[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]
राजा जनमेजय म्हणाला, "हे भाग्यवान व्यास, हे सर्व अख्यान ऐकून मी फारच विस्मयचकित झालो आहे. हे महाविचारी मुने, खरोखरच हा संसार पापरूप आहे. म्हणून या संसारातून, बंधनातून पुरुष कसा मुक्त होईल ? त्रैलोक्याचे ऐश्वर्य प्राप्त झाले असताही कश्यपपुत्र इंद्रानेही जर असे निंद्यकर्म केले, तर दुसरा कोण बरे करणार नाही ?
खोटी शपथ घेऊन, सेवेचे निमित्त करून मातेच्या गर्भाशयात प्रवेश करून बालहत्या करणे हे फारच भयंकर असे कुकर्म आहे. पण धर्माचा शास्ता व रक्षक, तसेच त्रैलोक्याचा अधिपती तो इंद्र, त्यानेसुद्धा असले चांडालकर्म केले, तर इतर सुद्धा अयोग्य कर्म का बरे करणार नाहीत ?
हे जगद्गुरो, माझ्या पूर्वजांनीही कुरुक्षेत्रावर भयंकर असे दुष्कर्मच केले आहे. भीष्म, द्रोण, कृप, कर्ण, तसेच धर्माचा अंश असलेला तो युधिष्ठिर, ह्या सर्वांनाही धर्माविरुद्ध वागण्याची वासुदेवानेच प्रेरणा दिली. पण ते सर्वजण, देवाचे अंश, महाज्ञानी, सर्वज्ञ, असे असूनही त्यांनी हे निंद्य कर्म का बरे केले ?
हे भाग्यवान मुने, असे जर असेल तर लोकांचा धर्मावर विश्वास कसा बसावा ? धर्माविषयी माझे मन अतिशय अस्थिर झाले. आप्तवाक्य प्रमाण असे जर मानले तर देहाचेही ठिकाणी तादात्म्यबुद्धी धारण करणारा कोणता आप्त समजावा ? तसा कोणी नाही.
वित्तोपासक पुरुष सर्वदा अनुरक्त असतो. अर्थनाश झाल्यास रागाचे द्वेषांत रूपांतर होते. द्वेषांमुळे स्वार्थी होऊन असत्य भाषण करावे लागते. जरासंधाचा घात करण्यासाठी श्रीहरीने जाणीवपूर्वक कपट करून ब्राह्मण रूप धारण केले. अशावेळी आप्त कुणाला समजावे ? तो सत्त्वमूर्ती वासुदेवसुद्धा असाच ! यज्ञरूप कार्य उपस्थित झाले असता त्या अर्जुनानेही तसलेच वर्तन केले.
खरोखरच, हा राजसूय झाला तरी कशा प्रकारचा ? यज्ञ शांततारहित का केला ? परलोकप्राप्ती, यश, किंवा इतरही कोणत्या फलांची अपेक्षा मनात ठेवून हा यज्ञ पार पाडला ?
सत्य हाच धर्माचा प्रथम पाद आहे. तसेच शौच हा दुसरा पाद होय. दया हा त्याचा तिसरा पाद आहे असे श्रुतिवचन आहे. तसेच दान हा चवथा पाद आहे.
खरोखरच या सर्व पदांवाचून सुसंगत असा धर्म या जगात राहील का ? धर्माविषयी कुणाचीही मती स्थिर नाही.
धर्माशिवाय कर्म फलदायी होणार नाही. छलकांना नष्ट करण्यासाठी जगत्प्रभू विष्णूने वामन अवतार धारण केला.
त्या वामनाने वेदाज्ञा मानणारा, शंभर यज्ञ करणारा बली, त्यालाच कपटाने फसविले धर्मतत्पर, दानशूर, सत्यवचनी, जितेंद्रिय असा तो बली, त्याला विष्णूने स्थानापासून च्युत का बरे केले ?
"हे व्यासमुने, खरोखरच त्या दोघात कोण बरे विजयी झाला ? तो बली विजयी झाला किंवा कपट कर्म करणारा तो वामन विजयी झाला ? म्हणून हे द्विजश्रेष्ठ, फसविणारा विजयी की फसलेला विजयी ? या विषयी आपण सत्य तेच सांगा. कारण आपण पुराणकर्ते, धर्मवेत्ते व महाज्ञानी आहात. म्हणून माझा संदेह नाहिसा करा."
जनमेजयाचे भाषण ऐकून धर्मवेत्ते व्यास म्हणाले, "हे राजेन्द्रा, ज्याने पृथ्वीचे दान दिले, तो बलीच खरोखर जिंकला आहे. तो वामन त्रिविक्रम ह्या नावाने प्रसिद्ध पावला.
हे प्रजाधिपते, हे जनमेजयराजा, हा वामनावतार विष्णूने कपटासाठीच धारण केला होता. शिवाय त्याला द्वापरत्त्व प्राप्त झाले. राजा, सत्य हाच धर्माचा एकमेव आधार आहे. पण हे भूपते, देहधारी प्राण्याला सर्वस्वी सत्याचे अवलंबन करणे खरोखरच दुर्घट आहे.
हे भूपाला, असंख्य रूपांनी युक्त असलेली ती त्रिगुणात्मक माया सर्वात बलशाली आहे. तिने तिन्ही गुणांच्या योगाने हे वैचित्र्यपूर्ण विश्व निर्माण केले
आहे. तेव्हा कपटाचे अवलंबन करणार्या पुरुषाचे हातून अखंड सत्याचे पालन कसे होणार ?"
हे विश्व गुणांच्या मिश्रणातून उत्पन्न झाले आहे. ही स्थिती चिरंतन आहे. आसक्ती, प्रतिग्रह, राग, लोभ ह्यापासून नित्य अलिप्त असलेले वैखानस मुनीच ह्या जगतामध्ये सत्याने परिपूर्ण आहेत. केवळ उदाहरणादाखल म्हणून अशा प्रकारचे मुनी निर्माण होत असतात.
नृपश्रेष्ठा, वेद, पुराणे, धर्मशास्त्र व ह्याबाबतीत जगतामध्ये एक वाक्यता नाही. सगुण पुरुष जे गुणांचे मिश्रण करतो तसे निर्गुणाच्या हातून काही होत नाही. ते सर्वगुण मिश्र असून, परस्परांपासून ते भिन्न नाहीत.
हे महाराजा, या संसारातील मायामोहात गुरफटलेल्या कोणत्याही पुरुषाची अक्षय धर्माचे बाबतीत मती स्थिर नाही. इंद्रिये क्षोभ उत्पन्न करतात, मन त्यामध्ये आसक्त असते, गुणांमुळे मनुष्य एकसारखा प्रेरीत होतो आणि विविध गोष्टी करतो.
हे राजा, ब्रह्मदेव, शंकर वगैरे सर्वच देवदेखील त्या चराचर विश्वासह मायेच्या आधीन असतात. ती माया, त्यांसह सर्व विश्वात क्रीडा करीत असते. ती सर्वांना मोहित करते आणि हे विकारयुक्त जगत ती सर्वदा उत्पन्न करते.
हे राजेंद्रा, कार्यसाधू पुरुष प्रथम सत्यापासून भ्रष्ट होतो. विषयाचेच चिंतन करीत असलेल्या पुरुषाला त्यांची प्राप्ती झाली नाही तर त्या प्राप्तीसाठी ते छलाचे अवलंबन करतात. त्यामुळे सहजगत्या पापाची प्रवृत्ती निर्माण होते. काम, क्रोध लोभ हे सर्वात प्रबल वैरी आहेत. त्याच्या कचाटयात सापडलेल्या पुरुषांना जन्मात येऊन आपण काय केले आणि काय करायचे राहिले हेच समजत नाही.
अशा पद्धतीमुळे असत्याचा विजय होऊन वैभव प्राप्त झाल्यास अहंकार प्रबल होतो. अहंकारापासून मोह आणि मोहाची परिणती नाशात होते. मोह मनात निर्माण झाला की विविध संकल्प - विकल्प मनात वारंवार येऊ लागतात. त्यामुळे ईर्षा, असूया, द्वेष, यांचा अंतःकरणात प्रादुर्भाव होतो
आशा, तृष्णा, दैन्य, दंभ, अधर्मबुद्धी इत्यादी मोहापासून निर्माण होणारे दोष प्राण्यात उत्पन्न होतात. अहंकारग्रस्त पुरुष सर्वदा यज्ञ, दाने, तीर्थयात्रा, व्रते व नियम करू लागतो. पण अहंकाराने केलेले कोणतेही कर्म शुद्ध नसते. राग आणि लोभ यांनी युक्त असलेले कर्म जरी यथासांग असले तरी ते शुद्ध नसते.
प्राज्ञ जनांनी प्रथम द्रव्यशुद्धीकडे लक्ष्य द्यावे. द्रोहाशिवाय मिळविलेले द्रव्य यज्ञकर्मासाठी योग्य द्रव्य होय. द्रोहातून प्राप्त झालेल्या द्रव्याने जरी पुरुषाने यज्ञादी शुद्ध कर्मे केली तरीही परिणामी ते विपरीत फल देते. निर्मल मनाने कर्मे केल्यास कर्त्याला चांगले फल मिळते. विकारयुक्त मनाच्या पुरुषाला असे फल कधीही प्राप्त होत नाही.
आचार्य ऋत्विज यांचेही अनुष्ठानाचे वेळी जर मन शुद्ध असेल तर पूर्ण फल मिळते. देश, काल, क्रिया, द्रव्य, कर्ता व मंत्र ही जर शुद्ध असतील तर कर्माचे फल पूर्ण मिळते. शत्रूनाश किंवा स्वतःची वृद्धी व्हावी म्हणून ज्यावेळी पुरुष कर्म करीत असतो त्याचे फल विपरीत मिळते. स्वार्थी व आसक्ती असलेल्या पुरुषाला शुभ - अशुभ समजतच नाही. तो नित्य दैवाधीन असतो आणि त्याच्या हातून बहुधा पापेच निर्माण होतात.
प्रजापतीपासूनच देव आणि राक्षस वगैरे सर्व प्राणी उत्पन्न झाले आहेत. ते सर्वचजण स्वार्थी असल्याने सांप्रत परस्परविरोधी बनले आहेत. सत्त्वगुणापासून देव, रजोगुणापासून मानव, तमोगुणापासून तिर्यग्योनीतील प्राणी, उत्पन्न झाले असल्याचे, वेदात सांगितले आहे.
सत्त्वगुणोत्पन्न देवांचे व राक्षसांचे नित्याचे वैर आहे. यावरून तिर्यग्योनीतील प्राण्यांच्यातही जाती वैर असल्याबद्दल आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. देवसुद्धा द्रोह, द्वेष, यांपासून अलिप्त नाहीत. ते नित्य तपश्चर्येत विघ्ने आणीत असतात. परस्परांशी विरोधाने वागतात.
हे राजा, हा संसारच अहंकारापासून उत्पन्न झालेला असल्याने तो राग, द्वेष यापासून विरक्त कसा असेल ?