[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]
त्या महात्म्या भार्गवाचे भाषण श्रवण करून प्रल्हाद अतिशय आनंदित झाला. दैव बलवत्तर आहे असे समजून तो त्या असुरांना म्हणाला, "युद्ध केल्याने आपणाला जय कधीही प्राप्त होणार नाही. ह्यास्तव आता आपण युद्ध करू नये हेच बरे."
ह्यावर बलामुळे गर्विष्ठ झालेले ते दानव जयाविषयी खात्री बाळगून म्हणाले, "हे प्रल्हादा, संग्राम हा केलाच पाहिजे. दैव काय आहे हे आम्ही जाणीत नाही. हे असुराधिपते, निरुद्योगी पुरुषांना दैव श्रेष्ठ होय. आम्हासारख्या उद्योगी पुरुषांचा दैवावर कधीही विश्वास बसायचा नाही. हे दैव कोणी व कुठे अवलोकन केले आहे ? हे कशा प्रकारचे आहे ? त्याला निर्माण तरी कोणी केले आहे ? हे दैत्यश्रेष्ठा, सांप्रत बलाचे अवलंबन करून आपण युद्धच करू. हे महामते, तू सर्वज्ञ आहेस, ह्यास्तव तू आमचा पुढारी हो व युद्धास तयार हो."
ह्याप्रमाणे असुरांनी सांगितले असता प्रबल शत्रूंचा नाश करणार्या त्या प्रल्हादाने दैत्यांच्या इच्छेकरता सेनाधिपती होऊन युद्धाकरता देवांना आव्हान केले. ते सर्व देवही रणामध्ये आलेल्य्या त्या असुरांना अवलोकन करताक्षणीच तयारी करून त्यांच्याशी युद्ध करू लागले. तेव्हा त्या ठिकाणी इंद्र व प्रल्हाद ह्यांचा मुनींनाही विस्मयचकित करणारा असा घोर संग्राम पूर्ण शंभर वर्षे झाला.
ते महायुद्ध झाले असता त्या युद्धात शुक्राने रक्षण केल्यामुळे प्रल्हादप्रभृति दैत्यांनाच जय प्राप्त झाला. त्याचवेळी गुरूच्या सांगण्यावरून सर्वदुःख नाशक, मुक्तिदायक आणि उत्कृष्ट अशी कल्याणरूप जी देवी तिचे इंद्राने मनामध्ये स्मरण केले.
इंद्र म्हणाला, "हे देवी, हे महामाये, हे शूलधारिणी, हे अंबिके, हे अभयप्रदे, हे शंख, चक्र, गदापद्म व खड्गधारिणी देवी, तुझा जयजयकार असो. हे भुवनेश्वरी, तुला नमस्कार असो. शक्तिदर्शनातील प्रतिपाद्य देवता तूच असून, हे माते, महाबिंदू व दशातत्त्वे ही तुझीच रूपे आहेत. हे सच्चिदानंद स्वरूप देवी, प्राणाग्निहोत्राची देवता तू असून महाकुंडलिनी व दीपशिखा ही तुझीच रूपे आहेत. हे माते, पंचकोशात तू असून पुच्छब्रह्म तूच आहेस आणि सर्व उपनिषदांनी अर्चित अशी आनंदकलिकाही, हे देवी, तूच आहेस.
हे माते, तू कृपा करण्यास उद्युक्त हो, हे जननी, दैत्यांनी पराजित केलेल्या आम्हा दुर्बलांचे तू रक्षण कर. हे देवी, आम्हाला आश्रय देणारी तूच आहेस. जगतामध्ये प्रमाणभूत तूच आहेस. तू संपूर्ण वीर्यांनी संपन्न असल्यामुळे दु:खशमन करण्यास तूच समर्थ आहेस. जे लोक तुझे ध्यान करीत असतात ते अत्यंत सुखी होतात. जे तुझे ध्यान करीत नाहीत ते कधीही शोकापासून व भयापासून मुक्त होत नाहीत. अभिमान व संग सोडून जे मुमुक्षु सज्जन तुझे ध्यान करतात ते संसारसागररूप उदक तरून जातात.
हे देवी, हे जगन्माते, तुझा प्रभाव सर्व जगात प्रसिद्ध आहे. आमच्या संरक्षणाकरता तू प्रकट झाली आहेस. तुझा प्रताप दु:खनाशक आहे. परंतु या सर्व जगताचा संहार करण्याकरता कालरूपही तूच होत असतेस. तेव्हा हे अंबे, कोण बरे मंदबुद्धी पुरुष तुझे चरित्र जाणण्यास समर्थ होईल ? ब्रह्मा, विष्णु महेश्वर, सूर्य, इंद्र, यम, वरूण, अग्नि, वायु, महासमर्थ मुनी आणि निगमागम हेही तुझा अतुल प्रभाव जाणण्यास समर्थ नाहीत.
जे महात्मे तुझ्या भक्तिविषयी तत्पर राहतात तेच धन्य होत आणि तेच सुखसागरामध्ये निमग्र झालेले असून संसारदु:खापासून अलिप्त असतात. परंतु हे उमे, तुझ्या ठिकाणी ज्याचा भक्तिभाव नसतो, ते जन्ममरणरूप लाटांनी युक्त असलेल्या दु:खसागरातून कधीही तरून जात नाहीत. तुझ्या कृपेने शुभ्र चामरांच्या योगाने ज्यांना सेवक वारा घालीत असतात आणि जे पालखीत बसून क्रीडा करीत असतात ते धन्य होत.
खरोखर पूर्वजन्मी नानाप्रकारच्या उपहारांच्या योगाने त्यांनी तुझे पूजन केले असे मला वाटते. उत्कृष्ट गजावर आरूढ झाले असताना ज्यांची प्रशंसा होत असते, स्त्रीसमुदायाचे विलास ज्यांना प्राप्त होतात व नम्र झालेल्या मांडलिक राजासह जे गमन करीत असतात, त्यांनी खरोखर पूर्वजन्मी तुझे पूजन केले आहे असे मी समजतो.
ह्याप्रमाणे इंद्राने स्तुती केली असता ती विश्वेश्वरी चतुर्भुज देवी सिंहारूढ होऊन वेगाने तिथे प्रकट झाली. तिचे नेत्र मनोहर असून शंख, चक्र, गदा व पद्म ही आयुधे आणि रक्तवस्त्र तिने धारण केले होते आणि दिव्य पुष्पे व भुषणे तिने घातली होती. प्रसन्न मुख करून ती देवी दयार्द्र वाणीने त्या देवांना म्हणाली, "हे देवहो, तुम्ही भय सोडा. मी खरोखर आता तुमचे कल्याण करते."
असे म्हणून सिंहारूढ झालेली ती सुंदरी देवी जिकडे ते मत्त दैत्य होते तिकडे वेगाने गेली. तेव्हा पुढे आलेल्या त्या देवीला अवलोकन करता क्षणीच प्रल्हाद वगैरे सर्व दैत्य भयभीत होऊन परस्परांना म्हणाले, "आता काय करावे ? खरोखर ही चंडिका देव व नारायण ह्यांना साहाय्य करण्याकरता तेथे प्राप्त झाली आहे. महिषासुराचा नाश करणारी हीच असून चंडमुंडांचा घात करणारी हीच होय. ज्याप्रमाणे हिने पूर्वी वक्र दृष्टीने मधुकैटभांचा वध केला त्याप्रमाणे ही अंतिका आम्हा सर्वांचा आता वध करील यात संशय नाही. यातून आपण कसे सुटावे ?"
ह्याप्रमाणे चिंताक्रांत झालेल्या दैत्यांना अवलोकन करून प्रल्हाद त्यांना म्हणाला, "हे दानव श्रेष्ठहो, आता युद्धच केले पाहिजे, पळून जाणे योग्य नव्हे." ह्यावरही काही पलायन करू लागले. मग त्या असुरांना नमुची म्हणाला, "ही जगन्माता क्रुद्ध झाल्यास खरोखर त्या आयुधांच्या योगाने आपला वध करील. ह्यास्तव हे महाराज, दुःख न होईल असा काही तरी उपाय योजा, नाही तर तिचे स्तवन करून तिच्या अनुज्ञेने आजच आपण पातालामध्ये जाऊ."
प्रल्हाद म्हणाला, "हे दैत्यहो, ह्या महामाया, उत्पत्ति, स्थिति व लय करणारी, सर्वांची जननी आणि भक्तांना अभय देणारी जी शक्तिरूप देवी तिचे मी स्तवन करतो."
असे बोलून रहस्यवेत्त्या विष्णूभक्त प्रल्हादाने हात जोडले आणि त्या जगद्धात्रीचे त्याने स्तवन केले.
तो म्हणाला, "जिच्या ठिकाणी सर्व चराचर जगत् रज्जूप्रमाणे भासत आहे त्या सर्वाधिष्ठानरूप र्हींमूर्तीला नमस्कार असो. हे सर्व चराचर विश्व तुझ्यापासून निर्माण झालेले असून सर्व तू निर्माण केलेले आहेस. कर्ते निमित्तमात्र होते. हे देवी, हे महामाये, तुला नमस्कार असो. तू जर सर्वांची जननी आहेस तर स्वत:च उत्पन्न केलेल्या दैवदैत्यांसंबंधाने तुझ्या ठिकाणी भेदभाव तो काय असणार ? आमच्या संबंधात देवासंबंधात तुझी भेदबुद्धी नसावी. तू द्वैतभाव धरू नकोस.
हे माते, देव जसे तुझे पुत्र होत तसे दानवही तुझे पुत्र होत. कारण पुराणामध्ये तुला विश्वजननी म्हणून म्हटले आहे. खरोखर ते देवही स्वार्थाविषयी तत्पर असून आम्हीही तसेच आहो. देवदैत्यांमध्ये भेद नसून हा भासणारा भेद मोहमूलक आहे. हे देवेश्वरी, आम्हाप्रमाणे देवही द्रव्य, स्त्री इत्यादिकांचा उपभोग घेण्याविषयी रात्रंदिवस आसक्त होऊन राहिलेले असतात. देवदैत्यांमध्ये भेद तो कोणता ?
तेही कश्यपाचे पुत्र असून आम्हीही त्याच्यापासूनच उत्पन्न झालो आहो. मग हे माते, तुझे ठिकाणी आम्हा उभयतांसंबंधाने सांप्रत विरोधबुद्धी खरोखर का बरे उत्पन्न झाली आहे ? हे माते सर्वकारणरूप जी तू, त्या तुझ्या ठिकाणी विरोधकर्तृत्व असल्याचे शास्त्रांत सांगितलेले नाही. देवासंबंधाने व आम्हासंबंधाने तुला नेहमी समदृष्टीच ठेवली पाहिजे. तू आम्हाला सारखेच मान.
गुणांच्या मिश्रणामुळे सर्व देव दैत्य उत्पन्न झाले आहेत. गुणयुक्त जे देहधारी देव ते अमर का बरे व्हावेत ? काम, क्रोध व लोभ हे सर्व देहामध्ये सर्वदा वास्तव्य करीत असतात. कोण बरे पुरुष भेदबुद्धिरहित होईल ? आम्हामध्ये भेद उत्पन्न होऊन तुला युद्ध पाहण्यास सापडावे. एतदर्थ कौतुकाने तू हा परस्परविरोध उत्पन्न केला आहेस असे वाटते. हे निष्पापे, हे चामुंडे, कलह अवलोकन करण्याची जर तुझी इच्छा नसती तर आम्हा भ्रात्यांमध्ये खरोखर विरोध उत्पन्न झाला नसता हे मी जाणून आहे. हे देवी, आम्हामध्ये भोगाकरता सर्वदा कलह होत असतो.
हे अंबिके, संसारात एका तुझ्याशिवाय शास्ता असा कोणीही नाही. विषयलोलुप पुरुषाची आज्ञा मान्य करण्यास कोण बरे समंजस पुरुष तयार होणार आहे ?
देवदैत्यांनी करार करून त्या सागराचे मंथन केले. परंतु अमृतरूप रत्न हरण करण्याकरता कपट करून विष्णूने विरोध उत्पन्न केला. परंतु तू ह्या विष्णूला जगद्गुरू कल्पून जगदरक्षणाकडे ह्याची योजना केलेली आहेस. समुद्रमंथनकाली केवळ लोभाने सुरसुंदरी लक्ष्मी त्याने स्वत: घेतली. त्याचप्रमाणे इच्छा तृप्त करणारा पारिजात वृक्ष व उच्चैःश्रवा अश्व ही रत्ने इंद्राने हरण केली.
विष्णूच्या इच्छेने देवांनी सर्व काही ग्रहण केले. अशा प्रकारचा अन्याय करूनही देव साधू झाले. हे धर्मलक्षण तू अवलोकन कर. देव खरोखर अन्यायी आहेत. असे असून त्यांचा फारच अभिमान बाळगणार्या विष्णूने देवांची स्वस्थानाचे ठिकाणी स्थापना केली आणि दैत्यांचा पराभव झाला. हे अधर्माने वागण्याचे फल तू अवलोकन कर.
धर्म आहे कोठे ? कशा प्रकारचा आहे ? व कर्तव्य कोठे आहे ? अहो, हे कर्म कोणीकडे आणि साधुत्व कोणीकडे ? परंतु हे सांगावे कोणासमोर ? ईश्वर नाही असे जे मत आहे तेच खरे सिद्ध आहे. युक्तिवाद जाणणारे तार्किक आणि विधिज्ञ वैदिक म्हणून जे प्रसिद्ध आहेत ते मूढमति असल्यामुळे या विश्वाला कर्ता आहे असे म्हणतात. या विस्तीर्ण संसारामध्ये खरोखर जर कोणी कर्ता असेल तर एका कार्यासंबंधाने परस्परविरोध का असावा ? वेदामध्ये व शास्त्रामध्ये एकवाक्यता नसून त्या वेदवेत्त्यामध्येही एकवाक्यता नाही. सर्व चराचर जगत् स्वार्थाविषयी तत्पर असल्यामुळे संसारामध्ये कोणीही निःस्पृह झाला नाही व होणार नाही.
धर्मसिद्धांत जाणणार्या इंद्राने गौतमाची आणि चंद्राने गुरूची भार्या समजून उमजून बलात्काराने हरण केली. गुरूने कनिष्ठ भ्रात्याची भार्या गर्भिणी असताना बलात्काराने तिचा उपभोग घेतला आणि गर्भाशयात असलेल्या बालकाला शाप देऊन अंध केले. हे अंबिके, सत्त्वशील विष्णूने राहूचे शिर त्याचा अपराध नसतांना चक्राच्या योगाने स्वेच्छेने व दांडगाईने तोडले. माझा नातू धर्मनिष्ठामध्ये श्रेष्ठ, सत्यव्रतपरायण, यथाविधी याग करणारा दानशूर, शांत सर्वज्ञ व सर्वमान्य असताना, कपट करणार्या हरीने वामनरूप धारण करून त्या बलीला फसवले आणि खरोखरच त्याचे सर्व राज्य हरण केले.
विचारी लोक देवांनाच धर्मनिष्ठ म्हणत आहेत आणि विजयी झाल्यामुळे ते देवही धर्मासंबंधाने मनोवेधक असत्य बोलत आहेत. तेव्हा हे जगन्माते, हे लक्षात आणून तू इच्छेस येईल तसे कर. सर्व दानव तुला शरण आले आहेत, मग त्यांना मार अथवा तार."
प्रल्हादाचे योग्य भाषण ऐकून श्रीदेवी म्हणाली, "हे दानवहो, तुम्ही सर्व पातालामध्ये जा. तेथे निर्भय व क्रोधरहित होऊन यथेष्ट वास्तव्य करा. काही वेळा तुम्हाला कालाची प्रतीक्षा केली पाहिजे. कारण तो काळच कल्याणाचे व अकल्याणाचे कारण आहे. अत्यंत वैराग्यतत्परांना कोणत्याही ठिकाणी सर्वदा सुखच होत असते. पण ज्यांचे अंत:करण लोभाविष्ट झालेले असेल त्यांना त्रैलोक्याचे राज्य प्राप्त होऊनही सुखी होत नाही. फार कशाला ? कृतयुगामध्येही कामी जनांना प्राप्त झालेल्या फलांच्या योगाने पूर्ण सुख झालेले नाही. ह्या पृथ्वीचा त्याग करून सर्व दानवांनी आज माझ्या आज्ञेप्रमाणे पातालामध्ये जावे आणि मनामध्ये काही एक पाप त्यांनी धरू नये."
ते देवीचे भाषण श्रवण केल्यानंतर ते सर्व दानव 'ठीक आहे' असे म्हणून व त्या देवीला प्रणाम करून रसातलाला गेले. तेव्हा देवी गुप्त झाली. देवही आपापल्या घरी गेले आणि ते सर्व देवदानव वैरबुद्धी सोडून राहू लागले.
देवदानवासंबंधीची ही कथा जो श्रवण करतो त्याला मुक्ती मिळते. त्याच्या दु:खांचा नाश होतो.