[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]
असा मनामध्ये विचार करून तो शुक्र त्या दैत्यांना हसत हसत म्हणाला, "हे दैत्यहो, माझे रूप धारण करून ह्या देवगुरुने खरोखर तुम्हाला फसविले आहे. मी खरा शुक्र असून हा देवकार्य साधणारा कपटी गुरु आहे व ह्याने तुम्हाला फसविले आहे. तुम्ही माझे यजमान आहा यात संशय नाही. हे आर्यहो, तुम्ही ह्याच्या भाषणावर विश्वास ठेवू नका. माझे रूप धारण केलेला हा दांभिक देवगुरु आहे. हे यजमानहो, तुम्ही माझ्याकडे या आणि ह्या बृहस्पतीचा त्याग करा."
हे त्याचे भाषण श्रवण केल्यानंतर ते उभयताही सारखेच आहेत असे पाहून दैत्यांना मोठे आश्चर्य वाटले. हा आपल्याला उपदेश करणाराच खरा शुक्र आहे असा त्यांचा निश्चय झाला. परंतु ते पुन्हा संशयात पडले व त्यांच्या मनाचा निश्चय होईना. तेव्हा ते अतिशय गोंधळलेले पाहून शुक्राचे रूप धारण करणारा गुरु त्याचा फायदा घेऊन त्यांना म्हणाला, "दैत्यहो, हा देवगुरु असून तुम्हाला फसवीत आहे. ह्या देवगुरुने माझे रूप धारण केले आहे आणि देवकार्य सिद्धीस जावे एतदर्थ तुम्हाला फसवण्याकरता हा येथे आला आहे. हे दैत्यश्रेष्ठहो, तुम्ही त्याच्या भाषणावर विश्वास ठेवू नका. शंकरापासून मला जी विद्या प्राप्त झाली आहे ती तुम्हाला शिकवीन म्हणजे खरोखर देवांपासून तुम्हाला जय प्राप्त होईल यात संशय नाही."
शुक्राचे रूप धारण केलेल्या त्या गुरूचे हे भाषण श्रवण केल्यावर "हा पहिल्याने उपदेश करणाराच खरा शुक्र होय." असे म्हणून त्या दैत्यांची पूर्ण खात्री झाली. तेव्हा त्याने दानवांना नानाप्रकारांनी समजावून सांगितले. पण विपरीत कालगतीमुळे गुरुमायेने मोहित झालेल्या त्या दैत्यांची काही केल्या समजूत पटली नाही. पूर्वीचाच निश्चय कायम करून ते खर्या शुक्राला म्हणाले, "हा आमचा गुरु धर्मात्मा व बुद्धिमान असून आमच्या हिताविषयी तत्पर आहे. हाच खरा भृगुनंदन असून सतत दहा वर्षे आम्हाला शिकवीत आहे. म्हणून तू चालता हो. तू आम्हाला कपटी दिसत आहेस. तू आमचा गुरु नव्हेस."
असे बोलून त्यांनी त्या शुक्राची निर्भर्त्सना केली, प्रणिपातपूर्वक अभिनंदन करून त्यांनी प्रेमाने शुक्र म्हणून गुरूचाच स्वीकार केला.
तेव्हा देवगुरूने दैत्यांना उपदेश करून अतिशय फसवले आहे व तेही तन्मय होऊन गेले आहेत असे अवलोकन करून शुक्राला अतिशय क्रोध आला आणि त्याने त्यांना शाप दिला. तो त्यांना म्हणाला, "ज्याअर्थी मी बोध केला असूनही तुम्ही माझे म्हणणे मान्य करीत नाही त्याअर्थी तुम्ही बेशुद्ध झाला आहा. तुमचा लवकरच पराभव होईल. थोडक्याच वेळाने माझ्या अवज्ञेचे फल खरोखर तुम्हाला प्राप्त होईल आणि नंतर ह्या तोतया गुरूचे सर्व समजून येईल."
असे बोलून क्रुद्ध झालेला तो भृगुनंदन शुक्र त्या सर्व दैत्यांना शाप देऊन सत्वर तेधून निघून गेला आणि बृहस्पती आनंदित होऊन तेथेच सावध राहिला. नंतर शुक्राने त्या दैत्यांना शाप दिल्याचे समजताक्षणी गुरूने शुक्राचे रूप टाकून स्वतःचे रूप धारण केले. वेगाने तेधून निघून तो इंद्राकडे गेला आणि त्याला म्हणाला, "माझ्या हातून देवकार्य सिद्धीस गेले ह्यात संशय नाही. कारण शुक्राने त्या दैत्यांना शाप दिला असून मीही त्यांचा त्याग केला आहे. त्यामुळे ते आता खरोखर निराधार झाले आहेत. तस्मात् हे सुरश्रेष्ठहो, तुम्ही संग्रामाकरता प्रयत्न करा. हे इंद्रा, मी त्यांना निर्बल व शापदग्ध केले आहे."
हे गुरूचे भाषण श्रवण करून इंद्राला आनंद झाला, तसाच सर्व देवांनाही हर्ष झाला. ते सर्व बृहस्पतीची प्रशंसा करू लागले. नंतर त्यांनी आपापसात विचार विनिमय करून संग्रामाचा निश्चय केला. ते सर्वही देव एकत्र जुळून दानवांकडे जाण्यास निघाले. आपल्या पराभवामुळे नानाप्रकारचे उद्योग करून शेवटी स्वस्थ बसलेले महाबलाढय देव पुनरपी युद्धाकरता उद्युक्त झाले आहेत व बृहस्पतीही गुप्त झाला असे समजून आल्यावर सर्व दैत्य चिंताक्रांत झाले व त्या गुरूच्या मायेने मोहित झालेले ते दैत्य आपापसात म्हणाले, "खरोखर आपण सर्व फसलो. आता मनामध्ये क्रुद्ध होऊन गेलेल्या त्या महात्म्या खर्या शुक्राचार्याला प्रसन्न करून घेतले पाहिजे. कपटपटू, पापी, भ्रातृपत्नीचा उपभोग घेणारा, अंतःकरण मलिन पण बाहेरून मात्र शुद्ध असलेला तो देवगुरु आम्हांला फसवून गेला. आता काय करावे ? आता या खर्या भृगुनंदनाला शरण जाऊन त्याची सेवा केली पाहिजे. त्यालाच प्रसन्न करून घेतले पाहिजे.
आता करावे काय ? जावे कोठे ? आणि क्रुद्ध झालेल्या शुक्राचे मन आनंदित करून सहाय्याकरता त्याला आम्ही प्रसन्न तरी कसे करावे ? याचा विचार करीत ते सर्व एकत्र जुळलेले दैत्य भीतीने थरथर कापू लागले. नंतर प्रल्हादाला पुढे करून ते पुनरपी त्या भृगुनंदनाकडे गेले. मौन धारण करून बसलेल्या त्या मुनीच्या चरणांना त्यांनी प्रणाम केला.
तेव्हा क्रोधाने ज्याचे नेत्र आरक्तवर्ण झालेले आहेत असा तो भृगुनंदन शुक्र त्यांना म्हणाला, "हे यजमानहो, गुरूच्या मायेने मोहित झालेल्या तुम्हाला मी सावध केले होते. परंतु माझे योग्य हितकारक व पवित्र भाषण तुम्हाला मान्य झाले नाही, इतकेच नव्हे तर तुम्ही बृहस्पतीच्या अधीन होऊन माझा अवमान
केलात. खरोखर त्या अवमानानेच हे फल उन्मत्त झालेल्या तुम्हाला आज प्राप्त झाले आहे. म्हणून सत्त्वापासून भ्रष्ट झालेल्या मूर्ख दैत्यहो, देवकार्य साधण्याच्या उद्देशाने तो कपटवेषधारी वंचक जिकडे गेला असेल तिकडेच तुम्ही आता जा. मी त्याच्यासारखा वंचक नाही."
याप्रमाणे संदिग्ध व उपरोधिक वाणीने शुक्र बोलू लागला असता प्रल्हाद त्याचे पाय धरून म्हणाला, "हे भार्गवा, खरे आमचे हित कोणते ते आम्हाला खरोखरच कळले. म्हणूनच आम्ही आज आतुर होऊन आपणाकडे आलो आहो. आपणाला पुत्रतुल्य असलेल्या आम्हा यजमानांचा आपण त्याग करू नका. मंत्रप्राप्तीकरता आपण गेल्यानंतर त्या दुरात्म्या धूर्त बृहस्पतीने आपला वेष व मधुर भाषण ह्यांच्या योगाने आम्हाला फसविले. अज्ञानामुळे घडलेल्या दोषाबद्दल शांत पुरुष इतके क्रुद्ध होत नाहीत हे आपण जाणतच आहा. आता आमचे चित्त आपले ठिकाणीच लीन आहे.
हे महाविचारी मुने, तपोबलाने आमचे तुमच्या ठिकाणी असलेले खरे प्रेम जाणून आपण क्रोधाचा त्याग करा. साधूंचा कोप क्षणिक असतो असे सर्व मुनींचे म्हणणे आहे. स्वभावत: शीत असलेले उदक अग्रीचा अथवा उष्णतेचा संयोग झाल्याने जरी उष्ण होते तरी वियोग होण्याबरोबर शीत होत असते, क्रोध चांडालरूप असल्यामुळे प्राज्ञ जनांनी सर्वस्वी त्याचा त्यागच केला पाहिजे. म्हणून सुव्रता क्रोधाचा त्याग करून आपण प्रसन्न व्हा. हे गुरो, आपण क्रोधाचा त्याग न करता अत्यंत दु:खित झालेल्या व शरण आलेल्या आमचा जर त्याग कराल तर हे मुने, आपण त्याग करताक्षणीच आम्ही सर्व दानव रसातळाला जाऊ. तेव्हा आम्हाला क्षमा करा."
प्रल्हादाचे भाषण श्रवण करून भृगुनंदन शुक्राने ज्ञानदृष्टीने सर्व अवलोकन केले. मन संतुष्ट करून हसत हसत तो त्यांना म्हणाला, "हे दानवहो, तुम्ही भिऊ नका; रसातळालाही जाऊ नका ! अमोघ मंत्रानी खरोखर मी तुम्हा यजमानांचे रक्षण करीन. मी आज जे सिद्धांतरूप सत्य व हितावह भाषण करीत आहे, ब्रह्मदेवापासून पूर्वी मी जे श्रवण केले आहे ते, हे धर्मज्ञहो, तुम्ही श्रवण करा. अवश्य घडून येणार्या बर्या वाईट गोष्टी घडून येतच असतात. ह्या भूतलावर दैव फिरवण्यास कोणीही समर्थ नाही.
आज कालयोगामुळे निःसंशय तुमचे बल कमी झाले आहे. ह्यास्तव देवांच्या हातून एकवार पराजय पावून तुम्ही पातालामध्ये जाल. तुमचा काल फिरला आहे असे ब्रह्मदेवानेही सांगितले आहे. तुम्ही आजपर्यंत सर्वात समृद्ध राज्याचा पूर्णपणे उपभोग घेतला असून पूर्ण दहा युगेपर्यंत देवांच्या मस्तकी पाय देऊन दैवयोगाने त्रैलोक्याचे संपन्न राज्य तुम्ही केले आहे. आता येथून पुढे तुमच्या उत्कर्षाचे दिवस नाहीत. आता यापुढे सावर्णिक मन्वंतरामध्ये तुमचे राज्य होईल.
हे प्रल्हादा, तुझ्या त्रैलाक्यविजयी बलिनामक पौत्राला जेव्हा देव विष्णूने वामनरूप धारण करून त्रैलोक्य हरण केले, तेव्हाच त्या विजयशील देवाने तुझ्या पौत्राला अनुलक्षून सांगून ठेवले आहे. देवांची इच्छा सिद्धीस जाण्याकरता ज्याने बलीचे राज्य हरण केले, त्यानेच "पुढे सावर्णिक मन्वंतर प्राप्त झाले असता तू इंद्र होशील." असे सांगून ठेवले आहे.
भार्गव म्हणतो, "हे प्रल्हादा, याप्रमाणे विष्णूने तुझ्या पौत्राला सांगितले आहे. सांप्रत कोणत्याही प्राण्याच्या दृष्टीस न पडता तो तुझा पौत्र भयभीत झालेल्या पुरुषाप्रमाणे गुप्तपणे यथेष्ट सर्व ठिकाणी संचार करीत आहे. एकदा इंद्राच्या भीतीमुळे गर्दभरूप धारण करून तो एका ओसाड घरात असताना त्याची व इंद्राची गाठ पडली, तेव्हा इंद्र त्याला म्हणाला, "हे दैत्यश्रेष्ठा, तू गर्दभरूप कशाकरता धारण केले आहेस ? अरे, तू सर्व जगताचा उपभोक्ता असून दानवांचा अधिपती आहेस. तस्मात् हे राक्षसश्रेष्ठा, गर्दभरूपाने राहणे तुला लज्जास्पद कसे वाटत नाही ?"
हे इंद्राचे भाषण श्रवण करून दैत्यराज बली त्याला म्हणाला, "हे इंद्रा, ह्या योनीमध्ये काय बरे दु:ख आहे ? ज्याप्रमाणे महातेजस्वी विष्णूने मत्स्यकूर्मादि योनीत जन्म घेतला त्याचप्रमाणे मीही कालचक्रामुळे गर्दभरूपाने राहिलो आहे. ज्याप्रमाणे पूर्वी तू ब्रह्महत्येने पीडित झाल्यामुळे कमलामध्ये गुप्त होऊन राहिलास, त्याचप्रमाणे मीही आता गर्दभरूप धारण करून राहिलो आहे. हे इंद्रा, दैवाधीन प्राण्याला सुख काय व दुःख तरी काय ? सर्व परावलंबी आहे, खरोखर काल हा आपल्या इच्छेप्रमाणे प्राण्याला वागवीत असतो. त्याला काय करावे ?"
ह्याप्रमाणे ते इंद्र व बली सुखदु:खाविषयी विचार करीत असता परस्परात उत्तम भाषण करून व तत्त्व जाणून स्वस्थानी परत गेले. हे प्रल्हादा, ह्याप्रमाणे देवाची बलिष्ठता मी तुला कथन केली आहे. तात्पर्य, देव, असुर व मानव ह्यासह सर्व जगत् दैवाधीन आहे. तेव्हा दैवाचा प्रभाव जाणून तुम्ही योग्य ते कार्य करा, मी इतकेच सांगतो, ते ऐका."