[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]
जनमेजयाने विचारले, "हे सत्यवतीपुत्रा, हे मुनीश्रेष्ठ, हे सर्वज्ञाननिधे, हे निष्पाप, हे प्रभो, हे अस्मदीय कुलवर्धक, मी आपणाला काही प्रश्न विचारू इच्छितो. त्या श्रीमान महाप्रतापी शुरसेनाचा पुत्र वसुदेव, हा अनकदुंदुभी या नावाने प्रसिद्ध होता. श्रीहरी त्याचा पुत्र झाला असे मी ऐकले आहे. तो वसुदेव देवांनाही पूज्य होता. पण हे श्रेष्ठा, तो वसुदेव आपली भार्या देवकीसह, त्या कंसाच्या कारागृहात कसा गेला ? कंसाचा त्याने कोणता अपराध केला होता ? त्या ययाति कुलोत्पन्न कंसाने वसुदेव देवकीच्या सहा बालकांचा नाश का केला ?
तसेच त्या भगवान वासुदेवाचा जन्म कारागृहात का झाला ? तो प्रख्यात यादवाधिपती गोकुळात कसा गेला ? प्रत्यक्ष क्षत्रिय कुलात जन्मास येऊनही लौकिक दृष्टया त्या वैश्यकुलात का जन्माला आला ? तो श्रीकृष्ण अत्यंत तेजस्वी असताही मातेच्या उदरामध्ये असताना तो आपल्या मातापित्यांची त्या शृंखलेतून, का बरे सोडवणूक करू शकला नाही ?
प्रत्यक्ष परमात्मा वासुदेव, वसुदेवाच्या पोटी जन्माला आला असताही, दुर्घट असे कोणते पातक त्या मातापित्याच्या हातून घडले होते ? ते पुत्र कोण होते ? कंसाने शीळेवर आपटत असतानाही निसटून आकाशवाणी रूप होणारी ती बाला कोण ?
हे निष्पाप, तसेच तो अनेक भार्यांनी युक्त असलेला श्रीहरी, त्याचा देहत्याग, याविषयी आपण मला कथन करा. खरोखरच आजवर मी इतरांकडून ऐकलेले वासुदेवाचे चरित्र मनोहर आहे. आपण मला ते विस्ताराने कथन करा. धर्मपुत्र महात्मे, पुरातन, श्रेष्ठ देवर्षी नरनारायणांनी उत्कृष्ठ तप केले. बद्रीकाश्रमात राहून निराहार, मनोनिग्रही कामक्रोध इत्यादी षड्रिपूवर विजय मिळवून ते राहिले. ते विष्णूअंश मुनी नरनारायण उत्कृष्ठ तप करीत होते.
नारदमुनींनी सर्व मुनींना सांगितले होते तेच कृष्णार्जुन म्हणून अंशत: अवतार होत. पण हे मुनीश्रेष्ठा, त्याचे नरनारायण हा एक देह कायम असता त्यांना दुसरी शरीरे कृष्णार्जुन म्हणून कशी प्राप्त झाली. ज्या श्रेष्ठ मुनींनी मुक्तीसाठी योगासह दारुण तप केले, त्या महातपस्यांना देह प्राप्ती कशी झाली ?
शूद्राने जर स्वधर्माचे आचरण उत्तम केले तर तो क्षत्रीय होतो. स्वधर्मानुचरण तत्पर व शत्रुवृत्ती असलेला शूद्र मृत्यूनंतर द्विजाचा जन्म प्राप्त होतो. ब्राह्मणाने शांत चित्ताने स्वधर्म आचरण केल्यास तो या भवसागरातून मुक्त होतो. पण तपःसामर्थ्याने स्वतःला शुद्ध करून घेतल्यावर ते नरनारायणमुनी पुन: क्षत्रिय झाले, याचे मला आश्चर्य वाटते आहे. त्यांना कुणाचा तरी शाप झाला की काय ?
हे व्यासमुने, हे सर्व चरित्र सविस्तरपणे ऐकण्याची माझी इच्छा आहे. एका ब्राह्मणांचा शाप झाल्यामुळे संपूर्ण यादव कुलाचा नाश झाला, असे माझ्या ऐकण्यात आहे. तसेच गांधारीच्या शापामुळे कृष्णाच्या कुलाचा नाश झाला असे समजते.
हे मुने, शंबराने प्रद्युम्नाला का हरण करून नेले ? प्रत्यक्ष देवाधिदेव तो भगवान जनार्दन त्यावेळी विद्यमान असताना, त्याच्या वाडयातून, प्रत्यक्ष द्वारकेच्या किल्ल्यातून त्या सूतिका गृहातून त्या पुत्राचे कसे हरण झाले ? दिव्यदृष्टी असलेल्या वासुदेवाला हे समजले कसे नाही ?
हे ब्राह्मणश्रेष्ठा, मला फारच संशय वाटू लागला आहे. हे प्रभो, आपण सर्व सविस्तर सांगून माझा संदेह दूर करा. भगवान श्रीकृष्ण स्वर्गास गेल्यावर चोरांनी त्याच्या भार्यांना लुटले. खरोखरच ही घटना मनाला क्षोभ देणारी आहे. तो शूरकुलात जन्मलेला कृष्ण विष्णूचा अंश असून भूमीचा भार हलका करण्याकरता त्याने भीतीने मथुरेच्या राज्याचा त्याग का बरे केला ?
हे ब्राह्मणश्रेष्ठा, तो आपले सर्व सैन्य व आप्तेष्टांना घेऊन द्वारवती नगरीस का गेला ? त्या भगवंताचा अवतारच जर भूमीचा भार हरण करण्याकरता, दुष्टांचा नाश करण्याकरता, तसेच धर्माला स्थैर्य आणण्याकरताच झाला होता, मग असे असून त्याने चोरांचा नाश का केला नाही ? तो सर्वज्ञ असताही आपल्या भार्या लुटल्या जात आहेत हे त्याला समजले नाही, हे कसे शक्य आहे ?
भूभार हलका करण्याकरता, ज्याने भीष्म व द्रोण यांचाही वध केला. त्याने चोरांचा नाश कसा केला नाही, आश्चर्य नव्हे काय ? धर्मतत्पर सदाचारी, कृष्णभक्त अशा महात्मा पांडवांचे कृष्णाने रक्षण केले. राजसूय यज्ञ करून आणि उत्तमोत्तम दक्षिणा देऊन त्यांनी आपले श्रेष्ठत्व सिद्ध केले. तें पांडवही देवाचेच अंश होते. पण ते कृष्णाच्या आश्रयाने राहिले, तरीही त्यांना भयंकर दुःखे का भोगावी लागली ? त्यांची पुण्ये कोणीकडे गेली ? एवढी महादुःखे भोगायला लागावी अशी कोणती घोर पापे त्यांनी केली ?
ती भगवती द्रौपदीही देवीचा अंश असूनही ती पतिव्रता प्रत्यक्ष वेदीतून निघाली होती. ती कृष्णाची परम भक्त होती. तरीही तिला अनंत दुःखे भोगावी लागली. असे का व्हावे ? दुःशासनाने तर भरसभेत तिची वेणी ओढली. त्यावेळी ती रजस्वला होती. पण दु:शासनाने तिला एकवस्त्रावर भरसभेत आणली. विराट नगरीत तिला राजाची दासी होऊन राहावे लागले. कीचकाने तिच्याशी अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. तसेच एकदा जयद्रथानेही तिचे हरण केले. पण बलाढय पांडवांनी तिला पुन: सोडवून आणले.
तेव्हा हे महाबुद्धीमान मुनीश्रेष्ठा, पांडवाना इतकी संकटे भोगायला का लागली ? त्यांनी पूर्व जन्मी कोणती महाघोर पातके केली होती. माझ्या त्या पूर्वजांनी राजसूय यज्ञ केल्यावरही त्यांना फारच दु:ख भोगायला का लागले, हे समजत नाही. पण हे ब्राह्मणश्रेष्ठा, त्या देवांच्या अंशांना असली लौकिक दुःखे का भोगावी लागली ? याबद्दल मला फारच संशय प्राप्त झाला आहे. सदाचरण संपन्न पांडवांनी धनाच्या लोभाने भीष्मद्रोणांचा वध केला.
प्रत्यक्ष भगवंताने तसे करण्याविषयी त्या पांडवांना प्रेरणा दिली. त्या श्रीहरीच्या सहाय्याने त्यांनी प्रत्यक्ष कुलक्षय केला. खरोखर वीरश्रेष्ठांचा वध करण्यापेक्षा सज्जनांनी भिक्षेवर आपली उपजिविका करावी.
हे मुनिश्रेष्ठा, त्या जवळ जवळ नष्ट झालेल्या वंशात, आपण शत्रूंचा नाश करणारे गोळकपुत्र उत्पन्न केलेत, व कुलाचे रक्षण केलेत. पण त्याच वंशांत जन्मलेल्या परीक्षित राजाने तापसाच्या गळ्यात सर्प बांधण्याचे पाप केले.
क्षत्रिय कुलात जन्मास आलेल्या पुरुषांपैकी ब्राह्मणाचा द्वेष कोणीही करीत नाहीत. पण माझ्या पित्याने मात्र हे घोर पातक केले खरे. हे मुनी, खरोखरच अशा प्रकारच्या अनेक शंकांनी मी गोंधळून गेलो आहे. तेव्हा आपण माझे मन या संशयातून निवृत्त करा. हे दयानिधे, आपण सर्वज्ञ आहात.
इति श्रीमद्देवीभागवते महापुराणेऽष्टादशसाहस्र्यां संहितायां ॥
चतुर्थस्कन्धे जनमेजयप्रश्नो नाम प्रथमोऽध्यायः ॥ १ ॥
अध्याय पहिला समाप्त