[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]
अशा रीतीने जनमेजय राजाने प्रश्न विचारल्यावर सत्यवतीपुत्र व्यासांनी त्याला सर्व कथा विस्ताराने निवेदन केली. त्यामुळे परीक्षित राजाचे चित्त दूषित होत असे. जनमेजयाला समजून चुकले. त्यामुळे त्या धर्मपरायण जनमेजयाला अपार खेद वाटला. विप्राचा अपमान केल्यामुळे यमलोकी गेलेल्या पित्याचा उद्धार कसा करावा याविषयी तो चिंता करू लागला.
पुत्र पुन्नाम नरकापासून स्वतःच्या पित्याला तारीत असतो. पण आपला पिता, परीक्षित राजा विप्रशापामुळे अंतराळामध्ये सर्पदंश होऊन स्नान, दान, नित्य कर्मे न करताच मृत्यू पावला हे ऐकून व आपल्या पित्याला भयानक दुर्गती प्राप्त झाल्याचे श्रवण करून त्या महाभाग्यशाली परीक्षित पुत्राला, जनमेजयाला अत्यंत दु:ख झाले. नंतर राजाने त्या मुनींना नरनारायण याच्या विषयी सविस्तर कथा सांगण्याची विनंती केली.
जनमेजयाचे भाषण ऐकल्यावर व्यास म्हणाले, "हे राजा, त्या उग्र, भयानक हिरण्यकशिपूचा वध झाल्यावर लयाल्या प्रल्हाद नावाच्या पुत्राला राज्याभिषेक करण्यात आला. तो दैत्यराज देवांची पूजा करणारा होता. त्याचवेळी पृथ्वीवरील राजे सश्रद्ध होऊन देवासाठी यज्ञयाग करीत असत. ब्राह्मण तप, तीर्थयात्रा वगैरे पुण्यकर्मे करीत. वैश्य स्वधर्माप्रमाणे आचरण करीत. शूद्र द्विजांची शुश्रुषा तत्परतेने करीत असत.
नृसिंहाने त्या दैत्यपुत्राची पातालमध्ये राज्यावर स्थापना केल्यावर प्रल्हाद तेथे धर्माने राज्य करू लागला. एकदा भृगुपुत्र महातपस्वी च्यवनमुनी नर्मदाकाठी व्याव्हृतीश्वरतीर्थांवर स्नान करण्याकरता निघाला व महानदी नर्मदेला अवलोकन करून तो तिच्यात उतरला. पण तो पाण्यात उतरत असताना विषारी अशा एका भयंकर नागाने त्याला वेढले. मुनी भयचकित झाला. नागाने त्या मुनीला पातालात नेले.
च्यवनाने सत्वर देवाधिदेव भगवान विष्णूचे नामस्मरण मनातल्या मनात केले. त्या कमलनयन भगवान विष्णूचे नामस्मरण होताच इकडे तो महासर्प विषरहित झाला. त्यामुळे भुजंगाने त्याला धरून नेत असताही च्यवनाला दुःख व त्रास झाला नाही.
पण तेवढयात तो भयंकर नाग विचार करू लागला, 'न जाणो हा महातपस्वी मुनी आपल्याला कोणता शाप देईल ?' अशाप्रकारे शंकायुक्त होऊन खिन्न झालेल्या सर्पाने च्यवनाला मुक्त केले. सर्व नागकन्या त्या महामुनीला अवलोकन करून मान देत होत्या. पण हा मुनीश्रेष्ठ तसाच महासागरात संचार करीत नाग व दानव यांनी व्यापलेल्या महानगरामध्ये प्राप्त झाला.
असाच एकदा त्या नगरात तो भृगुपुत्र च्यवन संचार करीत असता धर्माचा प्रतिपाल करणारा दैत्यांचा राजा प्रल्हाद याने त्या महातपस्व्याला पाहिले. मुनीच्या समोर जाऊन त्याने मुनींची पूजा केली. तो नम्रपणाने हात जोडून म्हणाला, "हे महामुने, आपण पातालात का बरे आला आहात ? इंद्राने माझे राज्य पाहण्यासाठी अथवा माझ्या राज्याची हेटाळणी करण्यासाठी आपणाला इकडे पाठविले आहे काय ? आपण खरे असेल ते निवेदन करा."
प्रल्हादाचे भाषण ऐकून महामुनी च्यवन म्हणाला, "हे दैत्यराजा, एखाद्या दूताप्रमाणे इंद्राने मला तुजकडे पाठवावे असा माझा आणि इंद्राचा काहीही संबंध नाही. मी स्वतंत्र मनाचा व धर्मकार्य तत्पर असा भृगुपुत्र आहे.
हे दैत्यराजा, इंद्राने मला येथे पाठवले असेल याबद्दल तू मनात शंका आणू नकोस.
हे नृपश्रेष्ठा, मी नित्याप्रमाणे स्नानासाठी नर्मदातीरावर आलो होतो. पण मी नदीत उतरताच एका महाभयंकर भुजंगाने मला घेरले. तेव्हा मी भगवान विष्णूचे स्मरण केले. त्याचक्षणी माझ्या विष्णुस्मरणाचा प्रभाव घडून आला. तो भुजंग सत्वर निर्विष झाला.
तेव्हा घाबरून त्याने मला सोडून दिले. हे राजेंद्रा, मी संचार करीत येथे आलो आणि मला तुझे दर्शन घडले. हे दैत्यराज, तू विष्णूभक्त आहेस तसाच मीसुद्धा त्याच भगवान विष्णूचा भक्त आहे हे तू लक्षात ठेव."
त्या मुनीचे ते भाषण ऐकल्यावर त्या भक्त प्रल्हादाने निरनिराळ्या तीर्थांविषयी मुनींना माहिती विचारली. प्रल्हाद च्यवनमुनीना म्हणाला, "हे मुनीश्रेष्ठा, पृथ्वी, अंतरिक्ष व पाताल या सर्व ठिकाणी कोणकोणती तीर्थक्षेत्रे आहेत हे आपण मला विस्ताराने निवेदन करा."
च्यवनमुनी म्हणाले, "हे भक्तश्रेष्ठा, हे राजा ज्यांची मने निर्मळ आहेत, जे वाणीने, चित्ताने, शरीराने शुद्ध आहेत, त्यांना सर्वच क्षेत्रे तीर्थासारखी आहेत. पण मलिन अंतःकरणाच्या पुरुषांस मात्र गंगा ही कीटक देशापेक्षाही अपवित्र आहे. प्रथम मन शुद्ध करून पापरहित झाल्यावर सर्व तीर्थे आपणाला पवित्र करू शकतात.
गंगातीरी सर्व ठिकाणी विविध नगरे, गोठे, खाणी व लहानमोठी गावे आहेत. हे दैत्यश्रेष्ठा, निषाद, आवर्त, हूण, वंग, खस, म्लेंच्छ ह्यांची सुद्धा निवासस्थाने त्यात आहेत. ब्रह्मतुल्य असे ते पवित्र गंगाजल ते पुरुष नित्य सेवीत असतात. स्वेच्छेने ते लोक त्रिकाल स्नाने करतात. पण ह्या सर्वांपैकी एकाचेही अंतःकरण शुद्ध झालेले नसते.
हे राजेंद्रा, ज्यांचे मन विषयात व्याप्त आहे अशा पुरुषांना तीर्थाच्या फलाचा उपयोग काय ? त्यांना फल कसे प्राप्त होणार ? म्हणून हे राजा, मन हेच सर्वांचे कारण असल्याने इतर दुसरी कारणे त्याबाबतीत नाहीत. म्हणून मनशुद्धीच नित्य सांभाळली पाहिजे.
तीर्थामध्ये वास्तव्य करणारा पुरुषही इतर बाबतीत दुसर्यांची वंचना करतो. त्यामुळे तो महापापी होतो. त्या तीर्थक्षेत्रावरच पापाचरण केल्याने ते अक्षय्य व अक्षम्य आहे. कौंडाळ पिकल्यावरसुद्धा जसे ते मधुर लागत नाही तसेच दूषित मनाने युक्त असलेला पुरुष तीर्थक्षेत्री कोटयावधी स्नाने केली तरी शुद्ध होत नाही.
तेव्हा हे राजा, शुभेच्छु पुरुषाने प्रथम मन शुद्ध ठेवावे. कारण मन शुद्ध असल्यासच द्रव्य शुद्ध होते. त्याविना ते शुद्ध राहात नाही. तसेच शुद्धाचरण आवश्यक आहे. आचरणशुद्धी झाल्यासच तीर्थयात्रा फलदायी होतात, नाहीतर सर्व प्रयत्न व्यर्थ होत.
तीर्थयात्रेला गेल्यावर हीन वर्णाशी संबंध सोडावा, प्राणीमात्रावर दया दाखवावी. हे राजा, तू ज्या अर्थी ऐकण्यास उत्सुक आहेस त्याअर्थी मी तुला आता ते विस्ताराने कथन करतो.
नैमिष हे उत्तम व प्रथमतीर्थ आहे. चक्रतीर्थ व पुष्करतीर्थ ही दोन तशीच श्रेष्ठ आहेत. हे नृपश्रेष्ठा, भूतलावर एवढी तीर्थे आहेत की त्यांची गणनाच करता येणे अशक्य. कारण तेथे पुष्कळच तीर्थक्षेत्रे आहेत."
च्यवनमुनींचे हे भाषण ऐकल्यावर दैत्यराज प्रल्हादाचे अंतःकरण आनंदाने उचंबळून आले. तो स्वतःच त्या नैमिष तीर्थावर जाण्याची इच्छा करू लागला. त्याने दैत्यांना तसे निवेदन केले. प्रल्हाद म्हणाला, "हे महाभाग्यवान दानवांनो, उठा. आज आपण निमिष तीर्थाला जाऊन त्या ठिकाणी असलेल्या कमलनयन व पीतवस्त्रधारी अच्युताचे दर्शन घेऊ."
विष्णूभक्त प्रल्हादाचे भाषण ऐकून सर्व दानव अत्यंत हर्षभरीत होऊन त्याचेबरोबर जाण्यासाठी पातललोकातून बाहेर पडले. ते सर्वजण एकत्र होऊन नैमिषारण्यात गेले. तेथे पोहोचल्यावर त्यांनी अतिशय आनंदाने स्नानादि कर्मे केली.
अशा रीतीने सर्व महाबलाढय दैत्यांना बरोबर घेऊन प्रल्हाद तीर्थयात्रा करीत होता. तेव्हा महापुण्य फल देणारी व निर्मल जल असलेली ती श्रेष्ठ सरस्वती नदी त्याने अवलोकन केली. त्या सारस्वत जलरूपी तीर्थावर स्नान केल्यामुळे प्रल्हादाचे मन अतिशय प्रसन्न झाले. तेथे राहून स्नानादि इतर पुण्यकर्मेही त्याने केली. त्याने यथाविधी कार्ये केली.