षे त्याठिकाणी समृद्ध राज्य व संसारसुख भोगले.

परंतु याप्रमाणे राज्य प्राप्त होऊन सुरळीत चालले असतांना पूर्वीच्या लोकापवादाला भिऊन मी सीतेचा त्याग केला.

तेव्हा कांताविरहजन्य दुःसह दुःख मला प्राप्त झाले व नंतर ती भूमिकन्याही भूमी विदीर्ण करून पातालामध्ये गेली. ह्याप्रमाणे रामावतारामध्ये मी परतंत्र असल्यामुळे मला अशा प्रकारे दु:ख प्राप्त झाले. असे दुःख भोगणारा कोण बरे स्वतंत्र असणार आहे ? नंतर कालगतीमुळे मला भ्रात्यासह स्वर्ग प्राप्त झाला.

समंजस पुरुषाने ह्या परतंत्रतेविषयी विशेष वाटाघाट तरी करण्यात काय अर्थ आहे ? हे ब्रह्मदेवा, मी, तू रुद्र व इतरही सर्व सुरश्रेष्ठ खरोखर परतंत्र आहेत हे तू लक्षात ठेव. अहो, आपण सर्वच पराधीन आहोत. तेव्हा त्या मायेला आपण शरण जाऊ."



अध्याय अठरावा समाप्त

GO TOP