[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]
जनमेजय राजा म्हणाला, "कपटाने दैत्यांचे गुरुत्व स्वीकारून शुक्ररूपाने राहणार्या बुद्धिमान बृहस्पतीने नंतर काय केले ? सर्व विद्यांचा निधी, देवांचा अक्षय्य गुरु आणि अंगिरामुनीचा पुत्र जो बृहस्पती त्याने कपट कसे केले ? सर्व धर्मशास्त्रांमध्ये सत्य हेच धर्माचे मूळ असून त्याच्याच योगाने परमात्म्याची प्राप्ती होते असे मुनींनी सांगितले आहे. देवगुरुच जर याप्रमाणे दानवांशी कपटाने वागून मिथ्या भाषण करू लागला तर संसारामध्ये सत्यवक्ता गृहस्थाश्रमी कोण बरे संभवनीय आहे ? हे मुने, ब्रह्मांडाचे ऐश्वर्य जरी प्राप्त झाले तरी आहारापेक्षा अधिक अन्न कोणीही भक्षण करीत नाही. परंतु त्याच्याकरता मुनीसुद्धा का बरे कपट करण्यास प्रवृत्त होतात ? शिष्टांचाच जर अभाव आहे तर शब्दप्रामाण्याचा उच्छेदच झाला नाही काय ?
त्याचप्रमाणे छलकर्माच्या ठिकाणी प्रवृत्ती झाली असता गुरूला तरी निंदास्पद कसे नाही ? देव सत्त्वगुणापासून, मनुष्य रजोगुणापासून व तिर्यग्योनीतील प्राणी तमोगुणापासून उत्पन्न झाले आहेत. प्रत्यक्ष देवगुरुच जर स्वत: असत्य भाषण करणारा झाला तर रजोगुणापासून अथवा तमोगुणापासून उत्पन्न झालेले प्राणी कसे बरे सत्यवक्ते असणार ?
त्या बृहस्पतीच्या धर्माचे स्वरूप तरी कोणते ? त्रैलोक्यच जर असत्य झाले तर सर्व प्राण्यांची गती तरी काय होईल ? माझ्या मनात मोठा संशय निर्माण झाला आहे. विष्णु, ब्रह्मदेव, इंद्र आणि इतरही सर्व सुरश्रेष्ठ जर कपट करण्याविषयी प्रवृत्त आहेत तर इतर मनुष्यांची कथा काय ? सर्वही तपोधन मुनी व देव काम व क्रोध ह्यांच्या योगाने संतप्त झालेले असून त्याचे अंतःकरण लोभाने ग्रस्त झाल्यामुळे कपटाविषयी दक्ष आहेत. वसिष्ठ, वामदेव, विश्वामित्र व बृहस्पती हे जर पापकर्माविषयी रत आहेत तर हे मान्य. मुने, या त्रैलोक्यामध्ये धर्माची गती काय ?
हे मुने, इंद्र, अग्नी, चंद्रमा व ब्रह्मदेव हेच जर परस्त्रीविषयी लंपट आहेत तर ह्या जगामध्ये साधुत्व कोठे शिल्लक आहे हे तरी एकदा आपण कथन करा. हे निष्पाप मुने, सर्व देव आणि मुनी जर लोभग्रस्त झालेले आहेत तर कोणाच्या बरे वचनाला मान द्यावा ? कोणाचा उपदेश घ्यावा ?"
व्यास म्हणाले, "विष्णु, शिव, ब्रह्मदेव, इंद्र किंवा बृहस्पती तरी काय जो म्हणून देहधारी आहे, तो विकारांनी युक्तच असतो. ब्रह्मा, विष्णु व महेश्वर हे सर्वही रागीटच आहेत. हे प्रजाधिपते, रागीट पुरुष कोणते बरे अकार्य करणार नाही ? रागीट पुरुषही धूर्तपणामुळे देहाविषयी विरक्त असल्यासारखा भासतो, परंतु संकट प्राप्त झाले असता त्यालाही खरोखर गुणांची बाधा होतच असते. कारणाशिवाय कार्य होईल कसे ?
ब्रह्मादि सर्व देवांचेही कारण गुणच होत. त्यांचे देह दुसर्या कशानेही उत्पन्न झालेले नसून पंचवीस तत्त्वांच्याच योगाने उत्पन्न झालेले आहेत. योग्यकाली त्यांनाही मरण येतच असते. ह्याविषयी हे राजा, संदेह मानू नकोस.
दुसर्याला स्पष्टपणे उपदेश करण्याविषयी सर्वच शिष्ट असतात, परंतु स्वतःवर प्रसंग आला म्हणजे मात्र सर्वच शिष्टत्वापासून च्युत होतात. काम, क्रोध, लोभ, द्रोह, अहंकार व मत्सर हे दोष आहेत. परंतु ह्यांचा त्याग करण्यास कोण बरे देहधारी प्राणी समर्थ आहे ?
हे महाराज, हा संसार सर्वदा असाच असतो. ह्याशिवाय दुसर्या प्रकाराने हा शुभाशुभमय संसार खरोखर संभवनीयच नाही. भगवान विष्णूसुद्धा कधी कधी उग्र तप करीत असतो. तो सुराधिपती कधी कधी तर लक्ष्मीच्या क्रीडेमध्ये दंग होऊन असतो. कधी तो तरुण प्रभु तिच्या अधीन होऊन खरोखर वैकुंठामध्ये रममाण होत असतो. तो दयासागर दानवांच्या बाणांनी अतिशय पीडित झाला असता कधी कधी त्यांच्याशी भयंकर युद्ध करीत असतो. दैवामुळे कधी तो विजयी होत असतो व कधी पराजितही होत असतो. हा भगवानसुद्धा निःसंशय सुखदु:खांनी ग्रस्त होत असतो.
योगनिद्रेने युक्त होऊन कधी कधी हा शेषावर शयन करीत असतो. स्वभावतःच निद्रेचा त्याग केलेला हा जगदात्मा योग्य वेळी जागृतही होतो. महेश्वर, ब्रह्मा, विष्णु, इंद्र वगैरे देव आणि मुनी आपल्या पूर्व संचिताच्या व आयुष्याच्या मर्यादेला अनुसरूनच संचार करीत असतात. रात्र पडली असता हे सर्व चराचर जगत कोठेतरी निःसंशय गाढ निद्रेत असते. आपल्या आयुष्याच्या अंती ब्रह्मप्रभृती देवही आपल्या नाशाची इच्छा करीत असतात. पुनरपी विष्णु, शिव वगैरे देव प्रगटही होत असतात. तस्मात् हे राजा, देहधारी प्राण्याला कामादि दोष प्राप्त होतच असतात ह्याविषयी तुला आश्चर्य वाटण्याचे कारण नाही.
हे भूपते, कामक्रोधादिकांनी हा संसार लिप्त झालेला आहे आणि म्हणूनच त्यापासून अलिप्त असलेला परमार्थवेत्ता पुरुष सापडणे दुर्लभच आहे. जो या संसाराला भीत असतो तो दारापरिग्रह करीतच नाही.
त्यामुळेच सर्वसंगापासून मुक्त होऊन निर्भयपणे तो संचार करू लागतो.
प्राणिमात्र गुणत्रयाने बद्ध असल्यामुळेच चंद्राने गुरुभार्येचा उपभोग घेतला व गुरूही कनिष्ठ भ्रात्याच्या भार्येशी रममाण झाला. रागलोभादिकांनी या संसारचक्रामध्ये ग्रस्त झालेला पुरुष गृहस्थाश्रमाचे अवलंबन करून कसा बरे मुक्त होईल ? तस्मात्, सर्व प्रयत्नाने संसारातील आस्थेचा त्याग करून सच्चिदानंदस्वरूप महादेवीची आराधना करावी. तिचेच पूजन करावे.
हे राजा, तिच्या मायागुणांनी हे सर्व चराचर जगत् व्याप्त झाल्यामुळे मदिरेने बेशुद्ध झालेल्या उन्मत्त पुरुषाप्रमाणे भ्रमण करीत असते. ह्यास्तव तिच्याच आराधनाने त्या गुणांचा नाश करून विचारी पुरुषाने मुक्तीचे अवलंबन करावे. ह्याशिवाय मुक्तीला दुसरा मार्ग नाही. पूजा प्राप्त होऊन महादेवीने जोपर्यंत कृपा केली नाही तोपर्यंत मनुष्याला सुख कोठून होणार ? कारण भगवतीसारखा दयेने युक्त असा दुसरा आहे तरी कोण ? जिच्या आराधनेमुळे जीवनमुक्ती प्राप्त होते त्या दयासागर देवाचेच निष्कपटपणाने पूजन करावे.
दुर्लभ मनुष्यजन्म प्राप्त झाल्यावरही ज्यांच्या हातून महेश्वरीची सेवा झाली नाही ते जिन्याच्या वरच्या पायरीपासून खालच्या पायरीपर्यंत घसरत अधोगतीला गेले आहेत असे मी समजतो. अहंकाराने हे विश्व व्याप्त झाले असून तीन गुणांनी व्यापलेले असल्यामुळे असल्याने बद्ध आहे. तेव्हा महादेवीच्या सेवेशिवाय दुसर्या मार्गाने प्राणी मुक्त कसा होईल ? म्हणून सर्व काही सोडून देऊन सर्वांनी भुवनेश्वरीचीच आराधना करावी."
जनमेजय राजा म्हणाला, "हे पितामह, शुक्ररूप धारण केल्यानंतर गुरुने दैत्याकडे जाऊन काय केले ? शुक्र केव्हा परत आले हे आपण मला कथन करा."
व्यास म्हणाले, "हे राजा, शुक्ररूप धारण करून गुप्तपणाने दैत्यांमध्ये राहून त्या महात्म्या गुरूने पुढे काय केले हे मी आता तुला सांगतो, तू श्रवण कर. गुरू दैत्यांना उपदेश करू लागला. तेही हा आपला गुरु शुक्रच आहे असे समजू लागले. त्याच्यावर अतिशय विश्वास ठेवून ते त्याच्या शुश्रूषेमध्ये तत्पर झाले. अतिशय मोहग्रस्त झालेले ते दानव हा शुक्रच आहे असे समजून विद्येकरता त्या बृहस्पतीलाच शरण गेले. गुरुनेही त्यांना फसवले. कारण लोभामुळे कोणाला बरे मोह होत नाही ?
दशवर्षात्मक काल पूर्ण होऊन जयंतीला दिलेले वचन परिपूर्ण होण्याचा समय आला असता जयंतीसह क्रीडा करीत असलेल्या त्या शुक्राला आपल्या यजमानांचे स्मरण झाले. शुक्राला वाटले, माझे यजमान खरोखर माझी मार्गप्रतीक्षा करीत बसले असतील. म्हणून त्या माझ्या यजमानांकडे जाऊन मी त्यांची भेट घेतो म्हणजे त्या माझ्या भक्तांना देवापासून भय प्राप्त होणार नाही. असे मनात आणून शुक्र जयंतीला म्हणाला, "हे चारुनयने, आज तुझा दशवार्षिक काल संपूर्ण झाला आहे. तस्मात् हे देवी, मी माझ्या यजमानांना भेटण्याकरता जातो. हे सुंदरी, मी पुनरपि सत्वर तुझ्या समीप येईन."
ह्यावर पतिव्रता धर्म जाणणारी ती जयंती त्याला म्हणाली, "ठीक आहे. हे धर्मज्ञ, आपण यथेष्ट गमन करावे. मी आपल्या विचाराबाहेर नाही."
ते तिचे भाषण ऐकल्यावर शुक्र तेथून सत्वर निघाला. तो तेथे दानवासमीप बृहस्पती सौम्य वेष धारण करून यज्ञाची ज्यात निंदा आहे अशा स्वकृत जैन धर्माचा कपटाने त्यांना उपदेश करीत आहे असे त्याच्या दृष्टीस पडले. तेथे बृहस्पती तेव्हा दैत्यांना असे सांगत होते की, "हे दैत्यहो, हे असुर हो, मी खरोखरच तुमच्या हिताची गोष्ट सांगत आहे. अहिंसा हाच श्रेष्ठ धर्म होय. आततायी प्राण्यांचाही वध करणे योग्य नव्हे. विषयलंपट व जिव्हेंद्रिय तृप्त करण्यास सोकावलेल्या द्विजांनी जरी वेदामध्ये हिंसा दर्शविली आहे तरी हिंसा न करणे हेच श्रेष्ठ व्रत होय."
अशा प्रकारची कल्पित वेदशास्त्रविषयक वाक्ये गुरु कथन करीत असल्याचे ऐकून भृगुपुत्र शुक्र विस्मयचकित झाला. तो मनामध्ये म्हणाला, "खरोखर हा गुरु माझ्या द्वेषासच पात्र आहे. अरे, ह्या धूर्ताने निःसंशय माझ्या यजमानांना फसवले आहे. पापरूप लोभाने प्रेरित झाल्यामुळे गुरूही असत्य भाषण करू लागला ! तेव्हा ह्या पापाचे बीज व नरकाचे महाद्वार असलेल्या हा लोभाचा धिक्कार असो. ज्याचे वचन प्रमाण मानतात व जो सर्व देवांचा गुरु अशा धर्मशास्त्राच्या प्रवर्तकाने सुद्धा पाखंडाचे अवलंबन केले ! अहो, हा देवगुरुसुद्धा पाखंडपंडित झाला आहे तर लोभामुळे अंतःकरण दूषित झालेला इतर पुरुष काय बरे पातक करणार नाही ? कपटयुक्त अशा सर्व काही गोष्टींचा स्वीकार करून हा द्विजोत्तम अतिशय मूढ झालेल्या ह्या दैत्य- यजमानांना फसवीत आहे. हा गुरु खरोखरच कपटाचरणी आहे. सर्वच देव लोभी होऊन कपट करीत आहेत. आता काय बरे करावे ?"