[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]
जनमेजय व्यासांना म्हणाला, "हे पराशरपुत्रा, ह्या कथेविषयी माझ्या मनात मोठाच संशय निर्माण झाला आहे. वस्तुत: हे नरनारायण विष्णूचे अंश होते. शांत, तपोधन, तीर्थक्षेत्रावर वास्तव्य करणारे, सत्वगुणांनी युक्त, कंदमूलावर आहार घेणारे, धर्मपुत्र, महात्मे, तपस्वी, सत्यनिष्ठ असे ते असतानादेखील ते दोघेजण क्रोधायमान कसे झाले ? खरोखरीच त्या अत्यद्भुत तपश्चर्येचा त्याग त्यांनी केला आणि ते रणामध्ये युद्धप्रवृत्त होऊन कसे बरे लढले ? हे मुने, मी अत्यंत शंकित झालो आहे.
देवांची हजार वर्षे संपूर्ण होईपर्यंत त्यांनी समाधी व ध्यानाच्या सुखाचा अव्हेर करून ते मुनी प्रल्हादाशी का लढले ? असे युद्ध करण्याचे कारण काय ? हे महाभाग्यवान व्यासमुने, आपण ह्या विषयी मला विस्ताराने सांगा.
खरोखरच कनक व कांता हेच युद्धाचे कारण असते. पण दोन्हीपासून अलिप्त असलेले ते मुनिश्रेष्ठ असताना दोघांनाही युद्धाची इच्छा का व्हावी ? त्यांनी कोणता उद्देश मनात ठेवून तप केले ? मोह, सुख, स्वर्ग या उद्देशाने त्यांनी तप केले का ?
ते मुनी शांत अंतःकरणाचे होते. त्यांनी इष्ट फले प्राप्त करून देणारे अद्भुत तप केले. पण त्यांना असे अनिर्वचनीय बल कसे प्राप्त झाले ? तपश्चर्येमुळे अगोदरच देहाला कष्ट झाले असताना त्यांनी युद्ध करून देहांना पीडा का दिली ? का पीडा हेच फल त्यांना प्राप्त झाले ? कारण हजार दिव्य वर्षे युद्ध केल्याने त्यांना फारच पीडा झाली असणार ?
राज्य, धन, स्त्री, गृह यापैकी कोणतेही कारण नसताना त्यांनी युद्ध केले. तेव्हा युद्धाचे कारण तरी कोणते घडले ? पुराण धर्म ज्याला समजला आहे असा पुरुष विनाकारण युद्ध प्रवृत्त कसा होईल ? तेव्हा हे धर्मज्ञ मुने, ज्याची बुद्धी श्रेष्ठ आहे असा पुरुष दु:खप्रद कर्मे न करता नेहमी सुखप्रद कर्मेच करीत असतो. आजपर्यंतची परंपरा अशीच आहे. पण हे धर्मपुत्र हरीचे अंश सर्वज्ञ, सर्वभूषित नरनारायण यांनी धर्माचा नाश व दुःख उत्पन्न करणारे युद्ध का केले ?
सुखरूपी महाफल प्राप्त करून देणार्या समाधीचा त्यांनी त्याग का केला ? हे कृष्णद्वैपायन मुने, मूर्खसुद्धा असा भयंकर संग्राम करण्याची इच्छा करणार नाही. ययाती राजा स्वर्गच्युत झाला. अहंकार झाल्यामुळेच त्याला इंद्राने खाली पाडले. यज्ञकर्ता, दानशूर आणि धार्मिक अशा त्या ययाती राजाला त्याने स्वतःच्या प्रशंसेचा उद्गार काढताच इन्द्राने त्याला भूलोकी ढकलले. तात्यर्य, अहंकार हेच युद्धाचे कारण आहे. म्हणून हे मुने, प्रल्हाद व नरनारायण यांच्या युद्धाचे श्रेष्ठ कारण कोणते ?
जनमेजय संशयसागरात बुडाल्याचे अवलोकन करून व्यासमुनी म्हणाले, "हे राजा, संसाराच्या मुळाशी तीन प्रकारचा अहंकार असतो असे धर्माचा निश्चित बोध झालेल्या मुनींनी सांगितले आहे. देहधारी मुनीच्या हातून त्या अहंकाराचा त्याग होणे संभवनीय नाही. कारणावाचून कार्य संभवत नाही.
तप, दान, यज्ञ वगैरे प्रवृत्ती सात्त्विक किंवा राजस अहंकारामुळे उत्पन्न होतात. पण हे महाभाग्यशाली जनमेजया, तामस अहंकारामुळे कलह निर्माण होत असतो. हे राजराजेश्वरा जनमेजया, कोणताही लहान अथवा मोठा, बरा किंवा वाईट परिणाम हा अहंकाराशिवाय संभवत नाही. या भूतलावर बंध उत्पन्न करणारा अहंकार हाच एकमेव कारण आहे. हे विश्वच जेथे अहंकारातून उत्पन्न झाले आहे तिथे या विश्वातील चराचर प्राणी अहंकारावाचून कसा असेल ?
हे भूपते, ब्रह्मा, विष्णू, महेश्वर हे जर स्वत: अहंकारांनी युक्त आहेत, तर मग इतर मुनी वगैरेची गोष्ट हवी कशाला ? हे चराचर विश्वब्रह्मांड अहंकाराने परिपूर्ण आहे. म्हणून पुनः जन्म व व पुनः मृत्यू या गोष्टी घडतात व त्यामुळे सर्व प्राणी भ्रमण करीत राहून कर्माच्या आधीन झालेले असतात.
देव, तीर्यग्योनीतील प्राणीमात्र व मानव या सर्वांचे भ्रमण अहंकारामुळेच होत असून वास्तविक ते भ्रमण चक्राप्रमाणे निष्फलच असते. ह्या प्रचंड संसारसागरात उच्च अथवा नीच योनीमध्ये विष्णूने जेवढे अवतार घेतले त्यांची संख्या कोणाला तरी सांगता येईल काय ?
तो श्रीहरी नरनारायण मत्स्य, कूर्म, वराह नारसिंह, वामन अशा रूपाने अवतार घेतो आणि प्रत्येक युगात तो भक्तांचे दुःख नाहीसे करतो. पण असा तो भक्तवत्सल जगन्नाथही दैवाधीनच आहे. म्हणून त्याला स्वतःच्या इच्छेविरुद्ध अनेक अवतार घ्यावे लागतात. हे राजा, सातव्या वैवस्वत मन्वंतरात भगवान श्रीहरीने कोणते अवतार धारण केले ते आता मी तुला सांगतो. तू शांत चित्ताने श्रवण कर.
हे महाराज, सुरश्रेष्ठ, संपूर्ण विश्वाचे अधिपत्य करणारा असा जो भगवान विष्णु त्याने भृगूच्या शापामुळे अनेक विविध अवतार धारण केले."
जनमेजय संशयग्रस्त होऊन व्यासांना म्हणाला, "हे महाभाग्यशाली पूर्वज, माझ्या मनात आता अनेक शंका निर्माण होत आहेत. भृगूने विष्णूला का शाप दिला ? हे मुने, हरीने त्या मुनीचे अप्रिय असे काय केले ? अशाप्रकारे शाप देण्यासाठी भृगूला रागाचे कोणते कारण निर्माण झाले ?"
व्यास सांगू लागले, "हे जनमेजया, आता भृगूने शाप का दिला याचे कारण मी तुला सांगतो."
फार वर्षापूर्वी कश्यपाचा पुत्र हिरण्यकशिपू या नावाचा राजा राज्य करीत होता. त्यावेळी दैत्यांनी देवांशी परस्पर युद्ध सुरू केले. त्या युद्धामुळे सर्व जगत् संकटग्रस्त होऊन व्यापून गेले. सर्व चराचर व्याकुळ झाले. अखेर त्या हिरण्यकशिपू राजाचा वध झाला. त्यानंतर त्याचा पुत्र भक्तश्रेष्ठ प्रल्हाद राज्य करू लागला.
पुढे काही काळाने तो शत्रूचा नाश करणारा प्रल्हादही देवांना त्रस्त करू लागला. त्यावेळी इन्द्र आणि प्रल्हाद या दोघातही प्रचंड युद्ध सुरू झाले. तेव्हा ते घोर उत्पन्न करणारे प्रचंड युद्ध प्रल्हाद व देव यामध्ये शंभर वर्षे पूर्ण होईपर्यंत टिकले. शेवटी ह्या युद्धामध्ये त्या प्रल्हादाचा पराभव झाला. त्यामुळे तो अधिकच खिन्न झाला.
त्याने उदार होऊन विरोचनाचा पुत्र बळी यास राज्यावर बसवले आणि तो स्वत: मात्र गंधमादन पर्वतावर तपश्चर्या करण्यासाठी निघून गेला. अशा प्रकारे बलाढय बलीला राज्य मिळाल्यावर तो देवांशी शत्रूत्व करू लागला. त्यामुळे दैत्यराज बली व देव यांमध्ये प्रचंड युद्ध सुरू झाले.
इंद्र, विष्णु यांनी देवांना पूर्णपणे सहाय्य केल्यामुळे दैत्यांचा पराभव झाला. देवांनी बलीला राज्यापासून भ्रष्ट केले. अखेर पराभूत होऊन सर्व दैत्य शुक्राचार्यांना शरण गेले. शुक्राचार्यांकडे जाऊन ते त्यांना म्हणाले, "हे ब्राह्मण, आपण एवढे महापराक्रमी असताना आम्हाला सहाय्य का बरे करीत नाही ? आपण मंत्रवेत्त्यांमध्ये श्रेष्ठ आहात. असे असतानाही आपण जर आम्हाला मदत करणार नसाल तर आम्ही सर्वजण आता रसातलात वस्तीला जातो. कारण सांप्रत या ठिकाणी रहाण्यास आम्ही सामर्थ्यशील नाही."
अशा रीतीने दैत्यांनी शुक्राचार्यांना विनंती केल्यावर तो दयेचा सागर काव्यमुनी शुक्राचार्य त्यांना म्हणाला, "दैत्यहो, तुम्ही कसलीही भीती बाळगू नका. हे असुरहो, मी आपल्या तेजोबलाने तुम्हाला येथेच धारण करीन. मंत्र व औषधे यांचा, प्रयोग करून मी तुमचा सहायकर्ता होईन. म्हणून तुम्ही धैर्य धरून निश्चिंत व्हा."
तेव्हा काव्यमुनींचा आश्रय केल्यामुळे सर्व दैत्य भयरहित झाले. इकडे ही संपूर्ण घटना देवांना कळली. देवांच्या हेरांनी, काव्यमुनींनी, दैत्यांना आधार दिल्याचे देवांना सांगितले. काव्यमुनींच्या मंत्राचे सामर्थ्य देव जाणून होते. त्यामुळे ते अतिशय चिंताक्रांत होऊन विचार विनिमय करू लागले. देवांनी एकत्र येऊन मार्ग काढण्याचे ठरवले.
"दानवांनी अद्यापी आपणाला आपल्या या स्थानापासून भ्रष्ट केले नाही. तोपर्यंतच आपण शेष उरतील त्यांना पातालात ढकलून देऊ. एकदम गर्दी करून आपण युद्ध सुरू करू."
अशाप्रकारे त्या क्रोधायमान झालेल्या देवांनी विचार केला. हातात शस्त्रे धारण करून ते सर्वजण दैत्यांकडे निघाले. प्रत्यक्ष हरीचीच आज्ञा झाल्यामुळे ते देव दानवांच्या राज्यापर्यंत येऊन पोहोचले. दैत्य व देव यांच्यात प्रचंड युद्ध सुरू झाले.
त्या युद्धात दानवांचा वध होऊ लागला. तेव्हा भयभीत व त्रस्त होऊन ते सर्वजण काव्यमुनींकडे गेले. ते काव्यांना म्हणाले, "हे भाग्यवान, आमचे रक्षण करा, आमचे रक्षण करा."
देवांनी अत्यंत जर्जर केलेल्या दैत्यांना शुक्राचार्यांनी अभय दिले. मंत्र व औषधे यांचे सामर्थ्य जवळ असल्याने ते म्हणाले, "दैत्यांनो, भिऊ नका. धीर धरा."
काव्यमुनी शुक्राचार्य दृष्टीस पडताच देव विस्मित झाले आणि दानवांना तेथेच सोडून ते आपापल्या स्थानी सत्वर निघून गेले.