[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]
ह्याप्रमाणे विचार करीत ते रामलक्ष्मण स्वस्थ बसले असता, अकस्मात आकाशातून भगवान नारद ऋषी तेथे अवतीर्ण झाले आणि सुस्वरांनी भूषित असलेले प्रचंड वीणा वाद्य वाजवीत व साम गान करीत ते रामासमीप आले. ते दृष्टीस पडताक्षणी महातेजस्वी राम उठला. त्याने त्यांना शुभ वृषभ अर्पण केला. त्यांना आसन, अर्घ्य व पाद्य देऊन त्यांचा सत्कार केला. ह्याप्रमाणे उत्कृष्ट पूजा केल्यानंतर त्यांचा सत्कार केला. ह्याप्रमाणे उत्कृष्ट पूजा केल्यानंतर तो राम हात जोडून उभा राहिला आणि नारदमुनींनी आज्ञा केल्यावर, तो हरि त्यांच्या समीप बसला.
तेव्हा अनुज्ञांसह मनामध्ये दुःखी होऊन बसलेल्या त्या रामाला मुनीश्रेष्ठ नारद प्रेमाने कुशल प्रश्न करून म्हणाले, "राघवा, एखाद्या प्राकृत जनाप्रमाणे तू का बरे शोकाकुल झाला आहेस ? दुरात्म्या रावणाने सीता हरण करून नेल्याचे मी जाणत आहे. मी स्वर्ग लोकामध्ये गेलो असता तेथे, स्वतःचे मरण न जाणणार्या पुलस्त्यनंदन रावणाने मोहामुळे जानकीला हरण केल्याचे वृत्त, श्रवण केले. हे प्रजाधिपते, ककुत्स्थकुलोत्पन्न रामा, रावणाच्या मृत्युकरताच तुझा अवतार आहे व एतदर्थच त्याने जानकी हरण केली आहे.
पूर्वजन्मी ही जानकी तपश्चर्या करणारी मुनिकन्या होती, ती सुहास्यवदना वनामध्ये तपश्चर्या करीत बसली असताना रावणाच्या दृष्टीस पडली. नंतर हे राघवा, 'माझी भार्या हो' म्हणून रावणाने तिची प्रार्थना केली असता तिने त्याचा धिक्कार केला. परंतु त्याने बलात्काराने तिची वेणी धरली. तेव्हा हे रामा, तपश्चर्या करणारी ती मुनिकन्या अतिशय क्रुद्ध झाली. परपुरुषाच्या स्पर्शाने दूषित झालेल्या आपल्या देहाचा त्याग करण्याचे, तिने मनामध्ये निश्चित केले व शाप देण्याच्या उद्देशाने ती त्याला म्हणाली, "हे दुरात्म्या, मी देहत्याग करून पुढील जन्मी तुझ्या नाशाकरता भूतलावर अयोनिसंभव अशी श्रेष्ठ स्त्री होईन." असा शाप देऊन तिने तत्काळ देहाचा त्यागही केला. कारण कामवासनायुक्त अशा परपुरुषाचा देहाला स्पर्श झाला असताही तो अत्यंत दूषित होतो हा पतिव्रताधर्म पूर्वीपासून भरतखंडामध्ये प्रचलित आहे.
ती ही लक्ष्मीच्या अंशाने अवतीर्ण झालेली जानकी पुष्पमाला म्हणून मोहाने नागीण हरण करणार्या एखाद्या पुरुषाप्रमाणे, कुलाच्या नाशाकरता त्या रावणाने हरण करून नेली आहे. हे ककुत्स्थकुलोत्पन्न रामा, त्या रावणाच्या नाशाकरता देवांनी जन्मरहित असलेल्या श्रीहरीची प्रार्थना केली असता त्याच्याच अंशाने अजवंशामध्ये तुझा अवतार झाला आहे.
हे महापराक्रमी रामा, धैर्य धर ! पतिव्रताधर्माविषयी परम तत्पर व तुझ्याच अधीन असलेली ती सीता रात्रंदिवस तेथे तुझे चिंतन करीत राहिली आहे. स्वतः इंद्राने कामधेनूचे दूध पात्रामध्ये घालून पिण्याकरता तिच्याकडे पाठवले, तेव्हा ते अमृततुल्य दुग्ध तिने प्राशन केले. ती कमलनयन सीता कामधेनूचे दुग्ध प्राशन केल्यामुळे, क्षुधेसबंधी व तृषेसंबंधी दुःखविरहित झालेली आहे.
हे राघवा, त्या रावणाच्या नाशाकरता मी आज तुला एक उपाय कथन करतो. तू सांप्रत आश्विन महिन्यामध्ये, श्रद्धा धारण करून, देवीचे व्रत कर. हे रामा, नवरात्रोपवास करून जपहोमपूर्वक शास्त्रोक्त विधानाने, भगवतीचे पूजन केले असता, ती सर्व सिद्धी देते. याशिवाय पशूच्या योगाने देवीला बलिदान करून, जप करून तू हवन केलेस म्हणजे चांगला समर्थ होशील. पूर्वी ब्रह्मा, विष्णू महेश्वर आणि स्वर्गामध्ये असलेला इंद्र ह्यांनी हे व्रत केले होते. हे रामा, सुखी पुरुषाने हे शुभ नवरात्रव्रत करावे. संकटात सापडलेल्या पुरुषाने तर ते विशेषतः करावे. हे काकुत्स्था, विश्वामित्र, भृगु, वसिष्ठ व कश्यप ह्यांनीही हे व्रत केले आहे.
स्त्री हरण झाल्यावर गुरुनेही हेच महाव्रत केले होते. हे राजेंद्रा, रावणाच्या वधाकरता तू हे व्रत अवश्य कर. वृत्रनाशाकरता इंद्राने व त्रिपुरनाशाकरता शिवानेही हे उत्कृष्ट व्रत पूर्वी केले असून, मधुदैत्याच्या नाशाकरता मरुपर्वतावर विष्णूनेही हेच केले. हे काकुत्स्था, दक्ष राहून तूही हे व्रत यथाविधी कर."
श्रीराम म्हणाले, "हे दयानिधे, आपण सर्वज्ञ आहा. ती देवी कोण ? तिचा प्रभाव काय आहे ? ती कोठून उत्पन्न झाली ? तिने नाव काय आहे ? तिचे व्रत कोणते ? हे आपण यथाविधी मला कथन करावे."
नारद म्हणाले, हे रामा, ऐक तर. ती देवी सनातन व आद्यशक्ति आहे. तिचे सर्वदा पूजन केले असता सर्व दुःखांचा नाश करून, ती सर्व मनोरथ परिपूर्ण करीत असते. ब्रह्मादि सर्व जंतूचे कारण तीच असून, हे रघुवंशजश्रेष्ठ, तिच्या शक्तीवाचून चलनवलन करण्यास कोणीही समर्थ होत नाही. विष्णूची पालनशक्ती, माझ्या पित्याची कर्तृशक्ति व रुद्राची नाशशक्ति तीच असून, परब्रह्मशक्तिही तीच होय.
त्रैलोक्यामध्ये कोणत्याही ठिकाणी कोणतीही वस्तू असली तरी तिची शक्ती, ती देवीच होय. म्हणून तिची उत्पत्ती कोठून असणार ? ब्रह्मा, विष्णू महेश्वर, सूर्य, इंद्रप्रभूती सर्व देव, पृथ्वी व पर्वत यापैकी जेव्हा कोणीच नव्हते. तेव्हा युगाचे पूर्वी ती निर्गुण व कल्याणी, पूर्ण प्रकृती, परमात्मारूप पुरुषांशी संयुक्त क्रीडा करीत होती. नंतर ती सगुण होऊन प्रथम ब्रह्मादिकांना उत्पन्न करते आणि सर्व शक्ती त्यांना देऊन त्रैलोक्यास उत्पन्न करते. तिचे ज्ञान झाले असता प्राणी जन्मरूप संसार बंधनापासून मुक्त होतो.
वेदाहूनही ती आद्य, वेदकारिणी व परम विद्या अशी तीच आहे. गुणकर्मभेदाने ब्रह्मादिकांनी खरोखर तिची नावे असंख्य कल्पिलेली आहेत. म्हणून मी तुला काय बरे सांगू ? हे रघुनंदना, अ पासून ज्ञ पर्यंत स्वरांचा व वर्णांचा संयोग केल्याने तिचीच असंख्य नावे होत असतात.
राम म्हणाले, "हे विप्रर्षे, आपण थोडक्यात मला ह्या व्रताचा विधी सांगा म्हणजे मी आजच त्या प्रमाणे श्रद्धापूर्वक देवीचे पूजन करतो."
नारद म्हणाले, "हे रामा, समप्रदेशावर पीठ करून आणि त्या पीठावर जगदंबिकेची स्थापना कर. नंतर तू यथाविधी नऊ उपवास कर. हे भूपाला ह्या अनुष्ठानासंबंधाने तुझा आचार्य मी होईन. कारण, देवकार्य सिद्धीस जाण्याकरता मीही प्रयत्न करणे अवश्य आहे."
त्या नारदमुनीच्या भाषणावर विश्वास ठेवून प्रतापी श्रीहरी रामाने शुभ पीठ करवले. त्या पीठावर अंबिकेची स्थापना करून, त्याने तिचे यथाविधी पूजन केले. नंतर लवकरच अश्विनमास प्राप्त झाला असता त्या श्रेष्ठ पर्वतावर रामाने उपोषित राहून, ते उत्कृष्ट शारदीय नवरात्रव्रत केले. नारदमुनींना संमत असलेले ते व्रत, त्या उभयता भ्रात्यांनी होम, बलिदान व पूजन हे यथाविधी करून प्रेमाने शेवटास नेले.
ह्याप्रमाणे पूजन झाले असता, सिंहारूढ झालेल्या त्या भगवती देवीने, अष्टमीचे दिवशी त्या मध्यरात्री त्या दोघांना दर्शन दिले. पर्वतशिखरावर स्थित असलेली देवी, त्यांच्या भक्तिभावाने संतुष्ट होऊन, मेघासारख्या गंभीर वाणीने, लक्ष्मण व रामाला म्हणाली, "हे पराक्रमी रामा, मी आज तुझ्या व्रताने संतुष्ट झाले आहे. म्हणून तुझ्या मनात जे असेल त्याविषयी तू खुशाल माग. ह्या निष्पाप मानववंशामध्ये तू नारायणाच्या अंशाने उत्पन्न झाला आहेस. रावणाच्याच वधाकरता देवांनी तुझी प्रार्थना केली आहे.
पूर्वी मत्स्यरूप धारण करून, त्या घोर राक्षसाचा तू वध केलास व देवांचे हित करण्याच्या इच्छेने वेदांचे रक्षण केले आहेस. नंतर कूर्मरूप स्वीकारून तू मंदार पर्वत धारण केलास, आणि समुद्रमंथन करून देवांचे पोषण केलेस. हे रामा, नंतर वराहरुप धारण करून व दंताग्राने पृथ्वी उचलून तू हिराण्याक्षाचा वध केलास. नंतर हे रघुवंशज रामा, नारसिंहरूप स्वीकारून तू हिरण्यकशिपूचा वध केलास व प्रल्हादाचे रक्षण केलेस.
देवकार्य सिद्धीस नेण्याकरता इंद्राचा तू कनिष्ठ भ्राता झालास. वामनरूप धारण करून पूर्वी बलीचा छळ केलास. नंतर तू माझ्या, विष्णूच्या अंशाने युक्त होऊन जमदग्निपुत्र झालास. क्षत्रियांचा नाश करून द्विजांना पृथ्वीचे दान दिलेस. त्याचप्रमाणे हे ककुत्स्थकुलोत्पन्न रामा, रावणाने सर्व देवांना अतिशय पीडा केल्यामुळे, त्या देवांनी प्रार्थना केल्यावरून, तू सांप्रत दशरथाचा पुत्र झाला आहेस. हे पुरुषश्रेष्ठा, महाबलाढ्य, देवांश माझ्या शक्तीने युक्त असे हे कपी तुला साहाय्य करतील. तुझ्यापेक्षा लहान असलेला हा तुझा भाता लक्ष्मण, शेषाचा अंश आहे, हाच रावणपुत्राचा नाशक होईल. हे निष्पाप रामा, ह्याविषयी तू मुळीच मनामध्ये संशय आणू नको. आता वसंतऋतूमध्ये तू अतिशय श्रद्धेने माझे पूजन कर. म्हणजे तू पापी रावणाचा वध करून, यथेष्ट राज्य करशील. हे रघुवंशज श्रेष्ठ, अकरा हजार वर्षेपर्यंत तू भूतलावर राज्य करून पुनरपि स्वर्गाला जाशील."
असे सांगून देवी अंतर्धान पावली. रामाने मनामध्ये प्रसन्न होऊन, ते व्रत संपूर्ण केले. दशमीचे दिवशी विजयापूजन करून व अनेक दाने देऊन, त्याने तेथून प्रयाण केले. नंतर वानराधिपतीच्या सैन्याने युक्त, प्रकट झालेल्या परम शक्तीने प्रेरित, पूर्णकाम आणि प्रख्यात कीर्तीने युक्त अशा लक्ष्मणासह असलेला तो लक्ष्मीपती राम दक्षिण समुद्रतीरी जाऊन पोहोचला.
समुद्रामध्ये सेतु बांधून तो समुद्राच्या परतीरी असलेल्या लंकेत गेला आणि त्याने देवशत्रु रावणाचा वध केला.
देवीचे हे उकृष्ट चरित्र जो पुरुष भक्तीने श्रवण करतो तो ह्या लोकी विपुल भोग भोगून परमपदाला प्राप्त होतो, इतर पुराणे विस्तृत व पुष्कळ आहेत, परंतु ती ह्या श्रीमद्भागवताची बरोबरी करणारी नाहीत, असे माझे मत आहे.