प्रह्लाद उवाच
देवदेव जगनाथ भक्तवत्सल माधव ।
कथं न जितवानाजावहमेतौ तपस्विनौ ।
संग्रामस्तु मया देव कृतः पूर्णं शतं समाः ॥ ५२ ॥
सुराणां न जितौ कस्मादिति मे विस्मयो महान् ।
विष्णुरुवाच
सिद्धाविमौ मदंशौ च विस्मयः कोऽत्र मारिष ॥ ५३ ॥
तापसौ न जितात्मानौ नरनारायणौ जितौ ।
गच्छ त्वं वितलं राजन् कुरु भक्तिं ममाचलाम् ॥ ५४ ॥
नाभ्यां कुरु विरोधं त्वं तापसाभ्यां महामते ।
व्यास उवाच
इत्याज्ञप्तो दैत्यराजो निर्ययावसुरैः सह ॥ ५५ ॥
नरनारायणौ भूयस्तपोयुक्तौ बभूवतुः ॥ ५६ ॥
इति श्रीमद्देवीभागवते महापुराणेऽष्टादशसाहस्र्यां संहितायां
चतुर्थस्कन्धे प्रह्लादनारायणयोर्युद्धे विष्णोरागमनवर्णनं नाम नवमोऽध्यायः ॥ ९ ॥
प्रल्हाद व नरनारायण यांचे युद्ध -
[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]
अशा प्रकारे हिरण्यकशिपूचा पुत्र प्रल्हाद हा यथाविधी तीर्थयात्रा करीत चालला असता एक घनदाट छायेने युक्त असा वटवृक्ष त्याने पाहिला. तेथे गृध्रपक्ष्याची पिसे लावलेले व शिळेवर घासल्यामुळे तीक्ष्ण झालेले बाण त्याला दिसले. त्या बाण समूहात आणखीही विविध प्रकारचे बाण होते. तो मनात विचार करू लागला, "येथे ऋषींचा पवित्र आश्रम असताना असे हे दिव्य बाण कुणी ठेवले ? हे कोणाचे बाण आहेत ?"
असा विचार करीत असतानाच येथे जटाधारी असे तेजस्वी मुनिश्रेष्ठ नरनारायण त्याने पाहिले. त्यांच्याजवळ शार्ङ्ग व पिनाक अशी दोन धनुष्य होती. तसेच ते अक्षय बाणभात्यांनी युक्त होते. पण त्याच स्थितीत ते दोघेही मुनिश्रेष्ठ ध्यानस्थ असल्याचे पाहून प्रल्हादाला विस्मय वाटला. तो असुरांचे पालन करणारा प्रल्हाद एकदम कुद्ध झाला. तो नेत्र जलभडक करून त्या महामुनी नरनारायणांना म्हणाला, "हे पुरुषहो, धर्माचा नाश करणार्या दंभाचे आपण का बरे अवलंबन करीत आहात ? तीव्र तपश्चर्या आणि धनुष्यबाण धारण करणे या गोष्टी एकाच वेळी घडत असल्याचे या संसारात आजवर कोठे पाहिले नाही, तसेच ऐकलेही नाही. खरोखरच हा प्रकार कलियुगात संभवेल. पण या सत्ययुगात असा विरोधाभास कसा शक्य आहे ?
ब्राह्मणाने तपश्चर्या करावी, धनुष्यबाण हाती घेऊ नये. अहो, देहावर जटा धारण करणे आणि हे उपाहासाला कारणीभूत होणारे बाणांचे भाते धारण करणे, केवढा हा विरोध ? तुमची बुद्धी दिव्य असल्यामुळे तुम्ही धर्मसंमत आचरण करणेच इष्ट आहे."
हे प्रल्हादाचे भाषण ऐकल्यावर मुनिश्रेष्ठ नर म्हणाला, "हे दैत्यराज, तू आमच्या तपाविषयी निष्कारण काळजी करीत आहेस. सामर्थ्यानेच प्रत्येकाला इच्छित प्राप्त होत असते. हे मूढा, आम्ही हे सुप्रसिद्ध नर व नारायण दोघेही ही दोन्ही कार्ये एकाच वेळी करण्यास समर्थ आहोत. युद्ध आणि तपश्चर्या करण्याचे अतुल सामर्थ्य आमच्यात आहे. तेव्हा तुला काय करायचे आहे ? तू खुशाल आपल्या मार्गाने निघून जा. येथे वृथा बढाया मारू नकोस. तू मोहित झाल्यामुळेच ब्राह्मतेज दुर्घट आहे हे तू जाणत नाहीस. सुखाची इच्छा करणार्यांनी ब्राह्मणांशी वाटाघाट करू नये."
नराच्या बोलण्यामुळे प्रल्हाद कुद्ध झाला. तो नरनारायणांना म्हणाला, "हे मुनिश्रेष्ठांनो, तुम्ही वृथा गर्वाने मोहित झाला आहात म्हणून तुमची बुद्धी मंद झाली आहे. मी धर्माप्रमाणे आचरण करणारा दैत्यराज जिवंत असताना या तीर्थक्षेत्रावर अधर्माचे आचरण झालेले मी सहन करणार नाही. हे तपोनिधे, तुमच्या अंगी जर युद्धसामर्थ्य असेल तर ते आज माझ्यासमोर प्रकट करा. मी ते सामर्थ्य अजमावतो."
प्रल्हादाने असे सांगितल्यावर नर म्हणाला, "हे असुराधमा, तुझी इच्छा असेल तर खरोखर तू माझ्याबरोबर युद्ध कर. आज मी तुझे मस्तकच तोडून टाकतो म्हणजे यानंतर तुला युद्ध करण्याची कधीही इच्छा होणार नाही."
ते भाषण ऐकताच तो महाप्रतापी दैत्यराज कुद्ध झाला. कोणत्याही उपायांनी आज आपण या नरनारायणाचा पराभव करू अशी त्याने प्रतिज्ञा केली. नंतर त्याने प्रचंड टणत्कार केला.
हे अवलोकन करताच नराने शिलांवर घासलेले पुष्कळ बाण त्या प्रल्हादावर सोडले. ते पाहताच तो दैत्यराज वेगाने त्या नरनारायणाजवळ गेला. त्याने सुवर्णपंखाचे बाण सोडून नरनारायणाचे बाण तोडून टाकले. तेव्हा त्या दोघा मुनींनी सत्वर दुसरे कित्येक बाण प्रल्हादावर सोडले. पण तेही प्रल्हादाने आपल्या बाणांनी नष्ट .केले आणि एका तीक्ष्ण बाणाने त्या मुनिश्रेष्ठाच्या हृदयाचा वेध केला.
नरानेही कुद्ध होऊन प्रल्हादाच्या बाहूचा वेध केला त्यांचे हे अलौकिक युद्ध देव अंतराळात विमानात बसून पाहात होते. प्रल्हाद व नर यांचे शौर्य पाहून ते दोघांचीही स्तुती करीत होते. मेघापासून होणार्या जलवृष्टीप्रमाणे प्रल्हादाने अमोघ बाणवृष्टी केली. त्याने पुष्कळ बाण सोडले. त्यानंतर नरानेही शार्ङ्ग धनुष्याच्या साहाय्याने सुवर्णपिच्छांकित असे विपुल बाण प्रल्हादावर सोडले.
असे हे युद्ध बराच काळ चालू होते. दोघेही दैत्य व देव अत्यंत ईर्षेने व विजयाच्या इच्छेने एकमेकांशी युद्ध करीत होते. ते तुमुल युद्ध अवलोकन करून देव आनंदित झाले. त्यांनी अंतराळातून दोघांवरही पुष्पवृष्टी केली. पण नरानेही तेवढयाच शौर्याने त्यांचे सर्व बाण तोडून टाकले व प्रचंड बाणांची प्रतिवृष्टी केली. अखेर धनुष्याची प्रत्यंचा अधिकच आकर्षण करून प्रल्हादाने त्या निश्चल राहिलेल्या धर्मपुत्र नरावर बाण वृष्टी केली. तेव्हा नरनारायणाने तितक्याच आवेशाने आपल्या समोर स्थित असलेल्या प्रल्हादावर प्रचंड शरवृष्टी करून तसे प्रतिउत्तर दिले. प्रल्हाद व नरनारायण यांचे हे प्रचंड युद्ध पाहण्यास देवांनी आकाशात गर्दी केली व ते दोघांचाही यथोचित जयघोष करीत होते.
अशा रीतीने युद्ध चालू असता दोघांच्या शरवर्षावामुळे आकाश आच्छादून गेले. तो दिवस असतानाही रात्रीप्रमाणे अंधार दाटून आला.
"यापूर्वी कधीही न पहायला मिळालेले अद्भुत युद्ध आज अवलोकन करायला मिळाले." अशा प्रकारचे उद्गार देव व दैत्य आपापसात काढू लागले.
सर्व देवर्षी, गंधर्व, यक्ष, किन्नर, पन्नग, विद्याधर, चारण वगैरे सर्वजण हे दारुण युद्ध पाहून विस्मित झाले. नारद व पर्वतसुद्धा युद्ध अवलोकन करावे म्हणून तेथे आले. त्यावेळी नारद पर्वताला म्हणाला, "तारकासुराशी झालेले युद्ध, वृत्रासुराचे युद्ध, अथवा विष्णूने मधुकैटभाशी केलेले युद्ध यापैकी कोणतेही युद्ध या युद्धाच्या तोडीचे झाले नाही. ज्याअर्थी या अद्यद्भुत अशा नारायणांशी प्रल्हाद बरोबरीने युद्ध करीत आहे त्याअर्थी तो श्रेष्ठ वीर आहे यात संशयच नाही. तो खरोखरच महाबलाढय आहे."
असे हे युद्ध दिवस रात्र अखंड चालू होते. अखेर ते दोघेही अत्यंत पराकाष्ठेने युद्ध करू लागले. नारायणाने एकाच बाणाने प्रल्हादाचे धनुष्य तोडून टाकले. पण त्या प्रल्हादाने सत्वर दुसरे धनुष्य धारण केले. पण अत्यंत हलका हात असलेल्या नारारयणाने तेही धनुष्य मधोमध तोडून टाकले. असे होता होता प्रल्हादाजवळचे अखेरचे धनुष्यही नारायणाने तोडून टाकले. त्यावेळी प्रल्हादाने हातात प्रचंड परीघ घेतला. त्याने नारायणाचे हातावर मध्यभागी प्रचंड प्रहार केला. पण त्या महाबलाढय मुनीने अंगावर येत असलेला परीघ द्रुतगतीने नऊ बाण सोडून तोडून टाकला. प्रल्हादावर दहा बाण टाकून त्याने प्रल्हादाचाही वेध केला.
शेवटी प्रल्हादाने प्रचंड अशी मोठी लोखंडी गदा हातात घेतली आणि सत्वर त्वेषाने जाऊन त्याने नारायणाच्या गुडघ्यावर अद्भुत गदाप्रहार केला. पण तरीही तो मुनीश्रेष्ठ स्वस्थानापासून ढळला नाही. इतकेच नव्हे तर प्रचंड शीलिमुख बाण सोडून नारायणाने ती लोहाची कठिण गदा सत्वर तोडून टाकली. ते पाहाताच देवांनाही अतिशय आश्चर्य वाटले.
त्या शत्रूचा नाश करणार्या प्रल्हादानेही कुद्ध होऊन आपल्या जवळची शक्ती वेगाने नारायणाच्या छातीवर फेकली. पण येत असलेली ती शक्ती अवलोकन करताच त्याने आपल्याजवळील बाणांनी त्या शक्तीचे सात तुकडे केले व प्रल्हादाचा वेध केला.
एक हजार वर्षेपर्यंत हे दिव्य युद्ध चालू होते. ते अवलोकन करून आश्रमातील सर्वजण आश्चर्यचकित झाले. शेवटी पीतवस्त्र धारण केलेला व गदाधारी असा चतुर्भुज विष्णु प्रल्हादाच्या आश्रमात आला. शंख, चक्र, कमल धारण करणारा तो चतुर्भुज रमापती त्याच्याशी संभाषण करू लागला. विष्णूला आलेला पाहून तो दैत्यराज प्रल्हाद अत्यंत नम्रतेने हात जोडून म्हणाला, "हे देवा, हे जगन्नाथा, हे भक्तवत्सला, हे माधवा, युद्धामध्ये माझ्याकडून ह्या तपस्व्यांचा पराभव का होत नाही ? हे देवा, देवांची हजार वर्षे पूर्ण होईपर्यंत मी हे युद्ध केले. तरीही हे दोघे पराभूत झाले नाहीत. याबद्दल मला आश्चर्य वाटत आहे."
प्रल्हादाचे हे बोलणे ऐकून विष्णू म्हणाला, "हे सभ्य, माझ्याच अंशातून उत्पन्न झालेल्या या नर - नारायण मुनींचा पराभव होत नाही यात आश्चर्य ते कसले ? हे महाविचारी राजा, तू पातालात जा व माझी अचल भक्ती कर. या तपस्व्यांशी तू कदापीही विरोध धरू नकोस."
अशी ती भगवान विष्णूची आज्ञा होताच तो दैत्यराज प्रल्हाद आपल्या असुर सैन्यासह पातालात निघून गेला व विष्णूची भक्ती करू लागला. इकडे हे नरनारायण मुनीही पुन: दारुण तपश्चर्या करू लागले.