संजीवनी मंत्र प्राप्तीसाठी शुक्राचार्यांची तपश्चर्या -
[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]
सर्व देव दैत्यांना तेथेच सोडून निघून गेले. तेव्हा भृगु सर्व दैत्यांना उद्देशून म्हणाला, "हे दानवश्रेष्ठांनो, मी आता जे सांगत आहे ते ब्रह्मदेवाने पूर्वीच सांगून ठेवले आहे, ते तुम्ही श्रवण करा. सज्जनांचे दु:ख हरण करण्याकरता तो जनार्दन विष्णु दैत्यांचा वध करील. पूर्वी वराह रूप धारण करून त्याने पृथ्वीचा उद्धार करण्यासाठी हिरण्याक्षाचा वध केला.
नंतर त्याने नृसिंहरूप धारण केले तेव्हा त्याने हिरण्यकशिपूचा वध केला. तो धैर्यशील आणि सामर्थ्यसंपन्न विष्णु आताही दैत्यांचा वध करील. हे माझे भाषण वृथा होणार नाही.
जोवर मी तुमचे रक्षण करीत होतो तोवर तुम्ही सर्व देवांनाही जिंकण्यास समर्थ होता. पण आतामात्र त्या श्रीहरीप्रमाणे मला मंत्रसिद्धी पूर्ववत नाही, म्हणून हे दानवांनो, तुम्ही आता काही काळ वाट पहात रहा. मंत्र प्राप्त व्हावेत म्हणून मी आता सत्वर त्या देवेश्वर महादेवाकडे जातो. मंत्र प्राप्त झाल्यावर मी त्वरित परत येईन."
भृगूचे ते भाषण ऐकून दैत्य दीन झाले. ते सर्व नप्रपणाने त्यांना म्हणाले, "हे मुनीश्रेष्ठ, सांप्रत आम्ही तर पराभूत झालो आहोत. असे असताना आम्ही आता या पृथ्वीवर रहाण्यास कसे बरे समर्थ होऊ ? आता आपल्या म्हणण्याप्रमाणे काही काल आम्ही कसेतरी राहून वाट पाहू. कारण बहुतेक सर्व बलाढय दानवांचा आता वधच झाला आहे. जे थोडे शिल्लक आहेत ते सांप्रत दु:खी आहेत. त्यामुळे ते युद्धात टिकाव धरू शकणार नाहीत, तेव्हा काय करावे ?"
दानवांचे हे सत्य बोलणे ऐकून ते मुनीश्रेष्ठ शुक्राचार्य म्हणाले, "मी सत्वर जाऊन शंकराकडून मंत्र प्राप्त करून घेतो. तोपर्यंत तुम्ही तप आणि शम यांचे अवलंबन करा. साम, दान, समयोचित उपाय संकटप्रसंगी करून पहावेत असे विद्वान लोक सांगतात. तेव्हा ते उपाय योजून देश, काळ, सैन्य शक्तिसामर्थ्य लक्षात आणून समंजस वीरांनी योजना करावी. आपले कल्याण व्हावे म्हणून वेळ आलीच तर प्रत्यक्ष शत्रूचीही सेवा करावी. पण पुन: स्वतःला सामर्थ्य प्राप्त झाल्यावर मात्र विचारवंत पुरुषांनी शत्रूचा वधच करावा.
तेव्हा हे दैत्यश्रेष्ठांनो, सांप्रत तुम्ही कपटाचे आचारण करून सामपूर्वक विनम्र राहून मी परत येण्याची वाट पहात येथेच स्वस्थ रहा.
हे दानवांनो, महादेवापासून मंत्र प्राप्त करून घेऊन मी सत्त्वर परत येईन. मंत्राच्या सामर्थ्याचा उपयोग करून देवांशी दारुण युद्ध करीन."
असे आश्वासन देऊन ते मुनिश्रेष्ठ शुक्र मंत्रप्राप्तीसाठी महादेवाची आराधना व तपश्चर्या करण्यास सत्वर निघून गेले. तेव्हा त्या सत्यव्रत, व्यवहारदक्ष व देवांच्या विश्वासास पात्र असलेल्या प्रल्हादाला सर्व दानवांनी देवांकडे पाठवले. सर्व असूरांसह तो दैत्यराज प्रल्हाद देवांना नमस्कार करून विनंतीच्या स्वरात म्हणाला, "हे देवांनो, सांप्रत आम्ही शस्त्रत्याग केला आहे. तसेच युद्धाचा विचारही सोडून दिला आहे. आम्ही सर्वजण आता वल्कले धारण करणार आहोत आणि तपश्चर्येस सुरुवात करणार आहोत."
प्रल्हादाच्या बोलण्यावर विश्वास ठेवून देव युद्धापासून निवृत्त झाले. सर्व देव आनंदित होऊन विश्वासाने आपापल्या स्थानी परत गेले. कारण दैत्यांनी आपली शस्त्रे ठेवून दिली होती. म्हणून विश्वास ठेवून ते सर्व देव पुनः क्रीडा करण्यात मग्न झाले.
सर्व दैत्य दांभिकपणे कश्यप मुनींच्या आश्रमात येऊन राहिले. त्यांनी तपश्चर्येचे ढोंग केले. शुक्राचार्यांची वाट पहात ते तेथेच कालक्रमणा करू लागले.
नंतर शुक्राचार्याने कैलासपर्वतावर जाऊन महादेवाला प्रणाम केला. "तुझे काय काम आहे,"असे प्रभूने विचारले असता समर्थ शुक्राचार्य त्याला म्हणाले, "देवांचा पराजय व असुरांचा जय होण्याकरता बृहस्पतीजवळ नसलेले मंत्र आपल्यापासूनच प्राप्त करून घेण्याची माझी इच्छा आहे."
हे त्याचे भाषण श्रवण करून कल्याणरूप सर्वज्ञ असे शंकर मनात म्हणाले, "आता काय करावे ? देवांविषयी द्रोहबुद्धी धारण करून त्या दैत्यांचा विजय व्हावा म्हणून शुक्राचार्य मंत्रप्राप्ती करून घेण्याकरता येथे आला आहे. परंतु काही झाले तरी देवांचे रक्षण मला केलेच पाहिजे." असा विचार करून त्या कल्याणकर्त्या महेश्वराने दुर्घट व अतिशय उग्र असे व्रत त्याला सांगितले. भगवान शंकर म्हणाले, "सहस्रवर्षे पूर्ण होईपर्यंत जर तू अधोमुख होऊन कणधूम सेवन करशील, तर तुझे कल्याण होईल. व तुला मंत्रही प्राप्त होतील." असे महेश्वराने सांगितले असता त्या महेश्वराला प्रणाम करून शुक्राचार्य म्हणाले, "हे देवा, हे सुरेश्वरा, आपल्या आज्ञेप्रमाणे मी व्रत करीन."
असे शंकराला सांगून शुक्राचार्यांनी उत्कृष्ट व्रत करण्याचा विचार केला आणि
मंत्रप्राप्तीचा निश्चय करून ते शांत मुनी एकसारखे कणधूमसेवन करीत राहिले.
शुक्र व्रत करण्यास तत्पर होऊन राहिले. दैत्य दंभ करण्यात तत्पर आहेत असे कळल्यानंतर देव दक्षतेने विचार करू लागले. त्यांनी मनामध्ये काही बेत केला. देव संग्रामाला उद्युक्त झाले. दानव तप करीत होते. तेथे सर्व देव आयुधे धारण करून गेले. तेव्हा आयुधे घेऊन व कवचे धारण करून आलेल्या त्या देवांना अवलोकन करताक्षणी ते दैत्य भयाने उद्विग्न झाले. एकाएकी उठलेले देव पाहून भयाने जर्जर झालेले ते दैत्य भाषण करू लागले.
ते म्हणाले, "हे देवांनो, भयभीत होऊन आम्ही शस्त्रत्याग केला असता आचार्य तपश्चर्या करीत बसले असता पूर्वी अभय देऊनही तुम्ही आमचा घात करण्याच्या उद्देशाने येथे प्राप्त झाला आहात. हे देव हो, तुमचे सत्य कोणीकडे गेले ? शस्त्र त्याग केलेले, भयभीत व शरणागत यांचा वध करू नये. हा तुमचा श्रुत्युक्त धर्म कोणीकडे गेला ?"
देव म्हणाले, "तुम्ही कपटाने मंत्र प्राप्त करून घेण्याकरता शुक्राला शिवाकडे पाठवले आहे व तुमचे तपही कोणत्या हेतूने प्रवृत्त झाले हे आम्हाला समजून चुकले आहे. ह्यामुळे आम्ही तुमच्याशी युद्धच करणार आहो. तुम्ही युद्धाकरता सज्ज व्हा. हातामध्ये शस्त्र धारण करा. छिद्र पाहून शत्रूचा वध करावा हा सनातन धर्म आहे."
ते भाषण श्रवण करून दैत्यांनी परस्पर विचार केला. सर्वजण भयाने विव्हल झाले आणि पलायनाविषयी तत्पर होऊन तिथून निघून गेले. ते भयभीत झालेले दानव शुक्रमातेला शरण गेले. त्यावेळी अतित्रस्त झालेल्या त्या दानवांना अवलोकन करून तिने त्यांना अभय दिले.
काव्यमाता म्हणाली, "हे दानवहो, भिऊ नका ! भय सोडा. माझ्याजवळ असणार्यांना भय प्राप्त होणार नाही."
हे भाषण ऐकून दैत्य आयुधरहित जरी होते तरी निर्भय व स्वस्थ होऊन त्या श्रेष्ठ आश्रमामध्ये काव्यमातेसंनिध राहिले. दानव पळून गेले असे अवलोकन करताक्षणीच देव बलाबलाचा विचार न करता त्यांच्या मागोमाग शुक्राच्या आश्रमात गेले. सर्व देव दैत्यांचा वध करण्यास उद्युक्त होऊन तेथे गेले. शुक्रमातेने जरी त्यांचे निवारण केले तरीही ते त्या आश्रमात असलेल्या दैत्यांकडेच गेले.
नंतर देव दैत्यांचा वध करीत आहेत असे अवलोकन करून काव्यामाता कोपाने थरथर कापू लागली. ती म्हणाली, "हे दैत्यहो, भिऊ नका. मी तपश्चर्येच्या योगाने या सर्वांना निद्रायुक्त करते."
असे म्हणून तिने निद्रेला प्रेरणा केली असता ती निद्रा देवांजवळ गेली. तेव्हा इंद्रासह सर्व देव निद्राधीन झाल्यामुळे मुक्याप्रमाणे स्वस्थ बसले. निद्राग्रस्त झाल्यामुळे दीन झालेल्या देवांना अवलोकन करून विष्णु इंद्राला म्हणाला, "हे सुरश्रेष्ठा, तुझे कल्याण असो. तू माझ्यामध्ये प्रवेश कर. मी तुला दुसर्या ठिकाणी घेऊन जाईन व तुझे रक्षण करीन."
असे विष्णूने सांगितले असता इंद्र त्याचे ठिकाणी प्रविष्ट झाला. नंतर हरीने त्याचे रक्षण केले व तो निद्रेपासून मुक्त होऊन निर्भय झाला. हरीने रक्षण केल्यामुळे इंद्र निर्भय झाल्याचे पाहून काव्यमाता फारच क्रुद्ध झाली. ती म्हणाली,"हे इंद्रा, तू गर्व करू नकोस. जरी विष्णूने तुझे रक्षण केले तरी आता सर्व देवांसमक्ष मी तुला तपोबलाने त्या विष्णूसह भक्षण करते. माझे तपोबल कसे आहे हे तुला आताच दाखवते." असे तिने सांगितले असता तत्काळ ते उभयता महात्मे, इंद्र व विष्णू तिच्या योगशक्तीने ग्रस्त होऊन त्याच ठिकाणी स्तब्ध झाले. ते स्तब्ध झाल्याचे अवलोकन करून सर्व देव विस्मयचकीत झाले. ते मनामध्ये खिन्न होऊन आक्रोश करू लागल्याचे अवलोकन करून इंद्र विष्णूला म्हणाला, "हे मधुसूदना, तुमच्यापेक्षा मी अधिकच स्तब्ध झालो आहे. म्हणून हे विष्णो, हे प्रभो, तिने आपल्याला दग्ध केले नाही तोच तुम्ही हिचा वेगाने वध करा. ह्या दुष्ट स्त्रीला तपामुळे गर्व झाला आहे."
इंद्राने भगवान विष्णूला असे सांगितले असता त्या लक्ष्मीपतीने तिच्याविषयीची दया सोडून देऊन चक्राचे स्मरण केले. विष्णूने चक्राचे स्मरण करताक्षणीच त्याच्या अधीन असलेले ते चक्र तेथे प्राप्त झाले. नंतर इंद्राने सांगितल्यामुळे क्रुद्ध झालेल्या त्या विष्णूने तिचा वध करण्याकरता ते हातामध्ये घेतले. त्याने वेगाने तिचा वध केला. ते अवलोकन करून इंद्र आनंदित झाला. देवही अतिशय संतुष्ट झाले ते निश्चिंत व आनंदित होऊन 'जय जय’ म्हणून हरीची स्तुती करू लागले. या प्रमाणे जिकडे तिकडे आनंदी आनंद झाला. पण स्त्रीवध झाल्यामुळे भृगूचा दुर्धर शाप होईल की काय असे भय उपस्थित होऊन त्याविषयी इंद्र व विष्णु ह्यांच्या मनामध्ये त्याचवेळी भयंकर शंका निर्माण झाली व ते चिंता करू लागले.