[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]
व्यास म्हणाले, "हे राजा, आता कुमारिकेचे लक्षण मी तुला सांगतो, ते श्रवण कर. अंगहीन कन्या वर्ज्य करावी. त्याचप्रमाणे कुष्ठाने वा व्रणाने अंकित, दुर्गंधयुक्त आणि म्हणूनच हीन अशा अवयवांनी संपन्न, दुष्ट कुलामध्ये उत्पन्न झालेली, जन्मांध, बटबटित अथवा खोल डोळे असलेली, काणी, कुरूप, शरीरावर फार केस असलेली, रोगीण आणि रजोदर्शने व यौवनचिन्हांनी युक्त अशा कन्या, पूजेसाठी वर्ज्य कराव्या. कृश, नुकतीच जन्मलेली, पिता मेल्यानंतर जारापासून उत्पन्न झालेली, अविवाहित स्त्रीपासून झालेली, ह्या कन्या वर्ज्य कराव्या. ह्या कन्यांचा पूजानादि कोणत्याही कर्मामध्ये कधीही स्वीकार करू नये.
रोगरहित, मनोहर अवयवांनी युक्त, सौंदर्यसंपन्न, व्रणरहित आणि जारापासून न झालेली जी कन्या तिचेच चांगल्या रीतीने पूजन करावे. ब्राह्मणी कन्या, सर्व कार्यांना उक्त असून जयाकरता क्षत्रिय कन्येचे पूजन करावे, आणि लाभाकरता वैश्य कन्येचे अथवा शूद्रकन्येचे पूजन करावे. पण ब्राह्मणांनी व क्षत्रियांनी ब्राह्मणीचेच पूजन करावे.
वैश्यांनी ब्राह्मण, क्षत्रिय व वैश्य ह्यांपैकी कोणत्याही वर्णाच्या कन्येचे पूजन करावे आणि शूद्रांनी चारी वर्णापैकी कोणत्याही कन्येचे पूजन करावे. त्याचप्रमाणे शिल्पीलोकांनीही आपापल्या जातीतील कन्यांचे नवरात्र विधीने भक्तिपूर्वक सर्वदा पूजन करावे.
नवरात्रातील प्रतिदिवशी पूजा करणे शक्य नसल्यास, विशेषतः अष्टमीला तरी पूजन अवश्य करावे. पूर्वी दक्षयज्ञाचा विध्यंस करणारी महाघोर भद्रकाली कोट्यवधी योगिनींसह अष्टमीला प्रकट झाली आहे. विशेषतःअष्टमीला सर्वदा पूजन करावे. नानाप्रकारचे उपहार, सुगंधी द्रव्ये, पुष्पे, उट्या, पायस, पूजकाला मांसभक्षण निषिद्ध नसल्यास मांस, ब्राह्मणभोजन आणि फलाचे व पुष्पांचे उपहार ह्यांच्यायोगाने जगदंबेला संतुष्ट करावे.
नवरात्रव्रतामध्ये उपोषण करण्यास जे समर्थ असतील त्यांनी तीन उपोषणे केली असता, ती त्यांना वर निर्दिष्ट केलेले फल देतात, असे म्हटले आहे. सप्तमी, अष्टमी व नवमी मिळून तीन दिवस उपोषण करून पूजन केले असता सर्व फल प्राप्त होते. देवताराधन, होम, कुमारीपूजन व ब्राह्मणभोजन ह्यांच्यायोगाने ते व्रत पूर्ण होते असे सांगितले आहे. इतर जी काही नानाप्रकारची व्रते व दाने ह्या भूतलावर आहेत, ती या नवरात्रव्रताची बरोबरी करणारी नाहीत. हे नवरात्रव्रत सर्वदा धनधान्यप्रद, सुख व संतान याची वृद्धी करणारे आणि आयुष्य आरोग्य, स्वर्ग व मोक्ष देणारे आहे.
जो पुरुष विद्यार्थी, धनार्थी अथवा पुत्रार्थी असेल, त्याने हे सौभाग्यदायक व मंगलप्रद शुभव्रत यथाविधी करावे. हे व्रत केले असता, विद्यार्थी पुरुषाला कोणतीही विद्या प्राप्त होते. राज्यापासून भ्रष्ट झालेल्या राजाला सर्व प्रकारे राज्य प्राप्त होते. खरोखर पूर्वजन्मी ज्यांच्या हातून हे उत्कृष्ट व्रत झालेले नसेल, तेच व्याधिग्रस्त, दरिद्री व निपुत्रिक होतात. जी स्त्री वंध्या, विधवा अथवा दरिद्री असेल तिन्ही पूर्वजन्मी हे व्रत केलेले नाही असे अनुमान करावे. हे वर सांगितलेले नवरात्रव्रत, ज्याच्या हातून भूतलावर घडले नाही, तो वैभव प्राप्त होऊन स्वर्गामध्ये आनंदाने कसा राहणार ?
रक्तचंदनयुक्त व कोमल अशा बिल्वपत्रांच्या योगाने ज्याने भवानीचे पूजन केले असेल, तोच पृथ्वीवर राजा होतो, कल्याणी, दुःख व संकट नाश करणारी, सिद्धी देणारी व जगतामध्ये श्रेष्ठ अशा अक्षय्य देवीचे ज्याच्या हातून आराधन झालेले नसेल तो मानव खरोखर ह्या भूतलावर दुःखग्रस्त शत्रुयुक्त व दरिद्री होतो. ब्रह्मा, विष्णू महेश्वर, इंद्र, अग्नि, कुबेर, वरुण व सूर्य हे सर्व मनोरथ परिपूर्ण झाल्यामुळे आनंदित होऊन जिचे ध्यान करीत असतात त्या चंडिकेला मनुष्यांनी का बरे भजू नये ?
स्वाहारूप व स्वधारूप मंत्रांच्या प्रभावामुळे अनुक्रमे देव पितर तृप्त होत असतात आणि म्हणूनच देवीचे ते स्वाहास्वधारूप नामयुग्म मुनिश्रेष्ठ सर्व यज्ञांमध्ये मंत्रांचे अंती योजीत असतात.
जिच्या इच्छेने प्रजाधिपति ब्रह्मदेव हे संपूर्ण विश्व उत्पन्न करतो आणि खरोखर शंभू प्रलयकाल प्राप्त झाला असता, जिच्या इच्छेने या विश्वाचे भस्म करतो, त्या कल्याणदायक देवीला मनुष्य का बरे भजणार नाही ? सर्व भुवनामध्ये 'देव, मानव, पक्षी भुजंग, गंधर्व, राक्षस, पिशाच व वृक्ष यापैकी एकही तिच्या शक्तीशिवाय खरोखर हालचाल करण्यास समर्थ नाही.
सर्व मनोरथ परिपूर्ण करणार्या त्या चंडीची सेवा कोण बरे करणार नाही ? आणि धर्म, अर्थ काम व मोक्ष यांची इच्छा करणारा कोण बरे तिचे व्रत करणार नाही ? महापातकी पुरुषाने नवरात्रव्रत केल्यास तोही सर्व पातकांपासून मुक्त होतो, यांत संशय नाही.
हे नृपश्रेष्ठा, पूर्वी कोसलदेशामध्ये सुशील या नावाचा एक वाणी निर्धन, कष्टी व अत्यंत दुःखी होता. क्षुधेने पीडित अशी पुष्कळच अपत्ये त्याला होती. सायंकाळी एकावेळीच त्याच्या बालकांना काहीतरी भक्ष्य प्राप्त होत असे. दुसर्याचे कार्य करणारा हा बुभुक्षित वाणीही सायंकाली एकदाच भोजन करीत असे व अतिशय शांत राहून कुटुंबपोषण करीत असे.
सर्वदा धर्मनिष्ठ, शांत, सदाचारसंपन्न, सत्यवचनी, क्रोधहीन, धैर्यवान, मदरहित आणि निर्मत्सर राहून तो वाणी देव, पितर व अतिथि यांचे नित्य पूजन करीत असे आणि पोष्यवर्ग भोजन करू लागला, म्हणजे मग स्वतःभोजन करीत असे. अशा रीतीने त्याच्या आयुष्याचे दिवस जाऊ लागले. नावाने व गुणांनीही सुशील असलेला तो वाणी दारिद्र्याने गांजून गेल्यामुळे अतिशय बुभुक्षित होऊन, एके दिवशी एका शांत ब्राह्मणास कारण विचारू लागला.
सुशील म्हणाला, "हे महाविचारी विप्रा माझ्या दारिद्र्याचा नाश निश्चयाने कसा होईल. हे आपण मला आज कृपा करून सांगा. हे मान्य मुने, मी धनिक असावे अशी धनेच्छा मला मुळीच नाही. परंतु हे द्विजोतमा केवळ कुटुंबपोषणाकरता, मी आपणाला हा प्रश्न करीत आहे. मुलगी व माझा लहान मुलगा खाण्याकरता अतिशय रडत असतो. पण त्याला एक मूठभर अन्न देईन म्हणावे तर तितकेसुद्धा माझ्या घरामध्ये नसतें. ह्या कारणाने आज मी त्याला हाकून लावले, तेव्हा, तो बालक रडत रडत घराबाहेर कोठे तरी गेला आहे. त्यामुळे माझ्या मनाला अतिशय दुःख होत आहे.
अहो, द्रव्यावाचून मी करू तरी काय ? माझ्या कन्येचा विवाह कर्तव्य आहे. परंतु वित्त नाही. ह्याला मी तरी काय करू ? दहा वर्षांपेक्षा तिचे वय अधिक झाल्यास तिच्या दानाचाही काल पूर्णपणे निघून जाणार. त्या काली दहा वर्षे हाच कन्याविवाहकालाचा परमावधी समजला जात होता.
यामुळे हे विप्रप्रेष्ठा, मला फार दुःख होत आहे. हे दयानिधे, आपण सर्वज्ञ आहा. म्हणून मला काही तप, दान, व्रत अथवा मंत्रजप कथन करा. म्हणजे हे द्विजा, मी पोष्यवर्गाचे पोषण करण्यास योग्य होईन. त्याच्या पोषणापुरते मला धन मिळाले म्हणजे झाले. खरोखर मला अधिक धनाची इच्छा नाही. आपल्या प्रसादाने माझे कुटुंब येथे सुखाने राहील अशी काही तरी व्यवस्था बुद्धिपूर्वक विचार करून आपण मला सांगा."
व्यास म्हणाले, "हे नृपश्रेष्ठा, ह्याप्रमाणे त्याने विचारले असता निर्मल आचरणाने युक्त असलेला, तो ब्राह्मण अतिशय संतुष्ट झाला. तो त्या वैश्याला म्हणाला, हे श्रेष्ठ वैश्या, तू आज शुभ नवरात्रव्रत कर. भगवतीचे पूजन, हवन, भोजन, वेदपरायण, शक्ति मंत्राचा जप, होम वगैरे तू आज यथा शक्ति कर. म्हणजे तुझे इष्ट कार्य पूर्ण होईल. भूतलावर यापेक्षा दुसरे कोणतेही श्रेष्ठ व्रत नाही. हे वैश्या, हे नवरात्रव्रत पावन, सुखप्रद, ज्ञान व मोक्ष देणारे, धन व संतान ह्यांची वृद्धी करणारे, आणि शत्रूंचा खरोखर सर्वथा नाश करणारे असे आहे. राज्यभ्रंश होऊन सीतेचाही वियोग झाल्यामुळे दुःखाकुल झालेल्या रामाने किष्किंधेमध्ये हे व्रत केले होते. सीताविरहरूप अग्नीने संतप्त झाला असूनही रामाने नवरात्रव्रताच्या योगाने, देवीचे यथाविधी पूजन केले. त्यामुळे महासागरात सेतू बांधून व महाबलाढ्य रावण, कुंभकर्ण आणि मेघनाद ह्यांचा वध करून, त्याने सीता प्राप्त करून घेतली. बिभीषणाला लंकेचे राज्य देऊन अयोध्येमध्ये परत आल्यानंतर निष्कंटक राज्यही त्या रामाला प्राप्त झाले. तेव्हा हे श्रेष्ठ वैश्या, ह्या नवरात्रव्रताच्या प्रभावाने महातेजस्वी राजाला भूतलावरील सर्व सुखे प्राप्त झाली.
व्यास म्हणाले, "हे राजा, ब्राह्मणाचे भाषण श्रवण केल्यावर त्या वैश्याने त्या द्विजाला गुरु केले. मायाबीजसंज्ञक उत्कृष्ट भुवनेश्वरीमंत्र त्याने त्याच्या पासून स्वीकारला. नऊ दिवसपर्यंत तत्पर राहून त्याने परम भक्तीने त्या मंत्राचा जप केला आणि नानाप्रकारच्या उपाहारांनी त्याने त्या भगवतीचे आदरपूर्वक पूजन केले.
ह्याप्रमाणे नऊ वर्षेपर्यंत तो त्या मायाबीजसंज्ञक मंत्राचा एकसारखा जप करीत राहिला असता, नवव्या वर्षाचे शेवटी, महाष्टमीचे दिवशी महेश्वरीने मध्यरात्रीचा समय झाला असता, त्याला प्रत्यक्ष दर्शन दिले व नानाप्रकारचे वर देऊन त्याला कृतार्थ केले.