श्रीमद्‌देवीभागवत महापुराण
चतुर्थः स्कन्धः
सप्तदशोऽध्यायः


नारायणवरदानम्

जनमेजय उवाच
वाराङ्गनास्त्वयाख्याता नरनारायणाश्रमे ।
एकं नारायणं शान्तं कामयाना स्मरातुराः ॥ १ ॥
शप्तुकामस्तदा जातो मुनिर्नारायणश्च ताः ।
निवारितो नरेणाथ भ्रात्रा धर्मविदा नृप ॥ २ ॥
किं कृतं मुनिना तेन व्यसने समुपस्थिते ।
ताभिः संकल्पितेनाथ कामार्थाभिर्भृशं मुने ॥ ३ ॥
शक्रेणोत्पादिताभिश्च बहुप्रार्थनया पुनः ।
याचितेन विवाहार्थं किं कृतं तेन जिष्णुना ॥ ४ ॥
इत्येतच्छ्रोतुमिच्छामि चरितं तस्य मोक्षदम् ।
नारायणस्य मे ब्रूहि विस्तरेण पितामह ॥ ५ ॥
व्यास उवाच
शृणु राजन्प्रवक्ष्यामि यथा तस्य महात्मनः ।
धर्मपुत्रस्य धर्मज्ञ विस्तरेण वदामि ते ॥ ६ ॥
शप्तुकामस्तु संदृष्टो नरेणाथ यदा हरिः ।
वारितोऽसौ समाश्वास्य मुनिर्नारायणस्तदा ॥ ७ ॥
शान्तकोपस्तदोवाच तास्तपस्वी महामुनिः ।
स्मितपूर्वमिदं वाक्यं मधुरं धर्मनन्दनः ॥ ८ ॥
अस्मिञ्जन्मनि चार्वंग्यः कृतसंकल्पवानहम् ।
आवाभ्याञ्च न कर्तव्यः सर्वथा दारसंग्रहः ॥ ९ ॥
तस्माद्‌ गच्छन्तु त्रिदिवं कृपां कृत्वा ममोपरि ।
धर्मज्ञा न प्रकुर्वन्ति व्रतभङ्गं परस्य वै ॥ १० ॥
शृङ्गारेऽस्मिन् रसे नूनं स्थायीभावो रतिः स्मृतः ।
कथं करोमि सम्बन्धं तदभावे सुलोचनाः ॥ ११ ॥
कारणेन विना कार्यं न भवेदिति निश्चयः ।
कविभिः कथितं शास्त्रे स्थायीभावो रसः किल ॥ १२ ॥
धन्यः सुचारुसर्वाङ्गः सभाग्योऽहं धरातले ।
प्रीतिपात्रं यतो जातो भवतीनामकृत्रिमम् ॥ १३ ॥
भवतीभिः कृपां कृत्वा रक्षणीयं व्रतं मम ।
भविष्यामि महाभागाः पतिरप्यन्यजन्मनि ॥ १४ ॥
अष्टाविंशे विशालाक्ष्यो द्वापरेऽस्मिन्धरातले ।
देवानां कार्यसिद्ध्यर्थं प्रभविष्यामि सर्वथा ॥ १५ ॥
तदा भवत्यो मद्दाराः प्राप्य जन्म पृथक्पृथक् ।
भूपतीनां सुता भूत्वा पलीभावं गमिष्यथ ॥ १६ ॥
इत्याश्वास्य हरिस्तास्तु प्रतिश्रुत्य परिग्रहम् ।
व्यसर्जयत्स भगवाञ्जग्मुश्च विगतज्वराः ॥ १७ ॥
एवं विसर्जितास्तेन गताः स्वर्गं तदाङ्गनाः ।
शक्राय कथयामासुः कारणं सकलं पुनः ॥ १८ ॥
आश्रुत्य मघवांस्ताभ्यो वृत्तान्तं तस्य विस्तरात् ।
तुष्टाव तं महात्मानं नारीर्दृष्ट्वा तथोर्वशीः ॥ १९ ॥
इन्द्र उवाच
अहो धैर्यं मुनेः कामं तथैव च तपोबलम् ।
येनोर्वश्यः स्वतपसा तादृग्‌रूपाः प्रकल्पिताः ॥ २० ॥
इति स्तुत्वा प्रसन्नात्मा बभूव सुरराट् ततः ।
नारायणोऽपि धर्मात्मा तपस्यभिरतोऽभवत् ॥ २१ ॥
इत्येतत्सर्वमाख्यातं मुनेर्वृत्तान्तमद्‌भुतम् ।
नारायणस्य सकलं नरस्य च महामुनेः ॥ २२ ॥
तौ हि कृष्णार्जुनौ वीरौ भूभारहरणाय च ।
जातौ तौ भरतश्रेष्ठ भृगोः शापवशादिह ॥ २३ ॥

राजोवाच
कृष्णावतारचरितं विस्तरेण वदस्व मे ।
सन्देहो मम चित्तेऽस्ति तं निवारय मानद ॥ २४ ॥
ययोः पुत्रत्वमापन्नौ हर्यनन्तौ महाबलौ ।
देवकीवसुदेवौ तौ दुःखभाजौ कथं मुने ॥ २५ ॥
कंसेन निगडे बद्धौ पीडितौ बहुवत्सरान् ।
ययोः पुत्रो हरिः साक्षात्तपसा तोषितोऽभवत् ॥ २६ ॥
जातोऽसौ मथुरायां तु गोकुले स कथं गतः ।
कंसं हत्वा द्वारवत्यां निवासं कृतवान्कथम् ॥ २७ ॥
पित्रादिसेवितं देशं समृद्धं पावनं किल ।
त्यक्त्वा देशान्तरेऽनार्ये गतवान्स कथं हरिः ॥ २८ ॥
कुलञ्च द्विजशापेन कथमुत्सादितं हरेः ।
भारावतारणं कृत्वा वासुदेवः सनातनः ॥ २९ ॥
देहं मुमोच तरसा जगाम च दिवं हरिः ।
पापिष्ठानाञ्च भारेण व्याकुलाभूच्च मेदिनी ॥ ३० ॥
ते हता वासुदेवेन पार्थेनामितकर्मणा ।
लुण्ठिता यैर्हरेः पत्‍न्यस्ते कथं न निपातिताः ॥ ३१ ॥
भीष्मो द्रोणस्तथा कर्णो बाह्लिकोऽप्यथ पार्थिवः ।
वैराटोऽथ विकर्णश्च धृष्टद्युम्नश्च पार्थिवः ॥ ३२ ॥
सोमदत्तादयः सर्वे निहताः समरे नृपाः ।
तेषामुत्तारितो भारश्चौराणां न हृतः कथम् ॥ ३३ ॥
कृष्णपत्‍न्यः कथं दुःखं प्राप्ताः प्रान्ते पतिव्रताः ।
सन्देहोऽयं मुनिश्रेष्ठ चित्ते मे परिवर्तते ॥ ३४ ॥
वसुदेवस्तु धर्मात्मा पुत्रदुःखेन तापितः ।
त्यक्तवान्स कथं प्राणानपमृत्युं जगाम ह ॥ ३५ ॥
पाण्डवा धर्मसंयुक्ताः कृष्णे च निरताः सदा ।
ते कथं दुःखभोक्तारो ह्यभवन्मुनिसत्तम ॥ ३६ ॥
द्रौपदी च महाभागा कथं दुःखस्य भागिनी ।
वेदीमध्याच्च सञ्जाता लक्ष्म्यंशसम्भवा किल ॥ ३७ ॥
सभायां सा समानीता रजोदोषसमन्विता ।
बाला दुःशासनेनाथ केशग्रहणकर्शिता ॥ ३८ ॥
पीडिता सिन्धुराज्ञाथ वनमध्यगता सती ।
तथैव कीचकेनापि पीडिता रुदती भृशम् ॥ ३९ ॥
पुत्राः पञ्चैव तस्यास्तु निहता द्रौणिना गृहे ।
सुभद्रायाः सुतो युद्धे बाल एव निपातितः ॥ ४० ॥
तथा च देवकीपुत्रा षट् कंसेन निषूदिताः ।
समर्थेनापि हरिणा दैवं न कृतमन्यथा । ४१ ॥
यादवानां तथा शापः प्रभासे निधनं पुनः ।
कुलक्षयस्तथा तीव्रस्तत्पत्‍नीनाञ्च लुण्ठनम् ॥ ४२ ॥
विष्णुना चेश्वरेणापि साक्षान्नारायणेन च ।
उग्रसेनस्य सेवा वै दासवत्सततं कृता ॥ ४३ ॥
सन्देहोऽयं महाभाग तत्र नारायणे मुनौ ।
सर्वजन्तुसमानत्वं व्यवहारे निरन्तरम् ॥ ४४ ॥
हर्षशोकादयो भावाः सर्वेषां सदृशाः कथम् ।
ईश्वरस्य हरेर्जाता कथमप्यन्यथा गतिः ॥ ४५ ॥
तस्माद्विस्तरतो ब्रूहि कृष्णस्य चरितं महत् ।
अलौकिकेन हरिणा कृतं कर्म महीतले ॥ ४६ ॥
हता आयुःक्षये दैत्याः क्लेशेन महता पुनः ।
क्वैश्वर्यशक्तिः प्रथिता हरिणा मुनिसत्तम ॥ ४७ ॥
रुक्मिणीहरणे नूनं गृहीत्वाथ पलायनम् ।
कृतं हि वासुदेवेन चौरवच्चरितं तदा ॥ ४८ ॥
मथुरामण्डलं त्यक्त्वा समृद्धं कुलसम्मतम् ।
जरासन्धभयात्तेन द्वारकागमनं कृतम् ॥ ४९ ॥
तदा केनापि न ज्ञातो भगवान्हरिरीश्वरः ।
किञ्चित्प्रब्रूहि मे ब्रह्मन् कारणं व्रजगोपनम् ॥ ५० ॥
एते चान्ये च बहवः सन्देहा वासवीसुत ।
नाशयाद्य महाभाग सर्वज्ञोऽसि द्विजोत्तम ॥ ५१ ॥
गोप्यस्तथैकः सन्देहो हृदयान्न निवर्तते ।
पाञ्चाल्याः पञ्चभर्तृत्वं लोके किं न जुगुप्सितम् ॥ ५२ ॥
सदाचारं प्रमाणं हि प्रवदन्ति मनीषिणः ।
पशुधर्मः कथं तैस्तु समर्थैरपि संश्रितः ॥ ५३ ॥
भीष्मेणापि कृतं किं वा देवरूपेण भूतले ।
गोलकौ तौ समुत्पाद्य यत्तु वंशस्य रक्षणम् ॥ ५४ ॥
धिग्धर्मनिर्णयः कामं मुनिभिः परिदर्शितः ।
येन केनाप्युपायेन पुत्रोत्पादनलक्षणः ॥ ५५ ॥
इति श्रीमद्देवीभागवते महापुराणेऽष्टादशसाहस्र्यां संहितायां चतुर्थस्कन्धे
सुराङ्गनानां प्रति नारायणवरदानं नाम सप्तदशोऽध्यायः ॥ १७ ॥


जनमेजयाची संभ्रमावस्था -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

जनमेजय म्हणाला, "हे व्यास, आपण पूर्वी सांगितलेल्या वारांगना कामातुर होऊन नरनारायणाच्या आश्रमामध्ये शांत बसलेल्या त्या एका नारायणाची इच्छा करू लागल्या. तेव्हा तो नारायण मुनी त्यांना शाप देण्यास उद्युक्त झाला व त्या वेळी त्याच्या धर्मवेत्त्या भ्रात्याने नराने त्याचे निवारण केले. परंतु त्यानंतर अर्थ व काम यांची अतिशय इच्छा करणार्‍या त्या वारांगनांनी त्याचीच इच्छा धरल्यावर अशा प्रकारचे संकट उपस्थित झाले असता त्या नारायणमुनीने पुढे काय केले ?

इंद्राने उत्पन्न केलेल्या त्या वारांगनांनी विवाह करण्याविषयी नारायणाची वारंवार अतिशय प्रार्थना करून याचना केली का नाही ? हे श्रवण करण्याची माझी इच्छा आहे. हे पितामह, त्या नारायणाचे मोक्षप्रद चरित्र आपण मला सविस्तर कथन करा."

व्यास म्हणाले, "हे धर्मज्ञ राजा, त्या महात्म्या धर्मपुत्राचे चरित्र कसे काय झाले हेच मी आता सविस्तर कथन करतो. हरीचा अंश जो नारायणमुनी तो शाप देण्यास उद्युक्त झाल्याचे जेव्हा नराने अवलोकन केले तेव्हा सांत्वनपूर्वक त्याने त्याचे निवारण केले. अखेर त्या तपस्वी महामुनीचा कोप शांत झाला आणि तो धर्मपुत्र हास्यपूर्वक त्या देवांगनांशी मधुर भाषण करू लागला.

तो म्हणाला, "हे सुंदर स्त्रियांनो, ह्या जन्मामध्ये तर मी ब्रह्मचर्याचा निश्चय केला आहे. तेव्हा मला काही झाले तरी विवाह करता येत नाही. तस्मात् माझ्यावर कृपा करून तुम्ही स्वर्गास परत जा. दुसर्‍याच्या व्रताचा भंग धर्मज्ञ लोक करीत नसतात. ह्या शृंगारसामध्ये रती हाच स्थायीभाव रस होय, परंतु तोच माझे ठिकाणी नाही. तेव्हा हे सुलोचनांनो, त्याशिवाय मी तुमच्याशी कसा बरे संबंध करू ?

कारणावाचून कार्य होत नाही हे निश्चित आहे आणि रती हाच स्थायीभाव रस म्हणून कवींनी अलंकारशास्त्रामध्ये खरोखर कथन केला आहे. ज्या अर्थी मी तुमच्या अकृत्रिम प्रेमास पात्र झालो आहे त्या अर्थी भूतलावर मीच धन्य व भाग्यवान असून माझेच सर्व अवयव मनोहर आहेत हे खरे. पण आपण कृपा करून माझ्या ह्या व्रताचे रक्षण केले पाहिजे. हे महाभाग्यसंपन्न स्त्रियांनो, मी दुसर्‍या जन्मामध्ये तुमचा पती होईन. हे विशालनयन स्त्रियांनो, ह्या भूतलावर अठठाविसाव्या द्वापर युगामध्ये मी देवकार्य सिद्धीस नेण्याकरता निःसंशय अवतार धारण करीन. तेव्हा राजांचे उदरी कन्याकरूपाने पृथक् जन्म घेऊन तुम्ही माझ्या भार्या व्हाल."

ह्याप्रमाणे त्या भगवान श्रीहरीने त्यांचे सांत्वन करून व भार्या म्हणून त्यांचा स्वीकार करण्याचे वचन देऊन त्यांना जाण्याची अनुज्ञा दिली. तेव्हा त्या निश्चिंत होऊन स्वस्थानी परत गेल्या. ह्याप्रमाणे नारायणाने परत पाठवल्यानंतर त्या स्त्रियांनी स्वर्गास जाऊन इंद्राला परत येण्याचे कारण कथन केले. तेव्हा नवीन आलेल्या उर्वशीप्रभूती स्त्रिया अवलोकन करून त्या नारायणाचा सविस्तर वृत्तांत त्यांच्या मुखातून श्रवण केल्यानंतर, इंद्राने त्या महात्म्या नारायणमुनीची फारच प्रशंसा केली.

इंद्र म्हणाला, "काय हे मुनीचे धैर्य ! खरोखर केवढे तरी हे तपःसामर्थ्य कारण, उर्वशीसारख्या अनेक स्त्रिया त्याने आपल्या तपश्चर्येने सहज उत्पन्न केल्या !" अशी स्तुती करून देवराज इंद्र मनामध्ये प्रसन्न झाला. इकडे धर्मात्मा नारायणही तपामध्ये गढून गेला.

हे भरतवंशजा, याप्रमाणे महामुनी नरनारायणाचा हा सर्व अद्‌भुत वृत्तांत मी पूर्णपणे कथन केला आहे. तेच मुनीवर कृष्णार्जुन होत. तेच भृगूशापामुळे भूभार हरण करण्याकरता या भूवर उत्पन्न झाले."

जनमेजय राजा म्हणाला, "हे मान्य मुने, आता कृष्णावताराचे चरित्र आपण मला सविस्तर कथन करा आणि त्याविषयी माझ्या चित्तामध्ये असलेल्या संदेहाची निवृत्ती करा. महाबलाढय रामकृष्णांनी ज्यांचे पुत्रत्व स्वीकारले ते देवकीवसुदेव दु:खी का झाले ? कंस हा प्रत्यक्ष देवकीचा बंधु असून त्या कंसानेसुद्धा त्यांच्या पायात बेडया घालून अनेक वर्षेपर्यंत त्यांना पीडा का दिली ? ज्यांच्या तपश्चर्येने संतुष्ट झाल्यामुळे प्रत्यक्ष हरी ज्यांचा पुत्र झाला त्यांना देखील दु:ख प्राप्त व्हावे हे आश्चर्य नव्हे काय ?

प्रथमत: मथुरेमध्ये उत्पन्न झालेला तो हरी गोकुळात कसा गेला ? नंतर कंसाचा वध करून द्वारावतीनगरीमध्ये त्या कृष्णाने वास्तव्य कसे केले ? अहो, वाडवडिलांनी आश्रय केलेल्या समृद्ध व पवित्र अशा आपल्या पुरातन देशाचा त्याग करून दुसर्‍या अनार्य देशामध्ये तो हरी कसा गेला ?

द्विजशापाने त्या हरीच्या कुलाचा उच्छेद तरी कसा झाला ? सनातन वासुदेव भूभार हरण करून निजधामाला गेला ! पापिष्ठ लोकांच्या भाराने पृथ्वी व्याकुल झाली असता कृष्णाने महापराक्रमी अर्जुनाचे साहाय्य घेऊन त्यांचा वध केला. परंतु कृष्ण निजधामाला गेल्यानंतर ज्यांनी हरीच्या स्त्रिया हरण करून नेल्या त्या दुष्ट भिल्लांचा वध अर्जुनाने का बरे केला नाही ?

भीष्म, द्रोण, कर्ण, बाल्हिक राजा, विराट पुत्र, विकर्ण, राजा धृष्टद्युम्न आणि सोमदत्त वगैरे सर्व राजे ह्यांचा समरांगणावर कृष्णार्जुनांनी वध केला आणि पृथ्वीवरील त्यांचा भार कमी केला. पण स्त्रिया चोरणार्‍या चोरांचा भार मात्र त्यांच्याकडून का बरे कमी झाला नाही ? परिणामी पतिव्रता कृष्णपत्‍न्यांना का बरे दु:ख प्राप्त झाले ? हे मुनिश्रेष्ठा, हे असे संदेह एकसारखे माझ्या मनात घोळत राहिले आहेत.

त्याचप्रमाणे धर्मात्मा वासुदेव पुत्रशोकाने संतप्त होऊन प्राणत्याग करण्यास कसा उद्युक्त झाला ? अशा रीतीने त्याला अपमृत्यू का बरे आला ? पांडव धर्मनिष्ठ असून कृष्णाविषयी सर्वदा तत्पर असताना हे मुनिश्रेष्ठा, ते का बरे दु:खाचे वाटेकरी झाले ? महाभाग्यवती द्रौपदीला तरी दुःख का बरे झाले ? ती लक्ष्मीचा अंश असून वेदीमधून उत्पन्न झाली होती असे म्हणतात. परंतु ती बाला रजस्वला असतानाच दुःशासनाने वेणी धरून तिला क्लेश दिले व तिला सभेमध्ये आणले ? इतकेच नव्हे, तर ती साध्वी वनामध्ये गेली असताना तेथेही सिंधुराज जयद्रथाने तिला पीडा दिली. अतिशय रोदन करीत असता कीचकानेही तिचा छळ केला !

द्रोणपुत्र अश्वत्थाम्याने शिबिरात जाऊन तिचे पाचही पुत्र मारले ! सुभद्रेचा पुत्र तर युद्धामध्ये बालपणीच मारला ! त्याचप्रमाणे देवकीच्या सहा पुत्रांचाही कंसाने वध केला. समर्थ श्रीहरीनेही हे दैव फिरवले नाही.

यादवांना याप्रमाणे झालेला शाप, त्या शापाप्रमाणे पुनरपी प्रभासक्षेत्री त्यांना आलेले मरण, कृष्णाचा तो तशा प्रकारचा भयंकर कुलक्षय, त्याच्या स्त्रियांचे हरण आणि साक्षात् ईश्वर व सर्वव्यापी असलेल्या नारायणाने उग्रसेनाची सर्वदा दासाप्रमाणे केलेली सेवा, ह्याविषयी हे महाभाग्यवान मुने, मला वारंवार संदेह वाटत आहे. या प्रपंचामध्ये भगवान नारायण मुनीचे ठिकाणीही साधारण जीवाप्रमाणे एकसारखीच स्थिती का बरे दृष्टीस पडावी ? हर्षशोकाच्या गोष्टी सर्वांना सारख्याच का बरे लागू असाव्यात ? जो श्रीहरी ईश्वर, त्याचीसुद्धा अशी विपरीत गती का बरे व्हावी ?

तस्मात् कृष्णाचे अद्‍भुत चरित्र आपण मला सविस्तर कथन करा. श्रीहरीने भूतलावर अवतार घेऊन लोकोत्तर कर्म केले. पण दैत्य हे देहधारी असल्यामुळे नाशवंत व स्वकर्मबद्ध होते. म्हणून त्यांच्या आयुष्याचा क्षय यथाकाली होणारच होता. असे असून त्या हरीला मोठे कष्ट घेऊन दैत्यांचा वध का करावा लागला ?

हे मुनीश्रेष्ठा, हरीने आपली ऐश्वर्यशक्ती का दाखवली बरे ! रुक्मिणीहरणासंबंधाने पाहू गेले असताही तिला घेऊन वासुदेवाने पलायन केले म्हणजे चोराप्रमाणेच त्या वेळी वर्तन केले. तसेच कुलाला संमत व समृद्ध असे मथुरामंडळ सोडून जरासंधाच्या भीतीमुळे त्याने द्वारकेस गमन केले. तेव्हा हरी हा भगवान ईश्वर आहे असे कोणालाच कसे बरे समजून आले नाही ?

हे ब्रह्मन्, गोकुळामध्ये लपून रहाण्याचे काही तरी कारण असले पाहिजे. ते मला आपण पूर्णपणे कथन करा. हे व्यासमुने, हे द्विजश्रेष्ठा, हे महाशया, असेच हे व पुष्कळ संदेह मला आहेत, त्याची आज आपण निवृत्ती करा. कारण आपण सर्वज्ञ आहात.

ह्याशिवाय आणखीही एक संदेह आहे, पण त्याची परिस्फुटता होणे योग्य नव्हे तो संदेह मनातून जात नाही म्हणून विचारणे भाग आहे.

द्रौपदीचे पंचभर्तृत्व जगतामध्ये निंद्य ठरलेले नाही काय ? पंडित जन धर्माविषयी सदाचार हाच मुख्यत्वाने प्रमाण मानीत असतात. परंतु त्या समर्थ पांडवांनीही त्या पशुधर्माचे कसे बरे अवलंबन केले ? तेजरूपाने भूतलावर अवतीर्ण होऊन भीष्माने तरी काय केले ? धृतराष्ट्र व पांडु हे उभयता गोलोक उत्पन्न करूनच वंशाचे रक्षण केले ना ? अरेरे, पाहिजे त्या रीतीने पुत्रोत्पादन करण्याविषयी मुनीनी जो यथेष्ट धर्मनिर्णय दर्शविला आहे त्याचा धिक्कार असो ! हे महर्षे, माझ्या मनातील अशाप्रकारच्या सर्व संशयांचे आपण निरसन करा. मला या संदेहसागरातून मुक्त करा."



अध्याय सतरावा समाप्त

GO TOP