[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]
प्रथम वसंत गंधमादन पर्वतावर गेला. त्यामुळे सर्वत्र सुगंधित पुष्पे व भरपूर वेली यांनी शोभा आली. आम्र, बकुल, तिलक, पलाश, साल, ताल, तमाल, मधूक वगैरे सर्व वृक्ष पल्लवित झाले. कोकिल पक्षांच्या सुस्वर आलापांनी वातावरण भरून गेले. तेथील लताही प्रफुल्लित होऊन वृक्षांना आलिंगन देऊ लागल्या. आपापल्या भार्येवर प्रेम करणारे सर्व प्राणी कामातुर होऊन क्रीडा करू लागले.
सुखावह स्पर्श असलेला दक्षिण वायु सुगंधित होऊन वाहू लागला. इतर मुनींचीही इंद्रिये क्षुब्ध होऊ लागली. मदन रतीसह तेथे येऊन दाखल झाला. आपल्या बाणांनी तो सर्वांना ताडण करू लागला. कुशल रंभा, तिलोत्तमा तालसुरात मधुर गायन करू लागल्या. ते सुमधुर गायन तसेच भ्रमरांचा गुंजारव व पक्षांचे सूर ऐकून ऋषी देहभानावर आले. वसंत ऋतु अकालीच प्राप्त झाल्याने वन प्रफुल्लित झाले होते. त्यामुळे नरनारायण चिंतामग्न झाले. ते विचार करू लागले.
"अकालीच शिशिरऋतु कसा बरे समाप्त झाला ? सर्व प्राणी कामविव्हल कसे झाले ? कालाच्या धर्मात हा विपर्यस्त बदल कसा घडला ?"
या विचाराने नारायणाचे नेत्र विस्मयाने प्रफुल्लित झाले. तो नराला म्हणाला, "हे भ्रात्या, हे वृक्ष एकाएकी प्रफुल्लित दिसत आहेत. कोकिळांच्या आलापांनी वन नादमय झाले आहे. भ्रमरांनी ते युक्त झाले आहे. हे मुने शिशिररूपी प्रचंड राजाचे विहार पलाशपुष्यरूपी नखांनी या सिंहरूपी वसंताने केले आहे.
हे देवर्षे, नवीन पालवी फुटल्यामुळे जिचे कर आरक्त झालेले अशोक वृक्ष आहेत. प्रफुल्लित पलाशवृक्ष जिचे चरण आहेत, विकसित कमले हे जिचे मुख आहे, नीलकमल हे जिचे नेत्र आहेत, बिल्ववृक्षांची फले हेच जिचे स्तन आहेत, पल्लवित कुंद हे जिचे कर्ण आहेत, बंधुजीव हा अधरोष्ठ असून जिचा वर्ण शुभ्र आहे, सिंधुवार वृक्ष हे जिची नखे आहेत, कोकिल पक्षांचा ध्वनी हाच त्या पवित्र देवतेचा स्वर आहे, ती वसंतलक्ष्मी कशी प्राप्त झाली ?
कदंबवृक्ष ही ज्या देवतेची शुभ - वस्त्रे आहेत, मयूरगण हीच जिची भूषणे आहेत, सारस पक्षांचे ध्वनी ह्या जिच्या तोरडया आहेत, वासंतीलता हाच जिचा कमरपट्टा आहे, मंद हंस हीच जिची गती आहे आणि कदंबवृक्ष वस्राचे अधोभागी असलेल्या पुत्रजीव वृक्षरूप रोमपंक्तींनी जी सुशोभित झाली आहे, अशी ही वसंतश्री या बद्रिकाश्रमामध्ये अवेळी प्राप्त झाल्याने मी आश्चर्ययुक्त झालो आहे.
हे ऋषिश्रेष्ठा, सांप्रत विचार कर. आपल्या तपाला ही खरोखरच विघ्न आणणारी आहे. आपले चित्त विचलित व्हावे म्हणून इंद्रानेच हे अप्सरांचे गायन येथे सुरू केले आहे. तसे नसते तर हा ऋतुराज वसंत अकालीच कामवासना उत्पन्न करण्यासाठी का बरे आला असता ? खरोखरच त्या असुरशत्रू इंद्रानेच भयभीत होऊन हे विष्णू आणले आहे असे मला वाटते.
सुगंध, शीत व मनोहर वायूही वाहू लागले आहेत. इंद्राच्या कार्याशिवाय याचे कारण संभवत नाही." असे नारायणाने नराला सांगितले.
त्याच वेळी सर्वत्र मदनाची छाया दृग्गोचर होऊ लागली. ते पाहून नर नारायण दोघेही विस्मित झाले.
मदन, मेनका, रंभा, तिलोत्तमा, पुष्पगंधा, सुकेशी, महाश्वेता, प्रमद्वरा, गानकुशल व मनोहर हास्य करणारी घृताची, चंद्रप्रभा, कोकिलस्वरयुक्त असलेली सोमा, विद्युन्माला, अंबुजाक्षी, कांचमालिनी ह्या अप्सराही त्यांनी तेथे प्राप्त झालेल्या पाहिल्या. त्या सर्वजणी मिळून सोळा हजार पन्नास अप्सरांनी युक्त अशी ती मदनसेना होती.
इतक्यात सुंदर व दिव्य भूषणांनी युक्त असलेल्या पुरुषांना प्रणाम करून त्या अप्सरा उभ्या राहिल्या. त्यानंतर मदनाची वृद्धी करणारे असे सुस्वर गायन त्यानं सुरू केले. ते विष्णुरूप भगवान नर - नारायणांनी श्रवण केले. नारायण मुनी आनंदाने म्हणाला,
"तुम्ही खुशाल गात रहा. मी या ठिकाणी तुमचे उत्कृष्ट आदरातिथ्य करतो. हे सौंदर्यसंपन्न अप्सरांनो, अतिथी या नात्याने तुम्ही स्वर्गातून येथे आला आहात."
त्या नारायण मुनीला अभिमान वाटू लागला. तो मनात म्हणाला, "तपश्चर्येला विघ्न आणण्यासाठी इंद्राने यांना पाठविले आहे काय ? पण या अप्सरा कवडी किंमतीच्या आहेत. खरोखरच मी आता या सर्वापेक्षा सुंदर आणि दिव्य अशी अप्सरा उत्पन्न करतो आणि मी केलेल्या तपाचे सामर्थ्य दाखवतो."
असे मनात म्हणून त्या नारायण मुनीने सहजच आपल्या मांडीवर थाप मारली. त्याचक्षणी एक सर्वांगसुंदर स्त्री उत्पन्न झाली. नारायणाच्या उरूभागापासून ती निर्माण झाल्याने तिला ऊर्वशी हे नाव प्राप्त झाले. त्या सुंदर ऊर्वशीला पाहून सर्व अप्सरा आश्चर्यचकित झाल्या. स्वर्गातून आलेल्या अप्सरांच्या सेवेसाठी नारायणमुनीने त्वरित सोळा हजार पन्नास अप्सरा उत्पन्न केल्या. त्या स्त्रियांनी विविध नजराणे हातात घेऊन त्या मुनींना अभिवादन केले.
ती सुंदर ऊर्वशी पाहून त्या स्वर्गातून इंद्राने पाठविलेल्या अप्सरांनाही भ्रम उत्पन्न झाला व त्या स्वतःच मोहित झाल्या. त्यांची मुखकमले आनंदित झाली. ल्यांच्या तनूवर रोमांच उठले. त्या नरनारायणांना म्हणाल्या,
"खरोखरच, केवढे अद्भूत सामर्थ्य आहे तुमचे ? आपली स्तुती करण्यास कोण बरे समर्थ आहे ? आमच्या मदनबाणांच्या विषाने वास्तविक कोण दग्ध होणार नाही ? पण हे मुनीश्रेष्ठहो, तुम्ही त्या नरहरीच्या अंशातून उत्पन्न झाला आहात. त्यामुळे आपण जितेंद्रिय आहात. आमचे भाग्य म्हणून आम्हाला तुमचे दर्शन घडले. अपराध्याला शाप देण्यास आपण समर्थ असूनही आपले चित्त आपण क्रोधरहित केले आहेत. कारण महासामर्थ्यशाली ज्ञानवंत क्षुद्र फलासाठी तपाचा भंग करीत नाही."
त्या अप्सरांनी स्तुती केल्यामुळे ते दोघेही मुनी प्रसन्न झाले. त्यांनी खरोखरच काम व लोभ यांवर विजय मिळविले होते. अतिशय तप केल्यामुळे त्यांची शरीरे उजळून निघत होती. ते सतेज झाले होते. ते दोघेही संतुष्ट होऊन म्हणाले,
"आम्ही संतुष्ट झालो आहोत. आपणाला इच्छा असेल ते मागून घ्या. ही मनोहर ऊर्वशी तुम्ही बरोबर न्या. आम्ही नजराणा म्हणून हिला इंद्राकडे पाठवीत आहोत. म्हणून हिने आता इंद्राकडे जावे. सर्व देवांचे कल्याण असो. आता तुम्हाला हवे तिकडे तुम्ही गमन करा आणि इथून पुढे कुणाच्याही तपश्चर्येत विघ्न निर्माण करू नका."
मुनींचे हे भाषण ऐकून अप्सरा म्हणाल्या, "हे महाभाग्यवान नारायण मुने, आता आम्ही कुठे जाऊ ? हे सुरश्रेष्ठा, आम्ही अत्यंत भक्तीने येथे आलो आहोत. हे नाथ, हे मधुसूदना, हे कमलनयना, खरोखरच संतुष्ट होऊन तू आम्हाला वर देत असशील तर आम्ही आमची इच्छा सांगतो. हे महातपस्वे, हे देवाधिदेवा, 'तू आमचा पती हो.’ असा वर आम्ही मागत आहोत. हे जगदीश्वरा, आम्ही प्रेमाने तुझी सेवा करू. आपण निर्माण केलेल्या या सुनेत्रा ऊर्वशी व इतर स्त्रियांना हवे तर स्वर्गात पाठवावे. आम्ही स्वर्गातून आणलेल्या सोळा हजार पन्नास अप्सरांना येथेच राहू द्यावे. हे सुरेश्वरा, हे माधवा, आम्ही वर मागितला, तू आपला शब्द खरा कर.
हे देवाधिदेव, मदनाने विवश झालेल्या स्त्रियांचा आशाभंग करणे म्हणजे वधच होय. खरोखरच आमचे भाग्य म्हणून आम्ही स्वर्गातून आलो आहोत. हे सुरेश्वरा, आपण आमचा त्याग करू नका. हे जगदाधिपते, आपण समर्थ आहात."
अप्सरांचे बोलणे ऐकून नारायण मुनी म्हणाला, "हे सौंदर्यसंपन्न अप्सरांनो मी जितेंद्रिय होऊन हजार वर्षे तप केले. त्याचा भंग कसा करू ? जे विषयसुख धर्म व शाश्वत सुखाचा नाश करते त्या सुखाची मला इच्छा नाही. पशूदेखील जे सुख भोगू शकतात असल्या क्षुद्र सुखाची कोणता विचारी पुरुष अपेक्षा करील ?"
अप्सरा म्हणाल्या, "शब्द वगैरे पाच प्रकारच्या विषयसुखामध्ये स्पर्शसुख श्रेष्ठ आहे. सर्व आनंदाचे ते मूळ आहे. म्हणून आपण सांप्रत आमची इच्छा पूर्ण करा. आमच्यासह या गंधमादन पर्वतावर निरंतन विहार करा आणि चिरंतन सुखाचा भोग घ्या. खरोखरच आपण स्वर्गप्राप्तीची इच्छा करीत असाल, तर गंधमादन पर्वतापेक्षा स्वर्ग श्रेष्ठ नाही. म्हणून याच पर्वतावर शुभ ठिकाणी आम्हा सर्व अप्सरांचा आपण उपभोग घेऊन रममाण व्हा."