[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]
ते त्याचे निंद्य भाषण श्रवण केल्याबरोबर, जानकी भयाने विव्हल होऊन कापू लागली. मन स्थिर करून ती म्हणाली, "हे पौलास्त्य, कामवासने मोहित होऊन तू हे असे निंद्य भाषण करीत आहेस ? मी स्वैरिणी नसून जनकाच्या कुलामध्ये उत्पन्न झालेली आहे. हे रावणा, तू लंकेमध्ये जा, नाही तर राम तुझा वध करील. माझ्याकरता तुला मरण येईल, ह्यात संशय नाही." असे म्हणून पर्णकुटीकेमध्ये अग्निजवळ गेली.
इतक्यात स्वतःचे रूप प्रकट करून तोही पर्णकुटीकेसमीप गेला. त्या रडत असलेल्या सीतेला त्याने बलात्काराने धरले. त्या वेळी, "रामा, रामा ! लक्ष्मणा, धावा !" असा ती वारंवार आक्रोश करीत होती. सीतेला रथावर घेऊन तो सत्वर निघून गेला.
जाता जाता अरुणपुत्र जटायूने मार्गामध्ये त्याला अडवले. तेव्हा वनामध्ये, त्या उभयतांचा महाभयंकर संग्राम झाला. त्या संग्रामात राक्षसाधिपती रावणाने जटायूचा वध केला. आक्रोश करीत असलेल्या सीतेला त्याने लंकेमध्ये नेले व अशोक वनामध्ये तिला ठेवले. राक्षसीणींचा पहारा बसवला. नंतर सामदामादि उपायही त्याने योजले, परंतु ती आपल्या वर्तनापासून ढळली नाही.
रामाने त्या मृगाचा वध केला व त्याला घेऊन तो परत फिरला तो मार्गामध्येच लक्ष्मण येत असल्याचे त्याच्या दृष्टीस पडले. तेव्हा "त्या दुष्ट पाप्याचा शब्द ऐकून, हे बांधवा, तू हे भलतेच काय केलेस ? अरे प्रियेला एकटी टाकून तू येथे का आला आहेस ?" असे रामाने त्याला विचारले तेव्हा लक्ष्मण म्हणाला, "हे प्रभो सीतेच्या वाग्बाणांनी ताडित झाल्यामुळे मी निःसंशय येथे आलो." नंतर ते उभयता अतिदुःखित होऊन पर्णकुटिकेकडे आले. पण सीता तेथे नाही असे आढळून आल्यावर तिच्या शोधाकरता उभयताही प्रयत्न करण्यास उद्युक्त झाले. शोधता शोधता जेथे तो जटायुपक्षी केवळ धुगधुगी राहून भूतलावर पडला होता. तेथे ते आले. जटायू म्हणाला, "आज रावणाने ती जनकन्या हरण करून नेली. मी त्या दुरात्म्याला अडवून धरले; परंतु युद्धामध्ये त्याने मला चित केले." असेक बोलून त्याने लागलीच प्राणत्याग केला.
नंतर रामाने त्याचा और्द्धदेहिक संस्कार केला. तो रामलक्ष्मणासह तेधून निघून गेला. जाता जाता त्या रामप्रभूने कबंधाचा वध करून त्याला शापापासून मुक्त केले. त्याच्या सांगण्यावरून रामाने सुग्रीवाशी सख्य केले. नंतर वीर वालीचा रामाने वध केला. सुग्रीवाला त्याने किष्किंधेचे उत्कृष्ठ राज्य दिले. नंतर रावणाने हरण केलेल्या प्रिय जानकीचे मनामध्ये चिंतन करीत तो राम लक्ष्मणासह पर्जन्य कालातील चार महिने तेथेच राहिला.
अखेर सीतेच्या विरहाने दुःखीत झालेला राम लक्ष्मणाला म्हणाला, "हे लक्ष्मणा, आता मात्र कैकेयीचे मनोरथ परिपूर्ण झाले. कारण, जानकी प्राप्त झाली नाही, तर खरोखर तिच्याशिवाय मी जिवंत राहणार नाही. या जनककन्येवाचून मी अयोध्येलाही परत जाणार नाही. राज्य गेले ? वनवास भोगावा लागला ! पिता स्वर्गस्थ झाला, प्रियाही रावणाने हरण करून नेली. मला पीडा देणारे हे दुष्ट दैव पुढे आणखी काय काय करणार आहे हे कळत नाही.
हे भरतानुजा लक्ष्मणा, भवितव्य खरोखर प्राण्यांना पूर्वी समजणे दुर्घट आहे. बा लक्ष्मणा, अत्यंत दुःखदायक अशी आपली यापुढे स्थिती होणार ? मनुवंशात उत्पन्न झालेले आपण उभयताही राजपुत्र असून, पूर्व कर्मामुळे वनामध्ये अतिशय दुःख भोगत आहोत. हे सुमित्रानंदना, दैवयोगामुळे तूही भोगाचा त्याग करून माझ्यासह मंदिराबाहेर पडला आहेस. आता तुलाही दुस्तर दुःखाचाच उपभोग घेणे भाग आहे.
माझ्यासारखा दुःखी, दरिद्री, असमर्थ व क्लेशग्रस्त पुरुष आपल्या कुलामध्ये पूर्वी कोणीही झाला नाही. पुढे कोणी होणार नाही. हे सुमित्रानंदना आज मी काय करू ? दुःखसागरामध्ये मी मग्न झालो आहे. खरोखर साहाय्यरहित असलेला मला तरणोपाय नाही. हे अनुजा, द्रव्य व बल ह्यापैकी काहीच नसून, तू एकच मला अनुयायी आहेस. तेव्हा हे वीरा, स्वतःच्या कृतीमुळे प्राप्त झालेल्या ह्या भोगाबद्दल, मी आज कोणावर क्रुद्ध व्हावे ? इंद्रसभेची बरोबरी करणारे राज्य हस्तगत झाले असून, ते एका क्षणात नाहीसे होऊन, वनवास प्राप्त झाला. दैवाने नेमलेले जाणण्यास कोण बरे समर्थ आहे ? बालपणामुळे, वैदेही आपल्याबरोबर वनवासास निघाली; परंतु त्या तरुणीला तर
दुर्देवामुळे आपल्यापेक्षाही अधिक दुःखदशा प्राप्त झाली. लंकाधिपति रविणाच्या घरी त्या तरुणीला आता दुःख भोगावे लागेल. ती सुशीला व पतिव्रता असून, माझ्यावर अत्यंत प्रेम करणारी आहे. हे लक्ष्मणा, वैदेही त्याला वश होणार नाही. ती सुंदरी जनककन्या जारिणी स्त्रीप्रमाणे कशी बरे वागेल ?
हे भरतानुजा लक्ष्मणा, रावण बलात्कार करू लागल्यास ती प्राणत्याग करील. पण त्याला वश होणार नाही, हे अगदी निश्चित. हे वीरा, जानकी मृत झाली तर मी निःसंशय प्राणत्याग करीन. कारण हे लक्ष्मणा, कृष्णवर्ण नेत्रप्रांतांनी युक्त असलेली जानकी मृत झाल्यावर ह्या देहाशी मला काय कर्तव्य आहे !"
ह्याप्रमाणे कमलनयन राम विलाप करू लागले असता धर्मात्मा लक्ष्मण सांत्वन करीत त्यांना म्हणाला, "हे महापराक्रमी राजा, भित्रेपणा सोडून ह्या प्रसंगी तुम्ही धैर्य धरा. त्या राक्षसाधमाचा वध करून मी जानकीला परत आणीन. विचारी पुरुष विपत्तीमध्ये व संपत्तीमध्ये धैर्याने वागत असतात. परंतु मंदमति पुरुष वैभवकालीही दुःखामध्ये मग्न असतात. संयोग व वियोग ह्या दोन्ही गोष्टी दैवाधीन आहेत. ह्या दोहोंचाही संबंध आत्म्याशी मुळीच नसून फक्त देहाशीच आहे. त्यासंबंधाने शोकाचे अवलंबन का बरे करता ?
राजधानी सुटून ज्याप्रमाणे वनामध्ये वास्तव्य व वैदेहीचे हरण, ह्या गोष्टी घडल्या. त्याचप्रमाणे चांगला काळ आला असता, ह्याचा समागमही होईल. सुखदुःखाची समाप्ति भोगानेच व्हायची असते. भोगाशिवाय ती कधीही नाश पावत नाहीत. तेव्हा हे जानकीपते, तुम्ही आता शोकाचा त्याग करा. सुदैवाने सुग्रीवाचे साहाय्य आपणास मिळाले आहे. त्याचे वानरही पुष्कळ आहेत. हे चोहोकडे जातील व जानकीचा शोध करतील.
जानकी जेथे आहे तिकडील मार्ग समजून घेऊन मी तेथे जाईन, पराक्रम करून त्या दुष्कर्मी रावणाचा वध करीन. जानकीला परत आणीन. हे ज्येष्ठबंधो, व्यर्थ का बरे दुःख करीत आहा ? प्रसंग पडल्यास सैन्यासह व शत्रुघ्नासह भरतालाही आणून आपण त्या शत्रूचा वध करू. हे रघुवंशज रामचंद्रा, पूर्वी रघूने केवळ एकाच रथाच्या योगाने सर्व दिशा पादाक्रांत केल्या होत्या, तेव्हा त्याच्याच वंशामध्ये जन्मास आलेले आपण आहात. आपणास दुःख करीत बसणे कसे बरे योग्य होईल ? मी एकटाही सर्व देवदैत्यांचा पराजय करण्यास समर्थ आहे. मग आपले साहाय्य असल्यावर कुलकलंकी रावणाच्या पराजयाविषयी शंका पाहिजे कशाला ?
हे रघुनंदन रामा, फार काय सांगू ? साहाय्या करता जनकालाही आणून, मी त्या देवकंटक दुराचारी रावणाचा वध करीन, हे रघुनंदना, चाकाच्या अराप्रमाणे सुखानंतर दुःख व दुःखानंतर सुख प्राप्त होत असते. त्यापैकी एकच कधीही कायम राहात नाही. हे आपण जाणतच आहा. सुख अथवा दुःख प्राप्त झाले असता ज्याचे मन अतिशय भित्रे असते तो कधीही सुखी न होता, सर्वदा शोकसागरामध्येच मग्न असतो.
हे रघुनंदना, इंद्रालाही पूर्वी संकट प्राप्त झाले होते आणि त्या वेळी सर्व देवांनी नहुषाची स्थापना इंद्रपदावर केली होती. त्या वेळी भयभीत झालेल्या इंद्राने आपल्या स्थानाचा त्याग करून अनेक वर्ष पर्यंत, कमलामध्ये राहून, अज्ञातवास स्वीकारला होता. पुढे काल फिरताक्षणीच, त्याला स्वतःचे स्थान पुनरपि प्राप्त झाले व विप्रशापामुळे नहुष अजगराकृति होऊन, भूमीवर पडला.
रावणाप्रमाणे त्या वेळी त्या नहुषराजाने इंद्राणीविषयी कामवासना धरून ब्राह्मणांचाही अवमान केल्याकारणाने, अगस्तिमुनीच्या क्रोधामुळे तो सर्प झाला. हे राघवा, संकट प्राप्त झाले असता विचारी पुरुषाने शोकाचे अवलंबन न करता उद्योगाकडे मन लावून राहावे. हे महाभाग्यवान जगदीशा, आपण सर्वज्ञ असून समर्थ आहा. एखाद्या सामान्य जनाप्रमाणे स्वतःसंबंधाने का बरे अतिशय दुःख करीत आहा ?
लक्ष्मणाच्या ह्या भाषणाने रामाला बोध झाला. प्रचंड शोकाचा त्याग करून, तो निश्चिंत झाला.