[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]
अशारीतीने राजा परीक्षिताचा पुत्र जनमेजय हा संशय सागरात बुडाला असता, त्या संभाषण चतुर व वेदवेत्त्यांमध्ये श्रेष्ठ अशा व्यासांनी सुरेख भाषण करून राजाच्या संशयाचे परिमार्जन केले.
व्यास जनमेजयाला त्याचवेळी म्हणाले, "हे राजेंद्रा, आता तुला काय सांगू ! खरोखर कर्मगती ही देवांनाही आकलन होत नाही. मग मानवांची गोष्ट कशाला ! हे त्रिगुणात्मक ब्रह्मांडही कर्मयोगानेच निर्माण झाले आहे. कर्मयोगामुळे उत्पन्न होणारे बीज हे प्रस्तुतः उत्पत्ती व नाशविरहित आहे. नानाप्रकारच्या योनीमध्ये जन्म घेऊन ते पुनःपुनः मरते व जन्मास येते.
कर्मावाचून देह संयोग असंभवनीय आहे. शुभ, प्रारब्ध, भक्ती, अशा प्रकारची कर्मे आहेत. त्यासह देहातही तीन प्रकारची कर्मे आहेत. हे प्रजाधिपते, प्रत्यक्ष ब्रह्मदेवही, सर्व प्राणी कर्माच्या आधीन आहेत.
सुख, दुःख, जरा, मृत्यू, हर्ष, शोक, खेद, काम, क्रोध, लोभ हे गुण देहाचे आहेत. हे राजा, प्रत्येकाचे ठिकाणी असलेले हे गुण कर्माधीन आहेत. या रागद्वेषादि मनोवृत्ती स्वर्गातही आहेतच. देव, मानव तिर्यग्योनी वगैरेचे सर्व मनोविकार देहाबरोबरच उत्पन्न होत असतात. पूर्व वैरामुळेच ते त्या प्राण्यांना प्राप्त होतात.
हे राजा, कर्माशिवाय प्राण्यांची उत्पत्ती अशक्य. केवळ कर्मगतीमुळे सूर्यही भ्रमण करीत असतो. चंद्र क्षयरोगी झाला, रुद्र कपाली झाला. त्याच कर्मगतीमुळे स्थावर जंगमात्मक विश्व प्रवाहरूपाने शाश्वत आहे. जगत नित्य वा अनित्य आहे याविषयी विचार करण्यात मुनी व्यग्र आहेत. पण अद्यापी त्यांना खात्रीपूर्वक ज्ञान झाले नाही.
तेव्हा हे भूपेंद्रा, कार्यकारण भाव असतानाच तेथे कर्माचा अभाव आहे असे कसे होईल ? सर्वामध्ये अनित्य म्हणून प्राज्ञजनांनी समजणे अशक्य आहे.
हे राजा, हे जगत् कर्माने बद्ध आहे. ते अनेक धर्मांनी बद्ध असलेल्या अनेक योनीतून भ्रमण करीत असते. अद्भुत तेजाने युक्त असलेल्या विष्णूचा जन्म जर त्याचे स्वाधीन असता, तर त्याला निरनिराळ्या नीच योनीमध्ये का बरे जन्म घ्यावा लागला असता ? वैकुंठात राहून नाना भोग भोगायचे सोडून तो, मूत्रपुरी असलेल्यात या वराह योनीत त्रस्त होऊन का बरे राहिला असता ?
पुष्पे वेचण्याची लीला, जलक्रीडा, सुखासन ह्यांचा त्याग करून बुद्धिमान पुरुष गर्भाशयरूप गृहात वास्तव्य करण्याचे मनात का बरे आणील ? मृदु व सुंदर अशी शय्या सोडून, अधोमुख होऊन गर्भाशयात राहणे कोणता शहाणा पुरुष मान्य करील ?
नानारस युक्त गीते, नृत्ये, वाद्ये, सोडून नरकात वास्तव्य करण्याची कोण बरे इच्छा करील ? त्याग करण्यास अशक्य अशा लक्ष्मीसह विलास करण्याचे सोडून मूत्ररूप रस सेवन करण्याचे कोण मनात आणील ? खरोखर गर्भवास हा सर्वात जास्त दु:ख देणारा एक नरकच आहे. गर्भवास नको म्हणून तर मुनी तपश्चर्या करीत असतात.
हे राजा, विचारी लोक, राजेही राज्यत्याग करून त्यातून मुक्त होण्यासाठी वनात जातात. त्यातच पुन: जन्म घेणे कुणाला आवडेल ?
हे राजा, गर्भाशयात कृमी चावत असतात. जठराग्नीचा ताप दुःसह होत असतो, गर्भ भयंकर त्रासाने वेष्ठित असतो. तेव्हा, तेथे कोणते सुख आहे ? कारागृहात कल्पपर्यंत वास्तव्य करणे बरे, पण गर्भवास नको. कोणत्याही योनीत क्षणभरही वास्तव्य करू नये.
गर्भवासातले दहा महिने अत्यंत भयंकर होत. त्या योनीयंत्रातून बाहेर पडताना केवढे दु:ख भोगावे लागते. बालपणी बोलता येत नाही. काही समजत नाही, म्हणून दु:ख असतेच. कारण क्षुधा, तृषा बालपणी व्यक्त करता येत नाहीत. त्यामुळे प्राणी पूर्णपणे परतंत्र व भित्रा असतो.
भुकेने मूल रडू लागताच मातेला वाटते याला काही तरी झाले आहे, तेव्हा ती त्याला औषध देण्याचे मनात आणते. अशी ही विविध दुःखे बालवयात भोगावी लागतात. तेव्हा असे असताना प्राज्ञ जन कोणत्या सुखाची इच्छा करून योनीत जन्म घेण्यास उद्युक्त होतील ?
निरंतर सुखाचा त्याग करून मानवी योनीत अथवा अन्य जन्म घेऊन, देवासह युद्ध करणे हे कोण इच्छिल ? असे इच्छिल तो मूर्ख होय.
हे नृपश्रेष्ठा, कृतकर्मे घडल्यामुळेच ब्रह्मदेवादि देवांना सर्वसुखे प्राप्त झाली आहेत. हे राजेंद्रा, मनुष्य, देव, तिर्यग् योनी यांपैकी कोणताही प्राणी असला तरी शुभ वा अशुभ कर्माचे फल हे देहधारी प्राण्यांना भोगावे लागते. तपश्चर्या, दान, यज्ञ ह्याच्या योगाने मानवाला इंद्रपदही प्राप्त होते. तसेच पुण्याचा क्षय झाल्यावर इंद्रही स्वस्थानापासून पतन पावतो, हे नि:संशय.
रामाच्या अवताराच्या वेळी देव वानर झाले. कृष्णाला सहाय्य देण्यासाठी ते यादव झाले. तसेच ब्रह्मदेवाची प्रेरणा होऊन धर्मरक्षणासाठी श्रीहरीने निरनिराळ्या योनीत अवतार धारण केले. हे राजेश्वरा, रथचक्राचे जसे फेरे होत असतात, तसेच या श्रीहरीचे निरनिराळ्या योनीत सर्वदा अवतार होत असतात.
अंशात्मक जन्म घेऊन त्या श्रीहरीला पृथ्वीवरील दैत्यांचा वध करण्यासाठी युद्ध करावे लागते. म्हणून ती कृष्णजन्माची शुभ कथा तुला आता मी कथन करतो. हे राजा तू श्रवण कर.
तो भगवान विष्णूच कश्यप मुनीचा अंश असलेल्या यदुकुलात वासुदेव म्हणून जन्मास आला. हे राजा, पूर्व शापामुळे तो वृत्तीने पशुपाल झाला. हे भूपेंद्रा, अदिती व सुरसा अशा कश्यपाच्या दोन भार्या होत्या. त्या देवकी आणि रोहिणी या नावाने भूमीवर अवतीर्ण झाल्या. कारण त्यांना शाप झाला होता. त्या बहिणी होऊन जन्माला आल्या, वरुणानेच रागाला येऊन त्यांना शाप दिला होता, असे मी ऐकले आहे."
जनमेजय हे ऐकून विचारात पडला. त्याने व्यासांना प्रश्न विचारला.
"हे महाविचारी व्यासमुने, महर्षी कश्यपांकडून असा कोणता अपराध घडला होता ? त्यांना स्त्रियांसह शाप का प्राप्त झाला ?
सर्व युगे आदि व अंत अशी धारण करणारा तो सुरेश्वर नारायण, अविनाशी प्रभू षड्गुणैश्वर्ययुक्त असताना, त्याला कोणाची आज्ञा पालन करावी लागते ? स्वस्थानाचा त्याग करून कर्मबद्ध प्राण्यांमध्ये तो का बरे जन्म घेतो ? मनुष्यदेहप्राप्त झाल्यावर तो देवतुल्य वर्तन करतो आणि मानव योनीत जन्मास येऊनही पुरुष मात्र नाना प्रकारची कर्मे करीत असतो.
काम, क्रोध, असहिष्णुता, शोक, वैर, भीती, सुख, दु:ख, दैन्य, सरलता, दुष्कृत्य, सुकृत विश्वसनीय भाषण, हनन, पोषण, चलन, ताप, विचार, वल्गना, लोभ, दंभ, मोह, कपट, विलाप, विलास अशा तर्हेच्या इतरही गोष्टी या जन्मात कर्माने बद्ध असतात.
अविनाशी सुखाचा त्याग करून तो भगवान विष्णू या गुणदोषयुक्त मानव जन्मात का बरे जन्म घेतो ? हे मुनीश्वर, मनुष्य जन्मात येऊन भूतलावर कोणते सुख प्राप्त होते ? हा हरी प्रत्यक्ष गर्भवास का बरे पत्करीत असतो ? गर्भदु:ख, जन्मदुःख, बालपणाचे दुःख, त्यानंतर यौवनावस्थेतील कामविकार व त्यामुळे होणारे दुःख, गृहस्थाश्रमात कुटुंब पोषणार्थ होणारे दु:ख ही सर्व दुःखे मानव योनीत असताना तो भगवान विष्णू यात का बरे अवतार घेतो ? हे द्विजश्रेष्ठा, याविषयी आपण मला आता सांगा.
ज्याच्यापासून ब्रह्मदेवाची उत्पत्ती झाली त्या हरीने रामावतारात वनवासात दारुण दुःख भोगले. त्याला सीताविरहाचे दु:ख झालेच. त्याला सदैव युद्ध करावे लागले, त्या पतीव्रता कांतेचाही त्याग करावा लागला. ही सर्व दुःखे त्याने सहन केली.
कृष्णावतारामध्ये त्याला कारागृहामध्ये जन्म घ्यावा लागला, गोकुळात जावे लागले, गुरे राखावी लागली. अत्यंत कष्टाने कंसाचा वध करावा लागला. पुनः द्वारवतीला यावे लागले. अशा प्रकारची अनेक दुःखे त्याला भोगावी लागली.
हे सर्वज्ञ मुने, असा कोणता ज्ञानी पुरुष स्वेच्छेने या दुःखांची इच्छा करील ? तेव्हा हे सर्वश्रेष्ठ आपण माझा हा संशय दूर करा.
इति श्रीमद्देवीभागवते महापुराणेऽष्टादशसाहस्र्यां सहितायां ॥
चतुर्थस्कन्धे कर्मणो जन्मादिकारणत्वनिरूपणं नाम द्वितीयोऽध्यायः ॥ २ ॥
अध्याय दुसरा समाप्त