[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]
जनमेजय राजाने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी व्यासमुनी म्हणाले, हे राजा, हरीच्या व देवांच्या अंशावताराची पुष्कळच कारणे आहेत. आता मी तुला वसुदेव, देवकी आणि रोहिणी यांच्या अवताराचे कारण निवेदन करतो.
एकदा त्या महाभाग्यवान कश्यपमुनींनी यज्ञासाठी वरुणाच्या धेनू हरण करून आणल्या. वरुणाने त्या धेनू परत द्याव्यात म्हणून प्रार्थना केली. पण कश्यपांनी त्या परत दिल्या नाहीत. तेव्हा तो ब्रह्मदेवाकडे गेला. अत्यंत खिन्न होऊन त्या विनयशील वरुणाने ब्रह्मदेवाला आपली कहाणी निवेदन केली. तो म्हणाला,
"हे महाभाग्यशाली ब्रह्मदेवा, आता मी काय करू ? हा कश्यपमुनी मत्त झाला असून माझ्या गायी परत देत नाही. म्हणून मी त्याला शाप दिला की, "हे कश्यपा, तू मनुष्ययोनीत गोपाल हो !" तसेच त्याच्या दोघीही भार्यांना मानवयोनी प्राप्त होऊन दु:ख भोगावे लागेल.
माझ्या घरांतील वासरे मातृरहित होऊन आक्रोश करीत आहेत, म्हणून अदिती भूलोकी मृतवंध्या होईल. तिला कारागृहात राहावे लागून, अपार दु:ख सहन करावे लागेल.
जलाधिपती वरुणाचे भाषण ऐकून ब्रह्मदेवाने कश्यपांना बोलावून आणले. ब्रह्मदेव मुनींना म्हणाला, "हे महाभाग्यवान कश्यपमुने, लोकपाल वरूणाच्या धेनू तू का परत दिल्या नाहीस ? तू असा अन्याय का केलास ? हे महाविचारी मुनीश्रेष्ठा, तू सर्वज्ञ असूनही, तसेच न्याय जाणत असूनही, तू परद्रव्याचा अपहार का केलास ?
नंतर तो ब्रह्मदेव स्वतःशीच म्हणाला, "खरोखरच, मोठमोठयांनाही लोभ सुटत नाही. लोभ हा निंद्य असून, पापांची खाण आहे. तो नरकप्रद आहे. त्या लोभाचा त्याग करण्यास कश्यपही असमर्थ आहे. आता मी तरी काय करावे ? प्रतिग्रहापासून अलिप्त होऊन मनोनिग्रहात तत्पर असलेल्या वैखानस मुनींनीच फक्त लोभावर विजय मिळवला. खरोखर ते शांतचित्त मुनी धन्य होत.
या संसारात लोभ हाच बलाढय शत्रू आहे, तो अत्यंत अपवित्र आहे. या कश्यपाचाही दुष्ट लोभाशी स्नेह जडला, म्हणून तो दुराचारी झाला.
असा विचार करून त्या मर्यादारक्षक ब्रह्मदेवानेही प्रत्यक्ष आपल्या परमप्रिय नातवाला, त्या कश्यपमुनीला सत्वर शाप दिला,
"पृथ्वीवर तू यदुकुलात भार्यासह जन्माला येशील आणि तू गोपालाचा धंदा करशील."
भूमीवरील भार हरण करण्यासाठी अवतार व्हावा म्हणून वरुणाने व ब्रह्मदेवाने कश्यपाला शाप दिला. त्याचवेळी संतप्त होऊन दीतीनेही अदितीला शाप दिला.
"तुझे सात पुत्र निपजताक्षणीच मरतील."
हे ऐकून, जनमेजय पुनः संशयात पडला. तो म्हणाला, "हे मुनीश्रेष्ठा, दीतीने आपल्या भगिनीला त्या इंद्रमातेला शाप कसा दिला ? आपण मला त्याचे कारण निवेदन करा."
परीक्षितपुत्र जनमेजयाने सत्यवतीपुत्र व्यासमुनींना अशा प्रकारे प्रश्न विचारला. तेव्हा व्यासमुनींनी राजाला त्याचे कारण सांगितले.
दीती व अदीती या दक्षाच्या दोन्ही कन्या कश्यपाच्या भार्या होत्या. त्यांचे आचरणही उत्तम होते. अदीतीला इंद्र नावाचा बलाढय पुत्र झाला. तेव्हा तसाच शौर्यसंपन्न पुत्र आपणाला व्हावा असे दीतीला वाटले. ती आपल्या पतीला म्हणाली, "हे पूज्य, बलशाली, इंद्राप्रमाणे प्रतापी, वीरश्रेष्ठ, धर्मतत्पर, असा पुत्र आपण मला द्या."
तिचे बोलणे ऐकून कश्यप म्हणाले, "हे कांते तू निश्चिंत रहा. मी तुला व्रत सांगतो. ते पूर्ण केल्यास तुलाही तसाच पुत्र होईल."
तेव्हा तिनेही ते उत्कृष्ट व्रत केले. नंतर कश्यपमुनींपासून तिला मनोहर गर्भ राहिला. पयोव्रतात तत्पर राहून ती भूमीवर शयन करीत असे. तसेच पवित्र
मनाने ती उपदिष्ट मंत्राचा जप करी. तेव्हा अतिवीर्यवान गर्भ राहिल्याने ती शुभ्र वर्णाची दिसून अत्यंत तेजोनिधी झाली व तळपू लागली. ते पाहून अदिती दुःखी झाली. तिने विचार केला, 'खरोखर हिला जर इन्द्रतुल्य पुत्र झाला तर आपल्या पुत्राचे तेज कमी होईल.’
ती अभिमानी अदिती आपल्या इन्द्र नावाच्या पुत्राला म्हणाली, "हे पुत्रा, दीतीच्या गर्भात अत्यंत वीर्यवान पुत्र, तुझा शत्रू निर्माण झाला आहे. म्हणून तू शत्रूनाशासाठी काही तरी उपाय कर. हे कल्याण, तू कसेही करून तो गर्भ नाहीसा केला पाहिजेस. खरोखरच त्या कृष्णवर्ण नेत्रांच्या त्या सवतीस पाहून माझ्या मनात भवितव्याविषयी चिंता निर्माण झाली आहे, कारण सवत माझ्या सुखावरच घाव घालील असे मला वाटते. शत्रू जर क्षयरोगाप्रमाणे वाढला तर तो नाहीसा करणे अशक्य असते. म्हणून बुद्धिमान पुरुषाने शत्रूचा जन्म होताच त्याला नाहीसा करावा.
हे इन्द्रा, तिच्या उदरातील गर्भ, एखाद्या लोखंडाच्या सूळाप्रमाणे माझ्या हृदयास सलत आहे. म्हणून कोणताही उपाय करून तो गर्भ तू आजच पाडून टाक. हे महाभाग्यवान पुत्रा, तुला माझे म्हणणे ऐकायचे असेल, तर साम, दाम अथवा बल यापैकी कोणत्याही मार्गाने तू दीतीच्या गर्भाचा नाश कर.
आपल्या मातेचे हे भाषण ऐकून इंद्राने मनातच विचार केला. तो आपल्या सावत्र मातेजवळ गेला. त्याने तिच्या चरणांना स्पर्श केला. आणि आपल्या विषतुल्य पण मधुर वाणीने तो म्हणाला, "हे माते, तू व्रत केल्यामुळे देहाने क्षीण झाली आहेस. तू सांप्रत फारच अशक्त दिसत आहेस. तेव्हा तुझी सेवा करावी म्हणून मी येथे आलो आहे. म्हणून हे माते मी तुझी काय सेवा करू ?"
"हे पतिव्रते, मी तुझे पाय चेपण्याची इच्छा करीत आहे. कारण गुरुसेवेमुळे पुण्य मिळून अक्षय गती प्राप्त होते. खरोखरच अदिती व तुझ्यामध्ये माझ्या मनात यत्किंचितही भेदभाव नाही. हे मी तुला शपथपूर्वक सांगत आहे."
असे सांगून इंद्र दीतीचे पाय चेपू लागला. दीती व्रतामुळे कृश व श्रांत होऊन पहुडली होती. त्यामुळे इंद्राच्या सेवेने ती सुखावली व त्या सुलोचनेला विश्वासामुळे निद्रा आली. दीतीला निद्रिस्त झाल्याचे पाहून इंद्राने सूक्ष्म रूप धारण केले. हातात वज्र घेऊन त्याने अत्यंत सावधान चित्ताने तिच्या देहात प्रवेश केला. योगबलाने देहात प्रवेश करताच त्याने सत्वर या गर्भाचे सात तुकडे केले.
वज्राचा प्रहार होताच गर्भाशयातील बालक रडू लागले. इंद्राने हळूच त्याला न रडण्याविषयी सांगितले. नंतर त्या सातही तुकडयांचे त्याने प्रत्येकी सात सात तुकडे केले. तेव्हा त्यामुळे एकूणपन्नास मरूद्गण निर्माण झाले. थोडयाच वेळात ती सुंदरी जागृत झाली. इंद्राचे कपट तिने जाणले. ती दु:खी व कुद्ध झाली. आपल्या भगिनीचे हे कर्म तिला कळले. तेव्हा सत्यव्रत असलेली ती दीती क्रुद्ध होऊन तिने अदीतीला व इंद्राला शाप दिला. ती म्हणाली,
"माझ्या गर्भातील पुत्राचे, तुझ्या पुत्राने ज्या अर्थी तुकडे तुकडे केले, त्यासाठी त्याचे त्रैलोक्याचे राज्य नष्ट होवो. इंद्राने व अदीतीने पापाचरणाने माझ्या गर्भावस्थेतील पुत्राचा वध केला म्हणून तुझेही पुत्र जन्मतःच सर्वदा नष्ट होतील. तू पुत्र शोकाने व्याकूल होऊन कारागृहात राहशील. शिवाय दुसर्या जन्मीही तुझी मुले जगणार नाहीत."
असा दीतीने शाप दिल्यावर तो ऐकून विनयसंपन्न असा मरीचीपुत्र कश्यप तिला म्हणाला, "हे कल्याणी, तू क्रुद्ध होऊ नकोस. तुझे सर्व पुत्र मरुत् म्हणून अतिशय सामर्थ्यशाली देव होतील. तसेच हे सुंदरी अठ्ठाविसाव्या द्वापर युगात, अदिती मनुष्य जन्मात जाऊन, तुझा हा शाप भोगील. कारण वरुणानेही क्रुद्ध होऊन तिला शाप दिला आहे. म्हणून दोघांच्याही शापामुळे हिला मनुष्ययोनीत जन्म घ्यावा लागेल."
आपल्या पतीचे हे आश्वासन ऐकून दीती संतुष्ट झाली. त्यामुळे त्या श्रेष्ठ स्त्रीने कसलेही कटू भाषण केले नाही.
हे जनमेजयराजा, कश्यपमुनींच्या पूर्वशापाचे कारण मी तुला सांप्रत कथन केलेले आहे. हे नृपश्रेष्ठा, ती अदितीच स्वत:च्या अंशरूपाने देवकी म्हणून जन्माला आली.