[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]
जनमेजयाने विचारले, "हे भगवन् व्यास, रामाने ते देवीचे सुखप्रद व्रत कसे केले ? तो राज्यभ्रष्ट कसा झाला ? आणि सीता त्याने पुनरपी कशी आणली ? हे सर्व मला सांग."
व्यास म्हणाले, "दशरथराजा नावाचा पूर्वी एक अयोध्यापति होऊन गेला. तो राजा देवब्राह्मणांना मान देणारा असून सूर्यवंशामध्ये श्रेष्ठ होता. त्याला राम लक्ष्मण, भरत व शत्रुघ्न असे चार लोकविख्यात पुत्र झाले. ते सर्वही राजाचे प्रिय करणारे असून गुणांनी व रूपाने त्याच्यासारखेच होते. राम हा कौसल्येचा पुत्र असून भरत कैकयीचा पुत्र होता आणि लक्ष्मण व शत्रुघ्न हे उभयता सुमित्रेपासून झालेले मनोहर व जुळे मुलगे होते.
ते बाल असतानाच धनुर्बाण धारण करून शौर्य दाखवू लागले. त्या सुखवर्धक राजपुत्रांचा पुढे उपनयनसंस्कार झाला. पुढे एके दिवशी विश्वामित्राने येऊन दशरथापाशी यज्ञ रक्षणार्थ त्याचा सोळा वर्षांचा पुत्र जो रघुनंदन राम त्याची याचना केली व त्या दशरथानेही लक्ष्मणासह रामाला त्या विश्वामित्रमुनींबरोबर पाठविले आणि त्यांच्याबरोबर मार्गाने जाऊ लागले. जाता जाता मार्गामध्ये घोरमुद्रेने युक्त व मुनींना सर्वदा दुःख देणार्या, ताटकाराक्षसीचा रामाने एकाच बाणाच्या योगाने वध केला आणि कपटी सुबाहूचा वध करून विश्वामित्राच्या यज्ञाचे रक्षण केले. नंतर बाणांच्या योगाने मारीच राक्षसाला फेकून देऊन रामाने त्याचा वध केला.
अशाप्रकारे, मोठा पराक्रम करून यज्ञरक्षण केल्यानंतर ते राम, लक्ष्मण व विश्वामित्र सर्वही मिथिला नगरीला गेले. जाता जाता त्या अहिल्या नावाच्या गौतमस्त्रीला शापमुक्त करून रामाने निष्पाप केले. विश्वामित्र मुनीसह ते रामलक्ष्मण मिथिलानगरीला गेल्यानंतर जनकाने पणाला लावलेल्या त्र्यंबकचापाचा भंग करून, रामाने रमेच्या अंशाने अवतीर्ण झालेली जनककन्या जी सीता तिचे पाणिग्रहण केले.
नंतर जनकराजाने उर्मिला नामक आपली कन्या लक्ष्मणाला दिली. नंतर सुशील व शुभलक्षणांनी युक्त असे जे उभयता भ्राते भरत शत्रुघ्न त्यांना अनुक्रमे मांडवी व श्रुतकीर्ती ह्या कुशद्धजराजाच्या दोन कन्या प्राप्त झाल्या. ह्याप्रमाणे त्या चार भ्रात्यांचे शास्त्रोक्त विधीप्रमाणे मिथिलानगरीमध्ये विवाह झाले.
नंतर आपला पुत्र राज्याला योग्य आहे असे अवलोकन करून दशरथ राजाने राज्यभार रामावर टाकण्याचे मनामध्ये आणले. सर्व तयारी झालेली पाहून कैकयीने स्वाधीन असलेल्या आपल्या भर्त्याजवळ त्याने पूर्वी देऊ केलेले दोन वर प्राप्त होण्याविषयी प्रार्थना केली. एका वराने, तिने आपल्या भरत नामक महात्मा पुत्राला राज्य मागितले आणि दुसर्या वराने रामाकरता तिने चवदा वर्षेपर्यंत वनवास मागून घेतला. तेव्हा तिच्या आज्ञेप्रमाणे लक्ष्मण व सीता ह्यांसह राम दंडकारण्यामध्ये गेला.
दशरथराजा पुत्रविरहाने व्याकुळ झाला आणि पूर्वी श्रावणाने दिलेल्या शापाची आठवण करीत करीत त्याने प्राण सोडला. नंतर मातेच्या कृतीने पिता मृत झाल्याचे आढळून आल्यावर भ्रात्याचे प्रिय करण्याकरता म्हणून भरताने त्या समृद्ध राज्याचा स्वीकार केला नाही.
इकडे राम पंचवटीत वास्तव्य करीत असताना मदनाने व्याकूळ झालेली रावणाची जी कनिष्ठ भगिनी शूर्पणखा तिला त्याने वनामध्ये विरूप करून टाकले. तेव्हा नाक कापलेल्या त्या शूर्पणखेला अवलोकन करून खरप्रभूती निशाचरांनी महातेजस्वी रामाशी अतुल संग्राम केला. परंतु मुनीचे हीत करणार्या त्या सत्यपराक्रमी रामाने त्या अति बलाढ्य खरादि दैत्यांचा वध केला. तेव्हा विरूप झालेली ती शूपर्णखा लंकेमध्ये गेली आणि रामाच्या हातून खरदूषणांचा वध झाल्याचे, तिने रावणाला निवेदन केले. तो आघात ऐकल्यावर दुष्ट रावणही क्रोधाधीन झाला, रथारूढ होऊन तो मारीचाश्रमामध्ये गेला.
नंतर सीतेला फसविण्याकरता असंभवनीय अशा सुवर्णमृगाचे रूप, त्या मायावी मारीचाला देऊन रावणाने रामाला आश्रमातून दूर नेण्याकरता, त्याला पंचवटीकडे पाठविले. तोही मायावी मारीच सुवर्णमृग होऊन सीतेच्या दृष्टीस पडला. अत्यंत आश्चर्यकारक अवयवांनी युक्त झालेला तो मारीच सीतेच्या फारच जवळ संचार करू लागला. तो दृष्टीस पडताक्षणी दैवाची प्रेरणा झाल्यामुळे सीता रामाला म्हणाली, "हे कांत, ह्या मृगाचे चर्म मला कंचुकी करण्याकरता आपण घेऊन या."
असे नवर्याला स्वाधीन ठेवणार्या मानी स्त्रीप्रमाणे ती रामाला म्हणाली असता, रामही विचार न करता लक्ष्मणाला तेथे ठेवून व धनुर्बाण घेऊन मृगाच्या मागोमाग निघाला. कोट्यवधी मायांमध्ये निपुण असलेला तो मृगरूप मारीच, राम दृष्टी पडताक्षणी वारंवार दृश्य व अदृश्य होत होता.
असा तो दुसर्या वनात निधून गेला. नंतर मृग हस्तगत झाला, असे समजून रामाने आपले धनुष्य क्रोधाने ओढले आणि अति तीष्ण बाणाच्या योगाने त्या कृत्रिम मृगाचा वध केला. ह्याप्रमाणे त्या रामाच्या हातून प्रचंड सामर्थ्यामुळे त्याचा वध झाला. परंतु मरता मरता अत्यंत दुःखित झाला असूनही, त्या मायावी, नश्वर व दुष्ट राक्षसाने, 'हे लक्ष्मणा धाव, मेलो' असा मोठ्याने आक्रोश केला. तो करूण स्वर सीतेच्या कानावर येता क्षणीच, हा रामाचा स्वर आहे, असे तिला वाटले. सीता आपल्या दीराला, लक्ष्मणाला म्हणाली, "हे लक्ष्मणा, तू सत्वर जा, त्या रघुनंदनाचा वध होत आहे. तो तुला हाक मारीत आहे, हे सुमित्रानंदना, तू सत्वर साहाय्य करण्यास तिकडे जा."
लक्ष्मण म्हणाला, "हे माते, रामाचा वध होणे शक्य नाही. आश्रमामध्ये आज तुला एकटी टाकून मी जाणार नाही. हे जनककन्ये, "येथेच राहा" अशी मला रामाची आज्ञा झाली आहे. ती आज्ञा उल्लंघन करण्याचे मला भय वाटत असल्यामुळे मी तुला सोडून जाणार नाही. मायावी राक्षसाने रामाला दूर नेले आहे. हे ज्या अर्थी मला समजले आहे. त्या अर्थी हे माते, मी खरोखरच तुला एकटीला वनामध्ये सोडून एक पाऊलदेखील कोठे जाणार नाही. तू धीर धर, आज या भूतलावर रामाचा वध करणायास कोणीही समर्थ नाही. असे मी समजत आहे. म्हणून रामाच्या आज्ञेचे उल्लंघन करून, तुला येथे टाकून मी जाणार नाही."
तेव्हा उत्कृष्ट दंतांनी युक्त असलेली ती सीता परम शांत असूनही, दैवाची प्रेरणा झाल्यामुळे शुभ लक्षणांनी युक्त असलेल्या, त्या लक्ष्मणाला क्रूर शब्दांनी म्हणाली, "हे लक्ष्मणा, माझ्यावर तुझी पापदृष्टी आहे, भरताने पाठविल्यावरूनच तू केवळ माझ्याकरताच अरण्यामध्ये आला आहेस, हे मी जाणून आहे. परंतु हे कपटी, हे अधमा, मी तशा प्रकारची जारिणी स्त्री नव्हे. राम मृत झाल्यावर मी कामवश होऊन तुला पति करणार नाही. राम न येईल तर मी प्राणत्याग करीन. वियुक्त व अत्यंत दुःखित झालेली मी त्याला सोडून जिवंत राहणार नाही. हे लक्ष्मणा, तू जा अथवा राहा ! तुझा उद्देश मला समजत नाही ? अरे बंधुप्रेम दाखवणार्या अधमा, ते तुझे धर्मनिष्ठ असे, ज्येष्ठ भ्रात्याचे ठिकाणी असलेले प्रेम, खरोखर ह्या वेळी कोठे गेले ?"
हे तिचे भाषण श्रवण करताक्षणी लक्ष्मण मनामध्ये खिन्न झाला, त्याचे नेत्र अश्रूंनी पूर्ण भरले. कंठ दाटून आला. तो त्या जनककन्येला म्हणाला, "हे भूमिकन्ये, मला उद्देशून खरोखर अत्यंत क्रूर व मिथ्या असे हे भाषण, तू केले आहेस. तू हे काय म्हणत आहेस ? ह्यावरून तुझ्यावर काही तरी अत्यंत अनिष्ट प्रसंग ओढवणार आहे, असे माझ्या बुद्धीला वाटते." असे म्हणून, लक्ष्मणाने तिचा तेथे त्याग केला. शोकाकुल झालेला तो वीर अतिशय रडत रडत ज्येष्ठ भ्रात्याची उमटलेली पावले शोधीत शोधीत चालू लागला. लक्ष्मण तिकडे गेल्यानंतर कपटी रावण यतिवेष धारण करून, त्या आश्रमामध्ये आला. तेव्हा तो खरोखर यति आहे असे सीतेला वाटले. तिने त्या दुरात्मा रावणाचे, वनातील पदार्थांनी पूजन केले. त्याला भिक्षा अर्पण केली. त्यावेळी नम्रपणाने व मृदुस्वराने तो दुरात्मा तिला विचारू लागला, "हे कमललोचने, तू कोण आहेस ? हे प्रिये वनामध्ये तू एकटी का ? हे सुंदरी, तुझा पिता कोण ? भ्राता कोण ? पति कोण ? हे वरवर्णिनी, तू एखाद्या चुकलेल्या स्त्रीप्रमाणे येथे का बरे एकटी उभी आहेस ? हे प्रिये, राजवाड्यात बसण्यास तू योग्य असताना निर्जन अरण्यात का बरे राहिली आहेस ? देवकन्येप्रमाणे तुझी कांति असताना मुनिपत्नीप्रमाणे पर्णकुटीकेमध्ये तू का बरे रहात आहेस ?
हे त्याचे भाषण श्रवण केल्यानंतरही, तो मंदोदरीचा पति रावणच, दिव्य यतिरूपधारी आहे, असे न समजता दुर्दैवयोगाने तो खराच यति आहे, अशी सीतेची समजूत झाली. ती त्याला म्हणाली. "दशरथ म्हणून एक श्रीमान् राजा होऊन गेला. त्याला चार पुत्र आहेत. त्यांपैकी राम ह्या नावाने, अतिविख्यात असलेला जो ज्येष्ठपुत्र तो माझा पति होय. दशरथराजाने कैकयीला वर दिल्यामुळे तिने चौदा वर्षेपर्यंत वनामध्ये घालवून दिलेला माझा पति राम लक्ष्मणासह येथे वास्तव्य करीत आहे.
सीता म्हणून अति विख्यात असलेली मी जनककन्या आहे. लीलेने त्र्यंबकचापाचा भंग करून रामाने माझ्याशी विवाह केला आहे. रामाच्या बाहुबलामुळे आम्ही या वनामध्ये निर्भय राहत आहो. सुवर्णमृग अवलोकन करून त्याचा वध करण्याकरता माझा पती गेला आहे, लक्ष्मणही भ्रात्याचा ध्यनि ऐकून सांप्रत तिकडेच चालता झाला आहे. त्यांच्या बाहुबलामुळे मी ह्या ठिकाणी निर्भयपणे राहत आहे. मी सर्व वृत्तांत आपणाला कथन केला आहे. ते येथे आल्यावर आपले यथाविधी पूजन करतील. आपण विष्णूस्वरूप यति असल्यामुळे, मी आपले पूजन केले आहे. हा आश्रम राक्षसांनी व्याप्त असलेले घोर वनामध्ये आहे. म्हणून मी आपणाला विचारते, ते आपण सत्य सांगावे. त्रिदंडीरूपाने अरण्यात आलेले आपण कोण ?
रावण म्हणाला, "हे हंसनयने, मी वैभवशाली व मंदोदरीचा पति लंकाधीश रावण आहे. हे सुंदरी तुझ्याकरता मी हे रूप धारण केले आहे. हे वरारोहे, जनस्थानामध्ये त्या खर-दूषणांचा वध झाल्याचे श्रवण करून, माझ्या शूर्पणखा नामक भगिनीने पाठवल्यामुळे मी येथे आलो आहे. ज्याचे राज्य हरण केले आहे व ज्याची संपत्ती नाहीशी झाली आहे, अशा त्या निर्बल व वनवासी मानुष पतीचा त्याग करून तू मजसारख्या राजाचा अंगीकार कर.
मंदोदरीपेक्षा तू माझी उघड उघड पट्टराणी हो. हे तन्वंगी स्त्रिये, मी तुझा दास आहे. तू माझी स्वामिनी हो. लोकापालांचाही पराजय करणारा मी तुझ्या चरणी लीन होत आहे. म्हणून हे जानकी, माझा हात धरून तू आज मला सनाथ कर.
हे अबले, तुझ्याकरता पूर्वी मी तुझ्या पित्याची प्रार्थना केली होती. परंतु असा मी पण लावला आहे, म्हणून जनकाने मला सांगितले. तेव्हा रुद्रचापाच्या भीतीने मी स्वयंवराला आलो नाही. परंतु तुझे, ठिकाणी मग्न झालेले माझे मन विरहाने व्याकूळ झालेले आहे, पूर्वीच्या प्रेमामुळे मोहीत झालेल्या मला, तू या वनामध्ये आहेस अशी बातमी लागताक्षणी मी येथे आलो आहे. तेव्हा हे कृष्णवर्ण नेत्रांनी युक्त असलेल्या प्रिये तू माझा स्वीकार कर व माझ्या श्रमाचे साफल्य कर."