[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]
तो घोर वध अवलोकन करून भगवान शुक्रजनक भृगुऋषी क्रुद्ध झाले. अतिशय दु:खाने व्याकुळ होऊन ते मधुसूदनाला म्हणाले, "हे महाबुद्धिमान विष्णो, जाणून बुजून तू हे अयोग्य असे पापकृत्य केले आहेस. अरे, ब्राह्मणापासून उत्पन्न झालेल्या स्त्रीचा वध करणे योग्य नाही. तू सत्त्वगुणी, ब्रह्मा रजोगुणी व शंकर तमोगुणी म्हणून सर्वत्र प्रसिद्ध असताना तू हे विपरीत कसे केलेस ? तू तामसी कसा झालास ? अतिनिंद्य कार्य तू केले आहेस. हे विष्णो, स्त्री अवध्य असताना तू माझ्या निरपराधी भार्येचा वध का केलास ? म्हणून आता दुराचार करणार्या तुला मी शाप देतो. माझ्या हातून तुझे पारिपत्य कसे होणार ? हे पाप्या, इंद्राकरता तू मला विधुर केले आहेस.
हे मधुसूदना, आता मी तुलाच शाप देतो, इंद्राला देणार नाही. कारण तूच मनाने दुष्ट असून कृष्णसर्पाप्रमाणे सर्वदा कपट करण्यात तत्पर असतोस. जे मुनी तुला सात्विक म्हणतात ते खरोखर मूर्ख आहेत. कारण तू आताच माझ्यासमक्ष दुराचारी व तामसी ठरला आहेस. हे जनार्दना, माझ्या शापामुळे मृत्युलोकी तुझे अवतार होतील व केलेल्या ह्या पापामुळे तुला प्रत्येक अवतारास गर्भवासजन्य दु:ख भोगावे लागेल."
त्यानंतर जेव्हा जेव्हा धर्माचा र्हास होऊ लागला तेव्हा तेव्हा त्या शापाच्या योगाने विष्णु लोककल्याणाकरता मनुष्ययोनीमध्ये वारंवार जन्म घेऊ लागले.
जनमेजय म्हणाला, "हे मुनिश्रेष्ठा अतुल तेजस्वी अशा चक्राच्या योगाने जेव्हा भृगुभार्येचा वध झाला तेव्हा त्या महात्म्या भृगूला पुनरपी गृहस्थाश्रम कसा प्राप्त झाला हे मला सांगा."
व्यास म्हणाले, "ह्याप्रमाणे क्रोधाने हरीला शाप देऊन भृगूने पत्नीचे शिर सत्वर हातात घेतले आणि झटपट धडाला लावून तो कार्यवेत्ता भृगू म्हणाला, "हे देवी, विष्णूने मारलेल्या तुला मी आज जिवंत करतो. जर मला संपूर्ण धर्माचे ज्ञान असेल, जर मी संपूर्ण धर्माचे यथायोग्य आचरण केले असेल आणि जर मी सत्य बोलत असेल तर त्या सत्याच्या योगाने तू जिवंत होशील ! आज सर्व देवतांनी माझ्या तेजाचे प्रचंड सामर्थ्य अवलोकन करावे. आता शीत उदक तिच्यावर प्रोक्षण करून मी तिला तपोबलाने जिवंत करतो. माझे सत्य, शौच, वेदाध्यायन व तपोबल शुद्ध असल्यास त्यांच्या पुण्यबलाने ती जिवंत होईल."
जलप्रोक्षण झाल्याबरोबर ती सुहास्यवदनाने युक्त असलेली भृगुभार्या तत्क्षणी जिवंत झाली आणि अतिशय संतुष्ट होऊन ती उठून बसली. नंतर निद्रेतून उठल्याप्रमाणे तिला अवलोकन करून 'शाबास ! शाबास !' म्हणून चोहोकडे त्या भृगूची व तिची प्रशंसा करू लागले. ह्याप्रमाणे आपली स्त्री भृगूने जिवंत केली असता ती अवलोकन करून इंद्रादि देवांनादेखील अतिशय आश्चर्य वाटले. नंतर इंद्र देवांना म्हणाला, "भृगुमुनीने जर आपली साध्वी भार्या जिवंत केली आहे. परंतु आता तो शुक्र घोर तपश्चर्या करून मंत्रवेत्ता झाल्यावर काय काय करील कोण जाणे ?"
व्यास म्हणाले, "अशा रीतीने सुरराज इंद्राची निद्रा तर नाहीशी झाली. परंतु हे राजा, त्या भयंकर मंत्रामुळे घडणारा शुक्राच्या प्रतापाचे स्मरण होऊ लागल्यामुळे त्याला आपल्या देहाची सुरक्षितता वाटेनाशी झाली. तेव्हा याला काही तरी उपाय योजावा असा मनामध्ये विचार करून इंद्र आपल्या मनोहर अवयवांनी युक्त असलेल्या जयंती नावाच्या अविवाहित कन्येला हास्यपूर्वक म्हणाला, "हे पुत्रे, मी तुला तपस्वी शुक्राला अर्पण केले आहे. तू तिकडे जा. त्याची शुश्रूषा कर. हे सुंदरी, माझे कार्य होण्याकरता तू त्याला वश करून घे. आता त्या श्रेष्ठ आश्रमामध्ये तू सत्वर जा. मनाला आल्हाद देणार्या नानाप्रकारच्या उपचारांनी तू त्या मुनीची आराधना कर आणि माझे भय नष्ट कर."
पित्याचे भाषण श्रवण करून ती मनोरमा आश्रमात गेली. आश्रमामध्ये तो मुनी धूमपान करीत असलेला त्या जयंतीच्या दृष्टीस पडला. त्याचा देह दृष्टीस पडताक्षणी पित्याच्या आज्ञेचे तिला स्मरण झाले. केळीचे पान घेऊन ती त्या मुनीला वारा घालू लागली.
निर्मल, शांत, सुवासिक व हलके उदक म्हणून परमभक्तीने ती पिण्यास तयार ठेवीत असे. सूर्य मध्यभागी आला असता स्वत: पतिव्रताधर्माने वागणारी ती साध्वी सुंदरी वस्त्ररूप छत्राने त्याच्यावर छाया धरी. भक्षणाकरता विहित अशी मधुर, पक्व व दिव्य फळे ती त्या मुनीपुढे ठेवीत असे. हिरवेगार व म्हणूनच शुक्रासारखे असलेले दर्भ ती तिथे ठेवीत असे. नित्यकर्माकरता ती पुष्पेही पुढे ठेवीत असे, निद्रेकरता पल्लवांनी युक्त अशी शय्या ती तयार ठेवी. योग्य वेळी त्या मुनीला आदराने हळूहळू वारा घालीत असे. मुनीच्या शापाला भीत असल्यामुळे त्या जयंतीने कामविकार उत्पन्न करणारे हावभाव मात्र केले नाहीत.
उत्कृष्ट भाषण करणारी ती सुंदरी अनुकूल व आनंददायक शब्दांनी त्या महात्म्याची नेहमी स्तुती करीत असे. तो जागा झाल्यावर आचमनाकरता उदक घेऊन ती उभी राहात असे. सर्वदा त्याच्या मनाला अनुकूल असेल ते करून ती त्याची शुश्रुषा करीत असे. इंद्रही आतुर होऊन त्या जितेंद्रिय मुनीचा वृत्तांत समजण्याकरता नेहमी आपले सेवक पाठवीत असे.
ह्याप्रमाणे पुष्कळ वर्षेपर्यंत ती साध्वी जयंती निर्विकार व पातिव्रत्याविषयी तत्पर राहून, क्रोध जिंकून, एकसारखी त्याची शुश्रुषा करीत राहिली. अशा रीतीने हजार वर्षे पूर्ण झाल्यावर, मनोहर महेश्वर संतुष्ट व प्रसन्न झाले व शुक्राला वर देण्यास उद्युक्त झाले. ईश्वर म्हणाले, "हे भृगुनंदना, माझ्या कृपेने जे काही जगतामध्ये विद्यमान आहे, जे तुझ्या दृष्टीला गोचर होत आहे आणि जे वाणीला अगोचर आहे तेही सर्व तू निःसंशय मिळवशील. कोणाच्याही हातून तुझा वध होणार नाही. तू प्रजाधिपती होशील व द्विजांमध्ये श्रेष्ठ होशील."
ह्याप्रमाणे वर देऊन शंकर तेथेच गुप्त झाले. नंतर त्या जयंतीला अवलोकन करून शुक्र म्हणाले, "हे सुंदरी, तू कोण आहेस ? कोणाची कन्या आहेस ? तुझा उद्देश काय आहे तो सांग, हे सुंदरी कोणत्या कार्याकरता तू येथे आली आहेस, ते कार्यही मला कथन कर. हे सुलोचने, हे सुव्रते, तुझी काय इच्छा आहे ? तुझे म्हणणे दुर्घट जरी असले तरी सुद्धा ते मी आज शेवटास नेईन. तुझ्या सेवेमुळे मी आज प्रसन्न झालो आहे, तू वर माग."
तेव्हा आनंदित मुद्रेने युक्त झालेली ती जयंती मुनीला म्हणाली, "हे भगवान, माझा उद्देश तपोबलाने ओळखा."
ते ऐकून शुक्र म्हणाले, "तुझा उद्देश मला समजला आहे, पण तुझ्या मनामध्ये जे असेल ते तू स्पष्ट कथन कर. मी शुश्रुषेमुळे तुजवर प्रसन्न झालो आहे. ह्यास्तव तुझे सर्वथा कल्याण करीन."
जयंती म्हणाली, "हे विप्रा, मी इंद्राची कन्या आहे. पित्याने मला तुम्हाला अर्पण केले आहे. हे मुने माझे नाव जयंती आहे. जयंताची मी कनिष्ठ भगिनी आहे. हे प्रभो, आपल्याविषयी माझ्या मनामध्ये कामवासना उत्पन्न झाली आहे. म्हणून सांप्रतपूर्वक धर्माने आपल्याशी रममाण होण्याची माझी इच्छा आहे."
शुक्र म्हणाले, "हे सुंदर स्त्रिये, कोणाच्याही दृष्टीस न पडता हा ठिकाणी ह्या माझ्या आश्रमात राहून माझ्याशी तू स्वेच्छेने दहा वर्षेपर्यंत रममाण हो."
असे सांगून जयंतीचे पाणिग्रहण करण्याकरता तो शुक्र अंतर्गृहामध्ये गेला. तिच्याशी पाणिग्रहण संस्कार केल्यानंतर तो भृगुनंदन दहा वर्षेपर्यंत तिच्यासह गुप्त रीतीने राहिला. मायेने आच्छादित असल्यामुळे तो काव्य मुनी कोणालाही दिसला नाही.
इकडे तो मंत्र संपन्न व कृतार्थ होऊन परत आल्याचे श्रवण करता क्षणीच सर्व दैत्य आनंदित होऊन त्याची भेट घेण्याच्या उद्देशाने त्याच्या आश्रमात गेले. परंतु जयंतीशी संगत होऊन रममाण होणारा शुक्र त्यांच्या दृष्टीस पडला नाही. तेव्हा सर्वही मनामध्ये खिन्न झाले. सर्वांचाही उत्साह भग्न झाला. सर्वही चिंताक्रांत व अतिशय दीन होऊन वारंवार शुक्राला शोधू लागले.
मायेने आच्छादित असलेला तो शुक्र जेव्हा दृष्टीस पडेना तेव्हा ते सर्व दैत्य चिंताक्रांत व भयभीत होऊन आल्या मार्गाने आपापल्या घरी गेले. इकडे शुक्र जयंतीसह रममाण झाला आहे असे समजून त्या महाभाग्यवान बृहस्पती गुरूला इंद्र म्हणाला, "आता पुढे काय करावे ? हे ब्रह्मन्, आपण दानवांकडे जा. मायेने त्यांना मोहित करा. बुद्धिपूर्वक विचार करून आपण आता आमचे एवढे कार्य सिद्धीस न्या."
ते भाषण श्रवण करून शुक्र गुप्त राहून जयंतीशी रममाण झाला आहे असे जाणून गुरूने त्याचेच रूप धारण केले व तो दैत्याकडे गेला. तेथे गेल्यानंतर त्याने अतिशय प्रेमाने दानवांना आवाहन केले. तेव्हा ते सर्व दानव तेथे आले. समोरच शुक्र त्यांच्या दृष्टीस पडला. अतिशय मोह उत्पन्न झाल्यामुळे तो शुक्रच आहे असे समजून ते सर्व दैत्य प्रणाम करून तेथे उभे राहिले. तेव्हा तो प्रत्यक्ष शुक्रच आहे असा प्रत्यय करून देणारी ती गुरूची माया त्यांना समजली नाही. नंतर प्रच्छान् मायेने शुक्राचे रूप धारण केलेले गुरु त्यांना म्हणाले, "माझ्या यजमानांचे स्वागत असो. मी तुमच्या हिताकरता आज येथे आलो आहे. निष्कपटाने प्राप्त झालेली विद्या मी तुम्हाला कथन करीत तुमचे कल्याण व्हावे म्हणून मी शंकराला तपश्चर्येने संतुष्ट केले आहे."
हे ऐकून त्या श्रेष्ठ दानवांचे मन सुप्रसन्न झाले. आपला गुरु शुक्र कृतकृत्य झाला असे समजून मोहित झालेले ते दानव हर्ष मानू लागले. ते रोगरहित व दु:खरहित झाले. त्यांनी आनंदित होऊन शुक्राचार्यांना प्रणाम केला. देवांनीही भय सोडून देऊन ते सर्वही निश्चिंत झाले.