श्रीमद्‌देवीभागवत महापुराण
चतुर्थः स्कन्धः
सप्तमोऽध्यायः


अहङ्कारावर्तनवर्णनम्

व्यास उवाच
इत्याकर्ण्य वचस्तासां धर्मपुत्रः प्रतापवान् ।
विमर्शमकरोच्चित्ते किं कर्तव्यं मयाधुना ॥ १ ॥
हास्योऽहं मुनिवृन्देषु भविष्याम्यद्य सङ्गमात् ।
अहंकारादिदं प्राप्तं दुःखं नात्र विचारणा ।
मूलं धर्मविनाशस्य प्रथमं यदहङ्कृतिः ॥ २ ॥
मूलं संसारवृक्षस्य यतः प्रोक्तो महात्मभिः ।
दृष्ट्वा मौनं समाधाय न स्थितोऽहं समागतम् ॥ ३ ॥
वाराङ्गनागणं जुष्टं तेनासं दुःखभाजनम् ।
उत्पादितास्तथा नार्यो मया धर्मव्ययेन वै ॥ ४ ॥
तास्तु मां बाधितुं वृत्ताः कामार्ताः प्रमदोत्तमाः ।
ऊर्णनाभिरिवाद्याहं जालेन स्वकृतेन वै ॥ ५ ॥
बद्धोऽस्मि सुदृढेनात्र किं कर्तव्यमतः परम् ।
यदि चिन्तां समुत्सृज्य सन्त्यजाम्यबला इमाः ॥ ६ ॥
शप्त्वा भ्रष्टा व्रजिष्यन्ति सर्वा भग्नमनोरथाः ।
मुक्तोऽहं सञ्चरिष्यामि विजने परमं तपः ॥ ७ ॥
तस्मात्क्रोधं समुत्पाद्य त्यक्ष्यामि सुन्दरीगणम् ।
व्यास उवाच
इति सञ्चिन्त्य मनसा मुनिर्नारायणस्तदा ॥ ८ ॥
विमर्शमकरोच्चित्ते सुखोत्पादनसाधने ।
द्वितीयोऽयं महाशत्रुः क्रोधः सन्तापकारकः ॥ ९ ॥
कामादप्यधिको लोके लोभादपि च दारुणः ।
क्रोधाभिभूतः कुरुते हिंसां प्राणविघातिनीम् ॥ १० ॥
दुःखदां सर्वभूतानां नरकारामदीर्घिकाम् ।
यथाग्निर्घर्षणाज्जातः पादपं प्रदहेत्तथा ॥ ११ ॥
देहोत्पन्नस्तथा क्रोधो देहं दहति दारुणः ।
व्यास उवाच
इति सञ्चिन्त्यमानं तं भ्रातरं दीनमानसम् ॥ १२ ॥
उवाच वचनं तथ्यं नरो धर्मसुतोऽनुजः ।
नर उवाच
नारायण महाभाग कोपं यच्छ महामते ॥ १३ ॥
शान्तं भावं समाश्रित्य नाशयाहङ्कृतिं पराम् ।
पुराहङ्कारदोषेण तपो नष्टं किलावयोः ॥ १४ ॥
संग्रामश्चाभवत्ताभ्यां भावाभ्यामसुरेण ह ।
दिव्यवर्षसहस्रं तु प्रह्लादेन महाद्‌भुतम् ॥ १५ ॥
दुःखं बहुतरं प्राप्तं तत्रावाभ्यां सुरोत्तम ।
तस्मात्क्रोधं परित्यज्य शान्तो भव मुनीश्वर ॥ १६ ॥
( शान्तत्वं तपसो मूलं मुनिभिः परिकीर्तितम् ।) ॥
व्यास उवाच
इति तस्य वचः श्रुत्वा शान्तोऽभूद्धर्मनन्दनः ।
जनमेजय उवाच
संशयोऽयं मुनिश्रेष्ठ प्रह्लादेन महात्मना ॥ १७ ॥
विष्णुभक्तेन शान्तेन कथं युद्धं कृतं पुरा ।
कृतवन्तौ कथं युद्धं नरनारायणावृषी ॥ १८ ॥
तापसौ धर्मपुत्रौ द्वौ सुशान्तमानसावुभौ ।
समागमः कथं जातस्तयोर्दैत्यसुतस्य च ॥ १९ ॥
संग्रामस्तु कथं ताभ्यां कृतस्तेन महात्मना ।
प्रह्लादोऽप्यतिधर्मात्मा ज्ञानवान्विष्णुतत्परः ॥ २० ॥
नरनारायणौ तद्वत्तापसौ सत्त्वसंस्थितौ ।
तेन ताभ्यां समुद्‌भूतं वैरं यदि परस्परम् ॥ २१ ॥
तदा तपसि धर्मे च श्रम एव हि केवलम् ।
क्व जपः क्व तपश्चर्या पुरा सत्ययुगेऽपि च ॥ २२ ॥
तादृशैर्न जितं चित्तं क्रोधाहङ्कारसंवृतम् ।
न क्रोधो न च मात्सर्यमहङ्कारांकुरं विना ॥ २३ ॥
अहङ्कारात्समुत्पन्नाः कामक्रोधादयः किल ।
वर्षकोटिसहस्रं तु तपः कृत्वातिदारुणम् ॥ २४ ॥
अहङ्कारांकुरे जाते व्यर्थं भवति सर्वथा ।
यथा सूर्योदये जाते तमोरूपं न तिष्ठति ॥ २५ ॥
अहङ्कारांकुरस्याग्रे तथा पुण्यं न तिष्ठति ।
प्रह्लादोऽपि महाभाग हरिणा समयुध्यत ॥ २६ ॥
तदा व्यर्थं कृतं सर्वं सुकृतं किल भूतले ।
नरनारायणौ शान्तौ विहाय परमं तपः ॥ २७ ॥
कृतवन्तौ यदा युद्धं क्व शमः सुकृतं पुनः ।
ईदृग्भ्यां सत्त्वयुक्ताभ्यामजेया यद्यहङ्कृतिः ॥ २८ ॥
मादृशानाञ्ज का वार्ता मुनेऽहङ्कारसंक्षये ।
अहङ्कारपरित्यक्तो न कोऽप्यस्ति जगत्त्रये ॥ २९ ॥
न भूतो भविता नैव यस्त्यक्तस्तेन सर्वथा ।
मुच्यते लोहनिगडैर्बद्धः काष्ठमयैस्तथा ॥ ३० ॥
अहङ्कारनिबद्धस्तु न कदाचिद्विमुच्यते ।
अहङ्कारावृतं सर्वं जगत्स्थावरजङ्गमम् ॥ ३१ ॥
भ्रमत्येव हि संसारे विष्ठामूत्रप्रदूषिते ।
ब्रह्मज्ञानं कुतस्तावत्संसारे मोहसंवृते ॥ ३२ ॥
मतं मीमांसकानां वै सम्मतं भाति सुव्रत ।
महान्तोऽपि सदा युक्ताः कामक्रोधादिभिर्मुने ॥ ३३ ॥
मादृशानां कलावस्मिन्का कथा मुनिसत्तम ।
व्यास उवाच
कार्यं वै कारणाद्‌भिन्नं कथं भवति भारत ॥ ३४ ॥
कटकं कुण्डलञ्चैव सुवर्णसदृशं भवेत् ।
अहङ्कारोद्‌भवं सर्वं ब्रह्माण्डं सचराचरम् ॥ ३५ ॥
पटस्तन्तुवशः प्रोक्तस्तद्वियुक्तः कथं भवेत् ।
मायागुणैस्त्रिभिः सर्वं रचितं स्थिरजङ्गमम् ॥ ३६ ॥
सतृणस्तम्बपर्यन्तं का तत्र परिदेवना ।
ब्रह्मा विष्णुस्तथा रुद्रस्ते चाहङ्कारमोहिताः ॥ ३७ ॥
भ्रमन्त्यस्मिन्महागाधे संसारे नृपसत्तम ।
वसिष्ठनारदाद्याश्च मुनयो ज्ञानिनः परम् ॥ ३८ ॥
तेऽभिभूताः संसरन्ति संसारेऽस्मिन्पुनः पुनः ।
न कोऽप्यस्ति नृपश्रेष्ठ त्रिषु लोकेषु देहभृत् ॥ ३९ ॥
एभिर्मायागुणैर्मुक्तः शान्त आत्मसुखे स्थितः ।
कामक्रोधौ तथा लोभो मोहोऽहङ्कारसम्भवः ॥ ४० ॥
न मुञ्चन्ति नरं सर्वं देहवन्तं नृपोत्तम ।
अधीत्य वेदशास्त्राणि पुराणानि विचिन्त्य च ॥ ४१ ॥
कृत्वा तीर्थाटनं दानं ध्यानञ्चैव सुरार्चनम् ।
करोति विषयासक्तः सर्वं कर्म च चौरवत् ॥ ४२ ॥
विचारयति नो पूर्वं काममोहमदान्वितः ।
कृते युगेऽपि त्रेतायां द्वापरे कुरुनन्दन ॥ ४३ ॥
विद्धोऽत्रास्ति च धर्मोऽपि का कथाद्य कलौ पुनः ।
स्पर्धा सदैव सद्रोहा लोभामर्षौ च सर्वदा ॥ ४४ ॥
एवंविधोऽस्ति संसारो नात्र कार्या विचारणा ।
साधवो विरला लोके भवन्ति गतमत्सराः ॥ ४५ ॥
जितक्रोधा जितामर्षा दृष्टान्तार्थं व्यवस्थिताः ।
राजोवाच
ते धन्याः कृतपुण्यास्ते मदमोहविवर्जिताः ॥ ४६ ॥
जितेन्द्रियाः सदाचारा जितं तैर्भुवनत्रयम् ।
दुनोमि पातकं स्मृत्वा पितुर्मम महात्मनः ॥ ४७ ॥
कृतस्तपस्विनः कण्ठे मृतसर्पो ह्यघं विना ।
अतस्तस्य मुनिश्रेष्ठ भविता किं ममाग्रतः ॥ ४८ ॥
न जाने बुद्धिसम्मोहात्किं वा कार्यं भविष्यति ।
मधु पश्यति मूढात्मा प्रपातं नैव पश्यति ॥ ४९ ॥
करोति निन्दितं कर्म नरकान्न बिभेति च ।
कथं युद्धं पुरा वृत्तं विस्तरात्तद्वदस्व मे ॥ ५० ॥
प्रह्लादेन यथा चोग्रं नरनारायणस्य वै ।
प्रह्लादस्तु कथं यातः पातालात्तद्वदस्व मे ॥ ५१ ॥
सारस्वते महातीर्थे पुण्ये बदरिकाश्रमे ।
नरनारायणौ शान्तौ तापसौ मुनिसत्तमौ ॥ ५२ ॥
कृतवन्तौ तथा युद्धं हेतुना केन मानद ।
वैरं भवति वित्तार्थं दारार्थं वा परस्परम् ॥ ५३ ॥
एषणारहितौ कस्माच्चक्रतुः प्रधनं महत् ।
प्रह्लादोऽपि च धर्मात्मा ज्ञात्वा देवौ सनातनौ ॥ ५४ ॥
कृतवान्स कथं युद्धं नरनारायणौ मुनी ।
एतद्विस्तरतो ब्रह्मञ्छ्रोतुमिच्छामि कारणम् ॥ ५५ ॥
इति श्रीमद्देवीभागवते महापुराणेऽष्टादशसाहस्र्यां संहितायां ॥
चतुर्थस्कन्धे अहङ्कारावर्तनवर्णनं नाम सप्तमोऽध्यायः ॥ ७ ॥


अहंकाराचे प्राबल्य -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

त्या अप्सरांची ही विनंती श्रवण करताच तो प्रतापशाली धर्मपुत्र नारायण मनातच विचार करू लागला. तो म्हणाला, "सांप्रत मी काय बरे करू ? या अप्सरांबरोबर समागम केला तर मी सर्व ऋषींमध्ये हास्यास्पद होईन. केवळ अहंकारामुळेच हे दु:ख मला प्राप्त झाले. अहंकार हे सर्वस्वाच्या नाशाचे कारण आहे. ते संसारवृक्षाचे मूळ आहे.

या एकत्र जमून आलेल्या अप्सरांना पाहून मी मौन न स्वीकारता त्यांच्याशी भाषण करू लागलो. त्यामुळे मी दु:खाला पात्र झालो. तपश्चर्या सोडून मी स्त्रिया उत्पन्न केल्या. पण त्या आता मदनाने व्याकूळ झाल्यामुळे मलाच पीडा देऊ लागल्या.

खरोखरच एखाद्या कोळ्याप्रमाणे माझी अवस्था झाली आहे. म्हणून आता मी काय बरे करू ? या सर्व अबलांचा मी त्याग केला तर त्यांचे मनोरथ भंग पावल्यामुळे त्या मला शाप देतील. पण त्यामुळे मला तपासाठी एकांतवासात जाता येईल. म्हणून मी आता त्या सर्वांचा त्याग करतो."

अशा प्रकारे मनात विचार करून तो पुन्हा मनाशी विचार करू लागला, "क्रोध हा एक महाशत्रू आहे. तो कामापेक्षाही अधिक आहे. क्रोधायमान पुरुष हा प्राणनाशक हिंसा करीत असतो. हिंसा ही नरकरूपी उपवनातील विहीर होय. ती सर्व प्राण्यांना दु:ख देते. घर्षणापासून उत्पन्न झालेला अग्नी जसा वृक्षाला दग्ध करतो तसाच क्रोध देहाला दग्ध करतो."

अशा तर्‍हेने विचार मनात येऊन नारायण खिन्न झाला. तेव्हा त्याचा कनिष्ठ भ्राता नर त्याला म्हणाला, "हे महाभाग्यवान महाविचारी नारायणा, क्रोध आवर, शांत राहून अहंकाराचा नाश कर. पूर्वी अहंकारामुळेच आपण केलेले तप व्यर्थ गेले आणि हजारो वर्षे आपणाला प्रल्हाद नावाच्या असुराशी मोठे युद्ध करावे लागले व त्यापासून दु:ख प्राप्त झाले.

म्हणून हे मुनिश्रेष्ठा, क्रोधाचा त्याग कर. मन शांत ठेव. शांतता हेच तपश्चर्येचे मूळ आहे.

त्याचे भाषण ऐकल्यावर तो धर्मपुत्र नारायण शांत झाला आणि संतुष्ट झाला."

व्यासांचे हे भाषण श्रवण केल्यावर राजा जनमेजयाने प्रश्न विचारला, "हे मुनीश्रेष्ठा, त्या महान विष्णूभक्त प्रल्हादाने युद्ध कसे केले ? धर्मपुत्र नर व नारायण हे शांत स्वभावाचे असताना त्या दैत्यपुत्र प्रल्हादाशी का बरे युद्ध केले ? प्रल्हाद, धर्मात्मा, दानशूर, ज्ञानी, विष्णूभक्त असून नरनारायण तपस्वी व सत्वगुणी होते. तेव्हा प्रल्हाद व हे दोघे मुनी यांच्यांत वैर निर्माण होण्याचे कारण काय ? कारण तपश्चर्येमधून श्रमाशिवाय दुसरे कोणतेच फल निष्पन्न होत नाही.

पूर्वी सत्ययुगात लोकांना क्रोध व अहंकार यांवर विजय मिळवता आला नाही. मग असे असता खरी तपश्चर्या कोणत्या युगात आढळेल बरे ? अहंकाराशिवाय क्रोध व मत्सर यांची उत्पत्ती संभवत नाही. काम, क्रोध वगैरे विकार अहंकारापासूनच संभवतात.

सहा हजार कोटी वर्षे तप करूनही जरी अहंकाराचा अंकुर उद्‌भवला तरी सर्व तप व्यर्थ होय. सूर्योदयानंतर अंधकार राहात नाही तसेच अहंकारअंकुरापुढे पुण्याचा टिकाव लागत नाही.

हे महाभाग्यवान व्यासमुने, प्रल्हादाने हरीबरोबर ज्याअर्थी प्रत्यक्ष युद्ध केले त्याअर्थी भूलोकातील सर्व पुण्य व्यर्थ होय. शांतीने राहाणार्‍या नरनारायणांनीही तपाचा त्याग करून युद्ध केले. त्याअर्थी शमदमाने आढळणारे पुण्य अशक्य होय. तेव्हा अहंकार अजिंक्य असताना माझ्या सारख्या पामराची गोष्टच हवी कशाला ?

खरोखरच या त्रैलोक्यात अहंकाराविना कोण बरे आहे ? सर्वस्वी अहंकार त्याग केलेला प्राणी पूर्वीही कधी झालेला नाही. लोहशृंखला अथवा काष्ठपाशांनी बद्ध झालेला प्राणी मुक्त होईल, पण अहंकाराने बद्ध असलेला कधीही मुक्त होणार नाही.

हे मुनिवर्य, ही सर्व चराचरसृष्टी अहंकारयुक्त आहे. ती विष्ठा व मूत्र यांनी दूषित झालेल्या संसारातच भ्रमण करीत असते. म्हणून मोहग्रस्त संसारात ब्रह्मज्ञान कसे बरे संभवेल ?

हे सुव्रत व्यासमुने, सर्वांनी कर्मच करावे हे विचारवंतांचे मत मला योग्यच वाटते. हे महामुने, हे मुनिश्रेष्ठा, मोठमोठे सत्पुरुष जर कामक्रोधांनी युक्त असतात तर माझ्यासारख्या कलियुगात जन्मलेल्या माणसाची कथा कशाला ?"

व्यास म्हणाले, "हे भारतकुलोत्पन्न जनमेजया, कार्य हे कारणाहून वेगळे असत नाही. कडे व कुंडले ही सुवर्णासारखीच असणार. हे सर्व चराचर ब्रह्मांड जर अहंकारापासून उत्पन्न झाले आहे तर ते अहंकाररहित कसे असेल ? पट जर तंतूवरच अवलंबून असेल तर तंतूशिवाय तो संभवणार कसा ?

हे सर्व चराचर जगत् कस्पटासमान असून मायागुणांनी ते युक्त आहे. तेव्हा गुणांशिवाय पुरुष आढळत नाही. ब्रह्माविष्णूमहेशसुद्धा अहंकाराने मोहित होऊन ह्मा अगाध संसारात भ्रमण करतात. या मायामोहात गुरफटणारा देहधारी प्राणी या त्रैलोक्यात कोणीही आढळणार नाही. हे नृपश्रेष्ठा, काम, क्रोध, लोभ व अहंकार यांपासूनच देहधारी प्राण्यांची उत्पत्ती झाली आहे. वेदशास्त्राचे अध्ययन करून, पुराणाचे चिंतन करून तीर्थाटन, दान, ध्यान व देवपूजा करून विषयात रममाण होणारा पुरुष चोराप्रमाणेच असतो व सर्व कार्ये करीत असतो. काम, मोह, मद ह्यांनी युक्त असल्यामुळे त्यांना दुसरा विचार सुचत नाही.

हे कुरुनंदना, कृत, त्रेता व द्वापर या युगातही जर धर्म विद्ध झालेला आहे तर कलियुगात तो अविद्ध कसा आढळेल ? स्पर्धा, द्रोह, लोभ, असहिष्णुता ही सर्व नित्य असतात. म्हणून संसार हा असा परिपूर्ण आहे. यात निर्मत्सर, क्रोध व असहिष्णुता यांवर विजय मिळविलेले पुरुष फारच थोडे."

राजा म्हणाला, "मद, मोह यांपासून अलिप्त, जितेंद्रिय, सदाचरणी असे पुरुष खरोखरच धन्य होत. ते त्रैलोक्य जिंकण्यास समर्थ होतात. हे व्यासमुने, खरोखरच माझ्या पित्याने केलेल्या पापाबद्दल मला अत्यंत खेद होत आहे. निरपराधी मुनीच्या कंठात मृत सर्प अडकविण्याचे महान पाप त्याने केले. मी त्यासाठी काय बरे करू शकेन ? माझी बुद्धी मोहाने विचलित झाल्याने मला सांप्रत काही सुचेनासे झाले आहे.

मोहयुक्त अंतःकरणाच्या पुरुषाला मध दिसत असतो, पण खाली पडायला लावणारा कडा मात्र दिसत नाही. पुरुष निंद्य कर्म करतो, पण नरकाची त्याला भीती वाटत नाही.

हे निष्पाप मुनिश्रेष्ठ, नरनारायणाचे प्रल्हादाबरोबर युद्ध कसे झाले ते आता मला निवेदन करा. प्रल्हाद पातालातून कसा आला ? सारस्वत नावाच्या महातीर्थावर पवित्रतम अशा बद्रिकाश्रमात शांत वृत्तीने राहणारे ते सर्वमान्य महातपस्वी मुनी युद्धास प्रवृत्त कसे झाले ?

हे महामुने, खरोखरच त्यांनी द्रव्यलोभाने युद्ध केले काय ? निरिच्छ असलेल्या नरनारायणांनी हे भयंकर युद्ध कोणत्या कारणासाठी केले ? नारायण हे वस्तुतः सनातन देवच होते. हे माहीत असूनही त्या महात्म्या प्रल्हादाने त्यांच्याबरोबर युद्ध का करावे ? हे ब्राह्मणश्रेष्ठा, या सर्वांचे सविस्तर कारण मला निवेदन करा."



अध्याय सातवा समाप्त

GO TOP