[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]
सुदर्शन हा सुहृदांसह अयोध्येस राजा झाल्यानंतर शोकाकुल झालेल्या शत्रुजिताच्या मातेला प्रणाम करून तो म्हणाला, " हे माते, संग्रामामध्ये मी खरोखर, तुझ्या पायाची शपथ घेऊन सांगतो की, तुझ्या पुत्राचा व तुझ्या पित्याचा वध मी केला नाही. दुर्गेने संग्रामामध्ये त्यांचा वध केला आहे. ह्यात माझा अपराध नाही. अवश्य घडून येणार्या गोष्टीचा प्रतिकार होणे शक्य नसते. हे मानिनी, मृतपुत्राबद्दल तू शोक करू नकोस. जीत स्वकर्माचे अधीन असतो, कर्मानुसार सुखदुःखाचा उपभोग घेत असतो. हे माते मी तुझा दास आहे. हे धर्मज्ञ, जशी मला मनोरमा तशीच तू , तुम्हा उभयतांविषयी माझ्या मनामध्ये यत्किंचितही भेद नाही.
केलेले बरे वाईट कर्म ज्याअर्थी भोगलेच पाहिजे. त्याअर्थी सुख प्राप्त झाले असता हर्ष, व दुःख प्राप्त झाले असता शोक, तू कधीही करू नकोस. दुःख प्राप्त झाले असता अधिक दुःखी लोकांकडे दृष्टी देऊन शोकाकूल होऊ नये. सुख प्राप्त झाले असता अधिक सुखी लोकांकडे लक्ष देऊन हर्षाने उचंबळू नये. शत्रूप्रमाणे असलेल्या हर्षशोकाशी आपला संबंध ठेवू नये. हे सर्व दैवाधीन आहे आपल्या आधीन कधीही नाही. विचारी पुरुषाने अंतःकरण दुःखाने शुष्क करून घेऊ नये. ज्याप्रमाणे नटादिकांच्या अधीन असलेली लाकडाची पुतळी हालचाल करीत असते. त्याप्रमाणे स्वकर्माधीन असलेला देहधारी प्राणी, सर्वत्र हालचाल करीत असतो.
हे माते, मी वनामध्ये गेलो असताही वनात दुःखी झालो नाही. कारण, स्वतः केलेले कर्म भोगले पाहिजे, हे मी जाणीत असतो व मनामध्ये वागवितही असतो. मातामह ह्याच ठिकाणी मृत झाला असता माझी अनाथ माता भयभीत झाली आणि मला घेऊन गहन वनामध्ये गेले. जाता जाता बालपुत्राने युक्त असलेल्या, त्या निराश्रित मातेला मार्गात चोरांनी लुटून वस्त्रहीन केले आणि प्रवासामध्ये उपयोगी पडणारे सर्व उपजीवन - साधनही त्यांनी लुबाडून घेतले. अशा स्थितीत माता मला घेऊन भारद्वाजाश्रमामध्ये गेली. तेथे हा विद्दल व ही अबला दाई आम्हास येऊन मिळाली. आम्ही तिघे त्या ठिकाणी राहिलो व दयाळू मुनी आणि मुनिकन्या ह्यांनी फले व धान्य ह्यांच्या योगाने आमचे सर्वस्वी पोषण केले.
त्यावेळी मला दुःख झाले नाही व आज वैभव प्राप्त झाल्यामुळे सुखही वाटत नाही. वैर अथवा मात्सर्य माझ्या अंतःकरणामध्ये कधीही नसते. हे महातपस्वी माते, राज्यलाभापेक्षा निवाराभक्षण हेच श्रेष्ठ होय. राज्यभोग सेवन करणारा मनुष्य नरकात जातो. परंतु नीवार भक्षण करणार्याला, कधीही अधोगती प्राप्त होत नाही. ह्यास्तव इंद्रियवर्गाचे संयमन करून, विचारी पुरुषाने धर्माचरण करावे, म्हणजे नरकप्राप्री होत नाही. हे माते, कोणत्याही योनीमध्ये आहारादि सुख बरोबर प्राप्त होतच असते. परंतु ह्या शुभ भरत खंडामध्ये मनुष्यजन्म प्राप्त होणे दुर्लभ आहे. पुरुषांना स्वर्ग व मोक्ष देणारे जे धर्मरूप साधन ते अन्य योनीमध्ये दुर्लभ आहे, त्याचे अवलंबन मनुष्यदेह प्राप्त झाल्यावर अवश्य करावे.
याप्रमाणे त्या सुदर्शनाने सांगितले असता लीलावती अतिशय लज्जित झाली, पुत्रशोकाचा त्याग करून व नेत्रामध्ये अश्रू आणून त्याला म्हणाली, "हे पुत्रा, ज्याने तुझ्या मातामहाचा वध करून तुझे राज्य हरण केले, त्या माझ्या पित्याने युधाजितानेच मला अपराधी केले आहे. त्या वेळी मी समर्थ झाले नाही. म्हणून हे पुत्रा, त्यानेच ते कर्म केले. त्यात माझा अपराध नाही. हे आपल्या कृतीनेच मृत्यू पावले आहेत. तू त्यांच्या मृत्यूचे कारण नाहीस. यास्तव मला त्या पुत्राचे दुःख होत नसून त्याच्या कृतीचे मात्र सर्वदा दुोःख होत आहे. हे कल्याण, तू पुत्र आहेस व मनोरमा माझी
भगिनी आहे. हे पुत्रा, मला मुळीच वाईट वाटत नाही आणि तुझ्याविषयी माझ्या मनामध्ये यत्किंचितही क्रोध नाही. हे महाभाग्यशाली सुव्रता, भगवतीच्या प्रसादाने प्राप्त झालेले हे निष्कंटक राज्य तू कर."
मातेचे भाषण श्रवण केल्यावर तो राजकुमार सुदर्शन, तिला वंदन करून जेथे पूर्वी मनोरमा होती त्या रम्य गृहामध्ये गेला. तेथेच राहू लागला. तेथे जाऊन तो वास्तव्य करू लागल्यावर सर्व मंत्री त्याने बोलावून आणले. दैवज्ञ ब्राह्मणांना त्याने शुभ दिवस व मुहूर्त विचारला.
त्याने सुवर्णाचे मनोहर सिंहासन करवले. तो म्हणाला, "ह्या सिंहासनावर स्थित असलेल्या देवीचे मी सर्वदा पूजन करीन. प्रथमतः धर्म, अर्थ काम व मोक्ष देणार्या देवीची सिंहासनावर स्थापना केल्यानंतर रामदिकाप्रमाणे मी राज्य करीन. सर्व नागरिकजनांनी देवीचे पूजन करावे. सर्व मनोरथ परिपूर्ण करणार्या त्या शिवशक्तीला मान द्यावा."
ह्याप्रमाणे राजाने सांगितले असता त्या मंत्र्यानी ती राजाची आज्ञा शेवटास नेली. त्याप्रमाणे शिल्पिजनांकडून एक अति मनोहर देवालय करविले. एक सुंदर मूर्ती करवून त्या सुदर्शन भूपालाने द्विजांना निमंत्रण केले. शुभ दिवशी सुमुहूर्तावर त्याने त्या मूर्तीची स्थापना केली. प्रथम यथाविधी हवन करून, त्या विचारी राजाने देवतांचे पूजन केले. नंतर त्या वेळी वाद्यध्वनी, ब्राह्मणांचा वेदघोष व नानाप्रकारची गीते ह्यांच्या योगाने तेथे उत्सव सुरू झाला.
त्या कल्याणी देवीची वेदवेत्त्यांकडून ह्याप्रमाणे यथाविधी स्थापना केल्यानंतर, राजाने अतिशय विधीपूर्वक तिचे नानाप्रकारांनी पूजन केले. नंतर त्याने आपल्या पित्याच्या राज्याचा स्वीकार केला. तो त्या कोसलदेशामध्ये फार विख्यात झाला. तेव्हांपासून अंबिका देवीही त्या देशात विख्यात झाली. राज्य प्राप्त झाल्यानंतर सर्व मांडलिक राजे त्याने वश केले इतकेच नव्हे, तर सद्धर्माचे जय मिळवणार्या त्या सुदर्शन राजाने, त्या मांडलिक राजांनाही अति धर्मनिष्ठ केले.
तो स्वराज्यामध्ये रामाप्रमाणे, तसेच दिलीपपुत्र रघूप्रमाणे सर्वांना प्रिय झाला. प्रजाजनांना सुखही तसेच झाले. धर्ममर्यादाही तशीच कायम राहिली. वर्णाश्रमधर्म त्याचे कारकीर्दीत पूर्ण चतुष्पाद होता. भूतलावर कोणाचेही मन अधर्माकडे रमत नसे. त्याच्या राज्यात प्रत्येक ग्रामामध्ये, त्याचप्रमाणे इतर राजांनीही देवीची देवालये बांधली. याप्रमाणे कोसल देशामध्ये देवीचे पूजन त्यांनी प्रेमपूर्वक सुरू केले.
सुबाहूनेही पूर्वी काशीमध्ये एक देवालय तयार करवले. दुर्गेची शुभ मूर्ती करवून त्या देवालयात भक्तीने स्थापन केली. तेव्हा तेथील सर्व लोकांनीही विश्वेश्वराप्रमाणे तिचे पूजन, प्रेम व भक्तिने यथाविधी सुरू केले. तेव्हापासून ती दुर्गादेवी भूतलावर विशेष प्रख्यात झाली. प्रत्येक देशामध्ये तिची भक्ती वृद्धिंगत होऊ लागली.
भरतखंडामध्ये सर्व ठिकाणी सर्व वर्णातील सर्व लोक सर्व प्रकारे भवानीचे पूजन करू लागले. हे राजा, शक्तिभक्तीविषयी तत्पर आणि आगमोक्त स्तोत्रपाठासह एकसारखे जप व ध्यान करीत असलेले सर्व लोक मानास पात्र झाले. भक्तीविषयी तत्पर असलेले सर्व प्रजानन त्या दिवसापासून प्रतिवर्षी नवरात्रांमध्ये देवीचे यथाविधी अर्चन, हवन व यजन करू लागले.